प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

शस्त्रवैद्यक (सर्जरी):- ही विद्या अथवा कला प्राचीन काळीं पुष्कळ देशांत अवगत होती आणि त्यांतल्या त्यांत आपल्या देशांत तर फार उर्जितावस्थेंत होती हें मत यूरोपियन पंडितांनांहि मान्य आहे. यूरोप व इतर पाश्चात्त्य देशांत अमंळ अडाणी रानवट स्थितींत ती चालू होती. परंतु १९ व्या शतकाच्या मध्यापासून फ्रान्स व इंग्लंडमध्यें जे दोन शोध लागले त्यांमुळें या कलेस फार मदत झाली. ते शोध असे:- (१)  जंतुशास्त्राची प्रगति पाश्चूर व इतरांनीं फार केली (विज्ञानेतिहास पृ. ४३८ पासून पुढें पहा.)  उपयुक्त व दुष्टजंतू हवा, पाणी व चोहोंकडे भरून राहिले आहेत. ते जखमा बिघडवून त्यांत पू उत्पन्न करतात व त्यामुळें जखमेचा ज्वर येतो. (२)  जखमेंत जंतुवृध्दि व त्यामुळे अनर्थ न व्हावा म्हणून त्यास प्रतिबंधक उपाय इंग्लंडांत लॉर्ड लिस्टर यानें शोधून काढले व त्यामुळें या कलेत बरेंच मोठें स्थित्यंतर घडून आलें. (३)  क्लोरोफार्म वगैरे भूल देऊन बेशुध्दि आणणार्‍या उत्तम औषधांचा शोध. या शोधांमुळें शस्त्रक्रियेंत फार सुधारणा होऊन नव्या मन्वंतरास सुरवात कशी झाली याची नीटशी कल्पना हल्लीं येणार नाहीं. त्यासाठीं पूर्वीच्या रूग्णालयांतील व इतर शस्त्रक्रियेंत बर्‍या होणार्‍या रोग्यांची स्थिति थोडीशी वर्णिली पाहिजे म्हणजे हल्लींच्या प्रगतीचें महत्त्व लक्षांत येईल. जखम होऊन मांस उघडे पडलें तर जखमेंत हवापाणी जाऊन पू होऊन ती नासते व ज्वर येतो व उघडी नसलेली जखम लवकर बरी होते ही गोष्ट पूर्वी ठाऊक होती म्हणून मोठी शस्त्रक्रिया केल्यास पुवाची उत्पत्ति व ज्वर न उत्पन्न होतां ती बरी कशी करावी ही मोठी काळजी असे. म्हणून गळूं कापतांना अगर स्नायुबंधन तोडतांना जखमेंत हवा न जातां जितकी चामडी शाबूत ठेवून कमी जखम करतां येईल तेवढी करीत असत. जखमेवर लावण्याचें मलम, तेलें, पटट्या वगैरेमध्यें टर्पेंटाईन, उद यांचा उपयोग करीत. पण या मलमपटट्या जाड व बोजड असल्यामुळें इष्ट हेतु नेहमींच साध्य होत नसे. आंतील पुवाचा निचरा न झाल्यामुळें तो कोंडून त्यामुळें ज्वरपीडा, जखमेंत गुबारा धरणें, मोठी खपली अगर फापर धरणें वगैरे त्रास होई. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी शस्त्रवैद्य, वरील प्रकारची वाहिवाट त्रासदायक म्हणून टाकून जखमेवर मलमपटट्याचा मारा वाजवीपेक्षांहि फाजील कमी करूं लागले. त्यांचा हेतु हा कीं, जखमेंतील पू व लस कोंडून बसूं नये. कित्येक शस्त्रवैद्य हात अगर पाय छेदून टाकल्यावर त्यावर कसलेंच वेष्टणबंधन न बांधतां एका लिंटच्या वस्त्रावर तो अवयव ठेवीत. कित्येकजण शस्त्रक्रिया आटोपल्यावर कांहीं तास त्यांतील रक्त व लस निथळून बंद होईपर्यंत जखम उघडी ठेवीत व नंतर टाके मारीत व त्यावर फारशा पटट्या लावीत नसत. यामुळें पूर्वीपेक्षां पुष्कळ जखमा अधिक चांगल्या रीतीनें बर्‍या होत. पण कित्येक वेळां जखमा बिघडतहि  व त्यांत पू होऊन नासून प्राणघातक होईल असा ज्वरहि उद्भवे. यासच पूयजन्यदाहज्वर म्हणत व त्यास डॉक्टर लोक रोग्याच्या प्रकृतींतील अगर रक्तांतील दोष अगर एखाद्या विषाचा जखमेंत प्रवेश