विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वेधशास्त्र:- आकाशस्थ ज्योतींचें अवलोकन करून त्यांच्या गती, स्थिती वगैरे नक्की करणें हें या शास्त्राचें काम आहे. एखादी शलाका किंवा यष्टि किंवा दुसरा कांहीं पदार्थ मध्यें धरून त्यावरून सूर्यादि खस्थ पदार्थ पहाणें याचें नांव वेध होय. वेधाच्या साधनांनां यंत्रें व जेथून वेध घेतात त्या विशिष्ट इमारतीला वेधशाळा म्हणतात. आपल्याकडे वेधशास्त्रफार प्राचीनकाळींहि बरेंच प्रगत झालेलें होतें (विज्ञानेतिहास, पृ. ३२१ पहा.) वेधाच्या कामीं बरींच यंत्रेंहि वापरण्यांत येत व त्यांवर स्वतंत्र ग्रंथहि होते. प्राचीन भारतीय वेधशाळांची माहिती मात्र सांपडत नाहीं. सुमारें ख्रिस्तपूर्व ३०० पर्यंत जगांत कोठें वेधशाळा असेल असें वाटत नाहीं. पहिली मोठी वेधशाळा अलेक्झांड्रियाची म्हणतां येईल, ती सरासरी चारशे वर्षे पर्यंत म्हणजे इ.स. २ र्या शतकाच्या अंतापर्यंत चालू स्थितींत होती. याच वेधशाळेंत हिपार्कसनें आपले प्रसिध्द शोध लावले. यानंतर अरब राजांनीं बर्याच वेधशाळा बांधल्या. मोंगल खानांनींहि त्यांचें अनुकरण केलें. इराणच्या वायव्य भागांतील मरघा येथील उत्कृष्ट वेधशाळा यांपैकींच एक होय; ती इ.स. १२०० च्या सुमारास स्थापन झाली असावी. याच ठिाकणीं नासिर-उद्दिनानें इल्ले हा-खानिक तक्ते तयार केले. १५ व्या शतकांत उलुघबेगनें समरकंद येथे स्थापिलेल्या वेधशाळेंत नवीन ग्रहांचे तक्ते व तार्यांच्या यादी तयार झाल्या.
यूरोपधील पहिली वेधशाळा १४७२ त न्युरेंबर्ग येथें बर्नहार्ड वाल्टेर यानें स्थापिलेली होय. १६ व्या शतकांतील दोन प्रसिध्द वेधशाळा म्हणजे हेवन या डॅनिश बेटावरील टायकोब्राहीची व दुसरी कॅसल येथील लँडग्रेव्ह विल्यम (४ था) याची होय. या वेधशाळांनीं वेधशास्त्रांत मोठीच क्रांति घडवून आणिली. लेडन व कोपनहेगन हीं दोन विश्वविद्यालयें वेधशाळा बांधण्याच्या कामीं आघाडी मारणारीं होत यांत शंका नाहीं. यानंतर बर्याच सरकारी व खासगी वेधशाळा निघाल्या. गॅलिलीओच्या दुर्बिणीच्या शोधानें ज्योति:शास्त्रांत व विशेषत: या वेधशास्त्रांत मोठी महत्त्वाची भर पडली. (विज्ञानेतिहास, पृ. ३४५ पासून पुढें पहा.)
गेल्या दोन शतकांतच वेधशाळांतील यंत्रांत बरेच फरक करण्यांत आले. फोटोग्राफीच्या शोधानें तर व्यावहारिक ज्योति:शास्त्रांत बरीचशी सुधारणा केली आहे. आज बहुतेक वेधशाळा सर्वच वेधक्षेत्रांत प्रयोग करीत नसून प्रत्येकीनें आपापल्यापुरतें विशिष्ट क्षेत्र आंखून त्यांत शोध चालविले आहेत.
