प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र- शारीरशास्त्रामध्यें इतर प्रकरणांशिवाय अस्थिवर्णन, सांध्याचें व स्नायूंचें वर्णन यांचा समावेश होतो. अस्थि, स्नायु व सांधे या तिहींमुळें चलनवलनादि क्रिया चालतात. त्यांची शरीरांतील संख्या फार मोठी आहे. त्यांचीं नांवें वगैरे रुक्ष भागाकडे लक्ष न देतां त्यांचा उपयोग कसा होतो इकडे लक्ष देणें विशेष मनोरंजक व उपयुक्त होईल म्हणून तेंच दिलें आहे. शरीरांतील अन्नपचनादि इतर क्रिया व व्यापार तितकेच व किंबहुना अधिक उपयुक्त आहेत. त्यांचें वर्णन यथाक्रम पुढें येईलच. आपण मेजावर आपला बाहु सपाट ठेवला व नंतर कोपरापासून दंडाकडे तो कित्येक वेळां हलविला म्हणजे आपण एक चलनक्रिया केली. ही करतांना आपल्या बाहूंतील दोन हाडें व दंडांतील हाड ही कोपराच्या सांध्याच्या आधारावर कापसाप्रमाणें हालतात. याप्रमाणें चलनक्रिया करणारे व थोडा फार फरक असलेले अनेक सांधे व हाडें आहेत. हात दंडाकडे हलवितांनां दुसर्‍या हातानें आपण दंड धरला तर त्यांतील पदार्थ आपल्या हातास घट्ट व जाड लागेल. हा पदार्थ स्नायु अगर मांस होय. जसा एखादा पदार्थ आपणाकडे ओढून घेण्यासाठीं आपण दोरखंडाचा उपयोग करतों तद्वत् स्नायूंचा उपयोग आहे. म्हणजे हाडास तो बद्ध असून आकुंचन पावतांच हालचाल होते व कार्यक्रिया घडतात. व स्नायू, हाडें, आणि सांधे यांमुळें शरीरांतील उठणें, बसणें, पळणें, वांकणें हातपाय हालवणें या सर्व क्रिया चालतात. हाडामुंळें शरीराचा सांगाडा अगर अस्थिपंजर बनतो व डोक्याचीं हाडें, पाठीचा कणा व बरगडया आणि हातापायाचीं हाडें असे त्याचे विभाग पाडतां येतील. त्यांपैकीं कांहींचा आकार लांब न नळीसारखा तर कांहींचा चपटा; कांहीं हाडें आंखुड तर कांहीं अगदीं अनियमित आकाराचीं असतात; पण त्या सर्वांची रचना व गुणधर्म सारखेच असतात. त्यांत चुन्याचा कार्बोनेट व फास्फर असतो व म्हणून त्यापासून फॉस्फरसहि काढतात. हा त्यांतील खनिज भाग अ‍ॅसिडानें विरघळून टाकला तर बाकी मृदु हाड राहतें, अग्नीम्ध्यें तें जाळलें तर सर्व जळतें. कारण त्यांत कार्बनमय मृदु भाग गर्भावस्थेपासून असतो. व त्यांत चुन्याचा खनिज भाग व काठिण्य मागाहून येत जातें. नाना तर्‍हेचीं हाडें कापून पाहिलीं तर कांहींत नळीसारखी पोकळी असते तर कांहीं स्पंजासारखीं बारीक छिद्रमय असतात व त्यांत मगज अगर गीर असतो. (१) पाठीच्या कण्याची रचना, पुढें भरीव वाटोळे हाड व मागें कोडबोळयाप्रमाणें पोकळी असलेलें हाड असे मणके एकांवर एक रचल्यामुळें होते. मागील पोकळीचा लांबच लांब बोगदा तयार होतो. कारण मानेचे ७, छातीच्या प्रांतांत १२ व कमर आणि त्याखालील भाग व माकडहाड मिळून सर्व सुमारें ३३ मणके असून त्यांतील पोकळींत पृष्ठवंशरज्जू नामक मस्तकांतील मेंदूपासून निघालेला लांब पट्टयासारखा (ज्ञान) मज्जातंतूचा भाग असतो. (२) कवटी व मस्तकाचीं हाडें - हा अस्थिमय गोळा पाठीच्या कण्याच्या हाडावर उभा असतो. तो अनेक हाडांनीं बनलेला असतो व त्यांत नेत्रासाठीं व नाकासाठीं छिद्रें, खोबणी, पोकळया वगैरे असतात. तसेंच वरची व खालची (दांतांची) कवळी, जबडा व त्यामध्यें मुखासाठीं पोकळ जागा असते. कवटीच्या आंत मेंदूनामक सर्व शरीराचें नियमन करणारा ज्ञानतंतुमय भाग असतो व त्याचा मोठा लांब पृष्ठवंरज्जूनामक पट्टा पाठीच्या कण्यांतून खालीं उतरतो. छातीच्या दोन्ही बाजूंस अर्धवर्तुळाकार बारा बरगडया असल्यामुळें छाती पिंजर्‍यासारखी दिसते व तिचें अस्थिपंजर हें नांव सार्थ होतें. छातीच्या पोकळींत हृदयफुप्फुसादि महत्वाचीं इंद्रियें असतात. त्याखालीं उदरांत पचनेंद्रियें व कमरेखालीं कटिरास्थींत मूत्रेंद्रिय व जननेंद्रियें असतात (३) हातापायचीं हाडें यांत खवाटा, दंड, बाहु (२ हाडें), हात, मनगट, पंजांतील पांच हाडें, पांच बोटें, तसेच खालीं कटिरास्थि, मांडीचें हाड, पायांतील पांच बोटें असतात. (४) जबडयाचे वगैरे अनेक सांधे शरीरांत असतात व हे सांधे स्नायु व हाडास जोडणारीं व स्वाभाविक उत्पन्न होणार्‍या तेलानें स्निग्ध असलेलीं स्नायुबंधनें याभोंवतीं असतात. कोणतीहि चलनाची क्रिया फाजील कष्टानें झाली म्हणजे त्या जागचा सांधा लचकतो अगर निखळतो व निखळल्यास तो लवकर जागच्याजागी बसविणें चांगलें व जरुर असतें. सांध्यांतहि तीन चार प्रकार असतात. म्हणजे कांहीं बिजागरीचे तर कांहीं कुसबासारखे; कांहींनां खोबण तर कांहींनां इतर प्रकार असतो. (५) स्नायु म्हणजे तांबडे तंतू असलेलें मांस; उष्णता, टोंचणें, कापणें, वीज लावणें, मारणें, ठोकणें वगैरे बाह्य उपायांनीं माफक प्रमाणांत उत्तेजित केले तर स्नायू रबराप्रमाणें आंखुड होऊन घट्ट होतात व त्यामुळें त्यांत चेतना व शक्ति उत्पन्न झाल्यामुळें ज्या हाडास, सांध्यात ते जोडले असतील तो भाग हलवण्यास ते समर्थ होतात व म्हणूनच आपणांस हातपाय वाटेल तितका जवळ-लांब करतां येतो. तोंड, जबडा मिटतां येतो व अनेक ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया घडतात.  स्नायु आकुंचन होतांनां तो जाड होतो व म्हणून हातपाय हलवतांना दंड अगर मांडी हीं हातास जाड लागतात.

नुकत्याच मारलेल्या जनावराच्या शरीरांतील नाना ठिकाणच्या स्नायूंस ब्याटरीच्या तारा लावून उत्तेजित केलें तर तें मृत जनावरहि हात, पाय, बोटें, डोकें, पाठीचा कणा, व उदर येथील स्नायू हलवितें ! अशा प्रयोगामुळें कोणता स्नायु कोणती क्रिया करतो हें कळतें. स्नायु पुष्कळ आहेत व त्या प्रत्येकाचें एक अगर अनेक विशिष्ट क्रिया करण्याचें काम आहे. कांहीं वेळानें मांसांतील रक्त गोठल्यामुळें हे प्रयोग व या क्रिया होत नाहींत. प्राणी मेल्यावर शरीर ताठतें तें यामुळेंच. जेवणें, हंसणें, वांकणें, उठणें, बसणें, पळणें, पोहणें, लिहिणें इत्यादि आपणांस हव्या त्या क्रिया स्नायूंमुळें करतां येतात. नुसतें स्वस्थ उभें राहिलें तर शेंकडों स्नायूंच्या आकुंचनानें तें साधतें. व म्हणून नुसतें उभे राहणें म्हणजे विश्रांति नव्हे, कारण कांहीं वेळानें आपले पाय दुखूं लागतात. खुर्चीवर बसणें ही निवळ विश्रांति नव्हें. हृदय, श्वसनेंद्रियें, पचनेंद्रियें इत्यादींच्या स्नायूंवर आपला ताबा नसल्यामुळें आपणांस त्या क्रिया बंद करतां येत नाहींत हेंच बरें आहे. व म्हणूनच शरीरयंत्र सुरळीत चालतें. येणेंप्रमाणें अस्थि, मांस व सांधे यांचें शरीरांतील कार्य व उपयोग त्रोटकपणें सांगितले आहेत. हाडांत जरुर तेथें नाना इंद्रियांसाठीं पोकळी, खोबणी आहेत हें वर आलेंच आहे. तसेंच शुद्ध व अशुद्ध रक्तवाहिन्या, ज्ञानतंतू वगैरे नलिकाकार रचना एका भागांतून दुसरीकडे जातांना व अस्थींच्या पोषणासाठीं जरुर तेथें छिद्रें, बोगदे असतात. ज्याला आपण प्राणी म्हणतों तो चलनवलनादि क्रिया करतो हें एक त्याचें जें मुख्य लक्षण त्याचा विचार आपण केला. चलनवलनाखेरीज प्राण्याचीं दुसरीं मुख्य लक्षणें म्हणजे पोषण, ज्ञानादि-स्पर्श संवेदन व प्रजोत्पादन हीं होत.

पोषण म्हणजे अन्न खाऊन शरीर- कांहीं मर्यादेपर्यंत मोठें होणें हें होय. प्राणी जन्मतांच त्याच्या मागें खाण्याची विवंचना लागते. लेकरूं एवढेंसें असतें पण तें वरच्यावर दूध किती पितें ! मोठें झाल्यावर अन्न खाऊन वाढत जातें व सुमारें २१ वयाच्या सुमारास त्याची वाढ व उंची पुरी होऊन ते आई-बापाच्या आकाराचें बनतें. एवढया अवधींत त्यानें किती तरी अन्न खाल्लें असेल. पण त्यापैकीं अल्पांशच शरीरवृद्धि-पोषणासाठीं पचनेंद्रियें ग्रह्णण करतात व २१ वयानंतर तितकेंच अन्न खाऊन मर्यादेबाहेर शरीरवृद्धि होत नाहीं हा चमत्कार आहे. यासाठीं आपणांस दांत दिले आहेत. भूक लागल्यावर आपण अन्न दातांनीं चर्वण करतों. दातांमुळें अन्नाचे प्रथम बारीक तुकडे होऊन पुरें चर्वण झाल्यानंतर त्याचा लगदा होऊन जीभ व गालफड यांयोगें तो गळयांतील अन्ननलिकेंत लोटला जातो. अन्नचा तुकडा पाडणारे दांत प्रत्येक जबडयांत ४ असतात. कुत्र्याच्या दातांप्रमाणें सुळयासारखे अणकुचीदार दांत २ व चावून पीठ करणारे दांत १० असतात. म्हणजे दोन्ही जबडयांत मिळून ३२ दांत असतात. मुलांनां चावून पीठ करणारे फक्त १० दांत असतात. आठव्या वर्षी ते पडूं लागतात व नवे कायमचे दांत येतात. नाना प्राण्यांमध्यें दांतांच्या नाना तर्‍हा असतात; पण त्या सर्वांची रचना एकच असते. दांत हस्तिदंतासारखा शुभ्र असून त्यास २ अगर अधिक मुळें असतात आणि तो हिरडींत गढलेला असतो. त्यावर मिन्याचा रंग असतो तो पारदर्शक असतो त्यामुळें दांताच्या रचनेस धक्का पोंचत नाहीं बालपणीं म्हणजे ७-८ वर्षें वयापर्यंतच्या मुलांस २० च दांत असतात व ते पडून गेल्यावर कायमचे ३२ दांत उगवतात. दांतांनीं अन्नाचें चर्वण नीट झाल्यावर त्याचें पचनकार्य नीट होणें अवश्य आहे. तें जसें उत्तम पचेल व जिरेल त्याप्रमाणें शरीर संवर्धन होऊन शरीर पुष्ट होतें. त्या क्रिया कशा होतात हें ''शरीर संवर्धन'' लेखांत विस्तारानें दिलें आहे.

