विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वेश्याव्यवसाय:- फायद्याकरितां वाटेल त्याला आपला अंगविक्रय करणार्‍या स्त्रियांस वेश्या म्हणतात. वेश्यापासून रखेल्या निराळ्या काढिल्या पाहिजेत. रखेल्या या पत्नी या नात्यानें एकाच पुरूषाशी व्यवहार करतात. तेव्हां त्यांचा दर्जा धर्मपत्नीच्या जरा खालीं व वेश्येच्या जरा वर लागेल. वेश्या या सर्व काळीं सर्व ठिकाणीं आढळून येतील. पोटाच्या इतर धंद्यापेक्षां हा धंदा बरा असें समजून बर्‍याच स्त्रिया याचा अंगीकार करतात व बर्‍याच स्त्रियांनां बळजबरीनें या धंद्यांत ओढिलें जातें. (१) उद्योगधंदा मिळण्याची पंचाईत; (२) अतिशय दगदगीची व कमी पगाराची नोकरी; (३)  घरीं मुलींनां होणारा जाच; (४) गरीब लोकांची दाटीनें व असभ्यतेनें रहाण्याची सवय; (५) कारखान्यातून तरूण स्त्रीपुषांशांनां सदोदित एकत्र करावें लागणारें काम व वाईट लोकांची संगत;  (६) श्रीमंत लोकांची चैनींचीं व अनीतीचीं समोर घडणारीं उदाहरणें; (७) अनीतिकारक वाड्.मय व करमणुकीचे प्रकार; (८) व्यसनी व दुराचारी लोकांचे व त्यांच्या हस्ताकंचे डावपेंच; इत्यादि कारणांनीं बायका घरांतून उठून वेश्या बनतात असा पाश्चात्त्य समाजशास्त्रज्ञांचा अनुभव आहे. आपल्याकडे यांपैकीं कांहीं कारणें नवीन वेश्या होण्याला उपयोगी पडतात; तथापि आपल्यांत एक स्वतंत्र वेश्यावर्गच प्राचीन काळापासून अस्तित्वांत आहे. त्या वर्गातील स्त्रियांचा वंशपरंपरेचा हा धंदा आहे.

इतिहास:- वेदवाड्.मयांत देखील वेश्याव्यापाराविषयीं उल्लेख आढळतात. पुंश्चली, महानग्नी, रामा वगैरे शब्द वेश्या अर्थाचे होत. वाजसनेयी संहितेंत हा एक धंदा म्हणून उल्लेखिला आहे. रामाच्या राज्यारोहणाच्या वेळीं राजवाड्यांत वेश्यांचा नाच झाल्याचा उल्लेख आहे. लग्नासारख्या मंगलप्रसंगी वेश्यांचें आगमन शुभदायी मानणार्‍या जाती मुंबईशहरांत आजमित्तीलाहि आहेत. वेश्यांचा धंदा करणें हें आपलें कर्तव्य आहे असें मानणार्‍या व त्याप्रमाणे वंशपरंपरेनें हा धंदा चालविणार्‍या स्त्रियाहि आपल्याकडे आहेत. इतर कोणत्याहि देशांत हा धंदा परंपरेनें करणारी अशी स्वतंत्र जात नाहीं. गोंव्यांत वेश्यांचा भरणा फार आहे. ''तेथें या स्त्रियांचा वर्ग पोर्तुगीज लोकांनीं उत्पन्न केला. पोर्तुगीजांचा पाय गोंवा प्रांतांत भक्कम रूजल्यावर त्यांनीं आपल्या गोर्‍या शिपायांची कामवासना शांत करण्याकरतां ज्या हिंदु स्त्रिया त्यांच्या हवाली केल्या त्यांची संतति म्हणजेच हा वेश्यावर्ग होय'' असें म्हणतात. पाश्चात्त्य ग्रीक, रोमन व सेमेटिक राष्ट्रांतहि हा वर्ग असेच. ग्रीसमधील अतिशय सुशिक्षित स्त्रिया म्हणजे वेश्यापैकींच असत. रोममध्ये अत्युच्च दर्जाच्या स्त्रिया आपली वेश्यावर्गांत गणना करून घेत.

