विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वेलस्की रिचर्ड कॉली, मार्क्विस (१७६०-१८४२):- अर्ल ऑफ मारनिंग्टन. ड्यूक ऑफ वेलिंग्टनचा हा वडील बंधू होय. याचें प्राथमिक शिक्षण ईटन येथें झालें. तेथेंच त्याच्या अंगची हुशारी आणि तैलबुध्दि निदर्शनास आली. त्यानंतर त्यानें ऑक्सफोर्ड येथील ख्राईस्ट चर्च कॉलेजमध्यें शिक्षण घेतलें. पुढें (१७८१ त) तो मॉरनिंग्टनचा अर्ल झाला व १७८४ सालीं, हाउस ऑफ कॉमन्समध्यें दाखल झाला. थोडक्याच काळानंतर पिटनें त्यास खजिनदार नेमिलें व १७९३ त बोर्ड ऑफ कंट्रोलचा सभासद केलें. पिटचें परराष्ट्रीय धोरण वेलस्लीला पसंत होतें व त्याच्या समर्थनपर यानें अनेक व्याख्यानें दिलीं. इसवी सन १७९८ त वेलस्लीस हिंदुस्थानचा गव्हर्नर-जनरल नेमण्यांत आलें. हिंदुस्थानांत आल्यावर इंग्रजी राज्य विस्तृत करण्यासाठीं त्यानें आटोकाट प्रयत्न केले. हिंदुस्थानांत इंग्रजी साम्राज्याचा विस्तार ज्या चार मुत्सद्दयांनीं केला त्यांत हा एक होता. क्लाईव्हनें राज्याचा पाया घातला, वॉरन हेस्टिंग्जनें तो दृढ केला, परंतु वेलस्लीनें त्याचा विस्तार करून त्याचें साम्राज्यांत रूपांतर केलें. फ्रेंचांनां दक्षिणेंतून हुसकून लावावयाचें व हिंदुस्थानांत इंग्रजांचें सार्वभौमत्व मजबूत पायावर स्थापन करावयाचे, असा निश्चय करून तो हिंदुस्थानांत आला त्याच्या वेळची यूरोप व हिंदुस्थान येथील राजकीय परिस्थिती बिकट होती. नेपोलियन हा यूरोपांतील मोठमोठी राष्ट्रे पादाक्रांत करीत होता. तो इंग्रजांचा द्वेश करी. गेल्या पन्नास वर्षांत हिंदुस्थानांत इंग्रजांनीं फ्रेंचांचा पाडाव केला, ही गोष्ट त्याच्या मनांत डांचत होती.. तेव्हा इंग्रजांचा पाडाव करण्याच्या हेतूनें नेपोलियननें टिप्पूशी संधान बांधिलें. व त्याला इंग्रजांशी युध्द करण्याकरितां मदत करण्याचें आश्वासन दिलें. इकडे शिंद्याजवळ फ्रेंचांनीं शिकविलेलें सैन्य फार होतें. निजामास इंग्रजांनीं सोडल्यामुळें त्यानेंहि १४००० फ्रेंच नौकरीस ठेविले. हिंदुस्थानांतील अनेक संस्थानें अंत:कलहानें दुर्बल बनलीं होतीं. कलकत्त्यास इंग्रजांच्या खजिन्यांत फारसा पैसा नसून, फौजेंत दुफळी होती. अशा अडचणींतून मार्ग काढावयाचा असल्यामुळें वेलस्लीने तैनाती फौजेची खुबीदार पध्दत अंमलांत आणून, हिंदुस्थानांतील अनेक राजेरजवाड्यांस क्रमाक्रमानें आपल्या ताब्यांत आणिलें. जे राजे स्नेहाच्या नात्यानें आटोक्यांत येण्याजोगे होते, त्यांच्या बरोबर स्नेहाचे ठराव करून त्यानें त्यांचें पाठबळ मिळविलें; जे शिरजोर त्यांच्यांशी युध्द करून त्यांचा एकदम बंदोबस्त करण्याची तयारी केली आणि जे अगदींच कमकुवत होते, त्यांचीं राज्यें खालसा केलीं. निजाम, गायकवाड, अयोध्येचे वजीर हे पहिल्या कोटींतले होते; टिप्पू, शिंदे, होळकर हे दुसर्या कोटींतलें होते व तंजावरचा राजा वगैरे तिसर्या कोटींतले होते. या प्रत्येकाचा बंदोबस्त त्यानें पृथक़पणें केला. कवाइती तैनाती फौजेचा खर्च एतद्देशीय राजांपासून घेऊन त्यांच्या मदतीस आपली फौज देण्याचा, वॉरन हेस्टिंग्जनें सुरू केलेला क्रम वेलस्लीनें सरसकट अंमलांत आणला. हा योनानें परभारें खर्च भागून वाटेल तेवढी फौज इंग्रजांच्या ताब्यांत राहिली. तिजवरील अंमलदार यूरोपियन असता आणि तिला पगारहि इंग्रजांकडून मिळे. कर्नाटकांत फ्रेंचांची कारस्थानें उघड होत होतीं, तेव्हां टिप्पूस नाहींसा करून फ्रेंचांचा हिंदुस्थानांतून समूळ उच्छेद करण्याची तयारी यानें चालविली. श्रीरंगपटटणच्या मोहिमेंत टिप्पूचा पराभव होऊन तो मेला व म्हैसूरचें राज्य इंग्रजांच्या हातीं आलें. वेलस्लीनें हिंदुस्थानांत आल्याबरोबर प्रथम निजामाच्या पदरीं फ्रेंचांचीं फौज होती ती काढून तेथें आपली फौज ठेवून दिली होती. त्याप्रमाणें मराठ्यांशीहि तैनाती फौजेचा तह करण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता. बाजीरावानें वसई येथें असला तह केला. त्यापूर्वी गायकवाडांनींहि हा तह केला होता. शिंदे, भोसले, होळकर व पेशवे हे एक होऊन इंग्रजांविरूध्द खटपट करीत असतां असई, अडगांव वगैरे ठिकाणीं यानें हें मराठ्यांचें जूग फोडलें. शेवटीं शिंदे, भोसलें, होळकर ह्यांनीहि इंग्रजांशी तह केले. त्यांचीं दडपशाहीचीं कामें डायरेक्टर्सनां व पार्लमेंटच्या मत्रीमंडळाला पसंत न पडून त्यांनीं टपका दिल्यानें यानें १८०२ मध्यें राजीनामा पाठविला पण तो नामंजूर झाला. पुढें हा मराठ्यांच्या भानगडींत पडला, त्यामुळें नसती ढवळाढवळ करून कंपनीस कर्ज केल्याबद्दल कंपनीनें याला १८०५ मध्यें परत बोलाविलें. विलायतेस गेल्यावर त्याच्या अन्यायाच्या कारभाराबद्दल कंपनीनें त्याला टपका दिला. परंतु पुढें ३० वर्षांनीं तो दूर करून त्याला २ लाखांची रक्कम बक्षीस दिली.