रक्त- रक्तांत अन्नरस, लघुआंत्र वगैरे अन्नमार्गांतील ठिकाणीं प्रवेश करतो, व सर्व शरीरभर रक्त खेळत असल्यामुळें तें प्राण धारण करण्यास व शरीरांतील प्रत्येक सूक्ष्म अगर स्थूल रचनेस, अवयवास, परमाणूस अगर पेशीस जीवन पोंचविण्यास टपालखात्याप्रमाणें मदत करतें. तें दिसण्यांत लाल दिसलें तरी वास्तविकपणें तें पिंवळसर व चिकट पाण्यांत अगणित व अति सूक्ष्म लाल परमाणू तरंगत असल्यामुळें तसें दिसतें. एका सुईच्या बोचण्यानें निघालेल्या सूक्ष्म रक्ताच्या थेंबांत लक्षावधि नव्हे कोटयावधि असे लाल परमाणू असतात. एकानें असा शोध लावला आहे कीं हे कण एका माणसाच्या शरीरांतील घेऊन एकापुढें एक ठेवून त्यांचा दोर केला असें  कल्पिलें तर त्या दोराची लांबी पृथ्वीसभोंवतीं ५।६ वेळा गुंडाळण्याइतकी होईल ॥ शरीराबाहेरील सांडलेल्या रक्तांत चिकटपणाचा धर्म असल्यामुळें रक्त लवकरच गोठून त्याची लाल काळसर गांठ बनते व तिच्याभोंवतीं ''सीरम'' अगर लस नांवाचें चिकट पिवळें पाणी जमतें. या चिकटपणाचा असा एक उत्तम उपयोग आहे कीं, लहान लहान रक्तस्त्राव तेथील रक्त गोठून बंद होतात. हा गुणधर्म नसता तर टांचणीनें सुरु झालेला रक्तस्त्रावहि वाहून वाहून अखेरीस तो प्राणघातक जाला असता. अगर त्यामुळें फार अशक्तता तरी निदान आली असती. सूक्ष्म अगर मध्यम रक्तवाहिनीच्या फाटलेल्या छिद्रांत रक्त गोठून बसल्यामुळें रक्तस्त्राव थांबून पूर्ववत रक्ताचें शरीरांत अभिसरण सुरु होऊन शरीरव्यापार चालण्यांत आड काठी येत नाहीं.

रक्ताभिसरण- हृदयांत रक्ताचा मूळ सांठा असून त्याच्या उजव्या बाजूस व डाव्या बाजूस वरील व खालील असे चार कप्पे असतात. डाव्या बाजूस शुद्ध रक्त फुप्फुसांतून शुद्ध होऊन येतें तें प्रथम वरील कप्य्यांत येऊन नंतर खालील कप्प्यांत उतरतें. हृदय एकसारखें दर मिनिटास सुमारें ७२ वेळां आकुंचन व प्रसरण पावत असतें. त्या आकुंचनाच्या वेळीं शुद्ध रक्ताचा मोठा लोंढा शरीरांत पोंचविला जाण्यासाठीं महान शुद्ध रक्तवाहिनींत खेंचला जातो. महान व मध्यम रक्तवाहिन्यांत (धमनी) रक्ताचा लोंढा येणेंप्रमाणें प्रति सेकंदास येत असल्यामुळें ती धमनी हातास लागेल अशा मनगट, घोटा वगैरे ठिकाणीं चांचपून पाहिली तर बोटास नाडी लागते. डाव्या स्तनाच्या जवळ छातीवर आपण हात ठेवला तर या हृदयसंकोचन-प्रसरणानें छाती धडधडत आहे असा आपल्या हातास अनुभव देते. म्हणजे रक्तप्रवाह पुढें सुरु होऊन तो मोठयांतून मध्यम व मध्यमांतून लहान व सूक्ष्म व अति सूक्ष्म धमन्यांत नुसत्या, डोळ्यास अगम्य अशा केशवाहिन्यांत प्रवेश करून सूक्ष्म रचनांनां, पेशीपिंडांनां व अवयवांनां शुद्ध रक्त पोंचवतो व या रचनापेशीपिंड अवयवादींनीं दूषित केलेले कॅर्बानिक अ‍ॅसिडादि वायू त्या रक्तांत मिसळून तें शुद्ध रक्त काळसर निळसर होतें. परंतु तें परत आल्या वाटेनें केशाकार शुद्ध रक्तवाहिन्यांतून परत न येतां त्यास जोडलेल्या परंतु विरुद्ध दिशेस म्हणजे हृदयाकडे प्रवाहाची गति असलेल्या अशुद्ध रक्तकेशवाहिनीमागें सूक्ष्म, नंतर लहान, नंतर मध्यम व मोठया अशुद्ध रक्तवाहिन्यामार्गें हृदयाकडे परत येऊन त्या त्या उजव्या बाजूकडे वरील कप्प्यांत येतें व तेथून खालच्या कप्प्यांत उतरण्यास एक सेकंदहि पुरा लागत नाहीं. तें शुद्ध रक्त येणेंप्रमाणें प्रदक्षिणा करुन अशुद्ध होऊन परत येतें त्या वेळीं हृदयाचें आकुंचन संपलेलें असून तें प्रसरण पावून पोंकळ व मोठें होऊन त्यांत रक्त येतें. दुसर्‍या संकोचनाच्या वेळीं पूर्वीप्रमाणें डाव्या बाजूकडील रक्त शरीरांत लोंढयाच्या रुपानें जसें खेंचलें जातें तसेंच व त्याच वेळीं मात्र उजव्या बाजूस अशुद्ध रक्ताच्या मोठया धमनीमार्गें अशुद्ध रक्त फुफ्फुसांत, तें शुद्ध म्हणजे ऑक्सिजनमिश्रित व कॅर्बानिकअ‍ॅसिड रहित होण्यास वेंचलें जातें. हृदयाच्या आकुंचनकाळीं येणेंप्रमाणें तें काळें रक्त फुफ्फुसांत, आपण श्वासोच्छवासानें जी हवा छातींत घेतों तींतील ऑक्सिजन वायूमुळें शुद्ध व लाल होऊन एका सेकंदाच्या आंतच म्हणजे हृदयप्रसारण कालीं हृदयाच्या डाव्या व वरील कप्प्यांत येतें व नवीन हृदय आकुंचनकालीं पुनरपि शरीरभर खेळण्यास व वहाण्यास तयार असतें. असें हें रहाटगाडगें अगर प्रदक्षिणा अगर रक्ताभिसरण जन्मापासून मरणापर्यंत सुरु असतें. मरण म्हणजेच हृदय व श्वासोच्छवास थांबणें. वरील रक्ताभिसरण वर्णनांत फुफ्फुसांतील उपाभिसरण आलेंच आहे. तसेंच एक पचन क्रियांतर्गत अन्य उपाभिसरण यकृताभिसरण होय. त्याचा उद्देश व क्रम असा असतो कीं जठर, अन्नमार्ग व आंतडीं येथें शुद्ध रक्त सूक्ष्म व केशवाहिन्यांनीं येऊन तेथील घाण व कॅर्बानिक वायु घेऊन  निळें काळें व अशुद्ध होऊन हृदयाकडे अशुद्धरक्तवाहिन्यामार्गें येतें खरें परंतु त्यांत इतर घाणीबरोबर आपण खाल्लेल्या अन्नांतील पिष्टांशापासून व शर्करेपासून जो विद्राव्य स्थितींत ''शर्करामय अन्नरस'' असतो तोहि या रक्तांत असून तो यकृताशुद्धवाहिनीनें यकृतांत शिरतो. यकृतांत तो शर्करामय भाग ''ग्लायकोजन'' नामक पदार्थांत रुपांतर पावून, पेढींत रकम शिल्लक ठेवावी त्याप्रमाणें शरीरास उपवास, दुखणीं, श्रम वगैरे अडचणीच्या वेळीं तकवा कायम राखण्यास उपयोगी पडतो. हें निमिषार्धांत घडल्यानंतर जें रक्त यकृतांतून अशुद्धरक्तवाहिन्यांच्या द्वारें बाहेर पडून हृदयाच्या उजव्या वरील कप्प्यांत परत जातें त्यांत यकृतांत प्रवेश होण्यापूर्वी असा शर्करामय अन्नरस असतो तसा नसतो. म्हणजे तें रक्त शर्करारहित असतें. ही क्रिया जेव्हां बिघडते तेव्हां यकृतांत शर्करा सांठवून ठेवणें नीट घडत नाहीं म्हणून हृदयात परत जाणारें रक्त शर्करामिश्रित असल्यामुळें हृदयाकुंचनवेळीं तें शर्करामिश्रित रक्त शरीरभर खेळून मधुमेह म्हणजे शर्कराप्रमेह नामक रोग उत्पन्न करितें. अशुद्धरक्तवाहिन्या नलिकाकार परंतु पातळ व रिक्त स्थितींत चपटया व लुल्या दिसतात, धमन्या मात्र रबराच्या नळीप्रमाणें अंमळ चिवट, जाड व रिक्त स्थितींतहि आपला वर्तुळाकार कायम राखणार्‍या असतात.

श्वासोच्छवास- आपण श्वासोच्छवासानें ऑक्सिजन मिश्रित जी शुद्ध हवा घेतों ती मोठया, मध्यम, लहान, सूक्ष्म  व अति सूक्ष्म अशा श्वासवाहिन्यांतून शेवटीं साध्या दृष्टीस अगम्य अशा हवेनें भरलेल्या असंख्य व अगणित फुग्यांच्या समूहांत ज्यास आपण फुफ्फुसें म्हणतों त्यांत प्रवेश करते. तेथें त्या झिरझिरीत फुग्याच्या पडद्याशेजारीं अशुद्धरक्तवाहिनीचा झिरझिरीत पडदा असतो व या झिरझिरीत पण काळया रक्तांतील जड कॅर्बानिक वायु हवेच्या फुग्यांत, व हवेच्या फुग्यांतील शुद्ध ऑक्सिजन अशुद्ध रक्तात अदला-बदल पावतात. त्यामुळें उच्छवासाची हवा आपण बाहेर नाकानें परत सोडतों ती कॅर्बानिक अ‍ॅसिडमिश्रित अतएव अशुद्ध असते व फुफ्फुसांत अशुद्ध रक्त मात्र या अदलाबदलीनें शुद्ध व लाल होऊन शरीरपोषक अन्नरस पोंचविण्यास पुनः तयार होऊन हृदयाकडे परत जातें. हें रक्तशुद्धीकरण दर मिनिटास १६ ते २० श्वासोच्छवास याप्रमाणें आजन्म चालू असतें.

शिरा, नाडया, धमन्या वगैरें- येथपर्यंतच्या विवेचनांत शुद्ध रक्तवाहिन्या हें नांव आम्हीं प्राय: योजिलें आहे व पुष्कळदां त्यांनां ''धमनी'' असेंही म्हटलें आहे. या नलिकाकार असतात व शिरा उर्फ अशुद्ध रक्तवाहिन्या व रसवाहिन्याहि नलिकाकार व पोकळ असतात. यापुढें ''स्पर्शज्ञान संवेदन'' या विषयाच्या विवेचनाच्या वेळीं ज्ञानतंतु मज्जातंतु वगैरेंच्या रचना दिसण्यांत नलिकाकार परंतु आंतून भरीव असतात. प्रेतविच्छेदन करुन पहातेवेळीं नवशिक्यास धमनी अगर शुद्ध रक्तवाहिनी कोणती व शिरा (अशुद्ध रक्तवाहिन्या), नाडया, स्नायुबंधनें, रसवाहिन्या व ज्ञानतंतू हे ओळखण्यास अडचण पडतें हें साहजिक आहे. कारण या सर्व दिसण्यांत नलिकाकार दिसतात. म्हणून अशुद्ध व शुद्ध रक्तवाहिन्या व इतर नलिकाकार रचना यांतील फरक दृष्टीआड करूं नये. हा घोंटाळा आयुर्वेदिक प्राचीन ग्रंथांतहि आढळतो. तेथें ॠषी अगर ग्रंथाकारांनीं धमनी हें नांव ज्ञान अगर मज्जातंतूस समजून उमजून योजिलेल्या पुष्कळ श्लोकांवरून निःसंशय आढळतें. ज्ञानतंतूंच्या ज्ञानसंवेदक कार्याची ओळख आपल्या प्राचीन ॠषींनां नसावी असा निष्कारण दूषित पूर्वग्रह अनेकांच्या मनांत असण्याचा संभव आहे. याविषयीं वाद चालू आहेत. जुन्याच्या फाजील अभिमानानें धमनी म्हणजे ज्ञानतंतु असें ओढून ताणून म्हणत असतील असाहि ग्रह अनेक विद्वानांच्या मनांत असण्याचा संभव आहे. पण खरा प्रकार तसा नाहीं हें दोन्ही बाजूंचा पुरावा पाहून वाटतें. ज्ञानतंतू, मज्जातंतू वगैरें नांवें नवीन बनलेलीं व सोईस्कर आहेत खरीं पण त्यांनां प्राचीन ग्रंथांत धमनी हें नांव निःसंशय योजिलें आहे. तेव्हां या जुन्या धमनी नांवाचा उपयोग ''शुद्धरक्तवाहिनी'' या अर्थानें अर्वाचीन वहिवाटीप्रमाणें करावयाचा किंवा नाहीं याविषयीं सर्व भारतीय आयुर्वेदिक पाठशालांनीं एकमतानें ठरवावें हें बरें. पण तशी स्थिति दुराग्रहामुळें हल्ली नाहीं.