प्रच्छन्नवेश्या:- मुरळ्या, देवदासी यांसारख्या नांवाखालीं अल्पवयी मुलींचा वेश्यांच्या धंद्याकरतां उघडपणें व्यापार चालत असतो (देवदासी, बसवी, भाविणी व देवळी, मुरळी पहा.) फिनिशिया, फ्रिजिया, ईजिप्त वगैरे प्राचीन राष्ट्रांत धर्माच्या नांवाखालीं स्त्रिया वेश्यांचा धंदा करीत. मुंबई व मद्रास इलाख्यांत हा प्रघात फार आहे. इ.स. १९०१ ते १९०५ सालापर्यंत बेळगांव, धारवाड व विजापूर या तीन जिल्हयांत २६२३ मुली या कामीं देण्यांत आल्या. पुष्कळ वेळां या मुली विकत देतात व कधीं कधीं एकेका मुलीची किंमत २००० रू. घेतात. अशी हिंदुस्थान सरकारला प्रांतिक सरकारनें माहिती पुरविली होती.

वेश्यागारें:- गेल्या खानेसुमारीच्या वेळीं आपण अनीतीचा धंदा करतों असें स्वत: तोंडानें कबूल करणार्‍या वेश्यांची संख्या मुंबई शहरांत २९५५ होती. परंतु हा आंकडा बरोबर असावा असें वाटत नाहीं; कारण सर्वच वेश्या आपण हा धंदा करितो असें स्वत: कबूल करतील हें शक्य नाहीं. पोलीस कमिशनरच्या मतें ही संख्या ५१६९ असून ह्या सार्‍या वेश्या ५५८ वेश्यागारांत राहतात. यांपैकीं ५००० हिंदी, ८० जपानी, २८ यूरोपियन, २३ यूरेशियन ५ मॉरिशिअसच्या आणि ३३ बगदादी ज्यू होत्या. वेश्यागारांचे हस्तक आगगाड्यांचीं स्टेशनें, रस्ते, बागा, देवळें, मुलींच्या शाळा व विशेषेकरून स्त्रियांचे जमाव असण्याची ठिकाणें यांत नेहमीं येरझारा घालीत असतात. आणि नवरा बायकोचें भांडण पुष्कळदां हे स्वत: किंवा आपल्या साथीदारांच्या करवीं उपस्थित करीत असतात. किंवा अशाच प्रकारचे अनुकूल प्रसंग दिसतांच त्याचा फायदा घेऊन स्त्रियांनां पळविण्याची व्यवस्था करतात. एखादी स्त्री एकांतांत मिळाली किंवा नादिष्ट असली तर प्रसंगीं जुलूम करून सुध्दा तिला लांबवितात. कोणत्या तरी निमित्तानें भर रस्त्यांत या बेगुमान लोकांनीं स्त्रिया गाडींत घालून पळविल्याचीं व पुढें त्या आपल्या इच्छेप्रमाणें वागत नसल्यास त्यांचा भयंकर छळ केल्याचीं उदाहरणें कोर्टांत आलेली आहेत.

