विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वेलिंग्टन, आर्थर वेलस्ली:- एक मोठा इंग्रज सेनापति. याचा जन्म आयर्लंडमध्यें झाला. त्याचें ईटन येथें शिक्षण झाल्यानंतर त्यास मिलिटरी कॉलेजमध्यें पाठविण्यांत आलें. १७८७ त हा सैन्यांत शिरला. निरनिराळीं लहान मोठ्या दर्जाचीं कामें करीत तो वर चढल्यामुळें त्यास सर्व कामांचा अनुभव बराच आला होता. १७९३ त तो लेफटनन्ट झाला. पुढें त्यास हिंदुस्थानांत पाठविण्यांत आलें. टिप्पूबरोबरच्या लढाईत ब्रिटीश तुकडीचा हा मुख्य होता. म्हैसुरमध्यें ब्रिटीशांनीं त्यास मुख्य अधिकारी नेमलें. होळकराच्या हल्ल्यापासून पेशवाईचा बचाव यानेंच केला. असईच्या लढाईंत शिंदे-भोसल्यांचा यानें पराभव केला. पुढे तो इंग्लंडमध्यें गेला. तेथें त्यास नाइट ही पदवी देऊन नेपोलियन बरोबराच्या युध्दांत पाठविण्यांत आलें. हा १८१४ त पॅरिसला इंग्रजांचा वकील होता. नेपोलियन एल्बाहून परत आल्यावर झालेल्या वॉटर्लूच्या लढाईंत इंग्रजांकडील सेनापतित्व वेलिंग्टलकडेच होतें. नेपोलियलसारख्या योध्दावर त्यानें जय मिळविल्यानें इंग्लंडमध्यें त्याचा मानमतराव झाला. पुढे तो पार्लमेंटमध्यें शिरला. १८२८ ते ३० पर्यंत तो इंग्लंडचा प्रधान होता. पण त्याचा अंगीं मुत्सद्देगिरी दिसली नाहीं. त्याच्या कारकीर्दीत टेस्ट व कॉर्पोरेशन अॅक्ट रद्द झाले. व कॅथोलिक इमॅन्सिपेशन बिल पास झालें. याबद्दल त्याजवर बरीच टीका झाली. ग्रीस व तुर्कस्तान यांच्या प्रकरणांत त्याचें धोरण चुकलें. सुधारणा (रिफार्म) बिलावरील लोकमताची कल्पना न झाल्यामुळें त्यास त्यानें विरोध केला ही त्याची चूक झाली, व त्याचें प्रधानमंडळ तत्काल मोडलें. १८५२ मध्ये तो मरण पावला.