विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
व्हिक्टोरिया (१८१९-१९०१):- इंग्लंडची एक राज्ञी. इंग्लंडचा राजा जो तिसरा जॉर्ज त्याच्या चवथ्या मुलाची ही कन्या होती. हिचा बाप ही आठ महिन्यांची असतांना वारला. चवथा वुइल्यम वारल्यानंतर १८३७ सालीं हिला राज्याभिषेक झाला व विवाह १८४० सालीं मामेभाऊ प्रिन्स अलबर्ट याच्याशी झाला. व्हिक्टोरियानें इंग्लंडच्या इतर कोणत्याहि राजापेक्षां जास्त दिवस राज्यसुख भोगिलें. तिचीं मतें लिबरलपक्षाच्या बाजूचीं होतीं. पण ग्लॅडस्टनच्या आयरिश होमरूल बिलाला तिची अनुकूलता नव्हती. तिची रौप्य ज्युबिली व सुवर्णज्युबिली अनुक्रमें १८८७ व ९६ मध्यें साजर्या झाल्या. तिचा खून करण्याचे प्रयत्न तीन चार वेळां झाले पंरतु ते सर्व फसले. तिच्यापूर्वीच्या राजेलोकांच्या वर्तनानें इंग्लिंश प्रजेचें राज्यकर्त्याविषयीं जें मत झालें होतें तें तिनें आपल्या चांगल्या वर्तनानें नाहींसें केलें. तिनें ' दि अर्ली डेज् ऑफ प्रिन्स कॉन्सर्ट' व ' लीव्ह्ज क्रॉम दि जर्नल ऑफ अवर लाइफ इन हायलँड' हीं दोन पुस्तकें लिहिलीं. १८७६ सालीं एम्प्रेस ऑफ इंडिया' (हिंदुस्थानची महाराज्ञी) हा मान पार्लमेंटनें तिला दिला. ती जानेवारी १९०१ मध्यें मृत्यू पावली. तिला पांच मुली व चार मुलगे अशी अपत्यें झालीं. पहिली मुलगी प्रिन्सेस व्हिक्टोरिया हिचा महायुध्दांतील प्रमुख जर्मन बादशहा केसर हा मुलगा होय.