विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
व्यायाम:- आरोग्य व शरीराची वाढ होण्याकरितां जे शारीरिक श्रम करतात त्याला व्यायाम म्हणतात. या ठिकाणीं प्रथम पाश्चात्त्यव्यायामपध्दतीचें विवेचन करून मग आपल्या पध्दतीकडे वळूं. प्राचीन ग्रीक लोकांच्या ज्या व्यायामशाळा (जिम्नॅशिअम) असत त्यांमध्यें सार्वजनिक खेळांच्या सामान्यामधील खेळांडूंनां शिक्षण देत असत. कुस्ती व मुष्टियुध्द यांचें शिक्षण देण्याची विशेष सोय असे. ग्रीक देवतांच्या आणि वीरांच्या उत्सवप्रसंगीं शारीरिक खेळांचे सामने करण्याची पध्दत असे. सरकारनें चालविलेल्या व्यायामशाळा असत, व तत्संबंधीं सोलननें कांहीं कायदे केलेले आहेत. अशा शाळांनां विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याकरितां वैद्यकशाखाहि जोडलेली असे. ग्रीक तत्त्ववेत्ते व सोफिस्ट पंथी विद्वानहि येथें व्याख्यानें देत, याप्रमाणें जिम्नॅशिअम या ग्रीसमध्यें मोठ्या महत्त्वाच्या संस्था होत्या. रोमन लोकांत जिम्नॅशियम लोकप्रिय नव्हत्या, कारण अशा संस्थेंतील इसम आळशी व दुर्वर्तनी बनतात असें त्यांचें मत होतें. तथापि स्पार्टाच्या राज्यांत जिम्नॅशियम असत कारण त्यांत शारीरिक शक्ति वाढून युध्दाची आवड उत्पन्न होते असें त्यांचें मत होतें. रोमन लोक प्रत्यक्ष युध्दांतल्या गोष्टींचेंच शिक्षण तरूणांनां देत असत. निरोच्या कारकीर्दीत पहिली सार्वजनिक जिम्नॅशियम बांधली गेली. तथापि रोमन जिम्नॅशियममध्यें शरीरबलसंवर्धनाकडे लक्ष नसे, फक्त वैद्यकशाखेला महत्त्व असे. याप्रामाणें मध्ययुगांत व अर्वाचीन काळांतहि शरीरवृध्दीसंबंधीं ही अनास्था कायमच होती; ती आधुनिक काळांत प्रथम रूसोनें आपल्या 'एमिली' या पुस्तकांत निदर्शनास आणिली. शिक्षणशास्त्रवेत्ते पेस्टालोझी व फ्रोइबेल यांनीं जी शिक्षणसुधारणा सुचविली तींत शरीरबलवर्धन हा आवश्यक भाग मानला होता. जर्मनीमध्यें जिम्नॅशियम हा शब्द दुययम प्रतीच्या शाळांनांच लावूं लागले व पूर्वीचा त्या शब्दाचा अर्थ मागें पडला. उलटपक्षीं इंग्लंड, फ्रान्स व इतर यूरोपीय देश तसेंच अमेरिका येथें जिम्नॅशियम म्हणजे शारीरिक व्यायामाच्या जागा असाच अर्थ रूढ आहे. १९ व्या शतकांतहि इंग्लंडमध्यें या शिक्षणाच्या अंगाकडे फारसें लक्ष नव्हतें; व विद्यार्थ्यांची शरीरप्रकृति खालावत चालली होती. तिजबद्दल ओरड सुरू होऊन २० व्या शतकाच्या पहिल्या दशकांत इंग्लंडच्या पार्लमेंटमध्यें अनेक कमिशनांनीं या बाबतींत रिपोर्ट केले. कांहीं लोकांनीं शरीरबलसंवर्धनाच्या संस्थाहि काढल्या. प्राथमिक शाळांच्या कोडमध्यें शारीरिक श्रमांचे प्रकार नमूद करण्यांत आले. दुय्यम शाळांनां व युनिव्हर्सिट्यांनां जिम्नॅशियम जोडण्यांत आले.
