विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वेंगी देश:- गोदावरी व कृष्णा या नद्यांच्यामधील समुद्रापासून थोडासा आंतील प्रदेश यास पूर्वी वेंगी देश म्हणत. यावर प्रथम पल्लव राजे राज्य करीत असत. त्यांचें राज्य चालुक्य कुब्ज विष्णुवर्धन यानें (६१५) घेतलें. वेंगी राज्य हें स्वतंत्र होतें कीं काय हें नक्की सांगतां येत नाहीं, परंतु बहुतकरून ते कांचीच्या राज्याचें मांडलिक असावें. पांचव्या किंवा सहाव्या शतकांतील कांची येथील पल्लवराजा सिंहवर्मा (दुसरा) यानें वेंगी राष्ट्रांतील मांगडूर हें गांव एका ब्राह्मणास दान दिलें होतें. या राज्याची राजधानी गोदावरी जिल्ह्यांतील एल्लोर या गांवापासून उत्तरेस थोड्या मैलांवर असलेलें वेंगी अथवा पेद्दवेंगी हें शहर होतें. बर्नेल म्हणतो कीं वेंगी हें स्वतंत्र राज्य असून त्यावर शालंकायन राजे राज्य करीत असत. यापैकीं विजयचंडवर्मा व त्याचा पुत्र निजयनंदिवर्मा या पांचव्या शतकांतील राजांचा उल्लेख असलेला एक शिलालेख प्रसिध्द आहे. फलीटच्या मतें या राज्याचा आरंभ दुसर्या शतकापूर्वी नसावा. दुसर्या एका शिलालेखांत विजयनंदिवर्मा व त्याचा पुत्र विजयतुंगवर्मा (विजयबुध्दवर्मा) या राजांचीं नांवें आहेत. वेंगी घराण्याचा चालुक्यांनीं शेवट केल्यावर लवकरच ह्युएनत्संग त्या प्रांतांत गेला. त्यानें या राज्यास अन्-ता लो (आंध्र) हें नांव दिलें असून याची राजधानी 'पिंग-कि-लो' आहे असें म्हटलें आहे. डॉ. बर्नेल याने या शब्दाचें वेंगी असें भाषांतर केलें आहे राष्ट्रकूट गोविंद (तिसरा) यानें पूर्वचालुक्य वंशांतील (८०७ मधील) राजास वेंगीचा राजा म्हटलें आहे. अमरावती येथील शिलालेखांत वेंगी राजांचीं पुढील कांहीं नांवें आढळतात: सिंहवर्मा, सिंहविष्णु, नन्दिवर्मा, सिंहवर्मा (दुसरा,) अर्कवर्मा, उग्रवर्मा, महेंद्रवर्मा इत्यादि [आर्कि. सर्व्हे. साउथ इंडिया. भा. २; इंडि. ऍंटि. ५. १५४; साउथ इंडियन पॅलिओग्राफी; डिनॅस्टीज ऑफ दि डेक्कन.]