प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

व्यापार:- एकाच देशांत सर्व तर्‍हेच्या वस्तू पैदा होत नसल्यामुळें व्यापाराची उत्पत्ती होते. वस्तू पैदा न होण्याचीं मुख्य कारणें म्हणजे भूगोलदृष्ट्या भिन्न परिस्थिति व उद्यमाची व साहसाची विषमता. उदाहरणार्थ, कॉफी किंवा मद्य इंग्लंडांत तयार होणें शक्य नाहीं, कारण तेथील हवा अति थंड असते; कांहीं देशांत वस्तू जमीनींत असून साहस किंवा बुध्दि नसल्याकारणानें त्या जमीनीच्या बाहेर काढून व्यापारास पात्र करण्याची त्या देशांतील लोकांची शक्ति नसते. या दोन कारणांमुळें इतर देशांतून व्यापारद्वारां वस्तू आणणें आवश्यक होतें. मनुष्य रानटी स्थितींत होता तेव्हांहि अशा तर्‍हेची व्यापारानुकूल स्थिति होती; फक्त नाण्याच्या किंवा इतर विनिमयसामान्याच्या अभावीं वस्तुविनिमयच प्रचलित असे. ही अवस्था संपून मनुष्यसमाज सुसंस्कृत झाल्यावर कोणती तरी एक वस्तु सर्व विनिमयांचें साधन कल्पून त्यायोगें व्यापार करण्याची पध्दति पडली. या सर्व विनिमयसाधनांतून हल्लींच्या काळीं मुख्यत: सोनें व रूपें व गौण या नात्यानें तांबें, निकल, व पंचरसधातू या धातूंचीं नाणीं अथवा गट हें मुख्य व्यापाराचें साधन होऊन बसलें आहे.

व्यापाराच्या योगानें सुखसाधनें वाढतात हे नि:संदेह सत्य आहे व हेंच व्यापाराचें मुख्य फल आहे. हिंदुस्थान व इंग्लंड यांमधील व्यापार बंद झाल्यास आपल्या सोयी किती कमी होतील हें वर्णन करून सांगितल्याशिवाय प्रत्येकास स्पष्ट दिसेल; कांहीं वर्षे तर रेल्वे व मोटारी इत्यादि अत्यावश्यक सोयी सुध्दां नष्ट होतील. असें जरी आहे तरी शक्य तेवढ्या वस्तू आपल्याच देशांत करण्याचा प्रत्येक राष्ट्राने प्रयत्न केला पाहिजे व याच कारणाकरितां संरक्षक जकातीचे पुरस्कर्ते परकी व्यापार नको असें प्रतिपादन करतात. सर्वच गोष्टींत व्यापारदृष्ट्या देश पराधीन होणें त्याच्या स्वाभिमानास व सर्वांगीण उन्नतीस विघातक आहे. अशा रीतीनें प्रत्येक देशानें शक्य तितका प्रयत्न केल्यानंतर जी व्यापाराची स्थिति राहील ती हितकारक व नैसर्गिक असते; व अशी स्थिति प्राप्त झाल्यावर खुल्या व्यापाराचें तत्त्व मान्य करण्यास हरकत नाहीं.

यूरोपांतील व्यापाराचा त्रोटक इतिहास पुढें लिहिल्याप्रमाणें आहे. फिनिशियन हें या व्यापारांतील पहिलें महत्त्वाचें राष्ट्र होय. त्यानें स्पेन व आफ्रिका, सीरिया, आर्मिनिया, अरबस्तान, हिंदुस्थान, मेसापोटेमिया व पश्चिम यूरोप इतक्या विस्तृत क्षेत्रावर व्यापार केला. यानंतर कार्थेज हें राष्ट्र पुढें येऊन त्यानें रोमच्या साम्राज्याचा नाश करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो विफळ होऊन रोमनें उलट त्यांचा नायनाट केला. यानंतर ग्रीक लोकांनीं इटली व आशियामायनर येथें वसाहती स्थापून यूरोप व आशिया यांमधील महत्त्वाचा व्यापार आपल्या हातांत घेतला. ख्रिस्तपूर्व ३३८ मध्यें किरोनियाच्या लढाईंनंतर ग्रीक लोकांचें वर्चस्व नष्ट झालें व सर्व व्यापाराचीं सूत्रें विजयी रोमच्या हातांत गेलीं. रेशीम, कांच, लोंकरीचें कापड, जवाहीर हस्तिदंत, इत्यादि उंची माल पूर्वेकडील देशांतून रोममध्यें येत असे. रोममधून बाहेर जाणार्‍या मालांत पुस्तकें हींच फार महत्त्वाचीं असत; व त्याच्या खालोखाल कोरींव काम केलेलीं कपाटें व मातीचीं व धातूंचीं भांडीं यांचें महत्त्व असे. रोमचे रस्ते इतके प्रसिध्द असत कीं प्राचीनकाळीं तसे कोणत्याच देशांत नव्हते.