शरीरांतील उष्णता- वर सांगितलें आहे कीं, अन्न पचून त्याचा अन्नरस रक्तांत मिसळून तो सर्व शरीरांतील लहान मोठया अवयवांनां पुरविला जातो. या अवयवांच्या झिजेमुळें उत्पन्न झालेला कॅर्बानिक अ‍ॅसिडवायु तें रक्त ग्रहण करतें व त्याच्या अगोदर त्याच्या जवळील अन्नरस व ऑक्सिजन अवयवांनां पुरवितें. त्या दूषित वायूमुळें काळसर झालेलें रक्त श्वासोच्छवासांतील ऑक्सिजनमुळें शुद्ध होण्यासाठीं फुफ्फुसांत जातें. विस्तव जसा सर्पणामुळें व हवेमुळें प्रगट होतो तसें शरीरांत अन्नरसरुपीं सर्पण व श्वासागणित मिळणारा प्राणवायु यांच्या रासायनिक संयोगामुळें (ज्वलनामुळें) शरीरांत उष्णता (अग्नि) उत्पन्न होते. व इतर ठिकाणीं अग्नीमुळें जसा कॅर्बानिक अ‍ॅसिड वायु उत्पन्न होत असतो तसा रक्त व शरीरांतील रचना यांच्या ठिकाणीं कॅर्बानिक अ‍ॅसिड वायु फाजील (म्हणजे शरीरांतील पेशींनीं त्यांच्या पुष्टीसाठीं ग्रहण न केलेल्या) अन्नरसाच्या ज्वलनामुळें उत्पन्न होऊन तो दर उच्छवासाच्या वेळीं नाकावाटें बाहेर पडतो. म्हणून आपण उत्तर अगर दक्षिण ध्रुवासारख्या हिमप्रदेशांत असून भोंवतालची सृष्टि हिमाइतकी थंड असली तरी आपलें अंग गरम असतें. या अन्नरसज्वलनक्रियेंत बिघाड होऊं नये अशी निसर्गाची योजना असते. फाजील उष्णता घामाच्या रुपानें निघून जाते; व या क्रियेंत बिघाड झालाच तर मात्र आपणांस ज्वर येतो. चलनवलन व पुष्टि अगर शरीरसंवर्धन हा लेख पहावा म्हणजे अन्नपचन व पोषण हा विषय नीट समजेल.

प्राण्यांच्या यो दोन लक्षणांशिवाय आणखी लक्षण म्हणजे स्पर्शादि ज्ञानसंवेदन होय. तसेंच बुद्धि, हर्ष, भीति वगैरे मनोविकार होय. आपण एक उदाहरण घेऊं कीं बंद केलेल्या खिडकीच्या फटींतून अंगणांत चिमण्या किडे वगैरे दाणेटिपीत आहेत असें पाहिलें व मुद्दाम आपण खाडकन् खिडकी उघडली तर त्यांच्या मनांत भीति उत्पन्न होऊन त्या सर्व भुर्रकन् उडून जातील. नंतर आपण थोडें धान्य त्यांपुढें टाकलें तर त्यांची भीति दूर होऊन त्या आनंदित होऊन तेथें निर्भयपणें पुनः तें वेंचण्यास येतील व धान्य खातील. खिडकी खाडकन् वाजलेली त्यांनां कर्णेंद्रियांनीं ऐकूं आली. नंतर तिकडे पाहतांच त्यांनां धोकादायक माणूस तेथें उभा आहे असें त्यांनीं त्यांच्या नेत्रांनीं पाहिलें. व नंतर भीतीचें ज्ञान त्यांनां या इंद्रियामुळें त्यांच्या मेंदूस झालें व एकदम उडून जाण्यास समर्थ जे पंख व इतर स्नायू त्यांस हलण्याचा हुकूम निमिषमात्रांत मेंदूनें दिला व पुनः भक्ष्य (धान्य) मिळण्याचा संभव दिसताच व खिडकींतील माणूस शत्रु नसून मित्रवत् आहे असें पाहतांच त्यांच्या मेंदूनें पुनः त्यांनां पूर्वस्थळीं स्नायूंनां जरुर ते हुकूम देऊन आणलें. हें सर्व ज्ञानेंद्रियें व कर्मेंद्रियें यांचे ज्ञानतंतू व त्यांचा नियामक राजा जो मेंदू त्यामुळें घडलें; व सर्व काम टपाल अगर तारायंत्राप्रमाणें निरोप यावेत व जावेत त्याप्रमाणें चाललें. मेंदूकडे निरोप नेणार्‍या व तो मेंदूपासून स्नायू व इंद्रियांकडे पोंचविणार्‍या ज्या तारा अगर पांढरे दोरे त्यांनां ज्ञानतंतू (मज्जातंतू) म्हणतात. मेंदूची हुकमत सर्व मज्जातंतूवर इच्छाशक्तीमुळें असते.पण मेंदू झोपेमुळें वगैरे निद्रिस्थ असतां अगर सावध असतांहि त्या मेंदूच्या हाताखालीं अधिकारी असावेत त्याप्रमाणें पृष्ठवंशरज्जु व इतर गौण पण महत्वाचे मज्जासमूह असतात तेहि चलनवलनाचे हुकूम जरुरीप्रमाणें सोडतात. त्याची जाणीव एखाद्या वेळीं मेंदूस नसतेहि उदाहरणार्थ, झोंपेंत आपणांस डांसानें अगर ढेकणानें दंश केला तरी जागे न होतां पृष्ठवंशरज्जु हें मज्जास्थान आपणांस या कुशीवरून त्या कुशीस वळण्यास अगर डांसास चापटी मारण्यास (आपण जागे न होतां) जरुर त्या स्नायूस हुकूम सोडतें. जागेपणीं देखील रस्त्यानें चालतांना आपला मेंदू वाटेंतील अडचणी वगैरे जाणून त्याप्रमाणें त्या टाळून चालण्यास स्नायूंनां नेहमीं हुकूम देतो. परंतु आपण गहन विचारांत मग्न असून रस्त्यानें चालत असतांनां आपणांशेजारून कोण गेलें याचें विशेष भान मेंदूस नसूनहि आपण यंत्राप्रमाणें चालतो. अशा वेळीं पृष्ठवंशरज्जु हा दुय्यम अधिकारी स्नायूंनां हुकूम सोडतो.

मेंदूचें वर्णन व कार्य- डोक्याच्या कवटीच्या आंतील भाग बहुतेक मेंदूनें व्यापलेला असतो. मेंदू म्हणजे मज्जा नामक फॉस्फरसमय पदार्थांचा लांबट बिलबिलीत गोळा होय. त्याचा गाभा तंतुमय व पांढरा असतो व कवच मऊ करडया रंगाचें असतें. त्या बिलबिलीत कवचामध्यें मेंदूवर ठराविक जागीं ठराविक प्रकारच्या लहान मोठया भेगा असलेल्या पुष्कळ वळकटयांतील अंतरामुळें बनलेल्या असतात. या भेगांस व वळकटयांस हात, पाय, कान, डोळे वगैरे संबंधीं नांवें दिली आहेत. कारण त्या त्या स्थानास उत्तेजित (ब्याटरीनें) केलें तर ते ते अवयव हालचाल करतात असें प्रयोगांतीं सिद्ध झालें आहे. यावरून त्या त्या भागावरील हालचाली अगर स्पर्शदि ज्ञानसंवेदक भाग मेदूंच्या अमुक एका स्थानीं आहे असें ठरलें आहे. मेंदूंत इच्छाशक्ति, बुद्धि, चतुरता, आठवण, कल्पनाशक्ति, मनोविकार या भावना वसतात. व जेवढा मेंदु मोठा व त्यावर जेवढया बळकटया व भेगा अधिक तेवढा तो बुद्धिमान असा अनुभव प्राय: आलेला आहे. उलटपक्षीं लहान मेंदूची माणसें अर्धवट अगर पूर्ण वेडीं असतात हेंहि खरें आहे. अपघातामुळें मेंदूचा पुढील (कपाळावरील) भाग नष्ट होऊनहि बुद्धीत विशेष व्यंग आलें नाहीं अशीं उदाहरणें आहेत. पुढील भागांत फार महत्वाचें कार्य नसावें. लहान प्राण्यांचा मेंदु बाहेर काढला तर ते मरत नाहींत. पण ते इतके वेडसर होतात कीं आपण होऊन खाण्याचा उद्योग करणें त्यांस कळत नाहीं. व ते एके ठिकाणीं अगदींच बसून रहातात. जवळ अन्न असूनहि तें खात नाहींत व उपास काढून मरतात इतके ते अक्कलशून्य होतात. त्यांची इच्छाशक्ति पूर्ण नष्ट होते. पण बळें खाऊ घालून त्यांस कित्येक महिने जगवितां येतें. सगळया शरीरांतील स्पर्श, उष्णता, थंडी, वेदना वगैरे भावनांचे संदेश ज्ञानतंतुमुळें मेंदूंत येऊन पोंचण्याचीं स्थानें आहेत. मेंदूचा मागील व खालील भाग सेरिबेलम या नांवानें ओळखला जातो. त्याचें मुख्य कार्य शरीराचा तोल संभाळणें हें आहे. त्यानंतर पृष्ठवंशरज्जु व मेंदु यांमध्यें चौकटच्या एक्याच्या आकाराचा एक मज्जाभाग अति महत्वाचा असून तो मान व मस्तक यांच्या अगदीं कोपर्‍यांत असतो त्यांतून मुख व मस्तक यांचे मज्जातंतू तसेच हृदयरक्ताभिसरण व फुफ्फुसाच्या हालचालींचें नियमन करणारे मज्जातंतू निघतात. म्हणून हा भाग दुखावल्यावर प्राणी ताबडतोब मरतो. ससा, कोंबडी, बदक यांच्या कानाच्या व मानेच्या मागें एक खिळा खुपसून त्यास ताबडतोब पचनासाठीं मारतां येतें तें यामुळेंच. या पुढील भाग म्हणजे पृष्ठवंशरज्जु - रज्जु म्हणजे दोर व दोराप्रमाणें मस्तकापासून पाठीच्या मणक्यांतील बोगद्यांतून हा दोर माकडहाडापर्यंत पट्टयाप्रमाणें असतो. याच्या दोन्हीं बाजूंनीं जितके मणके तितक्या मज्जातंतूच्या मोठया शाखा निघून त्यांच्या उपशाखा मान, पाठ, छाती, हात, पाय, कमर व इतर सर्व शरीरांतील स्नायूंस हालचालीचे संदेश पोंचवितात. सर्व शरीरावरील त्वचेस जें स्पर्शवेदना, शीतोष्णादि ज्ञान होतें तें उलट दिशेनें निरोप पोंचविणार्‍या मज्जातंतुमार्गें व या रज्जुच्या गाभ्यांतून मेंदूच्या गाभ्यांत पोंचतें व त्यामुळें जरुर त्या हालचाली मेंदु स्वतः करतो अगर आपल्या दुय्यम अधिकार्‍यास हुकूम सोडतो. पृष्ठवंशरज्जूचा गाभा मध्यभागीं करडया रंगाचा व बाहेरचा भाग पांढर्‍या तंतूंचा असतो. ज्यावर आपल्या इच्छाशक्तीची हुकमत चालत नाहीं असें चौकटच्या एकयाच्या आकाराचें मज्जास्थान व सांगितलें आहे. त्याच्यामुळें हृदय उडणें, रक्ताभिसरण, श्वासोच्छवास या क्रिया आपणांस स्वेच्छेनें बंद करतां येत नाहींत. तसेंच पृष्ठवंशरज्जूच्या दोन्हीं बाजूंस दुय्यम वर्तुळाकार मज्जास्थानांची मालिका मान व मस्तकापासून माकडहाडापर्यंत असते व त्यामुळें शरीरांत लालोत्पत्ति, जाठरादि अनेक पाचक रसोत्पत्ति, अन्नपचन, मलमूत्रविसर्जन, वमन इत्यादि क्रिया जरुर तेव्हां आपोआप यंत्राप्रमाणें व्हाव्या अशी विधात्याची योजना आहे.

