विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
व्यंकटगिरी:- मद्रास इलाखा, नेल्लोर जिल्ह्यातील एक जमीनदारी; क्षेत्रफळ ४२७ चौरस मैल. गांवें १५२ लोकसंख्या (१९२१) ६९६९९. मुख्य गांव व्यंकटगिरी (लोकसंख्या १५ हजार.) हल्लींच्या जहागीरदारांचें घराचें १३ व्या शतकापासूनचें आहे असें म्हणतात. मूळ पुरूषाचे नांव चव्विरेडडी असून तो वेल्लम जातीचा होता. हें घराचें विजयानगरकरांचें मांडलिक होतें. या घराण्यांतील पुरूषांनी मुसुलमानांशी हिंदुराजांतर्फे लढाया मारल्या होत्या. येथील पेटट्याचम राजानें व्यंकटगिरी ही मुसुलमानांपासून जिंकून घेतली. (१७ व्या शतकाचा प्रारंभ) पुढें त्यांचे वंशज शहाजहान व औरंगझेब यांचे मांडलिक बनले. कुमार याचम हा जिंजीस औरंगझेबातर्फे राजारामविरूध्द लढला. त्याचा मुलगा बंगारू याचम हा निजाम व फ्रेंच यांच्याविरूध्द महंमदअल्लीस मिळाला. त्याचा मुलगा कुमार, याच्यावेळीं हैदरानें व्यंकटगिरी लुटली. तेव्हां जहागिरदार हा क्लाईव्ह यास मिळाला होता. सांप्रतच्या जमीनदारास राजा ही पदवी आहे. [बॉसवेल-नेलोर डि. म्यानुएल; डिनॅस्टीज ऑफ दि डेक्कन.]