वेश्यागारांत नवीन स्त्री आली कीं वेश्यागाराचा चालक तिला ज्या ज्या कांहीं वस्तू पुरवितो त्यांची दामदुप्पट किंमत आपल्या खात्यावर लिहून तिच्या नांवीं बरेंच कर्ज चढवून ठेवितो. कारण तिला आपल्या कह्यांत ठेवण्याचा हाच एक मुख्य मार्ग असतो. वस्तुत: तिच्या नांवावर कितीहि कर्ज असलें तथापि हल्लींच्या कायद्याप्रमाणें वेश्यागाराच्या मालकाला तें तिच्यावर फिर्याद वसूल करतां येत नाहीं. वेश्यागारांतील स्त्रियांची स्थिति खरोखरींच गुलामापेक्षांहि अगदीं खालच्या प्रतीची असते. त्यांनां गिर्‍हाइकांकडून मिळालेले पैसे मालकाला द्यावे लागतात, व त्या शरीरानें कितीहि असमर्थ असल्या किंवा व्याधिग्रस्त असल्या तथापि मालक सांगेल तितक्या माणसांची पाशवी इच्छा त्यांनां तृप्त करावी लागते आणि तसें न केल्यास अंगावर डागण्या मिळाल्याचींहि उदाहरणें आहेत. कित्येक ठिकाणें त्यांच्या १५x१० फूटांच्या किंवा त्याहिपेक्षां लहान खोल्या असतात. आणि या कनिष्ठ दर्जाच्या वेश्यागारांत १०।१२ वेश्या राहतात. त्याच जागेंत त्यांचा धंदा, जेवण-खाण, राहाणें वगैरे सर्व व्यवहार होतात. कित्येक वेश्यांचा हा व्यवसाय स्वत:च्या राहत्या घरांत खोल्यांतून चालतो. यातल्या कित्येक स्त्रिया नांवाच्या गरती, परंतु धंद्यानें वेश्या असतात. त्यांचे नवरे व त्यांची मुलें तेथेंच असतात व हे सर्व अनीतीचे प्रकार त्यांच्या डोळ्यांदेखत चालतात. कांहीं दिवसांपूर्वी मुंबईंतील डेक्कन रोडवर एका वेश्येचा खून झाला. त्या खटल्यानें बाहेर आलेल्या माहितीवरून कुंटणखान्यांतील स्त्रियांनां साधारणत: दररोज तीस ते चाळीस गिर्‍हाइकांची पशुवासना तृप्त करावी लागते असें सांगण्यांत आलें!

रोग:- वेश्याव्यवसायजन्यरोग मुख्यत: तीन प्रकारचे आहेत. पैकीं साफ्ट कॅन्सर हा अगदीं सौंम्य स्वरूपाचा व अल्प उपचाराअंतीं बरा होण्यासारखा असतो. प्रमेह (गनोरिया) हा रोग संसर्गजन्य व लवकर बरा न होणारा असा आहे. स्त्रियांवर या रोगाचे फारच अनिश्ठ परिणाम होतात. यामुळें शेकडा ५० स्त्रिया कायमच्या वांझ होतात. व केव्हां केव्हां या रोगाचें स्वरूप इतकें भयंकर होतें कीं, असह्य वेदना कमी करण्याकरतां शस्त्रक्रियेनें त्यांचे गर्भाशय कापून काढावे लागतात. तिसरा उपदंश (सिफ्लिस) हा रोगहि फार भयंकर आहे. स्त्री व पुरूष या दोघांनांहि याची बाधा होते. या रोगानें निरनिराळ्या प्रकारचे रोग होऊन माणसें कायमची दगावतात व याच्या संततीलीहि याचे परिणाम भोगावे लागतात.

रोगप्रतिबंधक उपाय:- या रोगांचा प्रसार मुख्यत: वेश्यांकडून होत असल्यामुळें त्याला प्रतिबंधक उपाय म्हणून वेश्यांनां शहराच्या एका ठराविक भागांत राहावयास लावावयाचें व तेथें त्यांचीं वैद्यकिय तपासणी करावयाची अशी क्लूप्ति कांही राष्ट्रांत काढण्यांत आली होती; पण त्याचें सर्व दृष्टीनीं वैयर्थ्य दिसून आल्यामुळें वेश्यांनां सर्व समाजापासून अलग करण्याची व त्यांची शारीरिक तपासणी करण्याची पध्दति आतां हळूहळू नाहींशी होत आहे. उपदेश, प्रमेह वगैरे रोग साधारणपणें वर वर तपासणी करून समजण्यासारखे नसतात. शरीरांतील रक्ताची तपासणी केली किंवा सूक्ष्मदर्षक यंत्राच्या साहायानें जननेंद्रिय तपासण्यांत आलें तरच या रोगाचा सुगावा लागतो. तसेंच वेश्यांची रोगमुक्तता डॉक्टराच्या दाखल्यावरून ठरावयाची असल्यामुळें असे खोटे दाखले देणार्‍या पोटार्थी डॉक्टरांचीहि वाण नसते. शिवाय वैद्यकी तपासणीच्या वेळी काहीं औषधांच्या साहाय्याने आपण रोगमुक्त आहोंत असें वेश्या सिध्द करूं शकतात असाहि अनुभ्व असल्यामुळें हे कायदे जेथें जेथें होते तेथें तेथें ते बंद करण्यांत येत असून हे रोग हटविण्याकरितां दुसर्‍या मार्गाचें अवलंबन करण्यांत येत आहे ही समाधानाची गोष्ट होय. इंग्लंडमधील अशा प्रकारचा कायदा इसवी सन १८८६ मध्यें रदद करण्यांत आला.

कायदे:- इंग्लंडमध्यें सांसर्गिक रोगांचा कायदा पास झाल्यानंतर तशाच प्रकारचा कायदा इसवी सन १८६८ मध्यें हिंदुस्थानांत पास करण्यांत आला व वेश्यांची नोंद करणें, सक्तीनें त्यांची शारीरिक तपासणी करणें, रोगग्रस्त वेश्यांनां सक्तीनें जरूर असे औषधोपचार करण्यास भाग पाडणें, इत्यादि प्रकार इकडे सुरू करण्यांत आले. हा कायदा इकडे इ.स. १८७० च्या ता. १ मे पासून अमलांत आला. वेश्याव्यवसायनज्य रोगामुळें आजारी असलेल्या रोग्याकरतां मुंबईत एक तात्पुरते हॉस्पिटल बांधण्यांत आलें. पहिल्याच वर्षी यांत २००० वेश्यांची नोंद करण्यांत आली व त्यांची सक्तीनें शारीरिक तपासणी करण्यांत आली. ६०० रोगग्रस्त वेश्यांनां औषधोपचार करण्यांत आले. याकरतां ८०००० रूपये खर्च करण्यांत आले. खर्चाच्या मानानें यश फारसें आलें नाहीं. हे सरकारनें पहिल्या वर्षाच्या अनुभवानें कबूल केलें; पण थोड्या कमी खर्चांत आणखी एकदां प्रयत्न करण्याचें ठरविलें. दुसर्‍या वर्षी ६०००० रूपये खर्च झाले आणि शारीरिक तपासणी कशी चुकवावी याच्या युक्त्या वेश्यांनां अवगत झाल्यामुळें दुसरें वर्ष अगदींच अपयशी ठरलें, इतकें कीं इ.स. १८७२ च्या मार्च अखेरला उपरिनिर्दिष्ट हॉस्पिटल व या कायद्याबद्दलच्या इतर सर्व तरतुदी बंद करण्यांत आल्या.

इ.स. १८७६ मध्यें या प्रश्नानें पुन: उचल खाल्ली. सरकार व मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्यामध्यें या प्रश्नांच्या अपयशाबद्दल पुष्कळ वाटाघाट झाली व उपदेश-प्रमेहादि रोगांचा उपद्रव झालेल्या माणसांनां ठेवण्याकरितां स्वतंत्र हॉस्पिटल काढण्याचें ठरलें. यावेळीं वेश्यांची नोंद करण्याचें काम पोलिसांकडे देण्यांत आलें. वेश्यांची शारीरिक तपासणी शहराच्या निरनिराळ्या भागांत करण्याची व्यवस्था करण्यांत आली आणि रोगग्रस्तांनां लॉक हॉस्पिटलमध्यें सक्तीनें ठेवण्यांत येऊ लागलें. मुंबईचे बिशप आदिकरून पुष्कळ लोकांनीं या प्रयत्नांचा निषेध केला. परंतु सरकारनें आापला हट्ट न सोडतां ही पध्दत तशीच चालू ठेविली. शेवटीं इंग्लंडांत या कायद्याची दुरूस्ती झाल्यावर दोन वर्षांनीं म्हणजे इ.स. १८७८ मध्यें मध्यवर्ती सरकारनें या कायद्याची दुरूस्ती केली. यापुढें या बाबतींत विशेष कांहीं प्रयत्न करण्यांत आले नाहींत.

मुंबई सरकारनें १९२१ सालीं नेमलेल्या कमिटीनें मुखत्वेंकरून सुचविले कीं, या बाबतींत ब्रह्मदेशांतील सरकारचें अनुकरण करून वेश्यागारें ठेवणें, वेश्याव्यवसायकरितां स्त्रिया आणणें व वेश्याव्यवसायाकरितां जागा देणें या तीन गोष्टी बेकायदेशीर ठरवाव्या. पुढें एका वर्षाने वरील कमिटीच्या सूचनांनां, कायद्याचें स्वरूप देण्याचें ठरवून आगस्ट १९२३ मध्यें सरकारनें एक बिल आणलें, पण उपरिनिर्दिष्ट तीन गोष्टींपैकीं वेश्याव्यापारावर उदरंभरण करण्याकरितां स्त्रिया आणणें ही एकच गोष्ट बेकायदेशीर ठरवून कुंटणपणाचे प्रकार गैरकायदा ठरविण्यांत आले.

याशिवाय कायद्याच्या दृष्टीनें मध्यवर्ती सरकारनें एक दोन कायदे पास केले आहेत. त्यांपैकीं देवदासीच्या नांवाखालीं होणारा वेश्याव्यापार बंद करण्याच्या दुसर्‍या कायद्याचा ठराव तारीख २६ फेब्रुवारी १९२३ रोजी लेजिस्लेटिव्हअसेंब्लीमध्यें सर मालकम हेले यांनीं आणला होता. अल्पवयी मुलीवर बलात्कार करणाराला शिक्षा करण्याची तरतूद पीनलकोडांत पूर्वीच केलेली होती. तशा कृत्याला मदत करणाराला शिक्षा करण्याचा या बिलाचा हेतु होता. हा यांतील फरक लक्षांत ठेवण्यासारखा आहे. यांत आपला देहविक्रय करण्यास कबुली देण्याच्या बाबतींत स्त्रीचें वय कमींत कमी १६ वर्षाचें असावें असें त्यांनीं सुचविलें होतें. अब्रूच्या बाबतींत निर्णय करण्यास हें वय निदान अठरा तरी असावें अशा रा. नी. म. जोशी यांना सूचना आणली होती ती शेवटीं पास झालीं पण या ठरावाची अमंलबजावणी सरकारनें आपल्या हातीं घेतलीं.

अमेंरिकेसारख्या पुढारलेल्या राष्ट्रांनीं या बाबतींत पुष्कळच सुधारणा केली आहे. त्या देशांत या धंद्यांतील अपराध्यांनां दंड किंवा शिक्षा न करतां ते सुधारावे म्हणून त्यांनां विशिष्ट संस्थांतून ठेवण्यांत येतें. तथापि हा धंदाच असा आहे कीं, कांहीं केल्या हा अजीबात नष्ट होणार नाहीं. समूल निर्मूलन करण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रच्छन्न रूपानें सर्व समाजांत पसरेल व एकंदर समाजाची अधोगति होईल याची जाणीव पाश्चात्त्य राष्ट्रांनां पुरी असल्यानें केवळ हा धंदा सुधारण्याचाच तिकडे प्रयत्न चालू आहे. गरीब लोकांची स्थिति सुधारणें; मुलांनां नीतीचे पाठ शाळेंतून शिकवणें व या धंद्याच्या अनिष्टतेची योग्य जाणीव करून देणें, अनाथ मुलींचें व बायकांचें संगोपन व संरक्षण करणार्‍या संस्था काढणें वेश्याव्यवसाय सोडूं इच्छिणार्‍यांनां मदत देऊन त्यांनां पुढील आयुष्यक्रमणाचा मार्ग दाखविणें इत्यादि अप्रत्यक्ष उपाय केल्यास या धंद्यामुळें समाजावर ओढवणारी आपत्ति कमी होईल. [पु. गो. नाईक -वेश्या व वेश्याव्यवसाय; अॅमॉस-दि सोशल इव्हल; सँगर-हिस्टरी ऑफ प्रास्टिट्यूशन; एन्सायको. सोशल रिफार्म्स; ए.रि.ए; ए. ब्रिं.; मुंबई कमिटीचा रिपोर्ट (१९२१)].