ज्ञानतंतू अगर मज्जातंतूंच्या योगानें स्पर्शादि ज्ञान कसें होतें याचा उल्लेख वर अनेक ठिकाणीं आला आहे. तथापि स्पर्श व इतर ज्ञानेंद्रियांविषयीं अंमळ अधिक फोड करुन लिहिलें पाहिजे. आपल्या शरीराच्या पृष्ठभागावर अगर कान, नाक, तोंड, डोळा, गुद इत्यादि आंतील भागांत कांहीं आगंतुक पदार्थांचा स्पर्श, पीडा, अगर वेदना शीतोष्णसंवेदन होऊं लागलें तर सर्व शरीरभर स्पर्शादि ज्ञानतंतूंचें जाळें पसरलें आहे त्या योगानें स्पर्शज्ञानसंदेश प्रथम पृष्ठवंशरज्जूंत जातो; कारण हे ज्ञानतंतू त्याच्या दोन्ही बाजूंकडून निघालेल्या तंतूंच्या शाखा असतात. तेथून तो संदेश मेंदूस पोंचतो. हें कार्य घडण्यास इष्ठ व जरूर त्या स्नायूंची हालचाल करण्याचे हुकूम चलनज्ञानतंतूमार्गे, मेंदु जागृत अगर सावधान असल्यास स्वतः सोडतो अगर तसा नसल्यास वरिष्ठाच्या गैरहजेरींत दुय्चम अधिकारी स्वतःच्या जबाबदारीवर हुकुम सोडतो तद्वत ते सर्व प्रसंगीं नाहीं तरी बहुतेक प्रसंगीं मेंदूचीं पुष्कळ कार्यें पृष्ठवंशरज्जू करुं शकते. व मग तें कार्य आपोआप (यंत्राप्रमाणें - त्याचें ज्ञान मेंदूस झाल्याशिवाय) होतें. हें स्पर्शज्ञानाविषयीं त्रोटक विवेचन झालें; आतां रस (चव), रुप (दृष्टि), गंध, श्रवण (कान) इत्यादि ज्ञानेंद्रियांसंबंधीं विचार कर्तव्य आहे. तथापि स्पर्शज्ञान काय किंवा या इतर ज्ञानेंद्रियांच्या योगानें होणारें ज्ञान काय मेंदूस झालें तरी मेंदूस स्वतःची तारतम्य व तर्कशक्ति चालवून त्याजविषयीचें झालेलें मत अगर ज्ञान निश्चित करावें लागतें व या कामीं मेंदूस एकापेंक्षा अधिक  ज्ञानेंद्रियांचाहि उपयोग करावा लागतो. हाताच्या पंजास व पांच बोटांस स्पर्शज्ञानक्षमता फार तीव्र आहे. पदार्थ चौकोनी आहे अगर वाटोळा आहे, टणक अगर मृदु आहे हें डोळे मिटूनहि पंजानें व बोटांनीं चांचपून सांगतां येतें; पण बाहु अगर मांडीनें चांचपून त्या पदार्थाचा आकार (डोळे बांधून) सांगणें झाल्यास अडचण पडेल व सांगण्यास बराच वेळ लागेल.

रसज्ञान (चव, रुचि)- एखादा पदार्थ आपण तोंडांत घातला म्हणजे त्याचे परमाणू लाळेंत विरघळल्यानें जी एक प्रकारची संवेदना मुखास व जिभेस होते तीस चव अगर रुचि म्हणतात, व त्याचे प्रकार खारट, तुरट, आंबट, गोड, कडु, तिखट इत्यादि होत. अन्न शिजवून तें रुचकर व स्वादिष्ट कसें करतां येईल यांत पुष्कळ लोक चूर असतात व तें कांहीं मर्यादेपर्यंत केलें तर फायदेशीर आहे. पुष्कळ गोष्टी हात न लावतां अगर रुचि न पहातां केवळ वासानें अगर आवाजावरुन अगर डोळयांनीं सांगतां येतात.

गंधज्ञान व घ्राणेंद्रिय (नाक)- यांत मध्यें पडदा व दोन्हीं बाजूंस नाकपुडया असून त्याच्यापुढील दोन्ही छिद्रांतून श्वासोच्छवासाची हवा आंत घेतली व बाहेर सोडली जाते. आपण अंशतः मुखांतून व अंशतः नाकानें श्वासोच्छवास करतो पण घोडा वगैरे कांहीं प्राणी निव्वळ नाकानें श्वासोच्छवास करतात. व त्यांच्या नाकपुडया फार वेळ मिटून धरल्या तर ते गुदमरून तडफडून मरतील. आंत हवा घेतेवेळीं आपणांस कांहीं पदार्थांचे सुवास अगर घाण येते. कांहीं पदार्थ स्वाभाविकपणेंच सुवासिक असतात, तर कांही दुर्गंधिमय व शरीरास प्राय: अपायकारक असतात. कांहीं पदार्थ व वायू शरीरास प्राणघातक असूनहि त्यांस घाण येत नाहीं; जसें - कॅर्बानिक अ‍ॅसिड ग्यास; यामुळें मनुष्य गैरसावध निजलेला असून त्यास विषारी वायूनें मरण येतें.

श्रवण- एका भांडयावर दुसरें भांडें आपटलें म्हणजे तें कंप पावून त्यापासून उत्पन्न होणारीं आंदोलनें हवा कंपित करतात व त्यांपासून ध्वनि उत्पन्न होऊन तीं हवेंतील आंदोलनें आपल्या कानांतील पडद्यावर आपटून त्या ध्वनीची संवेदना मेंदूस होते. माणसास ऐकू येण्यासारखा अगदीं लहान ध्वनि उत्पन्न होण्यास दर सेकंदांत निदान ३२ लहरी अथवा आंदोलनें उत्पन्न व्हावीं लागतात. उच्च स्वर अगर गायनांतील नि, या तीव्र सुरांत अगर ध्वनींत कमी अथवा जास्त आंदोलनें आहेत हें सरावानें किंवा गायनश्रवणाची अभिरुचि असणाराच त्यांतील सूक्ष्म फरकहि तेव्हांच कळतो. अति तीव्र सुराचीं आंदोलनें दर सेकंदांत ७६००० असूं शकतात. एखाद्या भरीव पदार्थांतील ध्वनि, आपण त्यास कान लावून ऐकतों. घडयाळ आपण कानाशीं धरलें महणजे त्यांतील टिक् टिक् ऐकूं येतें. तेंच आपण दांतांत धरलें तर ध्वनीनें घडयाळाचें धातुमय कवच व दांत कंपित होऊन तो ध्वनि ऐकूं येतो. दांतांत एक लांकडी पट्टी धरून तीवर घडयाळ ठेवलें तर आंदोलनें घडयाळांतील यंत्रांत सुरु होऊन नंतर तीं अनुक्रमें घडयाळाचें कवच, पट्टी, दांत, मस्तकाची कवटी, कानांतील पातळ पदार्थ व नंतर श्रवण ज्ञानतंतु यांत उत्पन्न होऊन ध्वनीचें ज्ञान मेंदूस कळतें. असा प्रकारें जवळ ध्वनि ऐकणें आपणांकडून क्वचितच घडतें. बहुधा दूरच्या पदार्थांत ध्वनि उत्पन्न होऊन त्याचीं हवेंतून दूर अंतरावरून येणारीं आंदोलनें कानांतील श्रवणेंद्रियाच्या मार्गें ध्वनीचें ज्ञान मेंदूस करुन देतात.

कानाचें वर्णन- ज्यास आपण कान म्हणतों तो श्रवणेंद्रियाचा फक्त दर्शनी भाग असून त्याचा उपयोग ध्वनीच्या लहरी गोळा करून आंत पडद्यावर जातील असें करणें हा होय. एखादेवेळीं गडबडीमुळें लहरी नीट व पोंचून ऐकूं येईनासें झालें तर कानामागें हाताचा पंजा धरुन अगर कानाची पाळ वळवून त्या ध्वनिलहरी आंत नीट जातीलसें आपणांस करावें लागतें. हा शिंगासारखा ध्वनिसंग्राहक कर्णा असून ससा, घोडा इत्यादि परम तीक्ष्ण  श्रवणशक्ति असलेल्या प्राण्यांत मनुष्याच्या कानांपेक्षां उत्तम बनविलेला असल्यामुळें जिकडून ध्वनि येतोसा वाटतो तिकडे म्हणजे मागें, पुढें, एकेबाजूस अगर दोन्ही बाजूंनां एक अगर दोन्ही कान उभारुन त्या त्या दिशांकडे त्यांनां कान फिरवतां येतात. कानाच्या कर्ण्यास जोडलेल्या नलिकाकार छिद्रांची (ज्यांत कानांतील मळ सांचतो) आंतील बाजू एका लवचिक पडद्यानें बंद झालेली असते व या पडद्यावर ध्वनिलहरी कर्ण्यांतून येऊन आपटतात व त्यायोगें तो पडदा कंपित होतो. पडद्याच्या आंत खर्‍या श्रवणेंद्रियास आरंभ होतो. त्याची रचना अत्यंत चमत्कारिक, मौजेची व चातुर्यांची आहे. पडद्यामागील सुमारें एका जागेंत तीन बारीक अस्थींची मालिका असते व तिच्या मागें दुसर्‍या पडद्यानें ती जागा बंद होते. हीं बारीक हाडें व पडदा ध्वनीनें कंपित होतात. त्याच्या मागें नळयांतून भरलेला प्रवाही पदार्थ असतो त्यासहि तो कंप पोंचतो व त्यास शंखाकार अगर स्क्रूच्या आकारासारख्या अवयवांत श्रवण मज्जांततूंचा मेंदूशीं संबंध असलेल्या सूक्ष्ममज्जेच्यां धाग्यामुळें मेंदूस ध्वनीचें ज्ञान होतें. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे ध्वनिलहरी शिरतात त्या प्रथम हवेंतून कानाच्या पडद्यावर, नंतर बारीक अस्थिमालिकेवर, नंतर आंतील पोकळीच्या दुसर्‍या पडद्यावर, नंतर नळयांतील प्रवाही पदार्थावर व शेवटीं श्रवणतंतूवर, व त्या मागें मेंदूस श्रवणज्ञान होतें. म्हणजे वायु, घनपदार्थ व द्रवपदार्थ या तिहींतून ध्वनीस मार्ग काढावा लागतो. यावरून श्रवणेंद्रियरचना किती मौजेची आहे याची कल्पना होते. तरी यापैकी आणखी सविस्तर वर्णन विस्तारभयास्तव दिलें नाहीं.

नेत्र- हें ज्ञानेंद्रिय अत्यंत नाजूक व चतुर रचनेचें आहे. परंतु त्याची रचना फार साधी आहे. नेत्राची रचना प्रत्यक्ष पाहण्याची जिज्ञासा विशेष असल्यास खाटिकाकडून मारलेल्या म्हैस, रेडा वगैरे जनावरांचा डोळा आणून चिरून वगैरे पहावा म्हणजे त्यांत पुढील रचना दिसतील. त्यास कठिण कवच असून त्याच्या मागें पांढर्‍या दोरीप्रमाणें तुटलेला धागा लोंबत असतो तोच दृष्टिमज्जातंतू होय व तो मेंदूस पाहिलेल्या पदार्थांचे ज्ञान करुन देतो. हा डोळा डोळयाच्या हाडाच्या खांचेबाहेर निघाल्यामुळें अंडयासारख्या लंबवर्तुळाकार दिसतो व तो पुढें पावलीएवढया जागेखेरीज सर्व अपारदर्शक असतो. ती पावलीएवढी जागा मात्र भिंगाप्रमाणें पारदर्शक असून त्यामागें मध्यभागीं छिद्र (बाहूली) असलेला काळा पडदा असतो. यूरोपियन लोकांत या पडद्याचा रंग निळा असतो म्हणून त्यांचे डोळे निळे दिसतात. या बाहुलींतून प्रकाश आंत जाऊन पाहिलेल्या पदार्थाचें ज्ञान होतें. बाहुली व बुबुळाचें भिंग यांतील पोकळ जागेंत पाण्यासारखा पदार्थ असतो. जर डोळा उभा चिरून पाहिला तर त्यांत पुरीच्या आकाराचा एक भिंगासारखा पदार्थ व त्याच्या मागील पोंकळींत पिंवळसर पण पारदर्शक बिलबिलीतपदार्थ असतो. या सर्वांच्या मागें छत्रीसारखा पसरलेला काळा पडदा असतो व त्याच्या मध्यभागीं बाहेरुन दृष्टिमज्जा शिरते. एकंदरींत डोळयाचा वर्तुळ आकार असला तरी फोटो काढण्याच्या क्यामर्‍याच्या तत्वावर त्याची रचना आहे. त्यामुळें पाहिलेल्या पदार्थाचें चित्र डोळयाच्या मागील पडद्यावर हुबेहुब उठतें व मेंदूस कळतें. क्यामेर्‍याप्रमाणें पुढें भिंग असून क्यामेर्‍यांत जाणारा प्रकाश कमी जास्त करण्यासठीं आकुंचन-प्रसरण पावणारा पडदा असतो तशीच रचना डोळयाच्या बाहुलीची असते. माणसाचे डोळे कांहीं वेळ झांकून लागलीच उघडून पाहिले तर बाहुली मोठी दिसते व जरा वेळानें पहावें तों उजेडामुळें पुनः बारीक होते. पदार्थाची प्रतिमा क्यामेर्‍यामागील अपारदर्शक कांचेवर पडते तशी येथें ती काळया पडद्यावर पडते. फार उजेडामुळें डोळे दिपूं नयेत महणून बाहुली आपोआप लहानमोठी कशी होते हें आपण आरशांत कांहीं वेळ लख्ख उजेडांत व कांहीं वेळ अंधुक उजेडांत पाहिल्यानें कळतें.

