विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शनि:- सूर्यमालेंतील एक ग्रह. हा गुरूच्या पलीकडे आहे. तो सुमारें पहिल्या प्रतीच्या तारेएवढा किंवा तिच्याहून किंचित् मोठा व रंगानें किंचित् पिंगट काळसर दिसतो. शनीला सूर्यासभोंवतीं आपल्या कक्षेंत एक प्रदक्षिणा करण्यास सुमारें २९॥ वर्षे लागतात. म्हणजे प्रत्येक राशींत तो सुमारें २॥ वर्षे असतो. शनि ज्या राशींत असतो त्या राशीच्या, व मागच्या पुढच्या राशींच्या मनुष्यास तो पीडा (साडेसाती) करतो अशी समजूत आहे. तो वक्री असतो तेव्हा त्याच्या मंदपणाची कमाल होते. तो एकाच ठिकाणीं पुष्कळ काळ घोंटाळत असतो. तेजाविषयीं पाहिलें असतां गुरू आणि शुक्र यांच्या तेजापुढें तर याचें तेज कांहींच नाहीं. परंतु मंगळ, बुध हे ग्रह देखील बहुधां नेहमीं याच्याहून तेजस्वी दिसतात. शनीची गति मंद व तेज कमी असल्यामुळें त्यास मंद म्हणतात व शनि हा खलग्रह आहे अशी सर्व देशांत फार प्राचीन काळापासून समजूत आहे. शनीच्या दैनंदिन प्रदक्षिणेस १० तास १४ मिनिटें लागतात. इतक्या काळांत तो स्वत:भोंवतीं एक फेरा करतो. आकाश स्वच्छ असतां एखाद्या काळोख्या रात्रीं दुर्बिणींतून शनि पाहिला असतां विलक्षण चित्र दिसतें. त्यांत एक भव्य गोल मध्यंतरीं असलेला दिसतो तो महादेवाच्या लिंगाप्रमाणें वाटेल व त्याच्याभोंवतीं शाळुंकेचें वेष्टन लंबवृत्तकार असलेलें दिसेल. शनीभोंवतालचीं कडीं त्यास चिकटलेलीं नाहींत आणि तें एकच कडें नसून त्यांत निरनिराळीं वलयें आहेत. यांचा रंग चित्रविचित्र दिसतो. यांतील आंतलें वलय तर आकाशांत अद्वितीय दिसतें. कधीं कधीं तें लख्ख्व जांभळें दिसतें आणि तें मध्यें असलें तरी त्यांतून पलीकडचा शनिगोलाचा भाग दिसतो.
शनीचा पूर्वपश्चिम व्यासापेक्षां दक्षिणोत्तर व्यास सुमारें दहावा हिस्सा म्हणजे साडेसात हजार मैल कमी आहे. त्यामुळें त्याचा आकार अगदीं गोल नसून, बराच चापट आहे. इतका चापट आकार दुसर्या कोणत्यहि ग्रहांचा नाहीं. त्याचा मध्यम व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारें ९ पट आहे. त्याची घनता सर्व ग्रहांत कमी आहे. ती पृथ्वीच्या सुमारें सातवा हिस्सा आहे. आणि पाण्याच्या पाउणपट आहे. म्हणून शनीवरील पदार्थ पाण्याहूनहि पातळ असले पाहिजेत. शनीहून द्रव्यानें सर्व ग्रहांत मोठा गुरू मात्र आहे. शनीभोंवतीं अतिशय दाट व अभ्रांनीं व्यापिलेलें असें वातावरण आहे. त्याचें गुरूच्या वातावरणाशी साम्य आहे. गुरूप्रमाणें शनीहि प्राण्यांस राहण्यास योग्य अशा स्थितींत नाहीं. शनीभोंवती फिरणारे असे ८ आठ उपग्रह आहेत. हे आपल्यापासून फार लांब अंतरावर असल्यामुळें अगदीं बारीक दिसतात. सर्वांत मोठा जो उपग्रह आहे तो आठव्या प्रतीच्या तारेएवढा दिसतो. कांहीं तर शेवटल्या प्रतीच्या तारेएवढे दिसतात. अर्थात् हे दुर्बिणीवांचून मुळींच दिसत नाहींत, ह्या उपग्रहांच्या कक्षा आणि शनीची कक्षा ह्यांमध्यें सुमारें २८ अंशांचा कोन आहे. ह्यामुळें यांचीं ग्रहणें फार क्वचित् होतात. सर्वांत मोठा उपग्रह इ.स. १६५५ मध्यें सांपडला. पुढें इ.स. १६८४ पर्यंत ४ उपग्रह सांपडले. त्यांचा शोध एका फ्रेंच ज्योतिष्यानें केला. पुढें १०० वर्षांनंतर हर्षलनें दोन उपग्रह शोधून काढिले. आणि सर्वांत धाकटा इ.स. १८४८ मध्यें सांपडला आहे. अगदीं आंतला उपग्रह शनीपासून १२० हजार मैलांवर आहे.
पृथ्वीच्या कक्षेचा विशुववृत्ताशी २३॥ अंशांचा कोन आहे. त्याप्रमाणें शनीच्या कक्षेचा त्याच्या विशुववृत्ताशी सुमारें २७ अंशांचा कोन आहे. शनीभोंवतीं जीं वलयें (कडीं) आहेत तीं विषुववृत्ताच्या दिशेत आहेत. अर्थात् त्यांचाहि कोन कक्षेशी इतकाच असला पाहिजे. यामुळें पृथ्वीवर सूर्य जसा वर्षांत दोन वेळां विषुववृत्तांत येतो त्याप्रमाणें शनीच्या वर्षांत म्हणजे आपल्या २९॥ वर्षांत सूर्य दोन वेळां त्याच्या विषुववृत्तावर येतो. तेव्हां पृथ्वीवरून पाहणार्यास शनीचीं वलयें एक सरळ रेषात्मक दिसतात. शनीचीं वलयें आणि पहिले सात उपग्रह यांच्या कक्षा एकाच पातळींत असल्यामुळें त्यावेळीं माळेंत मणी ओंवल्याप्रमाणें उपग्रह पाहण्याची संधि चांगली असते.