विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वृक्षसंवर्धन:- झाडें लावणें, त्यांचें संरक्षण करणें त्यांनां रोग वगैरे कांहीं झाल्यास त्यांवर औषधयोजना करणें इत्यादि गोष्टी वृक्षसंवर्धनामध्यें मोडतात. बागवाला झाडांच्या वार्षिक उत्पन्नाकडे म्हणजे झाडांपासून फळें, फुलें, पानें इत्यादि किती उत्पन्न होतील या गोष्टींकडे लक्ष देऊन झाडें लावतो; जंगलखात्याचे अधिकारी झाडांपासून विशेषत: इमारती लांकूड किती मिळेल याचा विचार करतात. परंतु वृक्षवेत्त्यांचें मुख्य लक्ष झाडांचें सौंदर्य, आकार, छाया, फुलें यांकडे विशेष असतें. अग्निपुराणांत 'वृक्षायुर्वेद' म्हणून एक शास्त्र आलें आहे. त्यांत वृक्षांची लावणी व संजोगणी कशी करावी, त्यांची कीड व अनेक रोग कसे घालवावे ह्याचें विवेचन आहे. प्रथम कोणत्या दिशेचा कोणता वृक्ष चांगला ह्यांचें विवेचन आहे. प्लक्षवृक्ष हा उत्तरेकडील, वटवृक्ष प्राचीकडील आम्रवृक्ष दक्षिणेकडील असला तर शुभदायक होतो. वृक्षारोपणास मूळ, हस्त मघा, इत्यादि नक्षत्रें उत्तम मानलीं आहेत वृक्षवेलींची लागवड करण्यापूर्वी औषधीपति चंद्र व ब्राह्मण, हंस यांची पूजा करून वृक्षारोपण करावें. व अशोक, कदली, जंबु, बकुल, दाडिम इत्यादि वृक्षांनां उन्हाळ्यांत सकाळ सायंकाळ, व हिंवाळ्यांत एक दिवसाआड पाणी घालावें. वृक्षवेलींची लागवड २० हातांवर केली तर उत्तमच परंतु निदान १५।१६ हातांवर करावी. वारंवार त्यांचें स्थानांतर करावें. वृक्षाची पालवी फार दाट झाली तर त्यास फळें येणें कमी होतें व याकरितां वारंवार शस्त्रांनीं लतावेलींचीं छाटणी करावी. फळें येत नसलीं तर तूप अगर थंड पाणी ह्यांचें सिंचन, त्याचप्रमाणें कुळीथ, जवस किंवा तीळ ह्यांचें खत घालावें, त्याचप्रमाणें मेंढयांच्या लेंड्या, गोमांस वगैरे घालावें. वृक्षांच्या मुळाशी मासे, मांसयुक्त पाणी घातलें असतां त्वरित फळें येऊ लागतात. अशा प्रकारची प्राचीन माहिती आढळते.
झाडें लावल्यापासून मुख्य फायदे हातात ते असें:- (१) ज्या ठिकाणीं झाडें असतात त्या ठिकाणीं झाडांचीं पानें उष्णता उत्पन्न करणारे सूर्याचें किरण शोशून हवा थंड करतात. झाडें पार नाहीशी झालेल्या ठिकाणच्या हवामानांत बराच फरक पडला आहे; (२) झाडें जमिनींतील पाणी वर शोशून घेतात तें पानांच्या द्वारें हवेंत पसरलें जाते. ह्यामुळें हवेंतील वाफ वाढून ती पाऊस अधिक पडण्याला कारणीभूत होते; (३) झाडें लावल्यानें मुळ्या जमिनींत खोल जातात, त्यांच्या योगानें पाऊस पडेल तो झटदिशी वाहून न जातां जमिनींत मुरतो. याच्या योगानें जमिनींतींल पाण्याचा सांठा वाढून नद्या, नाले, झरे, विहिरी यांचें पाणी कायम रहातें. झाडें नाहींशी झाल्यानें झरे व विहिरी यांचें पाणी कमी झाल्याचीं उदाहरणें आहेत; (४) झाडांखालील जमिनीवर सावली असल्यामुळें तिच्यांतील पाणी लवकर उडून जात नाहीं; (५) झाडांमुळें जमीन बांधली जाते, झाडें नसतील तर जमीन लवकर धुपून जाईल; (६) झाडांपासून खत, इमारती लांकूड; फळें व फुलें इत्यादिं मिळाल्यानें शेतकी व उद्योगधंदे यांस साहाय्य होतें.
झाडें लावण्याला योग्य स्थळें म्हटलीं म्हणजे पर्वत, डोंगर, टेंकड्या, माळ व इतर पडित जमिनी हीं होत; त्याचप्रमाणें नद्या, नाले, ओहोळ, तळीं व कालवे यांच्या कांठावर, शेतांच्या सभोंवतीं, सर्व प्रकारचे रस्ते, सडका यांच्या बाजूनें व शहरांतील सर्व रस्त्यांच्या बाजूनें झाडें लावण्याचे प्रयत्न अवश्य व्हावयास पाहिजेत.
सडकेच्या कडेला फार मोठीं होणारीं झाडें लावावींत. सडका चांगल्या रूंद असल्यास तीं समोरासमोर लावावींत. तसें नसेल तर एका आड एक अशी लावावींत; त्यांची छाया गर्द असावी. मधून मधून पांगारा, सांवरी, पळस, गुलमोहर यांसारखीं सुंदर फुलें येणारीं झाडें लावणें चांगलें. सुरू, निंब, उंडी, खिरणी, सिल्व्हर ओक, टेंभुर्णी, चिंच महोगनी, कदंब, मुचकुंद, बिबरळ, अशोक, गुलमोहर, बकुल, हीं झाडें शहरांत लावण्यास योग्य आहेत.
वरील झाडांशिवाय ऐन, किंजळ, अर्जुनसादडा, जंगली बदाम, बेहडा, हिरडा, साग, गोरखचिंच, भेंड, जंगली अक्रोड, रोहितक, बांबू, मिरलीमाड, ताम्हण, चेंडूफळ, सामन, धूप, पळस, शमी, खैर वगैरे झाडें जमीन व हवामान पाहून लावावीं. हीं झाडें लावून पहिलीं चार पांच वर्षेपर्यंत काळजी घेतल्यास पुढें त्यांची काळजी घ्यावी लागत नाहीं. ज्या जमिनींत पीक वगैरे घेणें सोईचें नसतें अशा जमीनींत जंगलीं झाडें लावल्यास तीं तीस वर्षांनीं तोडण्यासारखीं होतात. व त्यांचें उत्पन्न कोरडवाहू जमीनींतील पिकांपेक्षां पुष्कळच जास्त येतें. ज्या लोकांनां नोकरीमुळें व इतर कांहीं कारणांमुळें बरींच वर्षेपर्यंत आपल्या हलक्या जमीनीकडे लक्ष देण्यास फुरसत नसेल त्यांनीं आपल्या जमीनींत योग्य तीं झाडें लावण्याची तजवीज केल्यास विम्याच्या पॉलिसीप्रमाणें पेंशन घेतेवेळीं एकदम रक्कम मिळण्याला मुळींच हरकत पडणार नाहीं. झाडांची पहिली पांच वर्षेपर्यंत जोपासना करण्यास लागलेला खर्च ही वार्षिक प्रीमियमची रक्कम होय. नंतर पुढें पंचवीस वर्षांनीं एकदम मिळालेलें मोठें उत्पन्न ही पॉलिसीची रक्कम होय. झाडें बेतानें तोडल्यास हें उत्पन्न सतत मिळण्यास हरकत नाहीं.