आतांपर्यंत निरनिराळया इंद्रियांचें वर्णन आलें आहे, आता यानंतर मुख्य शारीरशास्त्राकडे वळूं या.

शारीरशास्त्राचीं मूलतत्वें

याला इंग्लिश भाषेंतील शब्द एलिमेंटरी अ‍ॅनॉटॉमी असा आहे. हा शब्द ग्रीक भाषेंतून आलेला आहे. सेंद्रिय, सावयव कोणत्याहि वस्तूंतील अवयवांचा परस्परसंबंध व त्यांची रचना सूक्ष्म रीतीनें तपासण्याकरितां शस्त्रानें मृत शरीराचे भाग कापणें, व्यवच्छेद (अभ्यासासाठीं शवच्छेद) करणें, अशा हा स्पष्टार्थ या शब्दांतील मूल शब्दार्थांत आहे, म्हणून त्या शब्दाला संस्कृत भाषेंत शारीर (शास्त्र) अथवा शरीरव्यवच्छेदनविद्या असा त्याच अर्थाचा पारिभाषिक शब्द योजण्यांत आला आहे. शरीरांत नैसर्गिक जी सर्व इंद्रियविशिष्ट रचना आहे तींत इंद्रियांचे व्यापार कसकसे चालले आहेत त्याचें ज्ञान ज्या शास्त्राच्या योगानें होतें त्या शास्त्राला इंद्रियविज्ञान म्हणतात. इंद्रियांच्या नैसर्गिक स्थितींत, किंवा त्यांच्या स्वधर्मयुक्त व्यापारांत फेरबदल अथवा पालट झाल्यानें जी एखादी विशिष्ट विकृत स्थिति प्राप्त होते, व त्यामुळें शरीरावर जे दुष्परिणाम घडतात अथवा ज्या व्यथा प्राप्त होतात त्यांचें ज्ञान ज्या शास्त्राच्या योगानें होतें त्याला विकृतइंद्रियविज्ञान (पॅथॉलॉजी) म्हणतात.

इंद्रियविज्ञान व विकृतइंद्रियविज्ञान यांच्या बद्दल विचार त्या त्या शास्त्रावरील प्रकरणांत व्हावयाचा असतो. शारीरशास्त्रांत वरील शास्त्रांचा समावेश केला जात नाही. प्रस्तुत आपल्यापुढें शारीरशास्त्राचा विचार असून त्यांत मानुषशारीर (ह्यूमन ऍनॉटॉमी) हाच भाग श्रेष्ठत्वानें पुढें आहे.

मानुषशारीर- मनुष्य प्राणि हा काय आहे ? हा प्रश्न अति पुरातन काळांपासून चालत आलेला आहे. शारीरशास्त्रवेत्ते व इंद्रियविज्ञानशास्त्रवेत्ते यांनीं आपल्या अपरंपार शोधांनीं आज मित्तीपर्यंत या दोन्ही शास्त्रांच्या ज्ञानांत अपरंपार भर घालून जरी तें ज्ञान पूर्वीपेक्षां हल्ली शेंकडों पटीनें वाढवून ठेविलें आहे, तरीहि पण मनुष्यप्राणी हा काय आहे या प्रश्नाचें गूढ अजून उकललें नाहींच. म्हणजे अजून त्या प्रश्नांतील गूढाचा थांग लागत नाहीं.

सृष्टीचे मुख्यतः दोन भेद होतात - सचेतन-प्राणिज सृष्टि हा एक भाग, व अचेतन-पार्थिव अथवा जड सृष्टि हा दुसरा भाग असे ते दोन मुख्य भाग आहेत. प्राणिजसृष्टींत चैतन्ययुक्त, चर व अचर अशा सर्व प्राणिजात वस्तूंचा समावेश होतो. म्हणजे जलचर व स्थलचर अशी सर्व प्राणिकोटि आणि वनस्पतिकोटि हीं यांत येतात. जड सृष्टींत चैतन्यरहित सर्व पार्थिव वस्तू म्हणजे खनिजकोटि येते. येणेंप्रमाणें या वर दिलेल्या सृष्टीच्या निरनिराळया भागांपैकीं चर-प्राणिकोटींत येणारा मनुष्य हा एक प्राणी आहे. चैतन्ययुक्त चर अशा प्राणिकोटींत ऐच्छिक गति व इंद्रियें हीं आहेत. परंतु चैतन्ययुक्त पण अचर अशा वनस्पतिकोटींत ऐच्छिक गति व इंद्रियें हीं नाहींत. त्यामुळें या दोहोंमधील जीव कांहीं क्रमानें परस्परांपासून सकृद्दर्शनी भिन्न असे दिसणारे आहेत. परंतु सूक्ष्म दृष्टीनें विचार करूं लागल्यास चरप्राणिकोटींतील जर एक चैतन्ययुक्त पिण्ड घेतला व अचर अशा या वनस्पतिकोटींतील तसाच चैतन्ययुक्त पिण्ड घेतला तर त्या दोहोंमधील अतिसूक्ष्म पिण्डांतल्या चैतन्यांतील भिन्नपणा जाणणें मोठें दुरापास्त आहे. इतकें त्या दोन्ही पिण्डांतील चैतन्यांत निकट साम्य आहे.

मनुष्य हा नुसता साधा प्राणी नव्हे. त्याच्यामध्यें अनेक गोष्टींची घटना एका ठिकाणीं आलेली आहे. प्राणिकोटीमधील सर्व इंद्रियें पाहिलीं असतां त्या बहुतेक इंद्रियांचें एकीकरण मनुष्यप्राण्यामध्यें झालेलें आहे. म्हणून सकलप्राणिविषयक इंद्रियांचें मनुष्यप्राणी हा एक मिश्र स्थानच आहे असें मानावें लागतें. शारीरशास्त्रविषयक गोष्टींचें ज्ञान करुन घेण्याला मनुष्यप्राणि हा शरीराचा एक नमुनाच पुढें आहे, व सर्व प्राणिकोटींचा सारांशभूत गोषवारा समजण्याला, प्राणिविषयक रचनेचें समालोचन कण्याला मानवकोटीच्या शरीराची रचना हीच आपल्यापुढें आपण मूळ आधार म्हणून घेतों. चरसृष्टींत सपृष्ठवंश (म्हणजे ज्यांनां पाठीचा कणा आहे) असा जो एक निराळा प्राणिवर्ग आहे त्या वर्गांतला मनुष्यप्राणी हा एक असून त्याची रचना फार मिश्र जातीची आहे. हा मिश्र जातीचा असून चलनक्रियेला दोन अवयवांचाच उपयोग करणारा आहे, व त्याच्या उन्नत संस्थितीवरुन म्हणजे शरीराच्या उभ्या, ताठ, सरळपणाच्या डौलावरुन तो खालच्या वर्गांच्या सर्वप्राण्यांपासून अगदीं भिन्न आहे.

मनुष्याच्या शरीराकडे पाहिलें की सकृद्दर्शनीं पुढें दिलेले भाग ढोबळ मानानें लक्षांत येतात (१) शिर व त्याच्याच बरोबर वर्णनाच्या सोईसाठीं मानेचा भाग घेऊं. (२) धड व धडांतच समावेश झालेले भाग (अ) छाती अथवा वक्षस्थल व (आ) पोट अथवा उदर. (३) अवयव दोन अग्रवतीं अवयव-ऊर्ध्वशाखा-हात. दोन पाठीमागचे अवयव-अधःशाखा-पाय. येणेंप्रमाणें हे स्थूल भाग आहेत.

शरीरांत वेगवेगळाले असे जे निरनिराळे भाग आहेत त्यांनां इंद्रियें असें नांव देतात. नैसर्गिक योजनेनें या इंद्रियांकडे आपापले व्यापार लावून दिलेले आहेत. अशीं हीं जीं निरनिराळीं इंद्रियें आहेत तीं सर्व पटानें (टिशूनें) बनून झालेली आहेत. या सर्व इंद्रियभागांचें वर्णन करण्यापूर्वी पटांचा विचार थोडक्यांत करणें इष्ट आहे. पट हा शब्द इंग्रजींतील टिशू या शब्दाच्या अर्थी योजलेला आहे म्हणजे मूळ इंग्रजींतील 'टिशू' या शब्दांत 'विणणें' हा अर्थ ध्वनित होत आहे. जाल, जाळे विणणेला तुकडा हाच अर्थ पट या शब्दांत येतो.वास्तविक विचार करतां 'टिशू' ही अतिसूक्ष्म पिण्डांची विणलेली वस्तु आहे व त्या अर्थानें पेशिजाल हा शब्द अगदींबरोबर आहे. परंतु पट हा थोडक्यांत पारिभाषिक शब्द असून त्यांत मूळ शब्दाच्या ध्वनितार्थाचा बिघाड होत नाहीं म्हणून पेशिजाल या शब्दाला पट हा शब्द कायम केला आहे. एकंदर सर्व शरीराच्या रचनेंत सहा जातींचे पट आलेले आहेत ते असे (१) अस्थिपट (२) स्नायूपट (३) मज्जातंतूपट (४) संयोजकपट (५) मांसपिण्ड अथवा मांसग्रंथिपट (६) रुधिर अथवा पोषक पट.

येणेंप्रमाणें या वर दिलेल्या पटांपैकीं कोणते ना कोणते तरी पट शरीरांतील निरनिराळया इंद्रियांच्या मूळाशीं आहेत. परंतु या सर्व पटांच्या बुडाशीं अतिसूक्ष्मपिंड आहेत. कारण या सहा पटांचा सजीव भाग अथिसूक्ष्मपिंडांच्या राशीकरणानें म्हणजे समुच्चयानें बनून राहिलेला आहे. म्हणजे अर्थांतच शरीराच्या रचनेचा क्रमाक्रमानें शोध करीत जातां जातां व तत्संबंधी विचार करता करतां अखेर आपण अतिसूक्ष्मपिण्ड यांच्याबद्दलच्या विचारापर्यंतच्या मुक्कामाला येऊन पोहोंचतों. सूक्ष्मपिण्डरचनाशास्त्रवेत्ते ज्यांनां आंग्ल भाषेंत हिस्टॉलोजिस्ट म्हणतात त्यांनीं असें दाखविलें आहे कीं, हा अतिसूक्ष्मपिण्ड म्हणजे एक सूक्ष्म वस्तूचा गोळा असून तो मृदु, लिबलिबीत चैतन्ययुक्त  अशा पदार्थाचा बनलेला आहे, त्या पदार्थाला जीवनरस असें म्हटलें आहे. या जीवनरसांत तीन वायुरुप द्रव्यें, व तीन घनवस्तू असे घटक आहेत. वायुरुप द्रव्यांत उज्जवायु, प्राणवायु, नत्रवायु
हे आहेत, व घनवस्तूंत कर्ब, स्फुर, आणि गंधक हे पदार्थ आहेत. या जीवनरसांत या वायुरुप द्रव्यांचा व घनवस्तूंचा जो संयोग झाला आहे तो मात्र समजण्याला फार कठिण आहे. शरीरांतील सर्वरचनांच्या मूळाशीं हे जे सूक्ष्मपिण्ड आहेत ते सर्व एखाच गुणधर्माचे नाहींत. ज्या ज्या ठिकाणीं ज्या ज्या क्रिया, जे जे व्यापार घडवून आणणें निसर्गाला इष्ट वाटलें त्या त्या ठिकाणीं विशिष्ट गुणधर्माच्या सूक्ष्म पिण्डांची योजना निसर्गानें करुन ठेवलेली आहे. या निरनिराळया पिण्डांचा शरीरांत कोणत्याहि जागीं एकदां र्‍हास झाला म्हणजे पुन्हां त्यांची जागा त्या ठिकाणीं त्याच विशिष्ट गुणधर्माचे पिण्ड उत्पन्न होऊन भरून निघणारी नसते. ज्या ठिकाणीं जो एकवार र्‍हास झाला तो कायमचाच ! मात्र ती जागा दुसर्‍या पिण्डांनीं व्यापल्यावर फेरबदल व परिणाम काय होतात तें समजावून देण्याचा भाग विकृतइंद्रियविज्ञान शास्त्राचा आहे म्हणून सांप्रत तत्संबंधीं अधिक विचार करण्याची आवश्यकता नाहीं.

