विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
व्होल्टा अल्सोन्ड्रो:- (१७४५-१८२७):- एक इटालियन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ. विद्युच्छास्त्रांतील पुरोगामी तज्ज्ञ म्हणून याची ख्याति आहे. ''व्होल्ट'' या नांवाचें विद्युत्परिमाण याच्या नांवावरूनच पडलें आहे. १७७४ सालीं कामो येथील विद्यालयांत याला पदार्थविज्ञानशास्त्राचा प्रोफेसर नेमण्यांत आलें; पाविआ येथें पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ प्रोफेसरची जागा जेव्हा १७७९ साली तयार करण्यांत आली, तेव्हां त्या जागेवर प्रथमत: याची नेमणूक झाली. १७९१ सालीं याला रॉयल सोसायटीनें ''कोपले'' पदक बक्षीस दिलें. सन १८०१ मध्यें याला नेपोलियननें बोलावून घेतलें व याच्या सन्मानार्थ एक नवीन पदक तयार करविलें. लांबडीं संस्थानाचा हा पुढें सेनेटर झाला. पादुमा येथील विद्यापीठांतील तत्त्वज्ञान शाखेचा याला डायरेक्टर करण्यांत आलें. १८१९ सालापासून मरेपर्यंत हा आपल्या जन्मगावीं राहात असे.