झाडांची अभिवृध्दि:- वनस्पतींची अभिवृध्दि मुख्यत: बियांच्या रूपानें होत असते; पंरतु मनुष्यानें निरनिराळ्या कृतींनीं आपल्याला इष्ट अशा सुधारणा घडवून आणल्या आहेत. वनस्पतींत कांहीं ना कांहीं तरी विशेष हा असतोच. हा विशेष आनुवंशिक असला तर त्यांच्या संततीमध्ये तो विशेष दृष्टीस पडेल, नसेल तर तो दृष्टीस पडणार नाहीं. वनस्पतींमध्यें विशेष आहे पण तो आनुवंशिक आहे किंवा नाहीं हें शोधून काढण्याला कधीं कधीं फार काळ लागतो. यासाठीं हा विशेष इष्ट असेल तर कायम ठेवण्यासाठीं नरमादीच्या संयोगापासून होणार्या संततीचा मुळींच उपयोग न करतां मनुष्य त्या वनस्पतीच्या एखाद्या भागाचाच उपयोग करतो. पहिल्या प्रकारामध्यें खरें वंशसंवर्धन होत असतें व दुसर्या प्रकारामध्यें फक्त व्यक्तीचीच वृध्दि होत असते.
झाडांपासून बीं तयार झाल्यावर त्यांच्यापासून झाडें तयार करण्याकरितां ज्याठिकाणीं किंवा प्रांतांत झाडें लावावयाचीं असतील त्याच प्रांतांत वाढलेल्या झाडांचें बीं घ्यावें; याचें कारण असें कीं त्या त्या ठिकाणच्या हवामानाला तीं झाडें निर्ढावलेलीं असतात व हे गुण बियांमध्यें उतरलेले असतात. बी चांगल्या पक्व झालेल्या फळांचे किंवा शेंगांचे असावें. तसेंच बीं घ्यावयाचें तें फार लहान अगर अगदीं जुनाट झाडाचेंहि घेऊ नये, मध्यम वयाच्या झाडाचें घ्यावें. बी अगदीं निरोगीं असून तें निरोगी झाडाचेंच घ्यावें. सामान्यत: सर्व फळझाडांचें बीं ताजें असावें लागतें. निदान तें एक वर्षापेक्षां जुनें केव्हांहि असू नये. बीं पेरण्यासाठीं वाफे सुमारें तीन फूट रूंद व सहा किंवा आठ फूट लांब असे असावें; व ते जमिनीपासून तीन इंच तरी उंच असावे. ते तयार करण्यासाठीं सर्व जमीन पहिल्यानें नांगरून अगर खणून घ्यावी व तींतील ढेंकळें फोडून माती भुसभुशीत व बारीक करावी. नंतर तींत पाल्याचें कुजलेलें खत प्रत्येक वाफ्यास चार घमेलीं याप्रमाणें घ्यावें. जमीन फार काळी अगर चिकण असल्यास वाफ्यांत चार घमेलीं नदींतील वाळू मिसळावी. नंतर वाफे सपाट करून त्यांत बीं पेरावें. वाफें नेहमीं उघड्या जागेंत असावें. पण उन्हाळ्यांत बीं रूजण्यापूर्वी दिवसा अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत त्यांवर थोडी सावली करावी. पावसाळ्यांत व हिंवाळ्यांत सावली करण्याचें कांहीं कारण नाहीं. बीं खोल पुरलें असतां मोडला वर येण्याला वाव मिळत नाहीं. व माती फार चिकण असल्यास बीं रूजतांना त्याला पुरेसा आक्सिजन (प्राणवायु) मिळत नाहीं. यासाठीं बीं वर लावणें व माती भुसभुशीत ठेवणें अत्यंत जरूर असतें. बीं रूजतांना त्याला उष्णतेचीहि जरूर असते परंतु महाराष्ट्रांत बीं रूजण्यापुरती उष्णता जमिनींत नेहमींच असतें.
केव्हां केव्हां वाफ्यांत बीं लावणें सोईचें नसतें; यामुळें तें कुंड्यांत किंवा परळांत अगर खोक्यांत लावावें लागतें. परळांत बीं लावण्यापूर्वी परळाच्या तळाशी एक लहानसें भोंक पाडावें. परळाच्या अगर खोक्याच्या तळावर फुटक्या मडक्याचे अगर कुंड्यांचे लहान लहान तुकडे करून त्यांचा एक थर घालून त्यावर थोडा वाळलेला पाला पसरून घालावा म्हणजे या सर्वांतून पाणी निचरून जाईल पण माती मात्र निघून जाणार नाहीं. परळ व खोकें भरण्यासाठीं नदीकांठची तांबडी माती, बारीक वाळू व पाल्याचें कुजलेलें व बारीक केलेलें खत अशी समभाग एकत्र मिसळून त्यानें परळ व खोकीं भरावीं व त्यांत वर सांगितल्याप्रमाणें बीं पेरावें. परळांत व खोक्यांत बीं वाफ्याइतकें खोल लावावें लागत नाहीं. पाणी झारीनें द्यावें. वाफे, परळ व खोकें यांतील माती खालपर्यंत ओली व्हावयास पाहिजे. नाहीं तर वरची माती ओली व खालची कोरडी राहिल्यास बीं रूजून आल्यावर लवकरच मान टाकतें. परळ व खोकें बीं रूजल्याबरोबर उन्हांत ठेवणें जरूर असतें. नाहीं तर रोप सुतळून निर्जिव होतें. रोप तीन अगर चार इंच वाढलें म्हणजे तें दुसरीकडे बदललें पाहिजें. रोप बदलण्याचा हंगाम पावसाळ्याचा आरंभ हा होय. हा न साधेल तर जूनपासून फेब्रुवारीपर्यंत बदलणी केव्हांहि केली तरी हरकत नाहीं. रोपें लावण्यासाठीं चांगल्या उघड्यावरची जागा पसंत करावी. नंतर एक एक फूट अंतरावर लांब लांब सर्या पाडून सर्यांच्या वरंब्यावर नऊ नऊ इंच अंतरावर रोपें लावावीं व लगेच सर्यांतून पाणी द्यावें. म्हणजे रोपांना जास्त पाणी होणार नाहीं; व त्यांच्या मुळ्या पोकळ जमीनींत शिरल्यामुळें रोपें वाढण्यास मुळींच अडचण पडणार नाहीं. एक महिन्याच्या अंतरानें सर्यांतील माती हालवून वरंबे नीट करावे. अशा रीतीनें रोपें लावल्यास तीं फार चांगलीं होतात. लहान झाडांचा धंदा करणारांची वहिवाट सर्व रोपें सर्यावर न लावतां ती एका वाफ्यांतच फार जवळ जवळ लावण्याची आहे; या रीतीनें जागा थोडी पुरते ही गोष्ट खरी आहे परंतु रोपें तितकीं चांगलीं होत नाहींत. यामुळें वरीलप्रमाणें रोपे केल्यास तीं चांगलीं होतात व तीं विलायती काट्यानें काढल्यास तीं फारच सुरेख निघतात. रोपें सहा महिन्यांनीं अगर निदान एक वर्षानें तरी बदललीं पाहिजेत. नाहीं तर त्यांच्या मुळ्या फार दूरवर जाऊन झाडे काढतेवेळीं त्या तुटतात व त्यामुळें झाडें मरण्याचा फार संभव असतो. अशा रीतीनें कागदी लिंबू, सिताफळ, पेरू, रामफळ, डाळिंब वगैरेंचीं झाडें तयार करावीं.