वर शरीररचनेच्या मूळाशीं जे सहा जातींचे पट सांगितले त्यांचा आतां क्रमवार विचार करूं.

अस्थिपट- शरीराच्या रचनेंत जे घन भाग आलेले आहेत त्या भागांशीं या पटांचा संबंध आहे. अस्थिपटांत दोन भाग आहेत व त्या दोन्ही भागांचा परस्परांशीं एकजीव झालेला आहे. त्यांपैकीं एका भागाला प्राणिजवस्तु म्हणतात, व दुसर्‍या भागाला पार्थिव वस्तु अथवा खनिज द्रव्यात्मक वस्तु म्हणतात. यांतील प्राणिजवस्तु जळली जाण्यासारखी असून तींतून शेष खनिज द्रव्यात्मक वस्तु राहणारी असते. व पार्थिव भाग अम्ल पदार्थांत विरघळला जाणारा असून त्यांतून शेष प्राणिजवस्तु राहणारी असते.

स्नायूपट- या जातींच्या पटांत जे सूक्ष्मपिण्ड आहेत त्यांच्यांत आकुंचन करण्याची शक्ति असणें हा विशिष्ट धर्म आङे. स्नायूंच्या तीन जाती आहेत त्या (१) स्वेच्छानधीन स्नायू. (२) स्वेच्छाधीन स्नायू व (३) हृतस्नायु या होत. स्वेच्छाधीन स्नायूंच्या तंतूवर थोडे व नियमित अंतरावर आडवे पट्टे असतात म्हणून त्यांनां स्वेच्छाधीन (पट्टांकित) स्नायू म्हणजे सळईचे स्नायू असें म्हटलें आहे. स्वेच्छानधीन स्नायूंचें तंतू वरच्यापेक्षां चापट असून त्यांवर पट्टे नसतात म्हणून त्यांनां स्वेच्छानधीन (पट्टहीन) म्हणजे सळई नसलेले स्नायूं असें म्हटलें आहे. स्वेच्छाधीन स्नायू मनुष्याच्या इच्छेनें चलन पावणारे असतात व स्वेच्छानधीन स्नायू मनुष्याच्या इच्छेचें चलन पावणारे नसतात. हृदस्नायू-हृदिंद्रिय म्हणजे हा एक स्नायूच आहे.

मज्जातंतुपट- मज्जातंतुपिण्ड व मज्जातंतुपिण्डाचे बनलेले धागे अशा दोहोंनी मिळून मज्जातंतुपट बनलेला आहे. मज्जातंतुपिण्डांत विशिष्ट धर्म हा आहे कीं ते पिण्डप्रेरणा घेणारे व प्रेरणा नेणारे असे आहेत. व मज्जातंतूंच्या बनलेल्या धाग्यांत हा विशिष्ट धर्म आहे कीं, ते धागे मेंदूला इंद्रियाज्ञान नेऊन पोहोंचविणारे व स्नायूंमध्यें गतिवाहक प्रेरणा उत्पन्न करणारे आहेत.

संयोजकपट- हा पट मुख्यत्वेंकरून धाग्याधाग्यांच्या रुपाचा असा आहे. निरनिराळया जातींचे पट एकमेकांशी जोडण्याकडे या पटाचा उपयोग आहे. या संयोजक पटांत श्वेततंतुमय पट पीततंतुमय लवचिक पट असे दोन भाग येतात. मेदोमय अथवा वसामयपट याच सदराखालीं येतो.

मांसपिण्डग्रंथीपट- हा पट म्हणजे पुष्कळसे पिण्ड एका जागीं झालेला असा एक जमाव आहे. या जातीच्या पटांतील पिण्डांचा विशिष्ट धर्म असा आहे कीं, रक्तामधील उपयोगी पडणारें जें द्रव्य तें द्रव्य हे पिण्ड निराळें करुन घेतात. परंतु रक्तामध्यें जी टाकाउ वस्तु आहे तिच्यापासुन आपण स्वतः अलिप्त राहतात.

रुधिर अथवा पोषक पट- शरीरांतील पोषकप्रवाही वस्तूंत मुख्य भाग जो आहे तो रक्ताकडे आलेला आहे. रक्तामध्यें जी द्रवरुप वस्तु आहे तिला रक्तकणाधारीरस म्हणतात. या रक्तकणाधारीरसांत दोन जातींचे पिण्ड तरंगत असतात. एक रक्तपिण्ड व दुसरे श्वेतपिण्ड. या दोन जातींच्या पिण्डांत रक्तपिण्डांची संख्या अधिक असते व श्वेतपिण्डांची संख्या कमी असते. येणेंप्रमाणें हे सहा जातींचे पट आहेत व त्यांचे वर वर्णन केल्याप्रमाणें घटक आहेत. नैसर्गिक योजनेनें यापटांतील घटकांची योजना कशी झालेली आहे, कशाकरितां झालेली आहे, व त्यांचे काय काय धर्म आहेत तें नीट लक्षांत आणिल्यावर त्या गोष्टींचें ज्ञान होणें किती महत्वाचें आहे हें सहज लक्षांत येईल. शरीरांतील अंतरिंद्रियें, निरनिराळया रचना, व्यवस्था म्हणजे व्यूह यांची माहिती आतां क्रमाक्रमानें पुढें येईल.

मनुष्यप्राण्याच्या शरीररचनेत जी अंतरिंद्रियांची नैसर्गिक योजना आहे त्या योजनेच्या निरनिराळया आठ व्यवस्था आहेत. त्यांनां इंग्लिश भाषेंत सिस्टीम्स म्हणतात. व त्यालाच अर्थबोधक पारिभाषिक शब्द व्यूह हा योजला आहे. हे आठ व्यूह असे-
(१) अस्थिव्यूह (२) स्नायुव्यूह (३) पचनेंद्रियव्यूह (४) अभिसरणव्यूह (५) श्वासेंद्रियव्यूह (६) उत्सर्जकव्यूह (७) शोषणक्षमव्यूह व (८) मज्जातंतुव्यूह.

येणेंप्रमाणें हे आठ व्यूह आहेत. तशींच पांच विशिष्ट इंद्रियें आहेत तीं येणेंप्रमाणें (१) श्रोत्रेंद्रिय (२) चक्षुरिंद्रिय (३) त्वगिंद्रिय (४) रसनेंद्रिय व (५) घ्राणेंद्रिय. याप्रमाणें हीं पांच विशिष्ट इंद्रियें आहेत. आतां वरील आठ व्यूह व पांच विशिष्ट इंद्रियें यांची यथानुक्रमानें थोडक्यांत माहिती दिल्यावर मानुषशारीरशास्त्रारख्या विस्तृत व गहन विषयाची निदान स्थूल बाह्यरुपरेषा वाचकांच्यापुढें उभी राहील.

अस्थिव्यूह.

सकृद्दर्शनीं आपणापुढें असा प्रश्न येतो कीं, शरीररचनेंत चोहोंकडे अस्थींसारखा जो कठिण व घट्ट पट पसरलेला आहे त्याचें प्रयोजन काय ? या प्रश्नाचीं तीन उत्तरें आहेत. (१) शरीरांत जे मृदु भाग आहेत त्यांनां अस्थींचें टेंकण अथवा आधार मिळतो. (२) शरीरांत जीं महत्वाचीं इंद्रियें आहेत त्यांचें कांहीं जागेंत अस्थींच्या योगानें संरक्षण केलें जातें व (३) स्नायूंनां गुंतून राहण्यास अस्थींचा बळकट आधार मिळतो व त्यामुळें स्नायूंनां अस्थींच्या आधारानें दुसरीकडे व स्वतः अस्थींवर देखील क्रिया चालविण्याला सोपें जातें. प्रौढ वयाच्या मनुष्याच्या शरीरांत निरनिराळया अशा सुटया अस्थींची संख्या दोनशेंपेक्षां कमी नसते त्यांचे निरनिराळे गट असे - मुखाचा भाग धरुन मस्तकाच्या अस्थी (अस्थी २२); पाठीच्या कण्याच्या अस्थी (त्रिकास्थी व गुदास्थी धरुन अस्थी २६); उरोस्थि व फांसळयांच्या अस्थी (अस्थी २५); जिव्हास्थि (अस्थि १); ऊर्ध्व शाखांच्या म्हणजे हातांच्या अस्थी (अस्थी ६४); अधःशाखा म्हणजे पायांच्या अस्थी (अस्थी ६२). या गणतींत जानुफलक म्हणजे गुडघ्याची वाटी, या अस्थीखेरजिकरून तीलकाकृति अस्थी, कर्णाची लहान अस्थि व दंत हीं मोजलीं नाहींत.

अस्थींच्या निरनिराळया जातींच्या आकारांवरून अस्थींचे पुन्हां चारवर्ग केले आहेत (१) दीर्घास्थी - उदाहरणार्थ भूजांच्या अस्थी (२) र्‍हस्वास्थी; यांतच तीलकाकृति अस्थींचा समावेश आहे. उदाहरणार्थ मणगटाच्या अस्थी. (३) सपाट अस्थी - उदाहरणार्थ मस्तकाच्या डंबरीच्या अस्थी (४) अनियमित आकाराच्या अस्थी - उदाहरणार्थ पाठीचे मणके. यावरून हें ध्यानांत येईल कीं, अस्थिपंजाराच्या अंगभूत भागांत असमता फार आहे. अस्थींत असा हा निराळेपणा ठेवण्यांत निसर्गाचा हाच हेतु आहे कीं, अस्थिपंजाराच्या प्रत्येक भागाला म्हणजे निरनिराळया अस्थीला तिच्याकडे जें कार्य करुन देण्याचें योजिलें आहे तें करण्याला ती अस्थि योग्य व्हावी, व तसेंच सर्व अस्थींनां जमावानें म्हणजे एकजुटीनें मिळून काम करण्याला त्यांच्यांत पूर्ण योग्यता यावी म्हणून ही असमता त्यांच्यांत राखण्यांत आली आहे. येथून तेथून सर्व अस्थीचें समालोचन करतांना प्रत्येक हाड सुटें घेऊन त्याचा आकार व त्याचें रुपलक्षण यांचा विचार करण्याला प्रत्येक हाडाचा पृथकपणेंच विचार केला पाहिजे. परंतु यापलीकडे हाडांबद्दल विचार करणें किंवा त्यांचा अभ्यास करणें म्हणजे त्यांचा एकमेकांशीं संबंध काय आहे याच गोष्टी काळजीपूर्वक शिकून घेतल्या पाहिजेत.

मस्तक (शिरोस्थि अथवा मस्तकावरण)- मस्तकाचे दोन विभाग केले आहेत (१) कवटी व (२) मुख. यांत कवटीच्या भागाच्या ८ अस्थी आहेत व मुखाच्या (चेहर्‍याच्या) भागाच्या १४ अस्थी आहेत, मिळून सर्व मस्तकाच्या २२ अस्थी होतात. पश्चिम कपालास्थि (शिरःपृष्ठास्थि) १; पार्श्व कपालास्थि (सीमंतास्थी) २; अग्रकपालास्थि (ललाटास्थि)१; शंखास्थि (कर्णास्थि) २; जतुकास्थि (शीर्षतलास्थि) १; सच्छिद्रास्थि १ ; एकूण अस्थी ८.

मुखाच्या (चेहर्‍याच्या ) अस्थी- ऊर्ध्वदंतास्थी २; गण्डास्थी २; नासिकास्थी २; बाष्पास्थी २; ताल्वस्थी २ ; जालास्थी (अधःशुक्तिकास्थी) २; सीरिकास्थि (फालास्थि) १; हन्वस्थि १; एकूण अस्थी १४.