झाला असें कांहीं तरी कारण सांगत दुसरें असें पहाण्यांत आलें कीं, जखमेवर कमी पटट्या बांधण्याची अगर बिनपट्ट्यांची वहिवाट पडल्यापासून रूग्णालयांत जेथें असे अनेक रोगी असतात, तेथें हा ताप व जखम बिघडण्याची प्रकृति वाढूं लागली. पण हा रोग झालेले रोगी व नुकतीच शस्त्रक्रिया झालेले रोगी वेगळे ठेवले तर, किंवा हवा व उजेडाचा शिरकाव रूग्णालयांत अधिक केल्यानें या ज्वराचा प्रतिबंध होत असे. खाजगी रोग्यांत म्हणजे रूग्णालयाबाहेर हा रोग सहसा होत नसे. म्हणून आतुरालयांत दोन्ही बांजूस खिडक्या ठेवून तेथील हवाशीरपणा वाढविण्याची पध्दति पडली. या सुमारास पदार्थ कसे कुजतात याचा शोध पाश्चूर यानें लावून व त्यचा अभ्यास इंग्लंडांत लिस्टरनें करून असा शोध लावला कीं, सर्वत्र म्हणजे हवा, पाणी, शस्त्रवैद्यांचीं हत्यारें, फडकीं, बोळे, स्पंज या सर्व ठिकाणीं उद्भिज्ज कोटींपैकीं अत्यंत सूक्ष्म व दृष्टीस अगम्य असे दुष्ट जंतू असतात व ते जखमेंत शिरून ती बिघडवून तिचा नाश करतात. ते जंतू सूक्ष्मदर्शक यंत्रानें पहातां येतात. हे जंतू सुष्ट व दुष्ट दोन्ही प्रकारचे असतात. लिस्टरच्या मतें एक दुष्ट जंतु म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्रांत दिसणारें, एक झाडाचें रोप होय व त्याची वाढ खुंटविण्याचे तो प्रयत्न करूं लागला. हे प्रयत्न तें रोप जखमेंत शिरण्याच्या अगोदर जंतुघ्न औषधांचा उपयोग करून तो करी किंवा जखमेंत ते शिरल्यावरहि त्यांचा उपयोग व पुवाचा निचरा होऊन रोग्यास ज्वर न येईल अशी तजवीज तो ठेवी. हे जंतुघ्न पदार्थ शरीररचना कुजविण्याचें थांबवीत म्हणून त्यांस जंतुघ्न औषधें असें नांव त्यानें दिलें. या कामीं कॅर्बालिक अॅसिडचा उपयोग त्यानें प्रथम करून पाहिला. त्यांत त्यास बर्‍याच अडचणी आल्या. अॅसिडांतील तीव्रता कमी करण्यासाठीं त्यांत पाणी तर घातलें पाहिजे व तें जास्त घातलें तर त्यांतील तीव्रता कमी न झाल्यामुळें जखम भाजल्याप्रामणें होईल व ती बरी होणें जड जाईल. यासाठीं तें अॅसिड इतर जंतुघ्न औषधांशी मिश्र करून त्याची तीव्रता त्यानें कमी केली; व त्या मिश्रणापासून कॅर्बालिक अॅसिडची वाफ फक्त जखमेच्या आसपास रहावी असेंहि त्यानें केलें. त्यामुळें पूयजन्यदाहरोगप्रसार बराच कमी झाला खरा; पण त्या औषधांच्या उपयोगानें जखम दग्ध होऊन मिळून लवकर येत नाहीं अशा तक्रारीं येत. नंतर त्यानें याविषयीं ग्लासगो व एडिंबरो येथें मोठ्या मेहनतीनें प्रयोग करून जखमांची शुश्रुषा कशी ठेवावी ही कला पूर्णतेला आणली व ती अगर तिचा अवशेष याचा आधुनिक कालीं शस्त्रक्रिया व जखम बांधण्याच्यावेळीं उपयागोंत आणण्यांत येतो. तो प्रकार असा:- समजा कीं पायाच्या घोट्याजवळ कांहीं रोगासाठीं पाय तोडण्याची शस्त्रक्रिया करणें जरूर आहे तर प्रथम तो धुवून स्वच्छ करून १ भाग कॅर्बालिक अॅसिड व २० भाग पाणी या मिश्रणांत भिजवलेला रूमाल त्याभोवतीं गुंडाळून अगोदर दोन तास ठेवितात. नंतर रोग्यास टेबलावर निजवून क्लोरोफार्म हुंगवून गुंगी आणतात. नंतर कांहीं वेळ पाय उंच उभा धरल्यानें त्यांतील रक्त खालीं उतरल्यावर गुडघ्याच्या खालीं रबरी पटट्यानें अगर नळीनें आवळून बांधून