ताणें, गुटी, जडवे, फांटे:- ताणे-वर सांगितल्याप्रमाणें वनस्पतींची वाढ बीं लावून करतां येते, परंतु कित्येक झाडे अशी आहेत कीं, त्यांनां बीं चांगलें येत नाहीं, कदाचित आलें तर तें खात्रीलायक निघेलच असें नाहीं; यासाठीं कित्येक वनस्पतींमध्यें बियांशिवाय निराळ्या पध्दतीनेंच वंशवर्धनाचें काम होत असतें. उदाहरणार्थ:- केळीसारख्या कित्येक वनस्पतींमध्यें जमीनींत राहिलेल्या कांद्यावर नवीन धुमारे फुटतात. हे धुमारे मूळच्या कांद्यापासून सोडवून दुसरीकडे लावले तरी त्यांपासून चांगलीं फलदायी झाडें होतात. आलें, हळद हीं या प्रकारचींच उदाहरणें होत. दुसर्या कांहीं वनस्पती अशा आहेत कीं त्यांच्या मुळ्या जमीनींत कांहीं अंतरावर पसरत गेल्या म्हणजे त्यांनां त्यांच्या टोंकाशी धुमारे फुटून त्यांचीं नवीन लहान लहान झाडें तयार होतात. उदाहरणार्थ घायपात, अननस वगैरे यांच्या बुंध्यापासून अगर खालच्या कांद्यापासून नवीन धुमारे फुटतात. आणखी उदाहरणें:- कावळालिंब, जंबुरी वगैरे. अननसाच्या फळावर जो तुरा येतो तो काढून लावला असतां देखील त्याला मुळ्या फुटून त्याचें झाड तयार होतें. हा तुरा म्हणजे फुलाच्या मोठ्या झालेल्या पार्या होत. कांहीं वनस्पती अशा आहेत की त्या उंच वाढत न जातां त्यांचा शेंडा जमीनीबरोबर पसरत जाऊन कोठें तरी जमीनीला टेंकला म्हणजे तेथेंच त्याला मुळ्या फुटतात. अशा प्रकारचे मुळ्या फुटलेले शेंडे निराळे काढून दुसरीकडे लाविले असतां त्यांच्यापासून चांगलीं झाडें तयार होतात. उदाहरणार्थ:- स्ट्रॉबेरी (इश्टापुरी), दूर्वा वगैरे. अशा प्रकारच्या रोपांनां ताणे असें म्हणतात.
गुटी:- कित्येक झाडें अशी आहेत कीं त्यांच्या फांद्या जमीनींला टेंकत नाहींत व त्यांचा जमीनीशी संबंधहि येत नाहीं. अशा झाडांच्या फाद्यांची साल दीडदोन इंच लांबीची सर्व बाजूनें काढून त्यावर माती लिंपून ती तरटानें बांधून त्याजवर नेहमीं पाणी पडून तें बांधण नेहमीं ओलें राहील अशी तजवील केली तर त्या बांधण्याच्या ठिकाणीं मुळ्या फुटतात; या कृतीला गुटी करणें अगर जडवे बांधणें असें म्हणतात. चिकू, पपनस, कागदी, लिंबू, गुलाब वगैरे झाडांची वाढ गुटीपध्दतीनें करतां येते.
जडवे:- गुटीचा दुसरा एक पोटभेद आहे; त्यामध्यें फांदीची साल सर्व बाजूंनीं न काढतां फांदीचें लांकूड शेंड्याकडे अर्धा-दीड इंचपर्यंत चिरावयाचें. चिरण्यासाठीं आरंभ फांदीच्या खालच्या बाजूनें व डोळ्याच्याखालीं (बुंध्याकडील बाजूला) करावा. व काप पहिल्यानें फांदीच्या अर्ध्या जाडीइतका गेला म्हणजे तो शेंड्याकडे वळवावा, म्हणजे फांदीच्या खालच्या बाजूला एक जिभलीसारखा दीड इंच भाग मोकळा होईल व जिभलीचें टोंक झाडाकडील बाजूला मोकळें राहील. नंतर या जिभलीमध्यें लहानशी पातळ पाचर घालून ती फांदी एका परळांत खत-माती घालून त्यांत दाबून ठेवावी; फांदी वर उचलूं नये म्हणून तिच्यावर एक दगड ठेवून द्यावा व परळांत नेहमीं पाणीं घालावें. कांहीं दिवसांनीं जिभलीपासून मुळ्या फुटतील. मुळ्या फुटल्या म्हणजे फांदी तोडण्याला हरकत नाहीं; परंतु एकदम न तोडतां ती थोडी थोडी आठ आठ दिवसांच्या अंतरानें कापीत जावी. शेवटचा काप घेतल्यावर आतां नवीन स्वतंत्र झालेला भाग अगर रोपा दुसर्या कुंड्यांत नेऊन लावावा. अशा रीतीनें चिकू, पपनस, कागदी लिंबू, पेरू वगैरे झाडांचीं नवीन रोपें करतां येतात. ही पध्दत विशेषत: शोभिवंत झाडांची अभिवृध्दि करण्याकरितां उपयोगांत आणतात. उदाहरणार्थ फिलिसियम बोगेन व्हिलिया वगैरे.
