विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
व्होल्टेअर– (१६९४-१७७८) एक फ्रेंच तत्त्ववेत्ता, इतिहासकार व नाटककार. हा पॅरिस येथें जन्मला. याचें खरें नांव फ्रॉंकॉइस मेरी अरूएट असें होतें. हे व्होल्टेअर कुटुंब सुखवस्तु असून व्होल्टेअरचा आजा व्यापार करीत असे. व्होल्टेअर ७ वर्षांचा असतांनाच ह्याची आई वारली. इ.स. १७११ पर्यंत जेसुइट लोकांनीं त्याला शिक्षण दिलें. बालपणांतच त्याची कवित्वशक्ति दृष्टोत्पत्तीस आली. वयाच्या सतराव्या वर्षी सामान्य शिक्षण संपल्यावर स्वत:चा कल वाड्.मयाकडे होता तरी केवळ बापाच्या इच्छेस्तव त्यानें कायद्याच्या अभ्यासाला सुरूवात केली. तथापि त्याचा वाड्.मयाचा व्यासंग सुटला नाहीं. यावेळीं त्यानें कांहीं व्यक्ति-निंदात्मक लेख लिहिल्यावरून त्याला टूल येथें व नंतर सली येथें हद्दपार करण्यांत आलें. तेथून परत आल्यावर त्याला इ.स. १७१७ मध्यें पुन्हां बॅस्टील येथील तुरूंगांत दिवस काढावे लागले. यापुढील त्याचा बराचसा काल लेखांबद्दल शिक्षा व हद्दपारी भोगण्यांतच गेला. नंतर यानें गुप्तहेराचें काम पत्करिलें. या नवीन कामास त्यानें १७२२ सालीं सुरवात केली. हें काम करीत असतां त्याचा लेखनव्यवसाय चालूंच होता. मध्यंतरीं त्यास अनेक शारीरिक आपत्तीहि भोगाव्या लागल्या. १७२५-२९ हा काळ त्यानें इंग्लंडांत काढिला. तेथून फ्रान्समध्यें परत येण्याच्यावेळीं त्यानें वाड्.मयविषयक बरेच बेत केले होते व त्याप्रामाणें त्यानें कांहीं पुस्तकेंहि प्रसिध्द केलीं. या वेळच्या कांहीं लेखांवरून त्याजवर तुरूंगांत जाण्याची पुन्हां पाळी आली होती. पण लॉरेन या स्वतंत्र संस्थानांत असल्यामुळें तो बचावला. प्रशियाचा राजा फ्रेडिक यानें व्होल्टेअरला अनेकवार बोलावलें; पण व्होल्टेर जाऊ शकला नाहीं; शेवटीं कांहीं राजकीय कामाकरितां त्यास जावें लागलें. यापुढें राजकारणांत त्याला मान मिळूं लागला. १७५१ सालीं व्होल्टेअर हा, फ्रेडिक दि ग्रेटच्या बोलावण्यावरून, बर्लिन येथें गेला. प्रारंभीं फ्रेंडिकनें याला चांगल्या रीतीनें वागविलें पण लवकरच या दोघांचें जमेनासें झालें. कांहीं दिवस कैद भोगल्यानंतर तो फ्रेडिकच्या कांचांतून सुटला. पण त्याला फ्रान्समध्यें येण्याची परवानगी नसल्यामुळें तो जिनेव्हा येथें गेला; व फर्नी येथें त्याचा बराचसा काळ गेला. शेवटीं १७७८ सालीं तो पॅरिस येथें परत आला व एक दोन पुस्तकें लिहून त्याच सालीं मरण पावला. व्होल्टेअर अतिशय कृश असे व कॉफी अतिशय पीत असे. १७८९ मधील फ्रेंच राज्यक्रांति घडवून आणण्यास ज्यांचे लेख कारण झाले त्या सर्व लेखकांत, रूसोखेरीजकरून, अग्रमान व्होल्टेअर यासच आहे. इतर कोणत्याहि बाबींपेक्षां धार्मिक बाबीवर त्यानें आपल्या विघातक टीकेचे भयंकर आघात केले. तो नास्तिक होता असा पुष्कळांचा गैरसमज आहे. वास्तविक तो ईश्वरवादी (डीईस्ट) होता, व म्हणूनच ईश्वराचें अस्तित्व मानणें हें बुध्दिव्यंगतेचें लक्षण समजणारे डेडिरॉट वगैरे कांहीं फ्रेंच निरीश्वरवादी व्होल्टेअरची हेटाळणी करीत असत. उपहास हें व्होल्टेअरचें लेखनशस्त्र होय. शिश्ट भाषेत टर उडविणार्या कलेंत त्याच्या तोडीचा एकहि लेखक नाहीं त्याचे गद्य लेख फ्रेंच भाषेचा अत्युकृष्ट नमुना आहे. फ्रेंच नाटककारांत त्याचा नंबर तिसरा लागतो. त्याचे ऐतिहासिक ग्रंथ सुबोध मांडणी व हदयंगम अशा वर्णनशैलीमुळें विद्यार्थ्यांस सुध्दां प्रिय आहेत.