वेधशाळेमध्यें गोलयंत्र, नाडीवलय, शंकू, चाप, तुरीयंत्र, घटीयंत्र, फलकयंत्र, यष्टियंत्र, गोलानंदयंत्र, प्रतोदयंत्र, चक्रयंत्र, यंत्रचिंतामणि (एक प्रकारचें तुरीयंत्र,) ध्रुवभ्रंमयंत्र, यंत्रराज, सर्वतोभद्रयंत्र, वालुकायंत्र इत्यादि प्राचीन यंत्रें असतात. तशीच नवीन वेधयंत्रदेखील असतात. त्यांत प्राधान्येंकरून टॅंझिट सर्कल, म्यूरल सर्कल, इक्वेटोरियल आणि अल्टाझिमथ हीं चार असलींच पाहिजेत. कारण हीं यंत्रें प्राचीन यंत्रापेक्षां सूक्ष्मता दाखविणारीं आहेत. यांतील अल्टाझिमथ या यंत्रानें ग्रहादिकांचे उन्नतांश केव्हांहि काढतां येतात; व दिगंश मापतां येतात. या यंत्रावरून अंश, कला, विकलापर्यंत माप घेतां येतें. तसें टॅंझिटकर्सल या यंत्रानें खस्थळाच्या याम्योत्तर वृत्तांमध्यें ग्रह आला असतां त्याचे उन्नतांश व नतांश हे कलाविकलांपर्यंत सूक्ष्म समजतात. इक्वेटोरियल यंत्रानें क्रांति व कालकोन मापतां येतात. म्यूरलसर्कलचाहि उपयोग दिगंश व उन्नतांश काढण्याकडे होतो. हीं यंत्रें वेधशाळेमध्यें स्थिर बसविलेलीं असतात. वेधशाळा अशा ठिकाणीं असावी कीं, त्या ठिकाणीं सबंध क्षितिज दिसावें; पर्वत, झाडें वगैरे आड येतां कामा नयेत. कारण तीं आड आलीं असतां वेध घेण्यास प्रतिबंध होतो. वेधशाळेंतील यंत्रें, पृथक पृथक् छातीइतके उंच व वृत्ताकार असे ओटे करून त्यांवर समभूसि करून प्राचीसाधन करून त्यावर स्थिर करावींत; तीं अशी कीं, यंत्रांतील प्राच्यपरा व समभूमीवरील प्राच्यपरा ह्या एकच व्हाव्यात. वेधशाळेमध्यें एक घड्याळ असावें तें असें कीं सबंध वर्षात त्याच्या चालींत एक सेकंदाचीहि चूक होऊ नये. हल्लीं ग्रीनिच, पॅरिस, बर्लिन आणि वाशिंग्टन येथें वेधशाळा स्थापन झालेल्या आहेत. तेथें सतत वेधाचें काम सुरू असून नवीन शोध वरच्यावर चालू आहेत.
पूर्वी हिंदुस्थानांतहि दिल्ली, जयपूर, मथुरा, काशी, उज्जनी इत्यादि ठिकाणीं वेधशाळा होत्या व तेथें वेधाचें काम चालत होतें. काशी येथील वेधशाळेचें नांव ''मानमंदिर'' असें आहे. हें मानमंदिर गंगा नदीच्या कांठांवर आहे. हल्लीं ही इमारत आणि सभोंवारचा प्रदेश जयपूरच्या राजाच्या मालकीचा आहे. याच्या मुख्य भागांत कांहीं यंत्रें फार मोठीं आहेत. तीं धातुमय नसून भित्तिमय आहेत. त्यांच्या बांधणीचें काम हजारों वर्षेपर्यंत सहज टिकेल असें आहे. त्या यंत्रांवर अंशांचे विभाग, कलांचे विभाग दिलेले आहेत. यावरून येथें सूक्ष्म काम होत होतें असें स्पष्ट दिसतें. हल्लीं उन व पाऊस यांच्या योगानें यंत्रांची खराबी होत आहे. व त्यांचे अंश, कला झिजून दिसेनातसे होत आहेत. या वेधशाळेंत गेल्यावर