टाकतात. म्हणजे शस्त्रक्रियेच्या वेळीं फारसा रक्तस्त्राव होत नाहीं. चिनी मातीच्या चौकोनी पसरट पात्रांत शस्त्रक्रियेपूर्वी अर्धा तास अगोदर १:२० कॅर्बालिकच्या धावनांत उकळलेलीं हत्यारें ठेवलेलीं असतात व रक्त टिपण्याचे बोळे अथवा स्पंज तशाच धावनांत ठेवलेले असतात व तशाच धावनांत शुभ्र चादरी भिजवून टेबलावर आंथरलेल्या असतात. व जेथें पाय तोडावयाचा तेथील रोग्याच्या वस्त्राभोंवतीं तशाच चादरी गुंडाळतात. शस्त्रवैद्य व मदतनीस मंडळी, नखें चोळून घासण्याचे ब्रश असतात ते घेऊन वरील धावनानें अगोदर आपलीं नखें फार दक्षतेनें स्वच्छ करतात. कारण साध्या नखांत फार जंतू रहात असून ते जखम बिघडवतात. १:३० या प्रमाणांत पाणी उकळवून त्याची वाफ त्या शस्त्रक्रियेभोंवतीं खेळेल असें करतात. परंतु हा वाफारा सोडण्याची वहिवाट हल्लीं चालू नाहीं. हा वाफारा उत्पन्न करण्याचें यंत्र असतें. शस्त्रक्रिया आटोपल्यावर जेथून रक्त जखमेंत येत आहे असें वाटतें तेथें धमनी पकडण्याचे चिमटे लावून तो रक्तस्त्राव बंद करतात. शस्त्रक्रियेनंतर गुडघ्याखालील रबरी पटटा सोडल्यावर आणखी कांहीं ठिकाणीं रक्त येत आहे असें वाटल्यास चिमटे तेथें आणखी लावून तें अडकवून ठेवतात. कांहीं थोडा वेळ हे चिमटे तेथेंच असे लोंबत ठेवले म्हणजे त्यांतील रक्तस्त्राव थांबतो. व मग हे सर्व चिमटे काढून घेतात. नंतर टांके मारून जखम शिवतात व तिच्या एका कोपर्‍यास रबरी नळीच्या बाजूंनां भोंकें पाडून ती नळी जखमेंत घालून ठेवतात. तिच्यावाटे तींतील स्त्राव कोंडून न बसतां बाहेर पडतो व त्यावर कॅर्बालिकनें शुध्द केलेल्या जाळीदार कापडाची दुहेरी घडी ठेवण्याच्या अगोदर तेलांत भिजविलेल्या रेशमी कापडानें जखम आच्छादतात. त्यावर पुन: जाळीदार कापडाचे अगर कापसाचे आठ थर ठेवतात. हे थर जखमेच्या सभोंवती पुरतील इतके रूंद असतात. त्यावर पातळ मेणकापडानें बांधून हे सर्व एका लांब पटट्यानें बांधून टाकतात. जखमेभोंवतीं कॅर्बालिकची वाफ असते. व मेणकापडामुळें ती आंत टिकून रहाते. जाळीदार कापडांतून पू व लस मेणकापडापर्यंत येऊन ते भिजलें म्हणजे जखम सोडून धुवून पुन: बांधितात व त्यावेळींहि वाफारा वगैरे चालूं करतात. यामुळें जखमा बिघडण्याचा प्रकार पुष्कळ बंद झाला. हा प्रकार त्या वेळच्या शस्त्रवैद्यांनां यांतील कॅर्बालिकचा वाफारा व तीव्रधावनें व अजस्त्र पटट्यावेष्टणें हीं निरर्थक व इजा करणारीं वाटून जखम बांधण्याचा प्रकार सोपा करतां येतो असा त्यांनीं अनुभव अन्य मार्गानें घेतला. जखम व तिच्या आसपासचा भाग जंतुरहित व स्वच्छ साध्या उकळलेल्या पाण्यानें अगर बोरिक अॅसिडसारख्या  (कॅर्बालिकप्रमाणें तीव्र नसलेल्या)  औषधाच्या पाण्यानें करण्यांत ते शस्त्रवैद्य फार मेहनत घेत. यामुळें इतर शस्त्रवैद्यांनां अशी पंचाईत पडली कीं लिस्टरचें म्हणणें व स्वच्छतेची जरूरी खरी दिसतें. पण या तीव्र जंतुघ्न औषधावर बहिष्कार टाकणार्‍या नव्या शस्त्रवैद्यांचा नुसत्या उकळलेल्या पाण्यानें केलेली स्वच्छता ह्याचाहि अनुभव चांगला येत आहे. तेव्हां लिस्टरची जंतूंची उपपत्ति खरी मानावी किंवा नाहीं? परंतु दुराग्रही नसलेला मध्यम व मोठा जो