फांटे:- आणखी कित्येक झाडें अशी आहेत कीं त्यांचा एखादा तुकडा मोडून तो ओलसर जमीनींत कांहीं दिवस रोंविला तर त्याला खालच्या बाजूला मुळ्या फुटून वरच्या बाजूला फांद्या फुटतात. अशा तुकड्यांनां फांटे असें म्हणतात. फांटे करावयाचे ते बहुधा जून भागाने घ्यावे, कोंवळ्या भागाचे घेऊ नये. खालचा छाट पानांच्या गांठीखालीं घ्यावा व वरचा छाट पानाच्या वरच्या बाजूला घ्यावा. प्रत्येक फांट्याला दोन तीन पेरी तरी असावींत. फांटे लावावयाचे ते भुसभुशीत जमीनींत लावले असतां त्यांनां मुळ्या लवकर फुटतात. तसेंच ते उभे न लावतां जरा तिरकस लावले असतांहि त्यांनां मुळ्या लवकर फुटतात. द्राक्षें, अंजीर, फाळसा वगैरे झाडांची वृध्दि फांटे लावून करतात.
कलमें:- एका झाडाचा एक तुकडा दुसर्या झाडावर बसविणें याला कलम बांधणें असें म्हणतात. इंग्रजींत ज्याला सायन अगर ग्राफ्ट असें म्हणतात त्यालाच मराठींत कलम असें म्हणण्याला मुळींच हरकत नाहीं. कलम ज्या फांदीवर अगर झाडावर घेतलें असेल त्याला खुंट असें म्हणतात. म्हणजे खुंट हा पोशक व कलम हें पोश्य होय. आतां सामान्य भाषेत ' कलम-बांधणें' यांमधील 'कलम' याचा अर्थ दोन अगर अधिक पानें अगर डोळे असलेली फांदी बांधणें असा होतो. परंतु एकच डोळा जरी असला तरी तो दुसर्या झाडावर बसविला असतां त्याला ' कलम' असें म्हणण्याला मुळींच हरकत नाहीं. फार झालें तर यास डोळाकलम असें म्हणावें. परंतु सामान्य भाषेत डोळाकलम बांधणें असें न म्हणतां फक्त डोळा बांधणें असें म्हणतात.
संत्रे, मोसंबें, पपनस, महाळुंग, बोर, तूत, गुलाब व क्वचित प्रसंगीं आंबा एवढींच झाडें डोळे बांधून तयार करण्याची वहिवाट महाराष्ट्रांत आहे. डोळे बांधण्यापासून असा फायदा आहे कीं, कांहीं झाडें बियांपासून तयार केलीं तर त्यांनां कांटे अतिशय असतात. उदाहरणार्थ:- संत्रीं व मोसंबीं यांचीं झाडें बीं रूजवून केलीं तर त्यांनां फार कांटे येतात. पण त्याचे डोळे जुंबारीवर अगर दुसर्या एकाद्या झाडावर बांधले तर त्यांच्या डोळयांपासून होणार्या झाडांवर सहसा कांटे येत नाहींत. कित्येक झाडें अशी आहेत कीं तीं बिंयापासून केलीं असल्यास तीं असावीं तितकीं कंटक असत नाहींत. मोसंब्याचें बीं रूजवून केलेलीं झाडें मोठ्या पावसाच्या पुरापुढें टिकाव धरीत नाहींत. जो भाग कांहीं वेळ पाण्याखालीं राहील त्या भागावरील साल कुजून लवकरच गळून खालीं पडते, व सर्व झाड अगदीं जायबंदी होऊन निरूपयोगी होतें. पण मोसंब्याचें डोळे जंबुरीवर बांधले असतां तीं झाडें पुराला दाद देत नाहींत. डोळे बांधून केलेल्या झाडांनां फळ लवकर येतें; वगैरे फायदे डोळे बांधल्यापासून होतात. संत्रीं व मोसंबीं यांचे डोळे बांधण्यास प्रथम जंबुरीचीं वरपीक फळें आणून त्यांचे बीं ताजें असतांनाच वाफ्यांत पेरावें, व रोपें तीन-चार इंच वाढल्यावर तीं सर्यावर लावावीं. रोपें दाटच लावावीं म्हणजे त्यांनां खालीं फांद्या फुटत नाहींत. जंबुरीचें खोड सिसपेन्सिलीइतकें जाड झालें म्हणजे त्यावर डोळे बांधण्याच्या वेळीं झाड रसावर असावयास पाहिजे. म्हणजे साल खालच्या लांकडापासून लवकर सुटते व आंतील बाजूनें ती बरीच बुळबुळीत लागते. अशा स्थितींत झाडें नसतील तर त्यांनां थोडी खणणी देऊन खत घालून भरपूर पाणी दिलें असतां झाडें ताबडतोब रसावर येतात. डोळे बांधण्यास उत्तम काळ म्हटला म्हणजे जुलै ते जानेवारी अखेरपर्यंत होय.
ज्या जातीचे डोळे बांधावयाचे असतील त्यांच्या फांद्याहि त्याचप्रमाणें चांगल्या रसावर असावयास पाहिजेत. डोळे काढावयाचे ते असे:- डोळे पानांच्या बगलेंत असतात. पानांचे देंठ ठेवून तीं सर्व चाकूनें कापून टाकावीं. जो डोळा भरावयाचा असेल तो चांगला फुगलेला असावा, परंतु फुटलेला नसावा; तसेंच तो मुकाहि असूं नये. संत्र्या-मोसंब्यांची काडी सुमारें सहा इंच लांब असावी. काडीवरील अगदीं खालचा एक अगर दोन डोळे व अगदीं वरचा एक डोळा हे बहुधां मुके असतात. म्हणजे ते जंबुरीवर बसविले असतां बहुत दिवसपर्यंत हिरवे राहतात पण ते मुळींच फुटत नाहींत; याकरितां असले डोळे भरण्यासाठीं घेऊ नयेत. डोळे काढण्यासाठीं विशेष प्रकारचे चाकू मिळतात तसला चाकू वापरला असतां काम चांगलें होतें. जो डोळा घ्यावयाचा असेल त्याच्या सुमारें अर्धा इंच वरच्या बाजूला व अर्धा इंच खालच्या बाजूला अशा दोन आडव्या चिरा सालीवर घ्याव्या. तसेंच डोळ्याच्या उजव्या व डाव्या बाजूला पाव इंच अंतरावर दोन उभ्या चिरा सालीवर घ्याव्या म्हणजे सुमारें एक इंच लांब व अर्धा इंच रूंद अशी डोळ्यासकट साल कापली जाईल. नंतर चाकूच्या मुठीनें डोळ्याची उजव्या बाजूची साल हळूच सोडवून घेऊन तिला थोडा डावीकडे हिसका दिला म्हणजे लगेच डोळा खालच्या लांकडापासून सुटतो. डोळा जंबुरीवर भरण्यासाठीं जंबुरीच्या सालीला जमीनीपासून सहा इंच अंतरावर अर्ध्या इंचापेक्षां किंचित् जास्त अशी आडवी चीर घ्यावी. ही चीर फक्त सालींतूनच घ्यावी. खालीं लांकडाला मुळींच लागतां कामा नये. नंतर सव्वा इंच लांबीची आडवी चीर घ्यावी आणि चाकूच्या मुठीनें साल सोडवून घेऊन पूर्वी काढलेला डोळा त्यांत बसवून द्यावा. झाड परत सोडून दिल्यावर डोळा नेमका जाग्यावर घटट बसतो; लगेच डोळा तेवढा उघडा ठेवून चिरेवर व डोळ्याच्या खालीं सोपट बांधून टाकावें. डोळा भरल्यापासून तो पाऊण महिन्यानें फुटतो. त्यावेळीं वरचा खुंट सुमारे चार इंच ठेवून छाटावा व पुढें डोळा तीन चार इंच वाढल्यावर खुंट डोळ्याच्या अंगाबरोबर छाटावा, डोळा सुमारें सहा इंच वाढला म्हणजे झाड दुसरीकडे वाफ्यांत बदलावें, म्हणजे सर्व मुळ्या नीट आटोक्यांत राहून झाडें दुसरीकडे लावतेवेळीं अगर बाहेर पाठवितेवेळीं मरण्याचा संभव फार कमी असतो.