जिम्नॅशियममध्यें व्यायाम घेण्याचीं साधनें बहुविध असून त्यांपैकीं कांहीं फार किंमतीचीं असतात. सर्वसाधारपणें डंब-बेल हें साधें व फार उपयुक्त साधन सर्वत्र असतें. डंब-बेल इंग्लंडांत इलिझाबेथच्या काळापासून प्रचारांत आहेत. त्यांचें वजन माणसाच्या वयाच्या व शक्तिच्या निरनिराळ्या मानानें निरनिराळें ठेवतात. डंब-बेल घेऊन शरीराला निरनिराळ्या प्रकारें चलन देऊन व्यायाम केल्यास सर्व शरीराची वाढ होण्यास तें उत्तम साधन आहे. डंब-बेलची व्यायामपध्दति युजिन सँडो नामक पाश्चात्त्य मल्लानें अत्यंत परिणावस्थेस नेली; व तो स्वत: या पध्दतीनें अद्वितीय व आदर्शभूत मल्ल बनला. डंब-बेल खेरीज जिम्नॅशियममध्यें व्यायामाची आणखीं साधनें असतात तीं; (१) लीपिंग-रोप; (२) लोपिंग-पोल; (३) व्हॉल्टिंग हॉर्स; (४) हॉरिझाँटल बार; (५) पॅरलल बार्स; (६) टॅपीझ; (७) ब्रिजलॅडर; (८) ल्पॅक; (९) इन्काइन्ड ल्पेन; (१०) मास्ट; (११) स्विंगिंग रिंग्ज; (१२) प्रिपेअर्ड बॉल; (१३) हॉरिझाँटल बीम.
शारीरिक व्यायामाचा रोगनिवारणाच्या कामीं होणारा उपयोगहि वैद्यकशास्त्रज्ञांच्या पूर्ण लक्षांत १९ व्या शतकांत आला; आणि शारीरिक दोष किंवा व्यंगें नाहींशी करणारे व्यायामाचे प्रकार त्यांच्या विशिष्ट साधनांसह ठरविण्यांत आले. एका फ्रेंच वैद्यकशास्त्रज्ञांनें विशिष्ट सात रोगांकरितां व शरिरव्यंगांकरितां व्यायामाचे प्रकार शोधून काढले आहेत. जर्मनीमध्यें विद्यार्थ्यांनां शारीरिक व्यायाम हा आवश्यक विषय असतो फ्रान्स, स्वीडन, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, इटली, रशिया वगैरे देशांत शारीरिक व्यायामसंस्था लोकप्रिय झाल्या आहेत. फिनलंडमध्यें व्यायामाचे अनेक निरनिराळे प्रकार शोधून काढून पुरूषांप्रमाणें स्त्रियांच्या व्यायामाची सोय केली आहे. शारीरिक शक्तीचे व खेळांचे आंतरराष्ट्रीय सामने प्राचीन ग्रीकांच्या ऑलिंपिक गेम्स ('खेळ' लेख पहा) या नांवानें होऊ लागले आहेत. १९०६ मध्यें अथेन्स येथें झालेल्या अशा सामन्यांत प्रथम डॅनिश स्त्रियांनीं भाग घेऊन याच सामान्यांत पुरूषांप्रमाणे स्त्रियाहि प्रावीण्य मिळवूं शकतात हें सिध्द केलें. जपानमधील जुजुत्सु कुस्तीसंबंधानें माहिती स्वतंत्र लेखांत दिली आहे.