शस्त्रवैद्यांचा वर्ग त्यानें असें पाहिलें कीं नुसती स्वच्छता व उकळलेल्या पाण्यानें जखम दग्ध न होतां लवकर भरते खरी पण त्यासहि खटाटोप व खर्च कमी लागत नाहीं. तेव्हां सत्याचा अंश जर दोन्ही पक्षांकडे दिसतो तर दोहोंतील ग्राह्यांश घेऊन म्हणजे कॅर्बालिकची परम तीव्रता कमी करून त्या अगर इतर कमी तीव्र केलेल्या जंतुघ्नांच्या धावनांचा उपयोग करणें व नव्या मताप्रमाणें जखम व आसपासचा भाग स्वच्छ व जंतुरहित करण्याची तसदी घेणें हे दोन्ही प्रकार अंमलांत आणावयाचे. एकंदरींत हा तिसराच सोयीस्कर मार्ग हल्लीं जास्त प्रचारांत असून त्याचे अनुभव उत्तम येत आहेत. येणेंप्रमाणें लिस्टर पंथ व शुध्द स्वच्छतेचे पुरस्कर्ते व मध्यममार्गी या तिन्हीं प्रकारच्या शास्त्रवैद्यांनीं पूर्वीची रानटी स्थिति व जखमा बिघण्याचा प्रकार बहुतेक अगदीं बंद पाडला असें म्हणण्यास हरकत नाहीं. कॅर्बालिकशिवाय दुस-या जंतुघ्न औषधांचाहि लोक शोध लावू लागले. जसें - आयडोफार्म, युकॅलिप्टस ऑईल, रसकापूर, हायड्रोजन पॅराक्साइड, स्थालिसिलीक अॅसिड व इतर औषधें. शस्त्रक्रिया चालू असतां कॅर्बालिकच्या वाफेचे तुषार चालू ठेवण्याची पध्दति पुढें पूढें लिस्टरनें स्वत:हि सकारण सोडली. परंतु पूर्वीच्या रानवट पध्दतीचा  म्हणजे जंतुघ्न औषधांचा उपयोग न करतां जखमा बहुतेक उघड्या टाकण्याचा कटु अनुभव घेतलेले त्याचे गतानुगतिक शिष्य व इतर पुष्कळ शस्त्रवैद्य त्याचा उपयोग करणें सोडीनात. लिस्टरच्या पद्धतीमध्यें फार तीव्र जंतुघ्नांचा व धावनांचा उपयोग करीत. त्यामुळें शस्त्रवैद्याचे व मदतनीसाचे हात भाजून सोडल्यासारखे होत. मग नाजूक जखमावर वाईट परिणाम होई यांत काय नवल! उदर चिरून करण्याच्या शस्त्रक्रिया फार वेळ चालतात अशा वेळीं आंत्रावरण वगैरे नाजुक भागांवर हा कॅर्बालिकचा तुषार चालू ठेवल्यानें जंतू मरत असतील खरे परंतु या तुषारांमुळें तो नाजुक भाग गारठतो व रोग्याची शक्ति त्यामुळें कमी होते व या तीव्र जंतुघ्नाचा रूक्ष व विपरीत परिणाम होतो. म्हणून अलीकडे तीव्र जंतुघ्नांचा उपयोग वर्ज्य करून  अगर मध्यम मार्ग म्हणजे जंतुघ्नांची तीव्रता कमी करून व जखम, रोग्याचें शरीर, हत्यारें व  शस्त्रक्रियेंत वापरण्याचें सामान्य व त्यावेळच्या सर्व मंडळीच्या हाताची व नखांची परमावधीची स्वच्छता व शुद्धता यांवर हल्लींची शस्त्रक्रिया चालू आहे. आतुरालयांत शस्त्रक्रियेची खोली हल्लीं जाउन पहावी म्हणजे स्वयंपाकाचीं भांडीं स्वच्छ करण्यांत जी आपण दक्षता घेतों त्यापेक्षांहि अधिक दक्षता तेथील जमीन    गुळगुळीत फरशीची, भिंती, मोर्‍या, नळ यांच्यासंबंधींहि ठेवलेली आढळेल. जखमेजवळ जाणारा प्रत्येक जिन्नस २० मिनिटांपर्यंत आधणांत उकळून निघाल्यामुळें मुळींच तीव्र नाहीं अशा सौम्य धावनांत अगर नुसत्या उकळलेल्या स्वच्छ पाण्यांत ठेवल्यानें काम भागतें. यास जंतुरहितपद्धति म्हणतात व लिस्टरची जंतुघ्नपद्धति हीच होय; तथापि पहिल्या पद्धतीचे पुरस्कर्तेहि लिस्टर यास आधुनिक सर्व पद्धतींचा जनक समजतात. या जंतुरहित पद्धतीसाठीं हत्यारें, सामान, शस्त्रक्रियागार अगर खोली, या ठिकाणीं नकशी, खोबणी, भेगा, कोंपरे, छिद्रे इत्यादि ठेवणें