डोळे बांधण्यासाठीं महाळुंगाचा खुंट जंबुरीइतका चांगला नाहीं. याचें कारण असें कीं महाळुंगाचें झाड फार दिवस रसावर रहात नाहीं, त्याची साल लवकर फाटते व काडीहि लवकर जाड होऊन जाते. रेशमी संत्र्याची साल लवकर सुटत नाहीं. नागपुरी संत्र्याच्या झाडाची सालहि तितकी लवकर सुटत नाहीं. पपनसच्या झाडावर डोळे बांधून झाडें बदलतेवेळीं त्यांचें खालचें सोटमूळ छाटलें असतां झाड जगत नाहीं. हे सर्व दोष जंबुरींत मुळींच नाहींत.
रोग:- पन्हेरी तयार होत असतांना त्यांवर कांहीं विशेष कीटकजन्य रोग पडतात. संत्री व कागदी लिंबाच्या पन्हेर्यावर एक प्रकारची पक्ष्याच्या विष्टेसारखी आळी पडते, ती वरचेवर हातानें वेंचून मारून टाकली पाहिजे. पेरूच्या पन्हेरीवर एक प्रकारचा पांढरा मावा पडतो त्यावर राळेचें मिश्रण मारावें; आंब्यांव्या कलमांवर 'पानविंचू'' या नांवाचे सुरवंटासारखे केंसाळ किडे सांपडतात यांचे केंस अतिशय विषारी असतात; हेहि निवडून मारून टाकावें.
फळझाडांची लागवड:- पूर्वी फळझाडांची लागवड फक्त श्रीमंत लोकर करीत असत व फळ श्रीमंतांच्या सुखाचा व चैनीचा पदार्थ समजला जात असे तोच आतां मध्यम स्थितीच्या लोकांत सुध्दां जरूरीचा पदार्थ समजला जातो. याचा परिणाम असा झाला आहे कीं साधारणपणें ऐपतदार शेतकरी शक्य असेल तर फळझाडें लावण्याचा प्रयत्न करीत असतो. इतर धंद्यांत यश किंवा अपयश हें जसें मालकाच्या शहाणपणावर, सचोटीवर, दक्षतेवर, भांडवलावर व त्या धंद्याच्या विशिष्ट ज्ञानावर अवलंबून असतें तसेंच तें फळझाडांच्या लागवडीच्या धंद्यांत देखील याच गुणांवर अवलंबून असतें. फळझाडांची लागवड अलीकडे जरी वाढत्या प्रमाणावर आहे. तरी सर्वच बागवाल्यांनां सारखेंच यश येतें असें नाहीं. फळझाडांच्या किफायतीचें यशापयश पुढील गोष्टींवर अवलंबून असतें; फळझाडांची लागवड करावयाची म्हटली म्हणजे पहिल्यानें भांडवलाची जरूरी फार असते. पण सर्वच फळझाडांनां सारखेंच व फार भांडवल लागतें असें नाहीं. संत्रीं, आंबें, नारळ, द्राक्षें, चिकू वगैरे फळझाडांच्या लागवडीला भांडवल बरेंच लागतें. या झाडांचीं पन्हेरीं किंवा रोपें विकत घेण्यालाच भांडवल फार लागतें. परंतु तीं झाडें एकदां लागास येऊ लागलीं म्हणजे भांडवल बेताचें पुरतें. पेरू, अंजीर, कागदी लिंबू, डाळिंबें वगैरे झाडांचीं पन्हेरीं विकत घेण्याला भांडवल थोडें पुरतें. द्राक्षासारख्या पिकाला पहिलें भांडवल खांब वगैरे विकत घेण्यास बरेंच लागतें. याशिवाय खेळतें भांडवलहि बरेंच पाहिजे. पन्हेरीच्या अगोदर जमीन पाणसाळींत आणणें, नांगरणें, तण असल्यास तें काढून, जरूरीप्रमाणें विहिरीची डागडुजी करणें, मोटवण बांधणें, पाट बांधणें, बैल विकत घेणें हीं पैशाचीं कामें आहेत; हा पैसा बाग तयार करतांना खर्च करावयाचा असतो. बाग लावून झाल्यावर खत विकत घेणें, बागेची खणणी, खुरपणी करणें, जरूर पडल्यास औषध शिंपडणें, बैल, मोट, गडी वगैरेंचा खर्च यासाठीं पैसा नेहमीं तयार पाहिजे. तथापि पुढील बहुतेक खर्च पोटपिकांवर भागूं शकतो. हीं पोटपिकें म्हणजे मिरच्या, वांगीं, कांदे, भाजीपाला वगैरेपासून पीक चांगले आल्यास खणणी, खुरपणी, खत, पाणी, सारा वगैरे खर्चवेंच भागूं शकतो.