भारतीय:- व्यायाम (वि+आ+यम्) याचा शब्दार्थ 'विशेष रीतीनें ताणणें' असा असून शरीरावयवांनां निरामयत्व राहण्याकरितां विशेष प्रकारें ताणून श्रम देणें याला व्यायाम म्हणतात. व्यायामाचे मुख्य दोन भाग होतात: (१) श्वासोच्छ्वास म्हणजे फक्त फुप्फुसांचा व्यायाम; आणि (२) इतर शरीरावयवांची हालचाल. यांपैकीं पहिल्या प्रकारचा व्यायाम जन्मापासून मरेपर्यंत चालू असतो. हा व्यायाम विशेष कौशल्यानें घेण्याचें जें शास्त्र निर्माण झालें त्याला प्राणायामशास्त्र म्हणतात. दुसरा हालचालींचा; यांत शरीराच्या निरनिराळ्या भागांनां विशेष प्रकारें ताणण्याची क्रिया मुख्य असते. या दुसर्या प्रकारच्या व्यायामाचे तीन पोटभाग आहेत: (अ) नि:साधन म्हणजे शरीराखेरीज इतर कोणतेंहि साधन न घेतां करावयाचा व्यायाम; (आ) ससाधन म्हणजे इतर साधनांच्या साहाय्यानें घ्यावयाचा व्यायाम; आणि (इ) करमणुकीचे शारीरिक खेळ. तिसर्या प्रकारच्या म्हणजे चढाओढीच्या शारीरिक खेळांमुळें लहान मुलांचें कायमचें नुकसान होण्याचा संभव असतो, कारण चढाओढीमुळें स्वत:च्या शक्तिच्या मानाहून अधिक श्रम केले जातात. म्हणून अशा खेळांत सारख्या वयाचीं मुलें असावीं व त्यांच्यावर व्यायामतज्ज्ञाची देखरेख असावी. व्यायामाचे एकंदर प्रकार असे: प्राणायाम, आसनें (हटयोग), नमस्कार, जोर, बैठका, जोडी, मल्लखांब, कुस्ती व आट्यापाट्या, खो खो, वगैरे खेळ.
प्राणायाम:- निसर्गत:च विश्रांतिकालामध्यें सुध्दां आपण एक प्रकारचा व्यायाम करीत असतों, तो व्यायाम म्हणजे श्वासोच्छ्वास हा होय. आपलें जिवंतपण सर्वस्वी फुप्फुसांच्या क्रियेवर अवलंबून असल्यामुळें व्यायामक्रिया इतर सर्व व्यायाममार्गांमध्यें अत्यंत महत्त्वाची आहे. योगमार्गी लोकांचा हाच मुख्य व्यायाम होय.
प्राणायमाचा प्राथमिक अभ्यास पुढीलप्रमाणें करावा:- (१) जमीनीवर उताणें (पाठीवर) निजावें. (२) हातपाय व इतर सर्व अवयव अगदीं ढिलें सोडून द्यावे. (३) डोक्याखालीं लहानशी अशी घ्यावी; ती नरम असावी. (४) अगदीं सावकाश श्वास आंत घेऊ लागावें व तो छातींत पूर्ण भरला व यापुढें आतां जास्त आंत घेतां येत नाहीं असें झाल्यावर तेथें थांबावें व पोट थोडें आंत दबवावें म्हणजे खांद्यांच्या बाजूंकडे वारा शिरेल (या थांबण्यास जालंधरबंध म्हणतात.) श्वास घेतांना मधला पडदा खालीं जात असतो लांबत असतो. (५) जितक्या सावकाशीनें आपण आंत श्वास घेतला तितक्याच सावकाशीनें तो बाहेर सोडूं लागावें (तो सोडतांना तोंडास बारीकसें द्वार ठेवून सोडला तरी चालेल.) सर्व वारा बाहेर गेलासें वाटतां व पुन्हां मधील पडदा वर ओढावा म्हणजे पोटाला मोठी खळी पडेल. ही छातींत जवळ जवळ वारा नसल्याची स्थिति झाली. बाहेर वारा सोडून देऊन जें स्वस्थ राहणें त्यासच ओड्यानबंध असें म्हणतात. अत्यंत अशक्त माणसांनीं आचरण्याचा हा प्रथम व मुख्य व्यायाम होय. श्वसनाकरितां जागा मोकळी व स्वच्छ असावयास पाहिजे; नाहीं तर श्वासाबरोबर अनेक प्रकारचीं घाण छातींत शिरत असते. यानंतरचा योगमार्गांतीलच व्यायाम आसनांचा होय. ('योग' पहा.)