हें अगदीं वर्ज्य असतें. कारण त्यांत जंतू सहज रहातात. म्हणून त्या पद्धतीनें केलेला चाकू जरी पाहिला तरी तो एकसंधी पोलादी व न मिटणारा असतो. तो मिटण्याची योजना केली की त्याच्य सांध्यांत जंतूंची वस्ती आलीच व म्हणून सर्व सामान उकळून काढल्यानें सर्व दोषांचा परिहार होतो. पोटीस बांधणें ही पद्धति जंतुरहिपद्धतीस विघातक समजतात. त्याऐवजीं लिंटचा तुकडा कढत पाण्यांत बुडवून तो बांधून त्यावर मेणकापड अगर तेलांत भिजवून घोळविलेलें रेशमी कापड बांधल्यानें शेक लागून जंतूची भीति नसते. नखेंहि पुरेशीं स्वच्छ झालीं किंवा नाहीं ही शंका राहूं नये म्हणून पातळ रबराचे हात मोजे वापरण्याची  पद्धति चालू आहे. शस्त्रक्रियेच्या वेळीं शस्त्रवैद्य व मदतनीसांनीं परीटघडीचे पांढरे शुभ्र जंतूरहित साधे पोशाक करून त्यावर गळयापर्यंत शुभ्र चादरीचें वस्त्र बांधावयाचें असतें, म्हणजे शस्त्रवैद्याच्या शरीरांतील घाम वगैरे घाण जखमेंत पडत नाहीं. आधुनिक शस्त्रक्रियेचीं उपांगें पुष्कळच आहेत पण एवढें दिग्दर्शन येथें केले आहे त्यावरून बरीच कल्पना येईल.


प्राचीनभारतीयवैद्यक व त्याची आधुनिक पाश्र्चात्त्य शस्त्रवैद्यकाशीं तुलना.:- बरी वाईट शस्त्रस्त्रिया सर्वदेशांत (मिसर, चीन, अरबस्तान, ग्रीस, हिंदुस्थान वगैरे)   सर्वकाळीं सुरू होतीच. परंतु विद्वानांच्या मतें ती व वैद्यक्रिया हिंदुस्थानांत  उत्तम स्थितींस पोंचली होती. ती इतकी कीं, हिंदु लोकांपासून अरब व ग्रीस वगैरे यूरोपियन देश ही विद्या शिकले हें सर्वांनां मान्य आहे. या अनेक देशांतील जुन्या शस्त्रक्रियेवरील ग्रंथांचें परिशीलन केलें असतां असें दिसतें की अनेक देशांतील रोगांवरील जुने उपाय हिंदु वैद्यकाशीं व शस्त्रवैद्यकाशीं जुळतात. यावरून कांहीं पंडितांनीं, ग्रीक लोकांनींच ही विद्या हिंदुंनां शिकविली असा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला आहे; पण तो पुष्कळ यूरोपियन पंडितानांहि मान्य नाहीं. चरक हा शस्त्रवैद्य पहिल्या व सुश्रुत हा दुसर्‍या शतकांत होऊन गेला. व त्याचा काळ कोणी ख्रिस्ती शकाच्या पूर्वी  व कोणी त्या शकाच्या नंतर सुमारें ५०० वर्षे असावा असें म्हणतात. त्याचे शस्त्रक्रियेवरील ग्रंथ इतके उत्तम आहेत कीं, त्यांनां शास्त्र हें नांव सार्थकतेनें देतां येईल इतकें उत्तम व व्यवस्थित ते आहेत. विषयाची मांडणी, रूग्णालयें कशीं बांधावींत याची माहिती, सुप्ति व स्पर्शज्ञानशून्यत्वाची आवश्य़कता व त्यासाठीं उपाय, शस्त्रक्रियेचीं हत्यारें, उपकरणें व त्यांचे उपयोग, बाळंतीणीची खोली व कुमारागार कसें असावें, हें सर्व जुन्या पद्धतीचें असलें तरी व्यवस्थितपणें व उत्तम वर्णिलें आहे. सुश्रुताच्या ग्रंथांत मूतखडयाच्या शस्त्रक्रियेचें जें वर्णन आहे तें हिपॉक्राटीसच्या ग्रीक ग्रंथांतील वर्णनाशीं जुळतें आहे. तसेंच त्या ग्रंथांत गाल अगर कपाळावरील चामडी खोलून व ती वळवून तिनें कापलेलें नाक दुरूस्त करण्याची क्रिया वर्णिली आहे तिचेंहि यूरोपियन शस्त्रवैद्य कौतुक करतात. वैद्यानें रोग्याशीं व धंद्यांत  पाळण्याचे शिष्टाचार व नियम प्रशस्त व कडक असून त्यावेळच्या ब्राहमण वैद्यऋशींनीं