प्रथमत: भित्तियंत्र आढळतें. ही सुमारें ८ हात उंच आणि ६ हांत रूंद अशी दक्षिणोत्तर दिशेत बांधलेली एक भिंत आहे. हिच्या योगाने मध्यान्हीं सूर्य आला असतां त्याचे उन्नतांश आणि नतांश काढतां येतात, तसेंच सूर्याची क्रांति आणि स्थळाचे अक्षांश काढतां येतात. जवळच एक दगडाचें मोठें वर्तुळ असून दुसरें चुन्याचें मोठें वर्तुळ आहे. यावरून सूर्याची अग्रा, दिगंश, शंकुच्छाया इत्यादि काढतां येतात. त्यावरिल खुणा हल्लीं अस्पष्ट दिसतात. तसेंच सम्राटयंत्र नांवांचें यंत्र आहे. हें फारच मोठें आहे. हें भित्तिस्वरूपच आहे. ही भिंत याम्योत्तर वृत्तांत असून तिची लांबी सुमारें २४ हात आहे व रूंदी ३ हात आहे. भिंतीची एक बाजू ४ हात उंच व दुसरी बाजू १४ हात उंच असल्यामुळें ती भिंत उत्तरेकडेस थोडथोडी उंच होत गेलेली आहे ती इतकी उंच आहे कीं तिच्या कडेवरून पाहिलें असतां नेमका ध्रुवतारा दिसतो. ह्या यंत्राच्या योगानें ग्रहादिकांची क्रांति समजते. आणि विशुववृत्तांशहि काढतां येतात. येथेंच एक दुहेरी भित्तियंत्र आहे. यांच्या पूर्वेस दगडाचें नाडीवलय आहे. त्याची पातळी विशुकववृत्तांतून गेली आहे. याच्या योगानें तार्यांची क्रांति काढतां येते. तसेंच लघुयंत्रसम्राट नांवाचें यंत्र आहे. याचा उपयोग यंत्रसम्राटप्रमाणेच करतां येतो. त्याच्या जवळच दोन भिंतींच्यामध्यें एक चक्रयंत्र आहे. त्याचा उपयोग तार्यांचे नतांश व उन्नतांश आणि क्रांति काढण्याकडे करीत असत असें सांगतात. त्याच्या जवळच एक मोठें दिगंशयंत्र आहे. त्याच्या योगानें खस्थ पदार्थांचे दिगंश मापतां येतात. दिगंश म्हणजे पूर्वापरवृत्त आणि खस्थ पदार्थांतून जाणारें दृड्.मंडल (व्हर्टिकल सर्कल) यांच्यामध्यें जो कोन असतो तो कोन होय. उज्जनी येथील वेधशाळेंतहि वरील प्रकारचीं यंत्रें आहेत. परंतु ती सर्व नादुरूस्त झालेलीं आहेत. हल्लीं त्या वेधशाळेचा जीर्णोध्दार करण्याचें काम ग्वाल्हेरसरकार करीत आहे.
आतां जगांत कोठें कोठें मोठ्या वेधशाळा आहेत तें पाहूं:- ग्रेट ब्रिटन व आयर्लंड:- (१) ग्रीनविच (स्थापना १६७५), येथील स्टॅंडर्ड 'मोटार क्लाक' घड्याळ हें सबंध युनायटेड किंगडममधील विद्युच्छासित घड्याळांच्या सिस्टिमचें केंद्र आहे. यांत सर्व प्रकारचीं यंत्रें आहेत. यांत घेतलेले शोध स्वतंत्र ग्रंथांतून प्रसिध्द होतात. (२) साउथ केन्सिंग्टन (स्था.१८७९). (३) ऑक्सफोर्ड रॅडक्लिफ वेधशाळा (१७७१). (४) ऑक्सफोर्ड युनिव्ह. (१८७५). (५) केंब्रिज युनिव्ह (१८२०). (६) डरहॅम युनिव्ह (१८४१). (७) लिव्हर पूल (बिड्स्टन, बर्कनहेड, स्थापना १८३८), (८) क्यू (रिचमंड, स्था. १८४२), युनायटेड किंगडममधील मध्य वर्तीहवामानशास्त्रीय वेधशाळा. (९) एडिंबरो रॉयल (१८११) (१०) ग्लासगो युनिव्ह. (१८४०). (११) डब्लिन युनिव्ह (१७८५). (१२) अश्मघ (१७९०). या सरकारी वेधशाळाशिवाय खासगीहि बर्याच आहेत. फ्रान्स – (१) पॅरिस नॅशनल (१६६७) (२) म्युडन (पॅरिसजवळ १८७५) भौतिक ज्योति:शास्त्र, विशेषत: खस्थप्रकाशलेखन याला ह वाहिलेली आहे. (३) माँटसोरी (१८७५) यांत नाविन अधिकार्यांनां शिक्षण मिळतें. (४) लियॉन्स. (५) बोर्ड युनिव्ह. (१८८२). (६) मार्सेलीस. (७) टुलूज (१८४१) इत्यादि. जर्मनी- (१) अल्टोना (१८२३). (२) बर्लिन रॉयल (१७०५) (३) बर्लिन युरेनिक सोसायटीची; सृष्टी विज्ञानाचा प्रसार हिच्यामार्फत होत असतो. (४) बॉन युनिव्ह (१८४५). (५) ब्रेमेन. (६) ब्रेस्लौ युनिव्ह. (१७९०) (७) गोथा (१७९१) (८) गॉटिंजेन युनिव्ह. (९) हीडेलबर्ग. (१०) जेना युनिव्ह. (११) कील युनिव्ह. (१२) कोनिंग्जबर्ग युनिव्ह. (१३) लाइपझिंग युनिव्ह. (१७८७) (१४) मॅनहीग (१७७२) (१५) म्यूनिच रॉयल (बोगेलहौसेन, १८०९) (१६) स्ट्रासबुर्ग युनिव्हर्सिटी. ऑस्टिया- (१) व्हिएन्ना, इंपीरियल ऍंड रॉयल. (२) क्रेम्समुन्स्टर (१७४८) (३) पोला. स्वित्झर्लंड- (१) झूरिच. (२) जिनेव्हा (१७७३). स्पेनपोर्तुगाल- (१) मॅड्रीड रॉयल. (२) बार्सेलोना. (३) केडीझ (१७९७) (४) लिस्बन रॉयल (१८६१). (५) कोइंब्रा युनिव्ह. (१७९२). इटली- (१) टुरिन युनिव्ह. (१७९०). (२) मिलन (३) पादुआ युनिव्ह (१७६७) (४) बोलोग्ना युनिव्ह. (१७२४) (५) रोम (१७८७) (६) नेपल्स रॉयल. (७) पालेर्मो रॉयल (१७९०) ग्रीस (९) अथेन्स. रशिया- (१) सेंटपीटर्सबर्ग- लेनिनग्राड (१७२५). (२) पुलकोव्हो. शिवाय इतर युनिव्हर्सिटी वेधशाळा आहेत. स्वीडन-नॉर्वे-डेनमार्क- (१) स्टॉकहोम (१७५०). (२) उप्साला युनिव्ह. (१७३०) (३) कोपनहेगन युनिव्ह. (१६४१), इत्यादि. हॉलंड-बेल्जम – (१) लीडन युनिव्ह. (१६३२). (२) ब्रुसेल्स रॉयल. अमेरिका:- अमेरिकेंत ठिकठिकाणीं वेधशाळा आहेत; त्यांतील बर्याचशा युनिव्हर्सिट्यांनां जोडलेल्या आहेत. वाशिंग्टनची वेधशाळा जगविख्यात आहे. आफ्रिका- (१) केप ऑफ गुड होप रॉयल (१८२०) (२) डरबॉन, (३) मॉरिशस. (४) अल्जीर्स. (५) सेंट हेलेना. जपान- टोकिओ युनिव्ह चीन- होंगकींग. ऑस्टेलिया:- (१) सिडने (१८५५) (२) मेलबोर्न (१८५३), इत्यादि.
बहुतेक मोठमोठ्या वेधशाळांचे शोधग्रंथ प्रसिध्द होत असतात; कांहींचीं नियतकालिकें आहेत. हवेंतील फेरफार समजण्याकरतां व नाविक शिक्षण देण्याकरतांहि यांपैकीं कांहीं वेधशाळांचा उपयोग करतात. तेव्हां त्या चांगल्या प्रगत व कार्यक्षम व्हाव्यात म्हणून प्रत्येक सरकारचें लक्ष असतें.