नमस्कार:- नमस्कार ही धार्मिक बाब आहे. प्रथम पंचांग, नंतर अष्टांग नमस्कार झाले. हे नमस्कार घालण्याची पध्दति ब्राह्मणवर्गांत बराच काळपर्यंत होती. परंतु मुसुलमान वगैरे परकीयांच्या स्वार्या हिंदुस्थानावर होऊ लागल्यानंतर समाजाची घडी आपोआपच बिघडत चालली व त्यांचें धार्मिक बाबींचें उज्वल स्वरूप जाऊन त्यांत रूपांतरें होऊ लागलीं. नमस्काराच्या स्वरूपांत रूपांतर करून दंड किंवा जोर यांचा व्यायाममार्ग प्रचारांत आणिला.
जोर:- हा व्यायाम करतांना आपण पाठीचा कणा पुढें व सरळ राखीत असतों. शरीराची सार्वत्रिक वाढ होण्याला हा व्यायाम पुरा पडत नाहीं, याकरितां जोराच्या भिन्न भिन्न तर्हा सांगितल्या आहेत. त्यांपैकीं कांहीं अशा:- (१) मच्छ अथवा सर्पजोर -दोन पायांचीं बोटें व दोन हातांचे तळवे यांवर वाटेल तिकडे शरीर ताठ ठेवून फुलाप्रमाणें उचलता येणें. डंकी हें मच्छजोराचें मुख्य अंग आहे. (२) वराह अथवा डुक्कर जोर-केवळ मान व खांदे तयार होण्याकरितां तेवढ्याच भागास चलन देणें. (३) सिंहजोर:- दोन पायांवर सारखा तोल ठेवून ताठ उभें रहाणें; अशा स्थितींत आपल्या डाव्या बाजूकडे कंबरेच्या वरचा शरीराचा भाग फिरवावा. तसें करतांनां छातीचा व मानेचा भाग वर ताणावा म्हणजे कंबरेस ताण बसेल. त्याच वेळीं मागील पायाची टांच वर उठेल. पुन्हां दुसर्या बाजूस तोंड फिरवावें व तसें करतांना मागीलप्रमाणेंच क्रिया करावी व असें आळीपाळीनें करावें. (४) हनूमान जोर - आपण साधा जोर काढतों त्याप्रमाणेंच हा जोर काढावयाचा परंतु जोर संपतांच दोनहि पाय हाताजवळ एकदम आणावे व चवड्यावर बसून हात वर उचलून छातींशी जोडावें. पुन्हां हात खालीं टेंकून पाय मागें उडवून पूर्ववत् जोर काढावा. (५) गरूडजोर -ताठ उभे राहून एक पाय गुडघ्यांत वाकवून तो दुसर्या पायाच्या मांडीवर आणावा. नंतर वांकविलेल्या पायाचा गुडघा ताठ असलेल्या पायाच्या घोट्यास लावावा व पुन्हां वर उचलावा. (६) गर्दभजोर - एकदम पाठीकडे तोंड खालीं करून जमिनीस हात टेंकून आकाशांत तंगड्या झाडणें ही याची क्रिया आहे. शत्रूनें पाठीवर जाऊन आपला पाय पकडला असतां तो सोडविण्याचें हें मोठें साधन आहे (७) एक हाती जोर व बिन हाती जोर इत्यादि प्रकारहि आहेत.
बैठका:- बैठक म्हणजे शरीरसंकोचनाची क्रिया. नुसते पायांचे सांधे गुडघ्यांत व मांड्यांचे वर मिटले तर त्याला बैठक म्हणतात. तसेंच मांडी घालून खालीं बसल्यास तीहि बैठक होते. ही बैठक 'चित्तेपछाड'' डावांत लागते. या शिवाय उडत बैठक, तिरपी बैठक वगैरे वांकडे तिकडे पाय टाकून बैठकीच्या अनेक तर्हा करतां येतात. तसेंच जोडीदारास कुस्तीमध्यें मागें पाडणें यालाहि बैठक म्हणतात.