बाजार:- बहुतेक फळें फार दिवस टिकत नसल्यामुळें तीं तयार झाल्याबरोबर विकून टाकण्याची तजवीज झाली पाहिजे. यासाठीं बाजार जितका जवळ असेल तितका चांगला किंवा दूरच्या बाजाराला माल पोंचविण्याची रेल्वें, आगबोटी अगर मचवे यांसारखी चांगली सोय पाहिजे. या साधनांत देखील मालाची चढ-उतार जितकी कमी होईल तितकी चांगली. स्टेशन किंवा बंदर जवळ नसल्यास फळ-झाडांची लागवड तितकी फायदेशीर होत नाहीं. कारण वाहतुकीचा खर्च फार येतो व फळ लवकर बिघडतें. अशा स्थितींत नाजूक फळें करूं नयेत. आंबे, संत्रीं, मुसुंबीं, डाळिंब हीं फळें चांगलीं. कारण तीं टिकाऊ असल्यामुळें लवकर बिघडत नाहींत. हीं फळें करावयाचीं झालीं तरी सुध्दां बैलगाडीचा रस्ता चांगला असावयास पाहिजे. अंजीर, पेरू, वगैरे फळें जाग्यावर खपण्यासारखीं असतील तेवढींच करावीं.
त्याचप्रमाणें कित्येक झाडें अशी आहेत कीं त्यांची छाटणी वगैरे विशेष प्रकारचीं कामें करणारे मजूर सर्व ठिकाणीं मिळतातच असें नाहीं. त्यामुळें बागेची नीट व्यवस्था रहात नाहीं. यासाठीं अशा प्रकारचीं कामें मालकाला स्वत: येत असलीं पाहिजेत व तीं आपल्या गडीमाणसांनां शिकवून त्यांच्याकडून करवून घेण्याची तयारी व ताकद असली पाहिजे.
दुसरी गोष्ट अशी कीं फळझाडांवर रोग कोणकोणते व ते केव्हां पडतात, त्यांवर औषधयोजना काय करावी लागते व ती कितपत फलद्रुप होते याची पूर्ण माहिती करून घेणें जरूर असतें. कारण कित्येक झाडें अशी आहेत कीं त्यांनां रोग हटकून होतात व त्यांवर अद्याप चांगलीशी उपाय योजना झालेली नाहीं. उदाहरणार्थ:- द्राक्षाला मुरी रोग पडतो त्यावर ओषध मारण्याची सर्व कृति मालकास पूर्णपणें माहीत असावयास पाहिजे. व त्याला लागणारीं उपकरणें देखील होतां होई तों स्वत:चीं पाहिजेत. संत्र्यामुसुंब्यांवरील खैरा व तांबेरा नांवाचे रोग हे पुणें प्रांतांत फार दृष्टीस पडतात. तरी अशा रोगासंबंधीं नीट विचार झाला पाहिजे.
जमीनीची निवड:- ज्या जमीनीत झाडें लावावयाचीं ती जमीन कशी काय आहे हें मालकाला उत्तम रीतीनें माहित असावयास पाहिजे. कारण पावसाळ्यांत जमिनींत पाणी कोणत्या जागीं सांचतें, कोणत्या ठिकाणची जमीन काकर कोरडी पडते, उन्हाळ्यांत जमीन कितपत फाटते, कोणतीं पिकें उत्तम होतात, कोणतीं चांगलीं होत नाहींत, कोणत्या जागेखालीं मुरूम आहे, कोठें खडक आहे, विहिरीचें पाणी किती खोलीवर आहे, तें वर्षभर पुरेल किंवा नाहीं, तें गोडें आहे किंवा मचूळ आहे इत्यादि गोष्टींच्या इत्यंभूत माहितीवरच बागेचें यशापयश अवलंबून असतें. फळझाडांनां जमीन भारीपैकीं मुळींच लागत नाहीं किंबहुना चालत नाहीं. मध्यम प्रकारच्या जमीनी चांगल्या. वरची माती दोन तीन फूट खोल असून खालीं मुरूम असावा, मुरून नसून मातीच असेल तर तिच्यांतून पाण्याचा निचरा उत्तम प्रकारें होतो अशाबद्दल खात्री करून घ्यावी. ज्या जमिनींत थोड्याबहुत प्रमाणांत चुनखडी असते ती बहुधा चांगली निचर्याची असते. चुनखडीचें जर बारीक पीठ झालें असेल किंवा जमीन नदीच्या अगर ओढ्याच्या कांठीं असेल तर तिच्यांतून निचरा चांगला होत आहे असें समजावें. पण एखादें सपाट मैदान असेल तर त्यांतून निचरा बहुधा चांगला होत नाहीं. अशा ठिकाणीं पुष्कळ वर्षे टिकणारीं झाडें लावण्याच्या भरीस पडूं नये. कित्येक ठिकाणीं जमीन रेताड असल्यामुळें तींत पाणी बिलकूल रहात नाहीं, जमीन ताबडतोब कोरडी पडते अशा जमिनींत झाडें लावलीं असतां त्यांनां एकदोन वर्षांतच फुलें येतात व त्यांचीं फळें लहान असतांना उमटून गळून पडतात व शेवटीं झाडांचीं पानें पिकून तीं लवकरच मरतात किंवा कांहीं वर्षे रोगट राहून मग मरतात. ज्या बागा झाडें लाविल्यानंतर अगदीं नापीक ठरलेल्या आहेत त्यांचें एक कारण बहुधां जमीन वाईट हें असतें.
जमीन चांगली असली तरी तिच्यावर शेजारच्या जमीनीचा परिणाम होण्याचा संभव असल्यांस त्याचा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ:- शेजारच्या जमीनींत उंस असेल व त्या जमीनींतून पाण्याचा झिरपा आपल्या जमीनींत येत असेल तर आपल्या जमीनींत झाडें लावणें नुकसानकारक आहे. निदान अशा जमीनींत ज्या झाडांचें पाणी अवश्य तोडावें लागतें अशा प्रकारचीं झाडें तरी लावतां कामा नये. यावरून मोठमोठ्या कालव्याखालींल उसाच्या टापूंत फळझाडांची लागवड करणें श्रेयस्कर नाहीं परंतु कालव्याखालील टांपूत देखील फळझाडें लावणें कधीं कधीं शक्य असतें. उदाहरणार्थ:- कालवा खडकांतून जात असेल व त्यांतून पाण्याचा झिरपा आपल्या जमिनींत येत नसेल तर कालव्याच्या खालच्या बाजूला फळझाडें लावण्याला हरकत नाहीं. विशेषत: कालवा व आपला मळा यांमध्यें लहानशी पटई सोडली असतां काम भागण्यासारखें असतें. मात्र त्या जमीनींत पाणभरू पिकें न लावतां आंब्यासारखीं -कीं ज्यांनां पांच सहा वर्षांनीं पुढें पाण्याचें फारसें कारण पडत नाहीं अशी -झाडें लावून टाकावीं म्हणजे कालव्याच्या झिरप्यापासून आपल्या झाडांनां यत्किंचित देखील उपसर्ग पोंचणार नाहीं. याशिवाय बागेची जागा सभोंवतालच्या जागेपेक्षां किंचित् उंच असल्यास फार चांगलें. निदान सभोंवतीं चार पांच फुटांचा एक खोल चर असावा. व तो नेहमीं मोकळा व पाणी वाहून जाईल असा असावा. आतां जमीन जरी चांगली असली तरी दुसर्या कांहीं आगंतुक गोष्टींनीं आपल्याला अपयश येण्याची भीति असते. विहिरीचें पाणी थोडें मचूळ किंवा खारट असल्यास झाडें बिघडण्याचा संभव फार असतो. विशेषत: जमीन जर थोडी काळी असेल तर ही भीति फारच असते. मचूळ पाणी थोडे दिवस टिकणार्या पाणभरू पिकांनां फारसें अपायकारक नसतें. कारण बिनपाण्यावर होणारें रब्बीचें किंवा खरिफाचें पीक काढून घेतलें म्हणजे अशा अनिष्ट पाण्याचा परिणाम नाहींसा होतो. पण असें मचूळ पाणी दीर्घकाळपर्यंत झाडांनां दिल्यानें तीं झाडें व जमीन कायमची बिघडण्याचा संभव असतो.