ते लिहिले आहेत. त्यांचीं भेषजद्रव्यें विपुल असून सोमल, पारद, कथील या व इतर धातूंच्या भस्मांचा उपयोग वैद्यकांत प्रथम आर्यहिंदूंनींच केला व तो हल्लीं इतीरांनींहि सुरू ठेवला आहे. सिकंदराची स्वारी हिंदुस्थानावर झाली तेव्हां आर्यवैद्यक व शस्त्रक्रिया हीं भरभराटलेल्या उत्तम स्थितींत होतीं. हल्लीं निवळ शस्त्रक्रिया आंग्लपद्धतीनें करणारे तोच एक धंदा करतात. नैत्रवैद्य वेगळे, प्रसूतिवैद्य वेगळे, असें विशिष्टीकरण यूरोपियन वैद्यांत सोयीस्कर मानतात तसें सुश्रुताच्या वेळीं नव्हतें. शस्त्रवैद्य त्यावेळीं पोटांत औषधें देउन रोग बरे करीत. मुतखडा वगैरे मोठया शस्त्रक्रिया राजाचा परवाना मिळवून कोणीहि कराव्या असें होतें. परीक्षा, पदव्या वगैरे कांहीं नव्हतें चांगल्या वैद्याखेरिज न्हावी, वैदू वगैरे लोक कान टोंचणें, शिरा तोडणें, तुंबडया व जळवा लावणें, वगैरे कामें करीत. तीं उत्तम पोलादाची बनविलेलीं असत व तीं सर्वसाधारण उपयोगासाठीं व शरीराच्या विशिष्ट भागावर क्रिया करण्यास उपयोगी असत. त्याशिवाय अनुशस्त्रें म्हणून लहान हत्यारें असत. निरनिराळया प्रकारचे चाकू  (वक्राकार, सरळ, लहान, मोठे), मोड कापण्याच्या, खरडण्याच्या धार असलेल्या वगैरे पळया, चमचे, नाडी व हाडीव्रणाची खोली पहाण्याची शलाका   (एषणी), अणुकुचीदार अगर बोथट व मागें सुईच्याप्रमाणें छिद्र असलेली अगर नसलेली अशी करीत असत. हयाशिवाय पोटांतील पाणी काढण्याचें हत्यार, छोटी कुर्‍हाड, मोतीबिंदु काढण्याचा चमचा अगर सळई, पडजीभ कापण्याचें हत्यार, हाडें कापण्याची करवत, कातरी, कांटे व बाणाचीं टोकें काढयाचें हत्यार, धनुष्य़ाकार व सरळ सुया यांचें वर्णन वाचलें म्हणजे आधुनिक पाश्र्चात्त्य शस्त्रवैद्यक पौरस्त्य ज्ञानाचा अंगीकार करूनच एवढया उत्तम दशेस आलें आहे यांत शंका रहात नाहीं. त्यामुळें आपल्या शोधक व विद्वान पूर्वजांविषयीं अभिमान वाटून आनंद होतो व अलीकडील आर्यवैद्यकाच्या अभिमान्यांनीं पाश्र्चात्त्यांचें घेण्यासारखें शोध आपल्या विशेषत: शस्त्रवैद्यकांत सामील करून आयुर्वेदास चालना व गति द्यावी हें वेडगळ वाटत नाहीं. आपल्या वैद्यकाच्या उत्तमत्वाविषयीं शहाण्या व शिकलेल्या लोकांत व वैद्य डॉक्टरांतीहि अद्याप अज्ञान आहे. वर वर्णिलेलीच  सुधारणा-तींत जरूर तेथें करून-युरोपियन लोक वैद्यकांत वापरीत आहेत. भगंदर आणि मूळव्याध कापून काढण्याच्या हत्यारांचें वर्णन आहे. अनेक प्रकारचे आणि आकाराचे लहान मोठे चिमटे, सांडस, नाडीयंत्रें  (नळया) घसा, योनिमार्ग, योनिव्रणेक्षणयंत्र, व गुद तपासण्याचीं यंत्रें   (अर्शो यंत्र)    हीं आधुनिक शस्त्रक्रियेंत सुधारून वापरतात तीं त्यावेळींहि होतीं. मूळव्याधीचे मोड चिरडायचें यंत्र, नाकांतील मोड कापण्याचें शस्त्र, व रोग्याच्या तोंडांत वैद्यानें बोट घातलें तर तें त्यानें चावून फोडूं नये म्हणून वापरण्याचीं टोपणें हीं हल्लींच्या व प्राचीन शस्त्रक्रियेंतहि आहेत हें पुष्कळांनां ठाउक नसेल. जखम धुण्याचीं यंत्रें, पिचकार्‍या, बस्तीयंत्रें, वाफारा देण्याचीं धुम्रयंत्रें , दूषित रक्त चोखून काढण्याचीं नलिकाकार यंत्रें, रोग तपासण्याच्या