विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वेल्लोर (एल्लोर), तालुका:- मद्रास, कृष्णा जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीकडील एक तालुका. क्षेत्रफळ ७६६ चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) २२००६३. यांत एक गांव (एल्लोर) व २०६ खेडीं आहेत. उत्तरभागांत जंगल व टेंकड्या आहेत. तालुक्याच्या दक्षिण सरहद्दीलगत कोलेर तलाव आहे.
गांव:- हें तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे. लोकसंख्या (१९२१) ४५८६२. एल्लोरच्या उत्तरेस ८ मैलांवर पेडडावेंगी येथें बरेच पुराणविशेष आहेत. वेंगी नामक बौध्द राज्याची राजधानी येथें असावी असें वाटतें. हें गांव १५१५ मध्यें विजयानगरच्या कृष्णदेव राजानें ओरिसाच्या गजपति राजाजवळून घेतलें. पण गोवळकोंड्याच्या कुत्बशाही सुलतानानें तें त्याजवळून घेतलें. १५७२ मध्यें एल्लोर हें सरकारचें मुख्य ठिकाण करण्यांत आलें. एल्लोर हें कोलेर तलावाभोंवतीं असलेल्या दलदलीच्या भागानजीक वसलेलें आहे. येथील हवा फार उष्ण आहे. गांवांत धान्याचा मोठा व्यापार चालतो. एल्लोरचे गालीचे सुप्रसिध्द आहेत. म्यु. ची स्थापना १८६६ सालीं झालीं. येथें एक हायस्कूल व एक इस्पितळ आहे.