रोमचें साम्राज्य इ.स. ४७६ त नष्ट झाल्यावर सर्वत्र जर्मन राष्ट्रांचा उदय झाला व त्यांची संस्कृति प्रथम निकृष्ट असल्यामुळें व्यापाराची भरभराट नाहींशी झाली व पूर्वेकडील देशांशी व्यापार बंद झाला. नंतर इ.स. ८०० च्या सुमासास शार्लमेन राजानें व्यापाराचें पुनरूज्जीवन केलें व सर्वत्र न्यायाधीश नेमून बंडाळी व सर्व अस्थिरता काढून टाकली. याच काळांत मध्ययुगांतील प्रसिध्द जहागीरपध्दति अथवा मनसबदारी ही उदयास आली. जहागिरीच्या हददींत अनेक शहरें उत्पन्न झालीं व त्यांमध्यें उद्योगधंदे पुनश्च प्रस्थापित झाले. या धंद्यांच्या गिल्ड नांवाच्या पंचायती अस्तित्वांत आल्या व त्या पंचायती धंद्यांसंबंधीं हरएक बाबीसंबंधानें नियंत्रण करूं लागल्या. याशिवाय व्यापार्‍यांची एक निराळी पंचायत प्रत्येक शहरांत असे. कांहीं कालानंतर बहुतेक शहरांनीं बादशहास किंवा जहागीरदारास मोठी रक्कम देऊन राजकीय व आर्थिक स्वातंत्र्य मिळविलें व शहराची सर्व शासनसत्ता आपल्या हातांत घेतली. कांहीं बादशहांनीं द्रव्य न घेतां देणगीच्या रूपानें सर्व हक्क नगरवासी यांच्या हवालीं केले. या सर्व संस्थांचा व्यापारावर फार अनुकूल असा परिणाम झाला व सर्वत्र बंडाळी असतांहि शहरें हीं व्यापार व सुराज्य यांचीं केंद्रें बनली. या वेळच्या इतिहासांत इटलींतील शहरें फारच प्रसिध्द आहेत. अमॅलफी, पीसा, फलॉरेन्स, व्हेनिस, जिनेव्हा व मिलन या शहरांनीं व्यापार करून अपरंपार संपत्ति मिळविली; या सर्व शहरांतील बँका अथवा पेढ्या सर्व यूरोपांतील व आशियांतील देवघेवीचा व्यापार करीत असत. १४ व्या शतकांत व्हेनिसचीं व्यापारीं जहाजें ३००० होतीं व याशिवाय लढाउ जहाजें ४० होतीं. दोन हजार पौंडापासून पसतीस हजार पौंडापर्यंत वार्षिक उत्पन्न असणारे व्यापारी १५ व्या शतकांत व्हेनिस शहरीं एक हजार होते.

जर्मनींतहि शहरांच्या द्वारां व्यापाराची वृध्दि झाली. हँबर्ग व ल्यूबेक यांनीं इ.स. १२०० च्या सुमारास एक व्यापारी संघ स्थापिला. इ.स. १३०० मध्यें जर्मनींतील सत्तर शहरें या संघांत सामील झालीं. या संघानें हलके हलके सर्व देशांशी व्यापार करण्याचा विशिष्ट हक्क राजांपासून मिळविला व अनेक देशांत नवीन धंदे व कारखाने सुरू केले. प्रसंगविशेषी हा संघ युध्द करण्यासहि कमी करीत नसे. या संघाच्या व्यापारी चळवळीनें सर्व देशांत नवीन सुखसाधनें व चैनीचे पदार्थ उत्पन्न होऊ लागले व मध्ययुगांतील अडाणीपणा पुष्कळ अंशानें कमी झाला. या संघानें यूरोपची संस्कृति वृध्दिंगत करण्याचें महत्कार्य केलें. केप ऑफ गुड होपकडून हिंदुस्थानास जाण्याचा निराळा रस्ता सांपडल्यानंतर या संघाचें प्राबल्य कमी झालें व इ.स. १६४८ मध्यें जर्मनींतील महायुध्द संपल्यानंतर हा संघ नष्ट झाला. याच सुमारास इतर देशांतहि व्यापार करण्याची महत्त्वाकांक्षा उदभवल्यामुळें प्रत्येक देश स्वतंत्र रीतीने व्यापार करूं लागला. या मध्ययुगीन व्यापारात अनेक ठिकाणीं ज्या जत्रा भरत असत त्यांचें फार महत्त्व असे. मध्ययुगांत आधुनिक कालाप्रमाणें 'स्टोअर' किंवा दुकानें नसत; त्यामुळें प्रसंगविशेषी भरणार्‍या जत्रांमध्यें अनेक वस्तूंची खरेदी करणे भाग पडे. बहुतेक जत्रा देवालयें अथवा दुसरीं महत्त्वाचीं स्थानें यांच्या आश्रयानें भरत असत व या प्रसंगीं अनेक दूरच्या देशांतील व्यापारी येऊन तेथें आपला माल मांडीत असत.