जोडी:- जोडी ही हाताच्या शक्तीची वाढ करण्याकरतां उपयोगांत आणतात. हिचे हात म्हणजे तरवारीचेच हात होत. तरवार एक हातानें परजीत असल्यामुळें दुसरा हात दुबळा राहतो व तरवारीचा हात निकामी झाला असतां दुसर्या हातांतील तरवारीचा उपयोग करतां येत नाहीं. ही उणीव दूर करण्याकरितां जोडीचा जन्म झाला असावा. जोडीमध्यें हलकी व जड असे दोन भेद असतात. कुस्ती करणारास जड जोडी ही जास्त उपयोगाची असते. हिच्या योगानें हाताच्या मुंढ्यांस सर्व प्रकारची गति येते व त्यांवरील स्नायू बैलाच्या खांद्याप्रमाणें बळकट होतात.
कारलें:- जोडीमध्येंच कारलें म्हणून कारल्याच्या आकाराचा एक जड जोडीचा प्रकार आहे. कारलीं जोडीप्रमाणें एकदम दोन न वापरतां एक एक हातानें एकच कारलें फिरवतात. यानेंहि मुढें तयार होतात.
नाळ:- दगडाच्या चाकाच्या मध्यावर आडवें दांडकें बसवून वजन उचलण्याची संवय करण्याकरितां जें साधन करतात त्यास नाल म्हणतात.
मल्लखांब:- मल्लखांब ही हातपायांव्यतिरिक्त मनुष्याची प्रतिमा अथवा प्रतिकृति आहे. शरीरसंवर्धनांत जीं जीं साधनें उपलब्ध आहेत, त्यांमध्यें मल्लखांबाच्या तोडीचें साधन क्वचितच सांपडेल. कुस्तीच्या कलेचा सांगोपांग अभ्यास करण्यास मल्लखांबाच्या तोडीचें अन्य साधन नाहीं असें म्हटलें असतां ती अतिशयोक्ति होणार नाहीं. कुस्तीच्या अभ्यासकरितां मानवी जोडीदार घेतला असतां तो थोड्याच वेळांत कंटाळून जातो; याकरितां त्या ठिकाणीं मल्लखांबाची योजना केलेली आहे. लहान मुलें व मोठीं मुलें यांच्याकरितां भिन्न भिन्न जाडीचे मल्लखांब असावयास पाहिजेत. लहानाचा घेर तळाशी १७ इंच व मोठ्याचा घेर २१ ते २४ इंच पर्यंत असावा व डोक्याकडे घेर उतरत नेऊन वर थोडा गळा व त्याच्यावर डोकें असावें. मल्लखांबावरील मुख्य उड्यांचीं नांवें-साध्या उड्या, तेढ्या, दसरंग, डंकी, घोडे, फरारे, कस, व कांही आसनें इत्यादि.
वेताचा मल्लखांब:- हा अगदीं अलीकडील म्हणजे गेल्या पिढींतीलच आहे. हा पूर्वी नव्हता. हा टांगल्या मल्लखांबाप्रमाणेंच उपयोगांत आणतात. बारीक असल्यामुळें अंगास पीळ देऊन हा करतात. याचा पीळ अंगास बसतो तेव्हां सर्पाच्या आवळ्याप्रमाणें रंग लागते.
कुस्ती:- वर वर्णिलेल्या सर्व व्यायाममार्गांचा अंतिम हेतु कुस्ती आहे. कुस्ती म्हणजे कोणत्याहि बाह्य साधनाशिवाय केवळ शरीरमात्रानें शत्रूशी युध्द करणें. अगदीं प्राचीन कालापासून कुस्तीचा उर्फ मल्लयुध्दाचा प्रचार आपल्या देशांत आहे. महाभारतादि ग्रंथांतील जीमूत, कीचक वगैरेंच्या बरोबर झालेल्या कुस्त्यांच्या वर्णनाखेरीज या विषयावर प्राचीन ग्रंथ नाहींत. सध्यां जेठी म्हणून जो मल्लांचा वर्ग आहे त्यांचा मल्लपुराण नांवाचा ग्रंथ उपलब्ध आहे. श्रीकृष्णाला महामल्ल ही संज्ञा होती व कृष्णापासूनच ही विद्या इतरांस परंपरेनें प्राप्त झाली. शिवाय तत्पूर्वी श्रीरामाच्या वेळच्या वानरजातींतील मुख्य मारूती अथवा वज्रांग व त्याचप्रमाणें जांबुवंत या दोघांच्या नांवानें चाल असलेल्या कुस्तीच्या दोन तर्हा आहेत. त्यांच्या जोडीला पुढें मुसुलमानांची व्याघ्रकुस्ती अस्तित्वांत आली.