मस्तकच्या चित्राकडे (आ.नं. २) पाहिलें म्हणजे असें दिसतें कीं, त्यांत पोकळ जागा सर्व बाजूंनीं अस्थींनीं वेष्टिली आहे, फक्त कांहीं ठिकाणीं मात्र खिंडारें आहेत. या सर्व भागाला मस्तिष्कावरण अथवा मस्तक म्हटलें आहे. या मधील पोकळ जागेंत मेंदु असतो. मेंदूच्या अति नाजूक अशा मज्जातंतुपटाला मस्तक हें उत्तम संरक्षणकारक होतें. या मस्तकाला जोडलेलीं अशीं अनियमित आकाराचीं अनेक हाडें दिसतात, तीं हाडें मुखाच्या भागाचीं आहेत. अगदीं तरुण मुलांत हीं हाडें फारच थोडीं वृद्धिंगत झालेलीं असतात. मस्तक हें कवटीचा व मुखाचा भाग मिळून झालेलें आहे. त्या प्रत्येक भागांत येणार्‍या अस्थींचीं नांवें व संख्या हीं वर दिलेलींच आहेत. मुख्य कवटीचा भाग बनून येण्यांत निरनिराळया आठ अस्थींचा अगदीं निकट संबंध झालेला आहे.

पश्चिमकपालास्थि अथवा शिरःपृष्ठास्थि ही कवटीच्या मागच्या भागाला आहे. दोन पार्श्वकपालास्थी अथवा सीमंतस्थी या कवटीच्या बाजूंच्या व वरील भागाच्या अस्थी आहेत. अग्रकपालास्थि अथवा ललाटास्थि ही कवटीच्या पुढील भागाची अस्थि आहे. शंखास्थि अथवा कर्णास्थि ही अस्थि कवटीचा कान शिलाच्या म्हणजे आंखाच्या बाजूचा जो भाग आहे त्या ठिकाणचा अस्थि आहे. शीर्षतलास्थि अथवा जतुकास्थि ही कवटीचा तळ अथवा पाया यामधील अस्थि आहे. सच्छिद्रास्थि ही अस्थि नाकाच्या वरील बाजूला असून तिला बरींच छिद्रें असतात, व त्या छिद्रांमधून घ्राणेंद्रियाचे तंतू नाकांत जातात. सीमंतास्थीचा सर्व भाग, ललाटास्थीचा कांहीं भाग आणि शंखास्थीचा कांहीं भाग असे हे सर्व भाग मिळून कवटीची जी डंबरी आहे त्या डंबरीचा सर्व भाग होतो. सबंध जतुकास्थि, सच्छिद्रास्थि, आणि शिरःपृष्ठास्थि व शंखास्थीचा कांहीं भाग मिळून कवटीच्या तळाचा अथवा पायाचा भाग झालेला आहे.

पश्चिमकपालास्थि अथवा शिरःपृष्ठास्थि या अस्थीचा आकार कांहींसा त्रिकोणाकृति व सपाट असा आहे. हा भाग बाहेरुन वरच्या भागाकडे अगदीं गुळगुळीत असून तो कवटीचा डंबरीसारखा जो भाग दिसतो त्यांत घुसलेला आहे. शिरःपृष्ठास्थीच्या खालच्या बाजूला कंगोरे व दबलेले भाग आहेत, ते स्नायूंचा त्यांच्याशीं संयोग होण्यासाठीं आहेत. डोक्याला कांहीं प्रकारच्या चलनवलनक्रिया उत्पन्न करतां येतात ते धर्म त्या ठिकाणच्या स्नायूंत आहेत. त्या ठिकाणच्या पृष्ठभागावर जो उंचवटा ध्यानांत येण्यासारखा आहे तो त्वचेखालीं मागचा भाग चाचपून पाहिला म्हणजे कळून येतो.

कवटीच्या आंतल्या भागांत चार खांचा अगर खळगे आहेत. या खळग्यांत मेंदूच्या भागाचें आश्रयस्थान आहे. हे चारी खळगे एकमेकांपासून त्यांनां असलेल्या कंगोर्‍यानें वेगळे झालेले आहेत, व त्या कंगोर्‍यांतहि खांचा व खोबणी आहेत. शिरःपृष्ठास्थीमध्यें एक मोठी लक्षांत घेण्यासारखी गोष्ट आहे ती ही कीं, त्या अस्थीमध्यें जें एक मोठें छिद्र दिसतें ती होय. या छिद्राला महाविवर असें म्हणतात. व तें खालच्या पृष्ठभागांत असतें. या महाविवरांतून पृष्ठमज्जारज्जू जाऊन ती मेंदूशीं सतत म्हणजे अखंडित होऊन राहिली आहे. याच भागाच्या दोन्ही बाजूला खालच्या पृष्ठभागीं गोलबाह्य अशीं अस्थींची गांठाळलेलीं वाटोळीं टोकें पुढें आलेलीं आहेत त्यांनां महार्बुद म्हणतात. त्यांच्या योगानें शिरःपृष्ठास्थीचा सांधा जडला आहे म्हणजे ती अस्थि पाठीच्या कण्याच्या मणक्यापैकीं जो अगदीं पहिला मणका त्याच्याशीं जोडून राहिली आहे. पुढें मागें मान हालवितां येणें, दोन्ही बाजूंनां मान डोलवतां येणें ही जी डोक्याची चलनवलनक्रिया चालते ती या दोन अस्थींमध्यें घडते. याशिवाय शिरःपृष्ठास्थींचा संयोग दोन्ही सीमंतास्थी व दोन्ही शंखास्थीशीं झालेला आहे, व जाणत्या माणसांत पुढील बाजूंत शीर्षतलास्थीशीं शिरःपृष्ठास्थि ही अस्थिपटाच्या योगानें घट्ट जोडून राहिली आहे. परंतु लहान मुलांत मात्र शिरःपृष्ठास्थि व शीर्षतलास्थि या दोन्ही अस्थी निरनिराळया असतात.

पार्श्वकपालास्थि अथवा सीमंतास्थि या अस्थी समप्रमाण आहेत व ढोबळ मानानें पाहिलें तर त्यांचा आकार चतुष्कोणी आहे, अगदीं थोडासा कांठ आहे पण तो जर वजा केला तर मग त्यांचा सर्व भाग गुळगुळीत व बाह्यगोल असा आहे, परंतु आंतल्या बाजूनें मात्र दबलेला, खांचा कोबणी असलेला व अंतर्गोलाकार असा आहे. त्या खांचांपैकीं एक खांच खालच्या बाजूच्या अग्रवर्ती कोनांत आहे. ही खांच बहुतेककरुन फार खोल असते, कधीं कधीं तर ती त्या अस्थींत एक पूर्ण कालवाच आहे असा तिचा आकार असतो, व यदाकदाचित आकस्मिक प्रसंगानें सीमंतास्थि चुरली गेली, तिचा भंग झाला तर त्या धमनीचें विदारण होतें म्हणजे ती धमनी फाटते. आकृति नं. ३ मध्यें जी एक उभी शिवण दिसत आहे व त्या शिवणीसारख्या भागाच्या दोन्ही बाजूंकडे जीं अर्धें दिसत आहेत त्या दोन सीमंतास्थी होत. प्रत्येक सीमंतास्थीनें कवटीच्या बाजूचा व माथ्यावरील छप्पराचा पुष्कळसा भाग झालेला आहे. प्रत्येक सीमंतास्थीचा तिचीच जोडीदार जी दुसरी सीमंतास्थि समोर आहे तिच्याशीं सांधा झालेला आहे व त्याचप्रमाणें सीमंतास्थीचे सांधे शिरःपृष्ठास्थि, ज्या त्या सीमंतास्थीच्या बाजूची शंखास्थि, ललाटास्थि आणि शीर्षतलास्थि यांच्याबरोबर जोडले गेले आहेत.

ललाटास्थि अथवा अग्रकपालास्थि (फ्रंटल बोन)- ललाटास्थीनें कपाळाचा भाग झालेला आहे. आकृति नंबर २ मध्यें हा भाग दिसून येईल. लहान मुलांत ललाटास्थींचीं दोन अर्धें समप्रमाण असतात व पुढें जाणतेपणांत या दोन्हीं अर्धांचा एकमेकांबरोबर एकजीव होतो. ललाटास्थीचा लंबवृत्त म्हणजे उभ्या रेषेंतला भाग मस्तकाच्या डंबरीप्रदेशांत घुसलेला आहे व त्याशिवाय ललाटास्थीचा क्षितिजसमांतर म्हणजे आडवा भाग हा खोल खांच घेतला गेलेला असा आहे. या खोल खांचीच्या प्रत्येक अर्धानें त्या बाजूचा जो डोळा त्या डोळयाच्या अक्षिकोशाचें छत झालेलें आहे, व त्याचप्रमाणें नाकाच्या छताचाहि कांहीं भाग त्यानें झालेला आहे (आकृति नं. ४ पहा).

ललाटास्थीचे सांधे इथर बारा अस्थींशीं जुळून आलेले आहेत. त्या अस्थी येणेंप्रमाणें- दोन सीमंतास्थी, शीर्षतलास्थी, सच्छिद्रास्थी, दोन नासिकास्थी, दोन ऊर्ध्वदंतास्थी, दोन बाष्पास्थी, आणि दोन गंडास्थी, याप्रमाणें बारा अस्थींनीं संयोग झाला आहे.

शंखास्थी अथवा कर्णास्थी- मस्तकाच्या दोन्ही बाजूंनां शंखास्थी आहेत त्याहि पु्हां सारख्याच आहेत. प्रत्येक शंखास्थीला एक चपटा भाग आहे, ज्याच्यामुळें कवटीच्या बाजूच्या भिंतीचा कांहीं भाग बनला आहे, आणि याच्याचपासून एक बारीक किरकोळ शृंग अथवा प्रसार पुढें येऊन त्याची एक पूर्ण कमान झाली आहे. व ही कमान गण्डास्थि म्हणजे गालाच्या हाडाबरोबर चाचपून कळते. शंखास्थीचा कांहीं भाग मस्तकाच्या डंबरींत शिरलेला आहे व याशिवाय शंखास्थीचा क्षितिजसमांतर म्हणजे आडवा भाग अति भक्कम, मजबूत आणि मनोर्‍याच्या आकृतीसारखा आहे. त्या भागानें मस्तकाच्या तळाचा म्हणजे पायाचा कांहीं भाग बनला आहे. एक चांगला लक्षांत येणारा उंचवटा अथवा ज्याला कानाच्या पाठीमागच्या हाडाच्या उंचवटा अथवा स्तनाकार (शृंग अथवा उन्नत भाग) म्हणतात, जो लहान मुलांत नसतो पण जाणत्या माणसांत पूर्णतेस आलेला असतो, तो उंचवटा कानाच्या मागच्या बाजूला हाताला साफ लागून कळतो. शंखास्थीच्या खालच्या पृष्ठभागीं एक अणकुचीदार कंटक आहे हा कंटक अस्थिपंजरांत पुष्कळवेळां तुटलेला असतो. या कंटकाला हाडाचें लेखणीसारखें टोंक अथवा कीलकाकृति अग्र म्हणतात. याचा उपयोग स्नायूंचा संयोग होण्याकडे होतो. शंखास्थीच्या खालच्या पृष्ठभागांत एक खोल खळगा आहे. त्याला कंदराकारपरिखा अथवा पीठपरिखा म्हणतात. हा खळगा खालच्या जबडयाच्या हाडाचें गांठाळलेलें वाटोळें टोंक, ज्याला महार्बुद अथवा पर्वांग म्हटलें आहे तें आंत बसण्याकरितां आहे. शंखास्थीनें श्रोत्रेंद्रियाला आवारच घातलें आहे, व त्या आवारांत एक बारीक दृश्य छिद्र आहे. त्याला बाह्यकर्णतल म्हणतात. शंखास्थीचा इतर दुसर्‍या चार अस्थींबरोबर सांधा जुळून आलेला आहे, त्या चार अस्थी म्हणजे शिरःपृष्ठास्थि, सीमंतास्थि, शीर्षतलास्थि, आणि हन्वस्थि या होत.

शीर्षतलास्थि अथवा जतुकास्थि- या अस्थीचा आकार कांहींसा चेंडू मारावयाच्या ब्याटीसारखा आहे. या अस्थीला पंख आहेत व तिचा आकार पंख पसलेल्या पाकोळीसारखा दिसतो. या अस्थीला पुढें वाढलेले उंचवटे म्हणजे उन्नत भाग आहेत ते पाकोळीच्या पायासारखे दिसतात. मस्तकाच्या पायामध्यें म्हणजे तळाशीं ज्या इतर अस्थी आहेत. त्या अस्थीमध्यें ही शीर्षतलास्थि पाचरीसारखी बसलेली आहे.

सच्थिद्रास्थि- ही अस्थि ललाटास्थीच्या क्षितिजसमांतर म्हणजे आडव्या भागाच्या दोन विभागांमध्यें जी खाप आहे त्या ठिकाणीं असते. ही अस्थि स्पंजासारखी आहे, व चाळणीला जशीं छिद्रें असतात तशीं या अस्थीला पुष्कळशीं छिद्रें आहेत, व म्हणूनच या अस्थीला सच्छिद्रास्थि हें नांव मिळालें आहे. येथपर्यंत मस्तकाच्या दोन विभागांपैकीं कवटी म्हणजे कपाळाच्या अस्थींचें वर्णन झालें. आतां दुसरा राहिलेला विभाग जो मुख त्याच्या अस्थींचा विचार करुं.