मध्ययुगांत कारखान्यांसंबंधानें प्रसिध्द असलेल्या प्रांतांत फलँडर्सची गणना आहे. या प्रांतांत लोंकरीचें कापड व तागाचें कापड पैदा होत असे. याशिवाय जरीचें कापड, मखमल व रेशमी कापड हें ऍंटवर्प शहरीं तयार होई. इटली व फ्रान्स देश त्या काळांतहि रेशमी कापडाकरितां प्रसिध्द होते. मध्ययुगांत इंग्लंडचा व्यापार विशेष महत्त्वाचा नव्हता; क्रूसेडच्या युध्दानंतर इंग्लंडचा व्यापार वाढूं लागला. प्रथम लोंकर हीच महत्त्वाची वस्तु निर्गत होऊ लागली. परंतु सन १३५० च्या सुमारास लोकरीचें कापडहि निर्गंत होऊ लागलें.

केप ऑफ गुडहोपचा मार्ग सांपडल्यापासून व्यापाराचें आधुनिक युग सुरू झालें. प्रथम पोर्तुगीज लोकांनीं हिंदुस्थान, मलाया द्वीपकल्प व इराण या देशांत ठाणीं बसवून त्यांनीं दक्षिण आशियाचा व्यापार आपल्या हातांत घेतला. नंतर त्यांनीं आफ्रिकेच्या वायव्यकिनार्‍याशी व्यापार सुरू केला व क्रमानें ब्राझिल, न्यूफौंडलंड हीं व्यापाराच्या टापूंत आणलीं. इ.स.१५७८ च्या सुमारास इंग्रज व डच लोकांनीं त्यांचा व्यापार काबीज केला. डच लोकांनीं १६०२ मध्यें ''डच ईस्ट इंडिया कंपनी'' स्थापिली व हिंदुस्थान, भोल्लक्का बेट, जावाबेट व सुमात्राबेट यांच्याशी व्यापार सुरू केला. आपल्या स्वत:च्याच हातांत सर्व व्यापार ठेवण्याच्या आकांक्षेमुळें डच लोकांनीं इंग्लंड, फ्रान्स, व हॉलंड या देशांतील लोकांस आपल्या वसाहतींत येण्याचा प्रतिबंध केला. त्यामुळें त्या देशांशी त्यांच्या लढाया सुरू झाल्या. फ्रेंच लोकांनीं आफ्रिकेंत सेनेगाल व मादागास्कर व आशियांत सयाम येथें व्यापारी ठाणीं स्थापण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सफल झाला नाहीं. हिंदुस्थानांत कांहीं कालपर्यंत त्यांचें वर्चस्व होतें परंतु तें इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीनें नष्ट केलें. अमेरिकेचा शोध लागल्यानंतर प्रथम स्पेननें मेक्सिको, पेरू, चिली व अटलांटिक महासागरातील बहुतेक बेटें हीं सर्व आपल्या सत्तेखालीं आणिलीं. परंतु या ठिकाणीं फक्त सोनें व रूपें मिळविण्याकडेच त्यांची दृष्टी होती. हें सोनें व रूपें देऊन त्याच्या ऐवजीं चैनीचे पदार्थ खरेदी केल्यामुळें स्पेन देश लवकरच दरिद्री झाला. आपल्या वसाहतींतहि उद्योगधंदे काढण्याची स्पेननें कांहींच खटपट केली नाहीं. नंतर इंग्लंडशी अनेक युध्दें होऊन अठराव्या शतकाच्या शेवटीं स्पेनचें साम्राज्य नष्ट झालें. पोर्तुगीज लोकांनीं ब्राझिल काबीज केलें परंतु १७०३ मध्यें तहामुळें तेथील सर्व व्यापार इंग्लिश लोकांच्या हातीं गेला. यानंतर डच लोकांनीं हडसन वे जवळ व ग्वायनामध्यें कांहीं प्रांत घेऊन वसाहत केली. याशिवाय कांहीं वेस्ट इंडियन बेटें त्यांनीं जिंकून घेतलीं; परंतु व्यापाराच्या दृष्टीनें या वसाहतींचा तादृश उपयोग झाला नाहीं. अखेरीस या साम्राज्यस्थापनेच्या घोटाळ्यांत इंग्लिश लोकांनीं अघाडी मारली. हल्लीं जीं 'युनायटेड स्टेट्स' या नांवानें निर्दिष्ट संस्थानें आहेत तेथें इंग्लिश लोकांनीं वसाहत केली. नंतर वेस्ट इंडियन बेटांपैकीं बहुतेक बेटें इंग्लंडनें घेतलीं व हलकें हलकें कानडामधील फ्रेंच्यांच्या वसाहती सुध्दा इंग्लंडनें काबीज केल्या. या साम्राज्यामुळें इंग्लंडचा व्यापार अतिशय वाढला.

