विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वेद्द:- या जातीची वस्ती विशेषत: म्हैसूर संस्थानांत असून एकंदर लोकसंख्या (१९११) २६८४५४ आहे. वेदा, वेदऊ हा शब्द व्याध या शब्दाचा अपभ्रंश आहे. सध्यां हे लोक शिकारीचा धंदा करीत नसून बहुतेक लोक शेतकरी, पहारेकरी, मजूर व सरकारी कचेर्यांतून चपराशी आहेत. त्यांच्या एकंदर कांटकपणावरून त्यांनां विजयानगरच्या राज्यांत सैन्यांत सामील केलें होतें; पुढें हैदरअल्ली यानेंहि त्यांची आपल्या सैन्यांत भरती केली. ते मूळचे तेलगु भाषा बोलणारे लोक होते पण कानडी मुलुखांत बरेच दिवस राहिल्यामुळें ते पुढें कानडी बोलूं लागले. यांच्यांत सहा मुख्य वर्ग आहेत. या जातींत बहुपत्नीत्व, प्रौढविवाह, विधवाविवाह रूढ आहे. एखादी स्त्री जन्मभर अविवाहितहि राहूं शकते. जातिभ्रष्ट झाल्यास अगर व्यभिचार केल्यास घटस्फोट करण्याची परवानगी आहे. एखाद्यास मुलगा नसल्यास तो आपल्या सर्वांत वडील मुलीस ‘बसवी’ करतो. ती जन्मभर आपल्या बापाच्या घरीं रहाते व मुलास असलेले सर्व अधिकार तिला असतात. वरिष्ट जातीच्या लोकांस कांहीं विशिष्ट विधीनंतर जातींत घेतात; हे लोक बहुतेक वैष्णव आहेत. त्यांचा गुरू वैष्णव ब्राह्मण असतो; गंगम्मा, मरम्मा, कावेलम्मा वगैरे त्यांच्या प्रमुख देवता आहेत. हे सर्व लोक मुनीश्वर म्हणून एका साधूच्या आत्म्याची पूजा करतात. हा आत्मा एका झाडांत असतो अशी त्यांची समजूत आहे. [से.रि. (१९११) पु. २१]