विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वेलदोडें:- (संस्कृत-एला) पश्चिम व दक्षिण हिंदुस्थान, सीलोन व ब्रह्मदेश या भागांत वेलदोडे होतात. वेलदोड्याच्या दोन जाती आहेत; लहान किंवा मलबारी आणि मोठी (म्हैसुरी) जात. वेलदोड्याच्या लागवडीस ओलसर किंवा जींतून पाणी झिरपत असतें अशी जमीन चांगली. वेलदोड्याची लागवड म्हैसूर प्रांतांत हसन तालुक्यांत बेलूर व हळेबीड या गांवच्या आसपासच्या दर्याखोर्यांतून होते. याशिवाय निलगिरी डोंगरावरील कुन्नूरजवळच्या दर्याखोर्यांतून विलायची लवंग वगैरेंची लागवड थोडीथोडी होते. मथुरा, मलबार व कुर्ग प्रांतांतहि याची बरीच लागवड होते. यावरून वेलदोड्याच्या पिकास सर्द जमीन व थंड हवा यांची जरूर आहे व ते इकडील उष्ण प्रदेशांत होण्याचा फारसा संभव नाहीं असें दिसून येईल. वेलदोडे व मिरीं या दोन पिकांची लागवड मुंबई इलाख्यांतील उत्तरकारवार जिल्ह्यांत होते. वेलदोड्याच्या झाडांच्या मुळाचे तुकडे लावून अगर बियांपासून रोप करून त्याची लागवड करतात. आठ फूट लांब व ४ फूट रूंद वाफ्यांत दोन तोळे बीं पेरतात. व हें रोप एक एकर जमीनीस पुरें होतें. रोपांचें दोन वेळां स्थलांतर करतात. पहिल्यानें हम चौरस अडीच फूट अंतरानें लावतात. ओळींत दोन झाडांमधील अंतर ९ ते १२ इंच असतें. हीं रोपें अठरा महिन्यांचीं झालीं म्हणजे दुसर्यानें पोफळीच्या बागेंत लावतात. लावण्याच्या वेळा २ आहेत: एक मार्च-एप्रिल व दुसरी सप्टेंबर -आक्टोबर. एकरीं सुमारें ३००-४०० झाडें लावतात. वेलदोड्यांचीं झाडें बोरूसारखीं पांच सहा फूट उंच वाढतात. कायमच्या जागीं लावल्यानंतर एक वर्षाने जमिनीजवळच बुंध्यावर त्याला ताणें फुटतात व त्यावर फुलें येऊन वेलदोडे धरतात. व ते सप्टेंबर, आक्टोबर महिन्यांत तयार होतात. ते सर्व एकदम तयार होत नाहींत म्हणून जसजसे तयार होतात तसतसे काढावे लागतात. ही वेचणी सुमारें तीन महिने चालते.
दर झाडास सुमारें ३-४ तोळे वेलदोडे येतात व दर एकरीं अजमासें १५०-२५० पौंडांपर्यंत उत्पन्न येतें. वेलदोड्यांचा खप हिंदुस्थान, ग्रेटब्रिटन, जर्मनी, अरबस्तान आशियांतील तुर्कस्थान, ईजिप्त या देशांतच होतो त्यांतल्या त्यांत हिंदुस्थानांत वेलदोडे फार खपतात. पण खुद्द हिंदुस्थानांत तयार होणारे वेलदोडे परदेशांत पाठविले जातात व हिंदुस्थानांत लागणारे वेलदोडे सीलोनमधून येतात, ही या व्यापाराची मजा आहे.