विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
व्हेसुव्हियस:- इटली. नेपल्स शहरापासून सुमारें सात मैलांवर नेपल्सच्या सामुद्रधुनीच्या पूर्वरेषेवर पसरलेला ज्वालामुखी पर्वत. याची उंची साधारणत: समुद्रसपाटीपासून ४००० फूट आहे. ख्रिस्ती शकाच्या आरंभीं व त्याचप्रमाणे त्यापूर्वीहि बरींच शतकें या पर्वतावर बरेच लोक वस्ती करून रहात. या पर्वताच्या ज्वालामुखीसंबंधीं त्यावेळीं लोकांनां मुळींच कल्पना नव्हती. या पर्वताच्या आसमंतात द्राक्षाचे मळे असत. या ज्वालामुखीचा पहिला स्फोट सन ७९ मध्ये ता. २४ आगस्ट रोजीं झाला. हा स्फोट अत्यंत भयंकर स्वरूपाचा असून यामुळें बर्याच लोकवस्तीचा व शहराचा नाश झाला. त्यानंतर सोळाव्या शतकापर्यंत सन २०३, ४७२, ६८५: व १५ व्या शतकांत सरासरी आठ नऊ असे एकंदर ११।१२ स्फोट झाले. आकस्मिक स्वरूपाचा दुसरा भयंकर स्फोट सन १६३१ मध्यें १६ डिसेंबर रोजीं झाला. या स्फोटाच्या वेळीं जवळ जवळ १८००० माणसें ठार झालीं असावींत. गेल्या तीन शतकांत, सन १७६६-६७, १७७९, १७९४, १८२२, १८७२ व १९०६ सालीं, असे एकंदर सहा स्फोट झाले. १९०६ च्या स्फोटानंतर प्रज्वलित सुळक्याचें स्वरूप् बरेंच बदललें आहे. हल्लीं सुळक्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यास नेपल्स शहराहून विजेच्या आगगाडीची सोय झाली आहे. त्यापुढें शिंक्यांत बसून तारेच्या साहाय्यानें ज्वालामुखीच्या तोंडाजवळ सरासरी १५० यार्डांपर्यंत जातां येतें. वारंवार होणार्या स्फोटांमुळें प्रत्येक वेळीं प्रज्वलित मुखाचें व त्याच प्रमाणें भोंवतालच्या कड्याचें स्वरूप बदलत चाललें आहे.