विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वेलन:- दक्षिण हिंदुस्थानांतील एक धोबी जात. यांची लोकसंख्या सुमारें २५०००. पैकीं निम्याच्यावर त्रावणकोर संस्थानांत आहेत. नायर व इतर जातीच्या स्त्रियांचें, प्रसूति व ऋतुकालांतील कपडेहि ते धुतात. वेलन शब्दाचा अर्थ भालाईत असा होतो. त्यांच्यामध्यें पुष्कळ वनस्पतिशास्त्रज्ञ व पंचाक्षरी आहेत. दक्षिणेमध्यें नारळ तोडणें हा त्यांचा धंदा आहे. हे ३२ फुटांच्या आंत आले असतां श्रेष्ठ वर्णांतील लोक त्यांचा विटाळ मानितात.