कालवा जवळ असल्यास सदोदित पाणी लागेल अशी झाडें लावणें बरें हें उघड आहे. आंबा, डाळिंब व अंजीर यांसारखीं झाडें लावणें देखील बरोबर होणार नाहीं. केळी व पपया लावण्याला हरकत नाहीं. हीं पिकें आठदहा वर्षांपेक्षां जास्त टिकत नाहींत. पेरू लावण्यालाहि हरकत नाहीं. याचें फळ मात्र फार दिवस टिकत नाहीं. द्रक्षालाहि हरकत नसते. जमीन योग्स असल्यास संत्रीं, मुसंबी, कागदी लिंबू हीं लावण्यास हरकत दिसत नाहीं.
कधीं कधीं असें होतें कीं, जमीन वगैरे चांगली आहे, उंचावर आहे, निचर्याचीहि आहे परंतु ती अशा ठिकाणीं असते कीं त्या ठिकाणीं उत्पन्न येणें शक्यच नसतें. उदाहरणार्थ लहान लहान टेंकड्या अगदीं जवळ जवळ आहेत, त्यांवर झाड झाडोरा वगैरे कांहीं नाहीं. त्या उन्हाळ्यांत अतिशय तापतात व त्यांपासून इतकी प्रखर उष्णता निघते कीं, मधल्या खोर्यामध्यें लावलेलीं झाडें चांगलीं होत नाहींत किंवा झालीं तरी त्यांवर फेब्रुवारीपासून पुढें येणारीं फुलें अगदीं ताबडतोब करपून जातात. यामुळें झाडांनां पाणी वगैरे पुष्कळ दिलें तरी त्याचा कांहीं उपयोग होत नाहीं. यामुळें अशा जमिनी जरी चांगल्या असल्या तरी त्यांच्या विलक्षण परिस्थितीमुळें त्या उपयोगांत आणतां येत नाहींत. त्या फक्त शेतकीच्याच उपयोगी होत. अशा ठिकाणीं कदाचित रायवळ आंबें येतील.
फळझाडांची बाग लावतेवेळी झाडांचें व पुढें फळांचें संरक्षण होण्यासाठीं बागेला कुंपण घातलें पाहिजे. हें कुंपण फक्त गुरें व चोर यांच्यासाठींच न घालतां वार्यासाठींहि घालावें लागतें. वार्यानें झाडें मोडण्याचा व फळें गळून पडण्याचा संभव फार असतों यासाठीं बागेभोंवतीं कसलें तरी झाडांचें दाट कुंपण करणें जरूर असतें. कोंकणांत सुपारी व माड यांच्या बागेंत पश्चिम व दक्षिण या दिशांनां करंज व भेंडी हीं झाडें लावतात व त्यांपासून उत्पन्नहि चांगले येतें. देशावर संत्रें, मोसंबें या बागांच्याभोंवतीं शेराचें कुंपण करतात. खानदेशांत केळीच्या बागांनां कपाशीच्या पळकाठ्यांचें कुंपण करतात. झाडांच्या कुंपणापासून कधींकधीं तोटा होतो; तो असा कीं पांखरांनां बसण्याला जागा मिळून तीं अंजिरासारख्या पिकाचें फार नुकसान करतात. झाडांचें कुंपण होतां होई तों फार मोठ्या वृक्षांचें करूं नये. कारण त्यांच्या मुळ्या व सावली यांपासून आंतील झाडांचें फार नुकसान होतें. झाडें लहान आहेत तोंपर्यंत त्यांच्यापासून कांहींच उत्पन्न मिळत नाहीं, बागेचा सर्व खर्च अंगावर पडतो. यासाठीं झाडांच्या ओळींमध्यें कांही तरी पोटपीक घेणें फायदेशीर असतें. त्याच्या योगानें मधली जमीन वेळच्यावेळीं खणली जाऊन तिला खत मिळतें व तणें होण्याचा संभवहि कमी असतो. पोटपिक घेतेवेळीं तें मुख्य पिकाला अपायकारक होणार नाहीं अशाबद्दल काळजी घ्यावी. उदाहरणार्थ संत्र्यासारख्या झाडांनां पाणी फार बेताचें लागतें तेव्हां त्यामध्यें लसूणघास अगर केळीसारखें फार पाणी लागणारें पीक घेऊ नये. तसेंच त्या पिकापासून सावलीहि होतां कामा नये. म्हणून पपयाचें पीक चालणार नाहीं. कोणतेंहि पीक असो तें फारसें उंच न वाढेल असें व सहा महिन्याच्या आंत काढतां येण्यासारखें व फार पाणी न लागणारें असें असावें. अशी पिकें मिरची वगैरेचीं होत. बाग मोठी झाली व तींत कांहीं कारणानें तण फार माजलें तर भोंपळे, मटकी वगैरे पिकें केलीं असतां त्यांचा जोर बराच कमी होतो. भोपळ्याचे वेल झाडांवर चढूं देऊ नयेत. फळझाडांनां कालव्याचें पाणी दिलें असतां झाडें लवकर बिघडतात अशी सामान्य समजूत आहे, व तीं कांहीं खरीहि आहे. पण झाडें बिघडण्याचें कारण असें आहे कीं कालव्याचें पाणी ओढून काढण्याला श्रम मुळींच पडत नसल्यामुळें पाणी भरणारा तें झाडांनां प्रत्येक वेळीं मुबलक देतो. यामुळें जास्त झालेलें पाणी झाडांनां मुळींच सोसत नाहीं व मुळांनां पुरेशी हवा मिळत नाहींशी होते, म्हणून झाडें लवकर बिघडतात. तसेंच पाटाच्या पाण्याबरोबर निरनिराळ्या ठिकाणाहून लव्हाळा, पाणकुंदा, कुंदा, हरळी वगैरेचें बीं वाहून आपल्या जमिनींत येतें व तेथें तें वाढून पुढें झाडांनां अपायकारक होतें. हे दोष टाळतां येण्यासारखें असतील तर कालव्याचें पाणी देण्यास मुळींच हरकत नाहीं. कित्येक लोक पाटाचें पाणी प्रत्यक्ष न घेतां जवळच विहिर खणून तिचें पाणी मोटेनें ओढून झाडांनां देतात. विहिरीचें पाणी पाटांतून झिरपून आलें असलें तरी हरकत नाहीं.