शलाका (साउंड), गर्भ ओढून काढण्याचे, मूतखडा काढण्याचे, दांत उपटण्याचे चिमटे, अंतर्गळाच्या शस्त्रक्रियेसंबंधीं हत्यारें यांचें वर्णन वाचलें म्हणजे आपणास पूर्वजांच्या अज्ञानाविषयीं मान खालीं घालण्याचें कारण नाहीं. हल्लींचीं यूरोपीयन पद्धतीची पुष्कळ हत्यारें आपल्या नमुन्यावरूनच बनविलेलीं आहेत. त्यांचा उपयोग करून अलीकडे शस्त्रवैद्यांचा धंदा जो आर्य वैद्यांनीं सोडला आहे तो त्यांनीं उमेदीनें पुन: सुरू करावा. येथें या आधुनिक प्रत्येक शस्त्राचें व उपकरणाचें वर्णन वेगळें मुद्दामच केलें नाहीं, कारण तें करावें तेवढें थोडेंच होईल. तथापि तीं बहुतेक शस्त्रें आर्य वैद्यकांत होतीं हें यूरोपीयन लोक कबूल करतात. तीं तयार कशीं करावीं, कशीं ठेवावीं, हें वर्णन प्राचीन ग्रंथांत आहे. जखम झांकण्यासाठीं पटटयांनीं बंधनें कशीं बांधांवीं हेंहि त्यांत आहे. हाड मोडल्याचें लक्षण जें कुर्र कुर्र आवाज ऐकूं येणें व भास होणें तो व त्यासाठीं भाळी बांधून हल्लीच्याप्रमाणें अस्थिभंग बरा करणें त्यांनां ठाउक होतें. निखळलेला सांधा हल्लीं खालीं वर ओढून वाटोळा फिरवून जसा जाग्यावर आणतात तसेंच  त्यावेळीं करीत असत हें आश्चर्य नव्हे काय? हल्लींच्या पद्धतींत वर्णिलेले जखमांचे चार पांच प्रकार त्यांनां ठाउक होते व शरीरांतील आगंतुक पदार्थ बाहेर काढण्याचीं हत्यारें व शस्त्रक्रिया हल्लीपेक्षां सुधारलेल्या होत्या असे यूरोपियन विद्वान म्हणतात. या कामीं लोहचुंबकाचाहि ते उपयोग करीत. दाह व सुजेस आरंभ झाला तर रोग्यास पथ्यावर ठेवून जळवा, शेंकणें, कापणें, तुंबडया लावणें हे हल्लींप्रमाणें इलाज माहित होते. रोग्यासाठीं हात, पाय, तोडण्याची क्रिया ते करीत पण रक्तस्त्राव हल्लींप्रमाणें सहज थांबवणें त्यांनां ठाउक नव्हतें म्हणून ते तप्त  तेल जखमेवर ओतून ती बंद करीत. पण हें रोग्यास वेदनादायक आहे. प्राचीन शस्त्रवैद्य ग्रंथिरोग, गंडमाळा कापून काढीत. जलोदर व वृषणोदरांतील पाणी काढणें, धमनीविस्तारण रोग, नाना तर्‍हेचे अंतर्गळ रोग यांवरील  शस्त्रचिकित्सा ते करीत असत. आधुनिक यूरोपियन शस्त्रवैद्यांनीं नांव ठेवण्यासारखें व्यंग यांच्यांत हें एक होतें कीं, धमनी बांधून रक्तस्त्राव लवकर बंद करण्याचें त्यांनां ठाउक नव्हतें. पण पोट चिरून (नाभीच्या खालीं डाव्या बाजूस) आंतडयांतील रोगअडथळा काढून आंतडें शिवीत व त्यावर तूप व मध वगैरे लावीत, व तें आंतडें जागच्याजागीं परत बसवून उदर शिवून टाकीत. शिश्र्नांत मार्गदर्शक शलाका घातल्याशिवाय मूतखडा काढीत. पोट चिरून गर्भिणीच्या गर्भाशयांतून जिवंत मूल बाहेर काढीत व जरूर तर योनिमार्गे मृत गर्भ कापून काढीत. मोतीबिंदु व कापलेलें नाक नीट करीत हें वर सांगितलेंच आहे. शस्त्रसाध्य रोगांतहि पथ्यपाणी व औषधोपचार त्या ग्रंथांतून पुष्कळ सांगितला आहे. बाहेर लावण्याचीं मलमें, हिराकस अगर पारद, तांबें, कथील, सोमल यांची भस्में तुपांत खलून करीत. पुस्तक-पोथ्या व ग्रंथापेक्षां हें सर्व गुरूमुखानें शिकण्यावर व शिकविण्यावर विशेष भिस्त असे. फळयावर मेण पसरून अगर काकडया, भोंपळे यांवर शस्त्रक्रिया करण्यासंबंधीं समजूत विद्यार्थ्यांनां