विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वैश्य:- वैश्य हा शब्द विश् पासून झालेला असून त्याचा अर्थ मनुष्य, लोक, प्रजा असा होतो; स्त्रीलिंगी अर्थ द्रव्य असाहि होतो. जुन्या संस्कृतांत विश् याचा अर्थ अन्न देणें असा होतो. वेदांत विष्पति म्हणजे खेड्याचा मुख्य असा शब्द येतो (क्र. १. ३१, ११.) आर्यांच्या चातुर्वर्ण्यात या जातीचें स्थान तिसरें असून तिचा समावेश द्विजांत होतो. या जातीचा धंदा कृशि-गोरक्षण-वाणिज्य हा प्राचीन काळापासून चालत आला आहे. आर्य लोक हिंदुस्थानांत येण्यापूर्वी त्यांच्यांत हा वर्ग होता, असें दिसतें. शूद्राच्या वरच्या वर्गातील परंतु ब्राह्मण व क्षत्रिय वर्गांतील लोकांहून भिन्न लोकांनां हा शब्द लावूं लागले. हल्लीं वैश्य हा शब्द वर्ण या अर्थानें प्रचारांत फारसा नाहीं, जातिरूपानें आहे. हिंदुस्थानांत वैश्य लोकांची संख्या पुष्कळ आहे परंतु ते लोक हल्लीं आपल्याला निरनिराळ्या जातिनामांनीं संबोधूं लागल्यानें हल्लीं एकूण वैश्य लोकांची संख्या जी सेन्सस रिपोर्टांत दिसून येते ती कमी आहे. ज्ञानकोशांत निरनिराळ्या वैश्य जातींची माहिती त्या त्या नांवाखालीं दिली आहे. त्याखेरीज ज्या जातींनीं आपला समावेश वैश्यजातींत करावा असें कळवून आम्हांला जी माहिती पुरविली आहे, ती येथें देत आहों.
वैश्य या नांवानें खानेसुमारींत समाविष्ट होणारी एकंदर लोकसंख्या (१९११ सालची) ४००६७ आहे, त्यांत म्हैसूर (२६४९७) व मद्रासप्रांतांत ती जास्त आहे. म्हैसूर राज्यांतील वैश्य संख्येपैकीं अर्धी अधिक संख्या कोलार व तुमकूर या जिल्ह्यांतच आढळते. हे लोक व्यापारी आहेत. कोचीनकडील वैश्य म्हणविणारे तेलगू भाषा बोलतात. पूर्वबंगाल्यांतून आसामांत ही जात गेली असून कामरूपकडील लोक शेती करतात व जानवें घालींत नाहींत (आसाम सेन्सस रिपोर्ट १९११). बृहत्संहितेंत यांनां पश्चिमविभागांतील रहिवाशी म्हटलें आहे (१४. २१.)
वैश्यसोनार:- रा. वा. ग. शिंगणापूरकर हें चांदूर बाझार येथून कळवितात कीं, ''वर्हाडांत व खानदेशांत वैश्य सोनार म्हणून प्रसिध्द असलेली जात सोनार नसून वैश्य आहे, परंतु त्यांचा धंदा सोनारीचा आहे. खानदेशांत व वर्हाडांत या जातीच्या पंचायती आहेत. फक्त बर्हाणपुरासच या जातीचा धर्माधिकारी आहे; इतरत्र नाहीं. जातीचीं देवळें घरें वगैरे स्थावरजंगम मालमत्ता मुळींच नाहीं. जातीचा कर नाहीं. आमचे जातीचे सदृष्य कोणतीच जात सांगणे कठिण आहे. तथापि दैवज्ञ जातीसारखी ही थोडी भिन्न जात आहे. ब्राह्मणाखेरीज कोणत्याहि जातीशी अन्नोदकव्यवहार नाहीं. सर्व संस्कार माध्यंदिन यजुर्वेदी भिक्षुक करतात. धार्मिक बाबींचा निकाल ब्राह्मणांकडून होतो. हे निकाल हायकोर्टाप्रमाणें मान्य झाले आहेत. जातीचें चातुर्वर्ण्यव्यवस्थेंत तिसरें स्थान आहे. मुळची ही जात महाराष्ट्रांतून तीनचारशे वर्षांत मध्यप्रांतांत आली. जातीची बंधनें इंग्रजी संस्कृतीमुळें बरींच ढिलीं झालीं. पुनर्विवाहाची चाल नाहीं. विधवांची व निराश्रित मुलांची व्यवस्था नाहीं राखीपासून झालेल्या मुलाची निराळी जात बनली आहे. तिला विदुर किंवा कृष्णपक्षी म्हणतात. महाराष्ट्रीय वैश्यवाणी किंवा लाडसोनार यांच्याशी संबंध नाहीं अथवा सोनार जातीची ही पोटजात नाहीं. लग्नांत मामाचेंहि गोत्र पाहतात. आमच्यांत अगस्ति, काश्यप, कौशिक, सांख्यायन वगैरे ११ गोत्रें आहेत.''
नार्वेकर वैश्य:- नार्वेकर वैश्यजातीबद्दल रा. वि. य गावडे जनरल सेक्रेटरी ना. वै. समाज, बेळगांव हे लिहितात कीं, ''आमचें मूळ ठिकाण गोंवेप्रांतांतील नार्वे गांव होय. पोर्तुगीजांच्या छळानें आम्ही घाटावर आलों. सांप्रत मुख्य वस्ती बेळगांव येथें असून, तेथें आमची मुख्य पंचायत आहे व एक समादेवीचें (जातीचें) देऊळ आहे. तिच्यासाठीं फंड प्रत्येकजणाकडून गोळा करतात. हुंड्यावर शेकडा २ रू. गोळा करण्याची चाल आहे. तसाच शिक्षणफंडहि सुरू आहे. केशवपनाची चाल अल्प प्रमाणांत आहे. या जातीशी सदृष्य अशा बादेकर (यांच्यांत पानवरे, संगमेश्वरी व पाटणे हे पोटभेद आहेत,) बावकुळे व वैश्य वाणी या जाती होत. द्रविड व गौडब्राह्मणांचेंच फक्त अन्न चालतें. विवाहादि संस्कार द्रविडब्राह्मण चालवितात. धार्मिक वाद संकेश्वरमठाकडून निवडतात. मंगेशी, नागेशी, म्हाळसादेवी, शांतादुर्गा वगैरे कुलदेव (गोंव्याकडील) आहेत. पुनर्विवाह रूढ नाहीं. नार्वेकर वैश्यसमाजाच्या १९१५-१६ सालच्या रिपोर्टावरून शिक्षणफंड १५३० रू. पर्यंत (त्यासालीं) जमला होता.''
कोमटी वैश्य:- कोमटी जातीविषयीं माहिती त्या नांवाखाली ज्ञा. को. ११ व्या विभागांत दिली आहेच. त्यासंबंधीं खुलासा करतांना गुलबर्ग्याचे रा. रामचंद्र लक्ष्मण जाजी हे लिहितात कीं, ''आमची कोमटी जात मूळची आंध्र वैश्य आहे. थर्स्टनच्या म्हणण्याप्रमाणें मद्दीग व ब्राह्मण यांच्यापासून झालेली नाहीं. आंध्रवैश्य हे आंध्रब्राह्मणांच्या हातचें खातात. आमच्या लग्नांत एक नाव करून ती विहिरींत सोडण्याची रीत आहे, यावरून पूर्वी आम्ही नावेंत बसून परदेशी व्यापारास जात होतों असें दर्शविलें जातें. पेनगोंडापट्टण (मद्रास इलाखा) येथें आमचे वैश्यगुरू भास्कराचार्य यांचें एक पीठ (शंकराचार्यांच्या पीठासारखें) आहे. आमच्यांत गोत्रप्रवर आहेत. आमचा समाज शिक्षणांत मागें आहे व धर्मभोळा आहे. गुलबर्ग्यापासून जवळ असलेल्या हिरापूर गांवी विहिरींवर १६ व्या शतकांतील तीन शिलालेख असून त्यांत आलेली 'वैश्य भिकाजी सोमाजी मोखेड, काश्यपगोत्रीय गौतम व मुग्दलगोत्री बंगोजी भानो' हीं तीन नांवें आमच्या वैश्य बांधवांच्या आहेत.''