रासायनिक कृत्रिम खतांचा उपयोग इतर देशांत फार होतो. परंतु अद्याप इकडे होऊ लागला नाहीं व यासंबंधीं अद्याप फारसे प्रयोग झाले नाहींत. फळझाडें लावण्यापूर्वी खडडे खणल्यावर त्यांत हाडांचे पीठ किंवा तें न मिळाल्यास साधारण कुटलेलीं अगर तुकडे केलेलीं हाडें घालावीं. निदान नुसतींच हाडें घातलीं तरी चालतील. हाडांचें खत फळझाडांनां फार चांगलें असतें. व तें फार सावकाश विरघळत असल्यामुळें झाड जसजसें मोठें होत जाईल तसतसा त्याला त्यांचा उपयोग होत जातो. हाडें सर्व ठिकाणीं मुबलक मिळत असल्यामुळें त्याचा उपयोग हिंदुस्थानांत हल्लीपेक्षां जास्त प्रमाणावर व्हावयास पाहिजे. फळझाडांच्या वृध्दीला नायट्रोजन, पोटॅश व फास्फोरिक अॅसिड हीं द्रव्यें विपुल मिळावयास पाहिजेत. शेणखत, पाल्याचें खत, सण अगर तागाचें खत यांमध्ये नायट्रोजन फार असतो व हाडांमध्यें फास्फोरिक अॅसिड फार असतें. झाडें लहान असतात तोपर्यंत त्यांनां शेणखत, पाल्याचें खत, तागाचें बिवड वगैरे या रूपानें नायट्रोजन पुरविला जातो. परंतु झाडांच्या पानांची वृध्दि जरी कमी करून त्यांनां फळें येण्यासाठीं पोटॅश व फास्फेरिक अॅसिड हीं पुरविलीं पाहिजेत. यासाठीं झाडांनां फळांचा बहार येण्यासाठीं नायट्रोजनचें प्रमाण कमी करून गांवखताच्या रूपानें पोटॅश व फास्फोरिक अॅसिड हीं पुरविलीं जातात. गांव खतांत घरांतील केरकचरा, राख वगैरे असल्यामुळें या द्रव्यांचा पुरवठा होतो.
फळें तयार होऊ लागलीं म्हणजे चोर, पाखरें व वाघळें यांपासून फार त्रास होतो. विशेषत: अंजीर, पेरू, चिकू, डाळिंब यांनां फार धोका असतो. यासाठीं झाडांवर जाळीं घालण्याची कोठें कोठें वहिवाट आहे.
सर्व हिंदुस्थानांत हल्लीपेक्षां पुष्कळ जास्त प्रमाणांत फळझाडांची लागवड होण्याचा संभव आहे. विशेषत: महाराष्ट्रांत अशी पुष्कळ ठिकाणीं फळझाडें फार किफायतशीर होतील. उदाहरणार्थ रायवळ आंबे बहुतेक सर्व ठिकाणी होण्यासारखें आहेत. जवळपासचे नामांकित आंबे मिळवून त्यांची वाढ व जोपासना आपल्या जमीनींत करावी. कलमी आंबे व फणस विशेषत: सर्व कोंकण प्रांतांत, मावळ भाग, व नाशिक, पुणें, सातारा, बेळगांव या शहरांच्या पश्चिम भागांत फार उत्तम होतील. खानदेश, नगर, सोलापूर व गोडें पाणी असल्यास गुजराथेंतील बराचसा प्रदेश या ठिकाणीं संत्र्यांची लागवड पुष्कळच होण्यासारखी आहे. नाशिक, पुणें, सातारा या ठिकाणच्या पूर्वबाजूस द्राक्षांची लागवड फार चांगली होण्यासारखी आहे. पुणें, सातारा, नगर या जिल्हयांतील डोंगरांवरील रूक्ष पठारांवर पाणी असल्यास अंजिरांची लागवड करण्यास हरकत नाहीं. पेरूची लागवड कोंकणाशिवाय सर्व ठिकाणीं होते हें सर्वांस महशूर आहेच. केळीची लागवड थोड्याबहुत प्रमाणांत सर्व ठिकाणीं होत असली तरी यापेक्षां ती जास्त व्हावयास पाहिजे. कोंकणांत अननस पुष्कळ ठिकाणीं होतात, पण ते पावसाळ्यांत तयार झालें असतां वाहतुकीच्या साधनांच्या अभावीं त्यांनां यावी तशी किंमत येत नाहीं.
वर दर्शविल्याप्रमाणें बागा जास्त झाल्या, रेल्वेवर जास्त चांगल्या सोई झाल्या, व पॅकिंगमध्यें सुधारणा झाली म्हणजे माल बाहेरच्या देशांत पाठविण्याची तयारी होईल. अमेरिका, वेस्टइंडिज, फिलिपाईन बेटें या ठिकाणांहून सर्व प्रकारचीं फळें इंग्लंडमध्यें जातात तशीच तीं हिंदुस्थानांतूनहि जाण्यास हरकत नाहीं; परंतु योग्य ती शास्त्रीय माहिती, धाडस, भांडवल, उद्योग व राजाश्रय यांच्या अभावीं सर्व गोष्टी कल्पनासृष्टीतच राहातात.
आपल्याकडे जो माल तयार होईल तो बाजारांत खपत नसल्यास त्यापासून रस, तेलें अॅसिडें वगैरे काढून त्याचा पक्का व टिकाऊ माल तयार करण्याचे कारखाने निघणें जरूर आहे. उदाहरणार्थ, आंब्याचा रस बाटल्यांतून अगर डब्यांतून भरून बाहेर देशी पाठविण्याची खटपट अवश्य व्हावयास पाहिजे. तसेंच हिरव्या आंब्यांचें लोणचें घालून अगर पडीच्या अंब्यांची आंबोशी घालून ती लोणच्यासाठीं तयार करण्याची खटपट झाली पाहिजे. पुष्कळ ठिकाणच्या कागदी लिंबांस चांगला भाव येत नाहीं. यासाठीं त्यांपासून तेल व सायट्रिक अॅसिड काढण्याचे कारखाने निघणें जरूर आहे. पेरूची लागवड बरीच होत असल्यामुळें पेरूपासून जेली तयार करणें फार किफायतशीर होईल. त्याचप्रमाणें केळीं, फणस, अननस यांची स्थिती आहे.