देत असत. कातडयाच्या पिशव्यांत पाणी भरून जलोदर व वृषणोदर टोंचून पाणी कसे काढावें हें शिकवीत. नुकत्याच मारलेल्या प्राण्यांच्या केंस काढलेल्या चामडयावर शस्त्रानें चोंचे मारण्यास शिकवित; कमळाच्या देंटावर ठोंचण्यास व गळूं फोडण्यास शिकवीत अगर मृत प्राण्याच्या रक्त वाहिन्यांवर व शरीरावर शिकवित असत. मानवकृति अशा सांधे हालणार्‍या पुतळयावर पटटयांचीं बंधनें बांधणें शिकवीत. डाग देणें, भाजणें हे जिवंत रोगी यांच्या शरीरावर व टांके मारण्यास चामडयावर अगर कपडयावर शिकवीत. शरीरशास्त्र विद्यार्थ्यांना यावें अशी गुरूंची अपेक्षा व इच्छा असे पण प्रेतविच्छेदन नियमितपणें व व्यवस्थितपणें होत नसावें. रोग्यावर व इतरांवर छाप बसावी म्हणून धर्मभोळया समजुतीस उत्तेजन या लोकांकडून मिळे. उदाहरणार्थ अमुक पाप केलें, अमुक चोरलें अगर अमुक वारीं अमुक खाल्लें अगर अमुक ग्रह अनिष्ट आले म्हणून अमुक रोग झाला, अगर होतो असे ठाम सिद्धांत ठोकून दिले आहेत. याचें कारण त्यांच्यांत दीर्घनिरीक्षण व चिकित्सकबुद्धि नव्हती असें नव्हे, तर कोणत्याहि शास्त्राच्या प्रगतीला एक दोन अगर चार सहा व्यक्तिचें जन्महि पुरत नाहींत. म्हणून कांहीं कारणें आपलें अज्ञान झांकण्याकरितां जसें आधुनिक डॉक्टरहि कदाचित पुढें करीत असतील तशी ही काल्पनिक कारणें दिलीं असावीं. मौजेची गोष्ट ही कीं यूरोपियन प्राचीन वैद्यकांतहि ही रोगांची चमत्कारिक उपपत्ति-म्हणजे अमुक पापामुळें अगर अनिष्ट ग्रहामुळें अमुक रोग होतो-ही आढळते. सदृढ स्थितींतील शरीरव्यापारविज्ञान पूर्वी इतकें माहित नव्हतें यांत आश्चर्य नाहीं. विकृत शरीरव्यापारविज्ञान हल्लीं जसें उत्तम अवगत आहे तसें त्या ऋषींनां नव्हतें हें क्षम्य आहे. पण आधुनिक विद्वान अमुक गोष्टींचा शोध लागला नाहीं असें प्रांजलपणें कबूल करतात तसें त्यांनीं न करतां वरील रोगोत्पत्तीस कारणें लावून दिलीं. व फार तर कफ, वात व पित्त हीं कांहींशीं उमजून घेतलीं तर समजणारीं कारणें हें त्यावेळचें विकृत शरीरव्यापारविज्ञान अगदीं क्षम्य आहे. प्राचीन यूरोपियन वैद्यकांतहि कफ, वात व पित्तच नव्हे तर आणखी एक दोन दोष जास्त त्यावेळच्या तेथील वैद्यांनीं वर्णिले आहेत. म्हणून हल्लींच्या आर्य वैद्यांनीं आपल्या देशांतील तशींच परदेशांतील उत्तम भेषज द्रव्यें कोशांत सामील करावीं, निरूपयोगी असतील त्यांचा त्याग करावा. शस्त्रक्रिया करण्याचें त्यांनीं सोडून दिलें आहे पण त्यांत त्यांनीं पुन:प्रावीण्य मिळवावें. आपल्या पद्धतीचीं  व आपल्या ताब्यांत असलेलीं रूग्णालयें काढावीं. शस्त्रक्रियेंत हल्लींच्या पद्धतीचीं शस्त्रें वापरावीं, जुन्या शस्त्रांचें व भेषजांचें संशोधन करून त्यांतील उत्तम तेवढीं उपयोगांत आणावींत. जंतुशास्त्र शिकावें, क्लोरोफार्म वगैरे औषधें उपयोगांत आणावीं व आपल्या पंथाचें विद्यार्थी तयार करावे. आंग्लपद्धतीनें तयार झालेले डाक्तर आर्यपद्धतींतील घेण्यासारख्या गोष्टी शिकण्यास तयार होतील तर त्यांजपासून अगर इतरांपासून पाश्र्चात्त्य वैद्यकांतील व शस्त्रक्रियेंतील उत्तम तेवढें घ्यावें.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .