विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शहाजी:- मराठी साम्राज्याचा संस्थापक शिवाजी याचा पिता. हा मालोजीस दीपाबाईच्या पोटीं स. १५९४ त झाला. हा लहान असतां याच्या लग्नाचा तंटा मालोजी व लुकजी जाधवराव यांच्यांत झाला होता. (१५९९). त्यानंतर मालोजीनें द्रव्यप्राप्ति करून, निजामशहाकडून पंचहजारी मिळविली व त्यामुळें जिजाऊचें लग्न शहाजीशीं झालें (१६०३). बाप वारला तेव्हां शहाजी २६ वर्षांचा होता; बापाच्या हाताखालीं त्यानें बरेंच शिक्षण घेतलें होतें. या सुमारास मोंगलानें निजामशहाचा पराभव केल्यानें लुकजी हा मोंगलास मिळाला व त्यानें शहाजीसहि आपल्याकडे बोलविलें पण शहाजी निजामशहाशीं बेइमान झाला नाहीं. यामुळें सासर्याजावयांत वैर वाढलें. मलिक अंबरचा शहाजीवर फार विश्वास होता म्हणून त्यानें त्याला मुख्य सेनापति केलें. लगेच शहाजीनें मोंगलांचा व त्याबरोबरच सासर्याचा भातवडीच्या लढाईत मोठा पराभव केला. जिजाबाईला शहाजीपासून ६ मुलें झालीं; त्यांत ४ अल्पायु होतीं; पांचवा संभाजी व सहावा शिवाजी होय. मलिक अंबर वारल्यावर पुन्हां मोंगल-निजाम यांमध्यें युद्ध सुरू झालें; त्यांत शहाजीनें खानदेशांत पुष्कळ धुमाकूळ घातला. तेव्हां खुद्द शहाजहानच शहाजीवर चालून आला. ही लढाई पुष्कळ दिवस चालली होती व त्याच धामधुमींत शिवाजीचा जन्म झाला (१६३०). शहाजी व शहाजहान यांच्यांतील अनुक्रमें निजामशाही बुडविण्याची व तारण्याची ही झटापट ९ वर्षे चालू होती; आणि त्यामुळेंच राधामाधवविलासचंपूकारानें उत्तरेंत शहाजहान व दक्षिणेंत शहाजी त्यांची तुलना केली व गागाभटटानें शहाजीस क्षत्रिय धर्माचा नवावतार म्हटलें आहे. या सुमारास निजामशहानें फत्तेखानास कैद करून, लुकजी जाधवाचा विश्वासघातानें खून करविला. तेव्हां शहाजीनें निजामशहाची नौकरी सोडून त्याच्या मुलुखांत धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केला. आणि जुन्नराजवळील भीमगडास आपलें मुख्य ठाणें ठेवून, जुन्नर-संगम-नेर व नगर-दौलताबाद इतका प्रांत काबीज केला. व स्वराज्यस्थापनेस प्रारंभ केला. परंतु निजामशहा, आदिलशहा व शहाजहान हे तीन शत्रू कायमचे ठेवण्यापेक्षां शहाजीनें नाममात्र शहाजहानची तावेदारी पत्करली. शहाजहाननेंही शहाजीचा पराक्रम अनुभवला होता म्हणून त्याला वरील मुलूख सरंजामांत देउन पंचहजारी दिली. (१६३१) त्यानंतर शहाजी आपल्याच प्रांतांत जुन्नर, संगमनेर, नाशिक वगैरे ठिकाणीं रहात होता. शहाजीनें मोंगली चाकरी १२।१४ महिने केली. नंतर त्यानें पुढील कारणासाठीं शहाजहानच्याविरूद्ध मोठें कारस्थान रचलें. मध्यंतरीं शहाजहाननें बहुतेक निजामशाही आटोपली होती, म्हणून तिच्या रक्षणासाठीं निजामशहानें फत्तेखानास कैदेंतून सोडलें. परंतु सुटतांक्षणीं त्यानें निजामशहास ठार करून सर्व निजामशाही तो मोंगलास देण्यास तयार झाला. ही संधि साधून निजामशाही तारण्याच्या निमित्तानें शहाजीनें शहाजहानची नौंकरी झुगारून त्याचे त्र्यंबक वगैरे किल्ले व उत्तर कोंकण काबीज केले. यावेळीं त्याचा भाउ सरीफजी हा मोंगलास मिळाला. शहाजीनें आपल्या मदतीस आदिलशहा आणला. मोंगलानें निजामशाही बुडविल्यानें तो आपलेंहि राज्य बुडवील या भीतीनें आदिलशहा शहाजीस मिळाला होता. या दोघांची व मोंगलीची दौलताबादेनजीक ५।६ महिने झटापट होऊन यांनां मागें हटावें
लागलें व दौलताबाद आणि निजामशहा मोंगलांच्या हातीं लागला (१६३३). तेव्हां शहाजीनें हिंमत देऊन आदिलशहाला आपल्या पुढील कार्यांत भागीदार केलें व त्याबद्दल त्यास त्याचा भीमासीना दुआब परत दिला. शहाजीनें निजामशाहीच्या कुळांतील एका पोरास भीमगडाच्या तक्तावर बसवून त्याच्या नांवानें गेलेला निजामशाही मुलूख जिंकण्याचा सपाटा लावला; तेव्हां मोंगलानें त्याला बावीस हजारी मनसब व बरीच जहागीर देउन आपला ताबेदार होण्याची खटपट केली पण ती व्यर्थ गेली. यावेळीं शिवनेर ही नव्या निजामशहाची राजधानी होती व त्याच्याजवळच जिजाबाई आणि बालशिवाजी रहात होते. शहाजादा सुजा यानें निजामशहाचा प्रख्यात परांडा किल्ला घेण्यासाठीं त्याला वेढा दिला, तेव्हां शहाजीनें त्याची रसद लुटून व सैन्य मारून त्याला परतावल (१६३४). पुढील सालीं मोंगली सुभेदार खानडौरान यानें शहाजीच्या दुप्पट सैन्य घेऊन त्याच्यावर स्वारी केली. तेव्हां शहाजीनें १२ वर्षें वयाच्या संभाजीस जुन्नरभाग संभाळण्यास ठेवून गनिमी लढाई सुरू केली. सहा महिने पाठलाग चालला तरी शहाजीची व मोंगलांची गांठ पडली नाहीं, उलट त्यानें मोंगलाचें नुकसान मात्र पुष्कळ केलें. तेव्हां खुद्द शहाजहान पाऊण लाख फौज घेऊन दक्षिणेंत आला. तो शहाजादा असतांना व बापाविरूद्ध बंड करून दक्षिणेंत आला असतांना शहाजीचा व त्याचा स्नेह जमला होता. पण या प्रसंगीं मात्र या दोघांत वैर उत्पन्न झालें होतें. याप्रसंगींहि खुद्द शहाजहानास शहाजीनें गनिमी लढाईंनें पुष्कळ महिने दाद दिली नाहीं. शाहिस्तेखानाच्या सैन्यानें जुन्नर घेतलें, तेव्हां तेथील बाल निजामशहा व जिजाबाई आणि बाल शिवाजी हे माहुली किल्ल्यावर गेले. इतक्यांत संभाजीनें मोंगलास जुन्नर येथेंच कोंडलें तेव्हां शहाजहाननें आदिलशहास निजामशाहीचा ९।५ हिस्सा देण्याची लालूच देऊन शहाजीच्या कटांतून फोडलें. तरीहि शहाजी डगमगला नाहीं; सहा किल्ले व सात हजार स्वार यांच्या बळावर त्यानें पुन्हां मोंगलाशीं टक्कर दिली. या वेळीं मोंगलांच्या मदतीस विजापूरकरहि आले होते. मोंगलांचा शिवनेर. घेण्याचा प्रयत्न शहाजीनें चालू न देतां बोरघाटांत त्यानें त्यांचा फार नाश केला. तेव्हां ते माहुलीकडे वळले व माहुलीच्या रक्षणासाठीं शहाजीहि त्यांच्या आर्धींच माहुलीवर गेला. कांहीं दिवस किल्ला लढविल्यावर धान्याचा तोटा आल्यानें शहाजी सल्ल्यास कबूल झाला. विजापूरकराच्या मध्यस्थीनें निजामशहा व सहा किल्ले त्यानें मोंगलांच्या हवालीं करून आपण आदिलशहाचा मनसबदार बनला (१६३६). परंतु आदिलशहा व शहाजी यांची दरबारांत पहिली भेट झाली तेव्हां शहाजीवर मोर्चेलें उडत होतीं. यापुढेंहि तो विजापूर दरबाराशीं अशाच तर्हेनें आपलें महत्त्व राखून वागत होता व दरबारहि त्यास मोठा मान देत असे. यानंतर स्वत:ला मिळालेल्या कर्नाटकच्या जहागिरीची व्यवस्था लावण्यांत त्यानें आपले दिवस घालविले आणि स्वराज्यस्थापनेचें काम आपल्या हातून होत नाहीं असें पाहून तें त्यानें शिवाजीवर सोंपविलें. यापुढें ''स्वराज्यस्थापनेंतील शहाजीचें श्रेय'' कसें व कितपत होतें याचें विवेचन ४ थ्या विभागांत ४२७-४३० या पृष्ठांत आलेलें आहे. शहाजीची फूस शिवाजीला आहे ही बातमी नक्की लागल्यावरच आदिलशहानें शहाजीला मुस्तफाखान व बाजी घोरपडे यांच्याकडून विश्वासघातानें कैद करविलें व ठार मारविण्याची शिक्षा दिली. तेव्हां शिवाजीचें मोंगलांकडून प्रेष लावून बापाची सुटका केली अफजलच्या वधानंतरहि शिवाजी आपल्याला आटोपत नाहींसें पाहून आदिलशहानें शहाजीसच तह ठरविण्यासाठीं म्हणून त्याच्याकडे पाठविलें. बापलेकांची ही भेट जेजुरीस झाली. सहा महिने शहाजी आपल्या मुलाजवळ राहिला आणि मग कर्नाटकांत परतला. तेथेंहि त्यानें आपला धाकटा मुलगा व्यंकोजी याच्यासाठीं दहा वर्षें खटपट करुन तंजावरचें एक स्वतंत्र संस्थानच तयार केलें होतें. पण व्यंकोजीच्या अंगीं शिवाजीची कर्तबगारी नसल्यानें तो मुसुलमानांचा मांडलिकच राहिला. शहाजीस शिकारीचा नाद असल्यानें एकदां बसवपट्टणाजवळ हरणाची शिकार करीत असतां हौदेगिरी या नजीकच्या गांवीं घोडयावरून पडून त्याचा अंत झाला (१६६४). या ठिकाणीं त्याचें वृंदावन असून पेशवाई अखेर त्याला उत्पन्न चालू होतें. (शाहू रोजनिशी; विलक्स; डफ; ऑर्म; बसातिनेसलातीन; शिवदिग्विजय; खरे-मारोजी व शहाजी; राधामाधवविलासचंपू).