इसवी सन १५०० ते १७७६ या काळांत इंग्लंडनें 'नॅव्हिगेशन लॉज्' अमलांत आणून सर्व व्यापार माल इंग्रजी जहाजांतूनच आणला पाहिजे असा निर्बंध घातला. यानंतर संरक्षक जकातपध्दतीचा अवलंब करून बाहेरून येणार्‍या मालावर जकात ठेविली. शेतकीच्या वृध्दिकरतां आयात धान्यावर जबर करक बसविला. 'बँक ऑफ इंग्लंड' ची स्थापना करून सर्व भांडवल केंद्रीभूत करण्याची व्यवस्था केली. या बॅकेंच्या द्वारें करग्रहणाची शास्त्रीय व आधुनिक पध्दति अमंलात आणल्यामुळें वाटेल त्या कार्याकरितां पैसे अल्प काळांत जमा करण्याची इंग्लंडची शक्ति किती तरी पटीनें वाढली. याच काळांत डच लोकांचा व्यापार खालीं बसला. जर्मन व्यापाराची तीच दशा झाली. परंतु अठराव्या शतकाच्या शेवटीं त्या व्यापाराचा उत्कर्ष सुरू झाला. फ्रान्समध्यें राजांच्या निष्काळजीपणामुळें व्यापाराची वृध्दि १६५० पर्यंत झाली नाहीं; परंतु या सुमारास कोलबरे या मंत्र्यानें संरक्षक पध्दति अमलांत आणून कारखान्यांस उत्तेजन दिलें; तथापि सरकारी जमाखर्चाच्या अव्यवस्थेमुळें देशास निकृष्ट दशा प्राप्त होऊन फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेस व्यापार नष्टप्राय झाला. यूरोपांतील इतर देश मध्ययुगाच्या तुलनेनें बरीच प्रगति करीत होते. परंतु त्यांचा व्यापार अगदीं मागासलेल्या स्थितींत होता. याचें मुख्य कारण तेथील राजकीय स्थिरता व इतर देशांशी युध्द करण्याची त्यांची प्रवृत्ति हें आहे.

