विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वैराट:- जयपूर संस्थान, तोरावती निजामतीमध्यें हें वैराट तालुक्याचें ठाणें आहे. लोकसंख्या सुमारें ५०००. गांवापासून एक मैलावर अशोकाच्या वेळचे (ख्रिस्तपूर्व २५०) शिलालेख व त्याच्याहि पूर्वीचीं तांब्यांचीं नाणीं सांपडलीं आहेत. महाभारतकाळची ही विराटनगरी असावी असें म्हणतात. हयुएनत्संगच्या वेळीं (इ.सन ६३४) येथें मोडकळीस आलेले बुध्दमठ होते. ११ व्या शतकाच्या आरंभीं गझनीच्या महंमदानें या गांवावर स्वारी करून तें लुटून नेल्यानंतर ५०० वर्षे हें गांव जवळ जवळ ओस होतें. ऐने-ई-अकबरींत या गांवाचा उल्लेख आहे; त्यावरून अकबराच्या वेळीं हें अस्तित्वात होतें असें दिसतें.