हल्लीं हिंदुस्थानामध्यें पंजाबी कुस्ती व भारतकालांतील जुनी कुस्ती आणि तिचें सुधारलेलें स्वरूप अशी दोन तर्हेची कुस्ती मुख्य आहे. पंजाबी कुस्तीमध्यें अलेक्झांडरच्या वेळीं हिंदुस्थानांत आलेल्या लोकांच्या बरोबर पाश्चात्त्य कुस्तीची कांहीं छटा दृष्टोत्पत्तीस येते. कारण तिच्यांत आणि दक्षिणींत बराच भेद दिसून येतो. पंजाबी कुस्ती बहुतेक खडा डी होते, म्हणजे अस्वलाच्या कुस्तीसारखी होते. याकरितां तिला कांहीं जुनें लोक अस्वली (जाबुवंती) अथवा ऋक्ष कुस्ती असें म्हणतात कारण त्या प्रकारांत जमीनीवर बसून भेटी कुस्ती फारशी होत नाहीं. पाश्चात्त्य कुस्तींत बॉक्सिंग प्रमाणेंच कंबरेखालीं मार नाहीं परंतु पंजाबीमध्यें टांग मारणें म्हणजे पायाचा उपयोग केला जातो. हा फरक हिंदुस्थानांतील कुस्तीशी तिचा संयोग झाल्यामुळें झालेला दिसतो. पंजाबी कुस्तींत खूप खुराक खावून पाशवी शक्ति वाढविण्याकडे फार कल दिसतो. दक्षिणी कुस्ती अगर हनुमंती कुस्ती हिची तर्हा पंजाबी अगर पाश्चात्त्य कुस्तीच्या तर्हांहून भिन्न आहे. या कुस्तीकरितां शरीर कमावण्याची तर्हाहि तशीच अगदीं भिन्न आहे.
पेशवाईच्या काळीं हिंदुस्थानांत बहुतेक राजे आपल्या पदरीं मल्ल अथवा जेठी यांनां, मल्लविद्येचा प्रचार लोकांत करण्याकरितां ठेवीत असत. त्याचप्रमाणें मुसुलमानहि पहिलवान पाळीत असत, 'आखाडे' पहा.
१९ व्या शतकांत कुस्तीला शास्त्रीय स्वरूप बाळंभट दादा देवधर यांनीं दिलें. दादा गुरूंनीं आवली शिष्यशाखा फार मोठी वाढविली व एक संप्रदायहि निर्माण केला. त्यांनीं हनुमंती कुस्तीचें रहस्य जाणत त्या कुस्तीच्या विद्येचें मुख्य साधन जो मल्लखांब त्याची पूर्ण क्रिया संपादन केली. या विद्येच्या बळावर त्यांनीं सुप्रसिध्द मुसुलमान पैलवानांवरहि विजय मिळविले. कुस्ती करणारास मल्लखांबाच्या अमुक पकडा आल्याच पाहिजेत असा त्यांच्या संप्रदायांतील आखाड्यांत नियम आहे. त्याच्यामुळें शारीरिक उन्नतीच्या बाबतींत ब्राहमणांचा दर्जा वाढला. हिंदुस्थानांतील कुस्तीची पध्दत आज सर्व जगांत श्रेष्ठ ठरली आहे असें गामाच्या उदाहरणावरून म्हणतां येईल. कारण गामा हा हिंदी पहिलवान 'वर्ल्ड चँपियन' म्हणून गणला गेला होता.
आपल्याकडील कुस्तींत शत्रूचा पराजय करणें म्हणजे त्याची पाठ खालीं (जमिनीस लागलेली) असून त्याच्या छातीवर बसून त्याला यत्किंचित हालूं न देणें हें होय. कुस्ती करतांना शत्रूस आपल ताब्यांत आणण्याकरितां ज्या युक्त्या आपण योजितों त्यांस डाव किंवा पेंच असें म्हणतात. पेंचामध्यें दुसर्याच्या शरीराचा कोणता तरी भाग पकडून ठेवून त्यानंतर कोणत्या तरी प्रकारचा मार करावयाचा असतो. पेंचामध्यें दोन्हीं क्रिया म्हणजे बांधणे आणि मारणें या एकाच व्यक्तीनें करावयाच्या असतात; डावामध्यें दुसर्यानें आपणांवर कांहीं प्रयोग केला असतां त्याच्या प्रतिकारार्थ आपण कांहीं क्रिया करावयाच्या असतात. सध्या हे दोनहि शब्द सारख्याच अर्थानें वापरतात. शरीराच्या सर्व अवयवांस पीळ सोसण्याची संवय पाहिजे, नाहींतर शत्रूच्या हातून थोडासा पीळ पडतांच आपण बेजार होऊन जातों. मल्लखांबामुळें शरीराला सर्व तर्हेच्या पिळाची व ताणाची संवय होते. प्रमुख डावपेंचांचीं नांवें : - अवपातन (चाट, जान्वाघात, डंकीरिग्गा,) उरूभंग (मांडमोड=खोडा,) कंठपाश (गळखोडा), कंठपरिभ्रमण (चक्रीकसोटा,), कटितनूकरण (कंबर खोडा), करभंग (हात मोड), करसंपीडन (हात मुरड), कक्षाबंध (हलकस), करसंपरडनावपातन (मोळीची टांग), गलग्रह (गळ मिठी), ग्रीवाभंग (कानसळई), ग्रीवाकर्षावपातन (मानेची टांग), चक्रमणपूर्वकाध:क्षेप (कलाजंग), जान्वाघात (चाट), द्वैधीकरण (तबकफाड), परिग्रह (खोंच), परिभ्रमण (दस्ती), परिवर्तन (झटका, निकाल), पाश्चात्प्रपातन-निकर्षण (बैठक), पादपाश (स्वारी), पादाकर्षण (नालपौंचा), पृष्ठभंग (तमंचा टांग), प्रग्रह (गम, सखी), प्रभृति (हस्तभंग), प्रत्योपवाहन (धक्का), बाहुपाश (दण्डमुरड), मणिबंधपीडन (चिकाटी), मुखपृष्ठाघात (झडप), मुखप्रपातन (गजबीड), वाहाहोत्थूतनिस्वन (पछाड), स्वपरिवर्तन (मानेची बैठक), स्वांगसंकोचन (आवळा), हस्तभंग (तावबगळी टांग) इत्यादि.
आहार:- व्यायाम घेणारानें आहाराबद्दलचें नियम नीट पाळले पाहिजेत (आहार पहा.) अन्नाशय हें एक प्रकारचें जातें आहे. त्याला एक वेळचें साधें अन्न बारीक करून पुढें ढकलण्यास सुमारें पांच तास लागतात. या प्रमाणानें दर पांच तासांनीं पोटांत अन्न घालण्यास हरकत नाहीं. त्या वेळा म्हणजे सकाळीं ६, दुपारी ११, सायंकाळीं ४ आणि रात्रीं ९ या चार होत. यापैकीं सकाळीं व सायंकळीं थोडें अन्न म्हणजे फराळ करून बाकीचे दोन मुख्य भोजनकाळ समजावे. चहा, कॉफी वगैरे गरम पेयें आणि तिखट व तेलकट पदार्थ जठराला अपायकारक म्ह. अग्निमांद्य (डिस्पेप्शिया) हा रोग उत्पन्न करणारे असतात, म्हणून ते वर्ज्य करावे. [लेखक - गणपतराव वझे मास्तर.]