यानंतर ज्याला ''औद्योगिक क्रांति'' या नांवानें संबोधितात तें युग सुरू झालें. वाफेच्या साहाय्यानें चालणारीं यंत्रें, नवीन शोध व अति मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारे कारखाने ही या युगाचीं प्रधान अंगें आहेत. आतांपर्यंत कामकरी बहुतकरून घरांतच काम करीत असत; परंतु आतां त्यांनां कारखान्यांत जाणें आवश्यक झालें. यांत्रिक पध्दतीनें कोळसा काढल्यानें कोळशाचें उत्पादन अधिक होऊन त्या कोळशाची लोखंडाच्या उत्पादनास मदत झाली. याबरोबरच रेल्वे व वाफेच्या बोटी यांच्या शोधामुळें मालाच्या परदेशगमनास विलक्षण सुगमता प्राप्त झाली व देशांदेशांतील व्यापार म्हणजे निव्वळ पोरखेळ असा वाटूं लागला. याच वेळेस यूरोपांतील सर्व देशांत शेतकीची विलक्षण प्रगति झाली. कृत्रिम खतें, यंत्राचा उपयोग, गवताच्याऐवजीं गुरांकरितां नवीन कंदमुळांचा शोध, एकाच जिमिनींत अनेक पिकें काढणें इत्यादि नवीन कल्पनांनीं शेतींचें उत्पन्न अतिशय काढणें इत्यादि नवीन कल्पनांनीं शेतीचें उत्पन्न अतिशय वाढलें. या सर्व सुधारणांचा इंग्लंडनें सर्व देशांच्या पूर्वी फायदा घेतला व इंग्रजी व्यापार एकोणिसाव्या शतकांत यूरोपांतील कोणत्याहि देशाच्या तुलनेनें जास्त होता. नेपोलियनशी जें युध्द झालें त्या युध्दांत सुध्दा इंग्रजी व्यापार वाढतच होता. या शतकांत इंग्लंडच्या साम्राज्यांत ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांची भर पडली. धान्याच्या महागाईमुळें इंग्लंडनें खूला व्यापार सुरू केला. व इंग्लंडची आयात कच्च्या मालाच्या असल्यामुळें या व्यापारापासून त्याचें नुकसान झालें नाहीं. १८५० नंतर इंग्लंडचें कापडाच्या व्यापारांतील व उत्पादनांतील वर्चस्व नाहींसें झालें कारण इतर देशहि कारखाने व गिरण्या काढूं लागले; व १८८० नंतर इतर देश इंग्लंडशी स्पर्धा करूं लागले. १८७० पर्यंत फ्रान्सची सांपत्तिक स्थिति साधारणच होती. यानंतर फ्रान्सनें अव्याहत श्रम करून व्यापाराची वृध्दि इतकी केली कीं इंग्लंडच्या खालोखाल त्या देशाचा दर्जा गेल्या महायुध्दापर्यंत होता. फ्रान्सप्रमाणेंच १९ व्या शतकाच्या पूर्वार्धांत जर्मनीच्या व्यापाराची व्यापाराची अवनतदशाच होती. परंतु त्या शतकाच्या उत्तरार्धांत सर्व जर्मन संस्थानांचें ऐक्य करून विस्मार्क यानें जर्मन व्यापारास पहिलें स्थान देण्याची महत्वाकांक्षा जागृत केली. १९१४ च्या सुमारास इंग्रजी व्यापाराचा मोठा प्रतिस्पर्धी जर्मन व्यापार हा होता. जर्मनीनें संरक्षकजकातपध्दतीचा पध्दतशीर व अव्याहत उपक्रम केलेला आहे. याशिवाय जर्मनीनें आपलें आरमार वाढवून इंग्लंडच्या नंतर दुसरा नंबर लागेल अशी महत्त्वाकांक्षा धरली व ती पुरी केली. परंतु साम्राज्य स्थापण्याच्या नादानें इंग्लंड व फ्रान्स यांशी विरोध करून जर्मनीनें आपलें नुकसान करून घेतलें.

१८३० पर्यंत हॉकलंडची व्यापारी दृष्टीनें फार निकृष्ट स्थिति होती. यावेळीं हॉलंडपासून बेल्जम स्वतंत्र झालें. यानंतर हॉलंडचा व्यापार पुष्कळ सुधारला व आपल्या वसाहतींतील व्यापारहि या देशानें सुव्यवस्थित केला. आजमित्तीस हॉलंडची व्यापारांतील प्रमुख देशांत गणना करतां येईल. बेल्जमची उन्नति तर १८३० नंतर फारच झपाट्यानें झाली. विशेषत: पोलादी जिनसा व यंत्रें यांमध्यें त्यांनीं महत्त्वाचें स्थान मिळविलें. महायुध्दानंतर या देशाच्या व्यापाराचा पूर्ण विध्वंस झाला. एकोणिसाव्या शतकांत स्वित्झर्लंडनें उद्योगधंद्यांत फार प्रगति केली. रशियाची स्थिति हिंदुस्थानप्रमाणेंच १८५७ पर्यंत होती म्हणजे बहुतेक निर्गत माल धान्य व लांकूड इत्यादि कच्चा असून आयात मात्र पक्क्या मालाची होती, यानंतर यांत्रिक उत्पादनास रशियन लोकांनीं सुरवात केली; तथापि आजमित्तीस कापडाशिवाय दुसरा महत्त्वाचा निर्गत माल नाहीं. एकंदरीनें हा देश अद्याप मागासलेलाच आहे. जर्मनीचा निकट संबंध असूनहि ऑस्ट्रिया देशानें कारखान्यांत प्रगति केली नाहीं; वस्तुत: या देशांत नैसर्गिक संपत्तीची इतकी विपुलता आहे कीं, जर्मनीच्यापुढेंहि हा देश गेला असता. परंतु अनेक वंशांचे व जातींचे लोक या राज्यांत असल्यामुळें व्यापारास आवश्यक अशी एकतंत्री घटना येथें कधींच स्थापित झाली नाहीं. याच कारणानें रूमानिया व बाल्कन राज्यांचीहि व्यापारी दृष्टीनें प्रगति झाली नाहीं. इटलीचा व्यापार १८६१ पर्यंत अल्प होता; परंतु या सालीं इटली एक राष्ट्र झाल्यापासून त्या देशाच्या व्यापाराची स्थिति उत्तरोत्तर सुधारली. स्पेनची गणना व्यापारी देशांत मुळींच करतां येत नाहीं कारण कांहीं कापडाच्या व कागदाच्या गिरण्यांशिवाय त्या देशांत यांत्रिक उत्पादनच नाहीं. पोर्तुगालची स्थिति त्याचप्रमाणें आहे. मद्य व बुचें यांशिवाय दुसरी महत्त्वाची निर्गत पोर्तुगालजवळ नाहीं तथापि वसाहतींचा योग्य उपयोग केल्यास या देशाचा व्यापार सुधारण्यासारखा आहे. या दोन देशांपेक्षां स्वीडन व नार्वे यांचा व्यापार जास्त विस्तृत आहे. डेन्मार्क हा देश कृशिप्रधान आहे तथापि या व्यापारांत त्या देशानें इतकी युधारणा केली आहे कीं पुष्कळशा बाबींत हा देश हिंदुस्थानास आदर्शभूत आहे. विशेषत: तेथील सरकारी पतपेढ्या व सहकारी तत्त्वावर मालाचें उत्पादन व विक्री करणें हीं हिंदुस्थान देशास अवश्य अनुकरण करण्यासारखीं आहेत.

वरील इतिहासावरून असें दिसून येईल कीं, शास्त्रीय शोध व त्यांस लागणारी शोधक बुध्दि व विद्या, विपुल भांडवल, तारवें, वाफेच्या बोटी इत्यादि साधनें उत्पन्न करण्याचें कौशल्य व शक्य असल्यास व्यापाराच्या संरक्षणाकरितां आरमार या गोष्टी व्यापारवृद्धीस आवश्यक आहेत. या गोष्टींच्या आभावीं स्पेन व पोर्तुगाल हे देश भिकेला लागले व त्यांच्याजवळ असलेलें सोनें-रूपें इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, वगैरे उद्योगी व साहसी देशांनीं हिरावून नेलें. यापैकीं बहुते साधनांच्या आनुकुल्यानें प्राचीनकाळीं फिनिशियन, कार्थेजियन, रोमन लोक व आधुनिक काळीं व्हेनिस, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड स्टेट्स हीं राष्ट्रे व्यापार करून अति संपत्तिमान झालीं. साम्राज्यवृध्दि हें सुध्दा व्यापाराच्या वाढीचें मोठें कारण आहे; किंवहुना असें म्हणतां येईल कीं साम्राज्याच्या मुळाशी मुख्यत: व्यापारतृष्णा व द्रव्यतृष्णा हींच असतात. जे. हॉबसन यानें आपल्या 'इंपीरिअॅलिझम' नामक पुस्तकांत हा सिध्दांत फार अप्रतिम रीतीनें विशद केला आहे; आधुनिक काळांतील अशी युध्दें व्यापाराकरितां झालेलीं आहेत.

याचा असा एक परिणाम होतो कीं, जित राष्ट्रांविषयीं प्रेम मनांत उत्पन्न न होतां त्या राष्ट्राचा व्यापार बसवून शक्य तेवढें त्याला पिळून काढावें व सर्व द्रव्याचा ओघ जेत्याकडे जावा अशी राजकीय घटना उत्पन्न होते. साम्राज्यवादाविषयीं प्रथमपासून तत्त्वज्ञानी व समाजशास्त्रज्ञ यांचा जो तिरस्कार आहे त्याचें मूळ या व्यापारी दृष्टीमध्यें आहे. हिंदुस्थानास या व्यापारी तत्त्वाचा फारच कटु अनुभव गेल्या तीनशे वर्षांत आलेला आहे. ही स्थिति बदलण्यास एकच उपाय आहे, तो हा कीं, हिंदुस्थानास स्वत:चें भांडवल, स्वत:चें आरमार, व वाहतुकीकरितां स्वत:च्या आगबोटी व यांत्रिक व रासायनिक शोध लावणारे हजारों शास्त्रज्ञ हीं सर्व सिध्द केलीं पाहिजेत. ही सामग्री नसल्यास लोण्याचा गोळा दुसरीकडे जाऊन भारतवशीयांस नुसतें ताक पिण्याचा प्रसंग आलेला आहे तो दूर होणार नाहीं.

हिंदुस्थानांतील व्यापाराचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाहीं व त्यामुळें सप्रमाण अशी सामान्य विधानें करतां येत नाहींत. तथापि प्रस्तावनाखंडांत जागोजाग भिन्न भिन्न काळाच्या व्यापारी स्थितीविषयीं उल्लेख आलेलेच आहेत. त्यावरून असें दिसून येईल कीं प्राचीन काळीं व्यापारांत हा देश फार पुढें गेलेला होता. जावापासून रोमपर्यंत हिंदुस्थानांतील हुन्नराच्या वस्तू जात असत व येथील व्यापार्‍यांचा सर्व देशांत प्रवेश असे. रोमन साम्राज्य नष्ट झाल्यानंतर यूरोपांत मध्ययुग सुरू झालें. त्याच काळांत व सदृश कारणामुळें हिंदुस्थानचा बाह्य व्यापार अगदीं कमी झाला. व तो पुन्हां यूरोपीय राष्ट्रांशी दळणवळण सुरू झाल्यावर वाढूं लागला. आज मित्तीस हिंदुस्थानचा एकंदर परकीय व्यापार आयात २८० कोटी + निर्गत ३६५ कोटी = ६४५ कोटीचा आहे. तुलनेकरितां इतर कांहीं देशांचे आंकडे दिले आहेत. इंग्लंडचा व्यापार ३३२५ कोटी रूपये; फ्रान्सचा व्यापार ५१०० कोटी रूपये; जर्मनीचा ९२० कोटी रूपये; युनायटेट स्टेट्सचा व्यापार २४०० कोटी रूपये व जपानचा व्यापार ६४० कोटी रूपये.

येथपर्यंत बाह्य व्यापाराविषयीं विवेचन झालें परंतु या व्यापारापेक्षां अधिक महत्त्वाचा व्यापार म्हणजे देषांतीलच आंतरव्यापार होय. हिंदुस्थान देश मोठा असल्यामुळें या व्यापाराचें फार महत्त्व आहे; येथील एक प्रांतांतून दुसर्‍या प्रांतांत जाणारा माल हा यूरोपांतील कांहीं देशांतून दुसर्‍या परकी देशांत जाणार्‍या मालाबरोबर येईल हा व्यापार उत्तम चालल्यास परकी व्यापार कमी झाल्याचा खेद करण्याची जरूर नाहीं. हा व्यापार वृध्दिगंत होण्यास पुढील गोष्टींचीं आवश्यकता आहे. उत्तम रस्ते, माल नेणार्‍या मोटारी अथवा बैलगाड्या, रेल्वे, नंद्यांतून जाणारीं जहाजें, पेढ्यांच्या द्वारा चेक व हुंड्या इत्यादि पैसे पाठविण्याचीं साधनें. यांपैकीं हिंदुस्थानांत जहाजांची अद्यापि कमतरता आहे. बँका सुध्दां जितक्या प्रमाणांत पाहिजेत, तितक्या प्रमाणांत नाहींत. देशांत अधिक माल पैदा करणें व तो प्रांतांप्रांतांत पसरविणें हें संरक्षक पध्दतीचें बीज आहे व हीच पध्दति कांहीं कालपर्यंत हिंदुस्थानास अनुकूल आहे. परकी व्यापाराच्या आंकड्यांनीं देशाची संपत्ति मापणें हें सर्वथैव चुकीचें आहे. अंतर्गत व्यापाराचं तत्त्व युनायटेड स्टेट्स या देशास फार उत्तम कळलें आहे व या देशाचेंच अनुकरण करणें आम्हांस उचित आहे.

अंतर्गत व्यापार वाढण्यास देशांत साहसी व धनाढ्य व्यापारी उत्पन्न झाले पाहिजेत. याशिवाय आधुनिक काळीं जॉइंट स्टॉक कंपन्यांच्या द्वारें पुष्कळ व्यापार होऊ शकतो. या कंपन्यांचें काम उत्तम होऊन त्यांत फसवाफसवी होऊ नये याकरितां कायद्याचें अति कडक असें नियंत्रण पाहिजे, असें नियंत्रण नसल्यास गरीबांचे हाल होऊन व्यापारांत आवश्यक असणारा विश्वास नाहींसा होतो. विश्वास अथवा पत हें व्यापाराचें केंद्र आहे, तें च्युत झाल्यास व्यापार नष्ट झाला म्हणून समजावें. त्याचप्रमाणें 'शेअर बाजार' अथवा 'स्टॉक एक्सचेंज' या संस्थांच्या संबंधांत अति कडक कायदे असावे लागतात. नाहीं तर सट्टेबाजी माजून शेअर, सरकारी कर्जरोखे इत्यादिंविषयीं तिटकारा उत्पन्न होऊन लोक नवीन गिरण्यांत अथवा कारखायांत पैसे घालण्यास उद्युक्त होत नाहींत व असें झाल्यानें व्यापारास मोठाच धक्का बसतो.

याशिवाय व्यापारास लागणारी महत्त्वाची सामुग्री म्हणजे पैसा ही होय. देशांत विपुल चलन असणें व त्याचा विस्तार व संकोच हीं जरूरीप्रमाणें आपोआप घडून येणें हें व्यापारीदृष्टीनें फार आवश्यक आहे. हें कार्य ज्या राजास अथवा सरकारास साधतें त्यालाच खरी राजसंज्ञा योग्य आहे. हें कार्य अति बिकट आहे व अनेक देशांत पैशाच्या अभावीं अथवा त्याच्या गैरव्यस्थेमुळेंच व्यापाराची अतिशय हानि झालेली आहे. मिल व फॉसेट यांच्या शिष्यगणाची अशी कल्पना होती कीं पैसा ही एक अन्य वस्तूंपैकीं एक वस्तु आहे व थोडा पैसा असला किंवा अतिशय असला तरी त्यांत लाभहानि कांहीं एक नाहीं. खरें तत्त्व असें आहे कीं, पैसा ही वस्तु नसून वस्तूंच्या उत्पादनाचें आद्यकारण आहे. व हें कारण भरपूर प्रमाणांत असल्याशिवाय वस्तूत्पादनाचें कार्य होणार नाहीं  (ह्या मुद्द्याचें विस्तृत विवेचन प्रो. बेन यांच्या 'प्रिन्सिपल्स ऑफ वेल्थ क्रिएशन' नामक ग्रंथांत पहावें). यावरून असें समजूं नये कीं फाजील पैशाची वाढ ही व्यापारास अनुकूल आहे. नोटा काढून पैशाचा अतिरेक केल्यास काय स्थिति होते ती हल्लीं जर्मनी, फ्रान्स व इंग्लंडमध्येंहि महायुध्दाच्या वेळीं दिसून आली. किंमती बेसुमार भडकल्या, परिमाणाची म्हणजे मुख्य नाण्याची किंमत पूर्वीच्या एक हजारांश अथवा त्याच्याहि खाली कांहीं देशांत गेली. परंतु त्यास उपाय असा आहे कीं, आवश्यक असा पैसा किती हें उत्तम ज्ञान असणार्‍या तज्ज्ञाकडून ठरवून घ्यावें. हें ठरविण्याचीं विशिष्ट तत्त्वें आहेत.

व्यापारवृध्दिपासून जसे फायदे तसे तोटेहि आहेत. व्यापारी देशांत संपत्तीच्या मदानें श्रीमंत लोक उन्मत्त व बेफिकीर होतात. व त्यामुळें गरीब-श्रीमंत यांमधील विरोध अधिक तीव्र होऊन समाजसत्तावाद, अराजकवाद इत्यादि अनिष्ट पध्दतींचा उगम होतो. शिवाय व्यापाराच्या लोभानें देशांतील लोकांचें शील भ्रष्ट होण्याचा संभव असतो. लोकांस लुबाडून द्रव्य मिळविण्याच्या नादांत नीति-अनीति, युक्त्या-युक्त, कर्तव्याकर्तव्य इत्यादिकांचा विचार रहात नाहीं. व रूपया अथवा डॉलर हाच सर्वशक्तिमान परमेश्वर बनून जातो [लेखक- प्रो. व्हि. एन्. गोडबोले.]

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .