विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वेरूळ:- हैद्राबाद संस्थानांतील औरंगाबाद तालुक्यांत औरंगाबदेच्या वायव्येस १५ मैलांवर असलेलें एक गांव. लोकसंख्या सुमारें दोन हजार. हा गांव भिक्षुकांचा आहे. भोंसल्यांचे पूर्वज या गांवीं रहात असत म्हणून हें गांव इतिहाप्रसिध्द आहे. घृष्णेश्रवर नांवाचें बारा जोतिर्लिंगांपैकीं एक जोतिर्लिंग या गांवापासून पाऊण मैलावर आहे. वेरूळचीं प्रसिध्द लेणीं गांवापासून एक मैलावर दौलताबादच्या वाटेवर आहेत. येथील लेण्यांचे एकंदर तीन भाग पडतात: बौध्द, ब्राह्मणी, व जैन. बौध्द लेणीं १२ आहेत; मध्यभागीं ब्राह्मणीं १७ आहेत व जैन ५ आहेत- त्यांस इंद्रसभा म्हणतात. बौध्द लेणीं इ. स. ४५० ते ७०० पर्यंतच्या काळांत कोरलीं असलीं पाहिजेत. यांपैकीं चैत्य (नंबर १०) व दोन ताल, तीन ताल हीं तीन महत्त्वाचीं आहेत. ब्राह्मणीं लेण्यांत दशावतार, रामेश्वर व हुमाळलेणें हीं महत्त्वाची आहेत. पण कैलासाइतकी प्रसिध्दी कोणाचीहि नाहीं. राष्ट्रकूट घराण्यांतील एका ताम्रपटांत एलापूर (वेरूळ?) च्या या शिवालयाची अतिशय तारीफ केली असून स्वर्गांत वास करणारे देवहि तें पाहून आश्चर्य पावतात, असें म्हटलें आहे. हें शिवालय कृष्णराज (इ.स. ७६०-८३) नांवाच्या एका दानशूर राजानें बांधलें. या ताम्रपटांत उल्लेखिलेलें एलापूर व वेरूळ हीं एकच, असें डॉ. भांडारकर, बर्जेसप्रभृतींचें मत आहे. पण फ्लीटचें म्हणणें एलापूर गांव उत्तर कानडा जिल्ह्यामध्यें असावें असें आहे. कैलास लेणें हिंदुस्थानांतील एकंदर लेण्यांमध्यें फारच मोठें व परिश्रमपूर्वक बनविलेलें असें आहे, इतकेंच नव्हे तर अत्यंत प्रेक्षणीय व शिल्पशास्त्रीय दृष्ट्या सर्वोत्कृष्ट, असें आहे असा अभिप्राय फर्ग्यूसन व बर्जेससारख्या शिल्पशास्त्रज्ञांनीं दिला आहे. जैन लेणीं हीं बौध्द व ब्राह्मणी लेण्यानंतरचीं आहेत. राठोड घराण्याचा ९ व्या किंवा १० व्या शतकांत पाडाव झाल्यानंतरच जैनांनीं आपल्याहि धर्माचें वर्चस्व दाखविण्याकरितां हीं कोरलेलीं दिसतात.
[संदर्भ ग्रंथ:- धनेश्वरकृत वेरूळचीं लेणीं; बर्जेसचा वेरूळ व पश्चिम हिंदुस्थानांतील ब्राह्मणी व जैन लेण्यांसंबंधीं रिपोर्ट, १८८३ (आर्किऑला. सर्व्हे. वेस्टर्न इंडिया पु. ५); फर्ग्युसन- बर्जेस -केव्ह टेंपल्स ऑफ इंडिया (१८८०); फर्ग्युसन-हिस्टरी ऑफ इंडियन ऍंड ईस्टर्न आर्कि; स्मिथ-ए हिस्टरी ऑफ फाईन आर्ट इन् इंडिया ऍंड सीलोन; सीली-दि वंडर्स ऑफ एलोरा; इत्यादि.]