मुखाचा जो घाट बनून आला आहे त्यांत चौदा अस्थींचा समावेश झालेला आहे. त्या अस्थी अशा - दोन नासिकास्थी, दोन ऊर्ध्वदंतास्थी, दोन गण्डास्थी, हन्वस्थि, दोन ताल्वस्थी, दोन बाष्पास्थी, दोन अधःशक्तिकास्थि अथवा बालास्थि आणि कालास्थि अथवा सिरिकास्थि. या चौदांपैकीं पहिल्या सात फार महत्वाच्या आहेत त्यांचा विचार प्रथम करुं.

नासिकास्थी- या अस्थी कपाळाच्या खालीं अगदीं लगतच व दोन नेत्रपुटांच्या मधोमध आहेत आणि त्यांच्या मुळें नासावंश म्हणजे नाकाचा दांडा झालेला आहे.

ऊर्ध्वदंतास्थी- या तोंडावरच्या जाभाडयाच्या अस्थी आहेत. यांच्या योगानें गाल, नेत्रपुट, नाक, कठिण ताळु अथवा तोंडांतील वरील छत हे भाग झालेले आहेत. तोंडांतील मागच्या भागांत ताल्वस्थीचा कांहीं भाग येतो.

गण्डास्थी- या अस्थींच्या योगानें गालाला उंचवटा आलेला आहे. चिनी लोकांत हा उंचवटा चांगलाच दिसण्यांत येतो.

हन्वस्थि अथवा खालचा जबडा- ही अस्थि मुखाच्या सर्व अस्थींत मोठी आहे. या अस्थीला हाडांची गांठाळलेलीं वाटोळीं जीं दोन टोकें अथवा पर्वांगें आहेत त्यांच्या योगानें या अस्थींचे सांधे शंखास्थीबरोबर जुळून आलेले आहेत.

दंत- खालच्या व वरच्या दोन्ही जबडयांत दातांच्या उथळया आहेत. जाणत्या माणसांत दातांची संख्या बत्तीस असते. परंतु मुलांमध्यें अल्पकालस्थायी तात्पुरत्या आलेल्या दातांची संख्या वीस असते. वरच्या जबडयाच्या दोन अर्ध्यांपैकीं प्रत्येक अर्धांत दांतांचा क्रम पुढे दिल्याप्रमाणें आहे - दोन पुढचे दांत म्हणजे छेदक दंत, एक सुळयाचा दांत, दोन उपदंष्ट्रा-उपदाढा व तीन दाढा. हाच क्रम पुन्हां मध्यापासून राहिलेल्या दुसर्‍या अर्धांत पुढें चाललेला आहे. वरच्या जबडयांत दोन्ही अर्धांत जसा दांतांचा क्रम सांगितला तसाच क्रम खालच्या जबडयाच्या दोन्ही अर्धांत आहे. भेद इतकाच कीं, वरच्या जबडयाच्या दाढांनां तीन दांत असतात पैकीं दोन दांत कमानीच्या बाहेरच्या कडेवर असतात, व एक दांत आंतल्या कडेवर असतो. परंतु खालच्या जबडयाच्या दाढांनां मात्र दोनच मूळखंडें असतात. दांत येण्याचा नैसर्गिक क्रम पुढीलप्रमाणें आहे - प्रथम खालचे व वरचे मिळून पुढचे आठ दांत बाहेर पडतात. नंतर खालच्या व वरच्या मिळून आठ दाढा बाहेर पडतात. नंतर खालचे वरचे मिळून चार सुळे बाहेर निघतात, आणि सरतेशवेटीं पाठीमागच्या दाढा बाहेर येतात. तसेंच दांत येतांनां खालचे व वरचे परस्परांशीं संबंध असणारे दांत हे बरोबरच बाहेर पडतात. दाढांपैकीं अगदीं शेवटची दाढ आहे तिला अक्कलदाढ म्हणतात. ही अक्कलदाढ मनुष्य वीस वर्षांचा होईपर्यंत आलेली असते. कधीं कधीं ती चाळीसाव्या वर्षीहि येते व केव्हां केव्हां तर असें होतें कीं, ही अक्कलदाढ येतच नाहीं. येणेंप्रमाणें वरील दांत १६ व खालील दांत सोळा मिळून दांतांची संख्या बत्तीस आहे. दांतांचा हिरडींत गेलेला जे भाग; ज्याला दंतमूल म्हणतात तो भाग खेरीज करुन दांतांच्या सर्व भागांवर कांचमिन्यासारखें चकाकणारें लुकण इतकें कठिण असतें कीं, पोलादाशीं त्याची चकमक झडली तर त्यांतून ठिणगी बाहेर पडते. या घट्ट कांचमिन्याला जर कांहीं अपाय झाला तर तो दुरुस्त होऊं शकत नाहीं. मुखाच्या चौदा अस्थींपैकीं मुख्य सात अस्थी व दांत यांचा विचार झाला. आतां मुखाच्या चौदांपैकीं बाकी राहिलेल्या सात अस्थींचा विचार करुं.

ताल्वस्थी- या दोन अस्थी नाकाच्या खांचेच्या मागच्या भागांत आहेत आणि ताळूचा कठिण भाग नासिकेच्या विवराची खालची व बाजूची मर्यादा आणि अक्षिकोशाचा खालचा भाग यांच्या रचनेंत या अस्थी अंशबूत आहेत. या प्रत्येक अस्थीचा आकार इंग्रजी एल् या वर्णासारखा आहे. या अस्थींचा संधि इतर सहा अस्थींशीं आहे. त्या येणेंप्रमाणें - शीर्षतलास्थि, सच्छिद्रास्थि या दोन कवटीच्या अस्थी, आणि ऊर्ध्वदंतास्थि, अधःशुक्तिकास्थि अथवा जालास्थि सीरिकास्थि अथवा पालास्थि, आणि संगतीचे अस्थी या मुखाच्या अस्थी यांच्याशीं मिळून संधि आहे.

अधःशुक्तिकास्थि अथवा जालास्थि- या छिद्रयुक्त, पातळ आणि हलक्या अस्थींचा थर नासिकेच्या आंतल्या अंगास बाहेरच्या मर्यादेजवळ क्षितिजसमांतर म्हणजे आडवा लागलेला असतो. याला दोन अंगे, दोन कांठ व दोन शेवटें असतात. आंतलें अंग गोलबाह्य, सच्छिद्र आणि मज्जातंतू व रक्तवाहिन्या यांसाठीं खांचण्यांनीं युक्त आहे. या अस्थींचा संधि सच्छिद्रास्थि, ऊर्ध्वदंतास्थि, बाष्पास्थि आणि ताल्वास्थि यांच्यांशीं झाला आहे.

बाष्पास्थी- मुखाच्या सर्व अस्थींपेक्षां लहान, पातळ व अत्यंत ठिसूळ असा या अस्थी आहेत. या अस्थी पातळ असून कांहींशा नखासारख्या अक्षिकोशाच्या आंतल्या भिंतीवर आहेत. प्रत्येक अस्थीस दोन अंगें व चार कांठ आहेत. या अस्थींच्या चार कांठांशीं पुढील चार अस्थींचा संधि झाला आहे - अग्रकपाल अथवा ललाटास्थि, सच्छिद्रास्थि, ऊर्ध्वदंतास्थि, आणि अधःशुक्तिकास्थि अथवा जालास्थि.

सीरिकास्थि अथवा फालास्थि- ही अस्थि पातळ असून नांगराच्या फाळासारखी आहे. या अस्थीच्या योगानें नाकाच्या खांचेच्या मधल्या पडद्याचा मागला आणि खालचा भाग होतो. ही अस्थि दोन अंगें व चार कांठ यांनीं युक्त आहे. प्रत्येक बाजूचें अंग ही नासिकेच्या विवराची आंतली मर्यादा होते, व त्यावर रक्तवाहिन्यांसाठीं खांचण्यां असतात. या अस्थीचा संधि शिर्षतलास्थि, सच्छिद्रास्थि, ऊर्ध्वदंतास्थि, ताल्वस्थि आणि नाकाच्या पडद्याची कूर्चा यांच्यांशीं झाला आहे. येणेंप्रमाणें मुखाच्या राहिलेल्या सात अस्थींचा विचार झाला.

पृष्ठवंशाच्या अस्थींकडे वळण्यापूर्वी एकंदर सर्व मस्तकाकडे लक्ष्य दिलें पाहिजें. मस्तकाच्या सर्व अंगभूत अस्थी परस्परांशीं जुळून आल्यावर जी एक पोकळी तयार होते, व जिच्यामध्यें मेंदू राहतो, त्या पोकळीला डंबरी अथवा छत व पाया अथवा तळ हीं आहेत असें म्हटलें आहे. मनोर्‍याच्या आकृतीसारख्या पुढें दिसणार्‍या दोन उथळया या नेत्रपुट अथवा डोळयांच्या जागा आहेत, त्यांमध्यें डोळे बसलेले आहेत. प्रत्येक नेत्राचें छत, जें ललाटास्थीच्या कांहीं भागानें झालेलें आहे तें फारच पातळ आहे, व या भागाची अस्थि प्रकाशांत धरली असतां ती पारदर्शक नसून प्रकाशभेद्य, स्वच्छ व चकचकीत दिसते. यावरून ती किती पातळ आहे तें दिसून येतें. प्रत्येक नासापुट म्हणजे पुढें व मागें असलेलीं द्वारें यांच्यासंबंधीं पाहतां त्यांच्या घेराचा व आकाराचा विचार केला पाहिजे. जाणत्या माणसाच्या मस्तकाच्या अस्थी पक्क्या, मजबूत न हालणार्‍या अशा शिवणीनें परस्परांशीं सांधून गेलेल्या असतात, व या शिवणी बहुतेककरुन क्रकचदंताकार म्हणजे कर्वतीच्या दांत्यांसारख्या असतात. अशा या सांधून गेलेल्या अस्थींपैकीं मुख्य अस्थी येणेंप्रमाणें (१) मुकाटास्थि; ही ललाटास्थि व दोन्ही सीमंतास्थी यांमधील अस्थि होय. (२) बाणाकार अस्थि; ही अस्थि दोन सीमंतास्थींमध्यें असून थेट पाठीमागें गेलेली आहे. (३) ग्रीकवर्णमालेंतील लांब्डा अक्षराकृति अस्थि; ही (४) खवले असलेली म्हणजे सशल्कलास्थि; ही अस्थि शंखास्थीचा खवले असलेला भाग आणि सीमंतास्थीची खालची कड यांमधील अस्थि होय (आकृति नं. २ व ३ पहा).

तान्ह्या मुलांमध्यें मस्तकाच्या ज्या अस्थी असतात. त्या मध्यें अस्थिरहित अशा जागा राहून परस्परांपासून निरनिराळया झालेल्या असतात, आणि जेथें मस्तकाच्या कित्येक अंगभूत अस्थी येऊन एकमेकीशीं मिळतात अशा ठिकाणीं या मोकळया जागा फारच विस्तृत असतात, आणि अशा या मोकळया जागांनां तालु म्हटलें आहे. पुरस्तालु व पश्चिमतालु अशा या दोन तालूंच्या मुख्य जागा आहेत. यांपैकीं एक महत्वाची तालु कोणत्याहि एक वर्षाच्या आंतल्या तान्ह्या मुलांत सहज कळून येणारी असते. तिच्यामधून मेंदूंमध्यें पडणारे ठोके हाताला लागतात. कवटीच्या छतामधील हा तालूचा भाग आयुष्याच्या पहिल्या व दुसर्‍या वर्षाच्या आंत मिळून येईपर्यंत ती जागा फार नाजूक रहाते.

कण्ठिकास्थि अथवा जिव्हास्थि- या अस्थीचा आकार फांकलेल्या कोयंडयासारखा किंवा पसरलेल्या अशा इंग्लिश वर्णमालेंतील 'यू' या अक्षरासारखा आहे. या अस्थीचा जिभेशीं विशेष संबंध असल्यामुळें या अस्थीला कोणी कोणी जिव्हास्थि म्हणतात. ही अस्थि जिभेच्या मूळाजवळ आहे, व हनुवटीच्या आणि कण्याच्या कठिण भागामध्यें हाताला सहज लागते. या अस्थीला संधी इतर अस्थींशीं होत नाहीं.

पाठीचा कणा- या भागामध्यें आपल्याला असें दिसून येईल कीं, ज्याज्या कार्याला ज्या ज्या अवश्य गोष्टींची जरुरी आहे त्यांची सुंदर जुळणी निसर्गानें या ठिकाणीं केली आहे. हा मणिस्तंभ भरपूर आधार देण्याचें काम करीत असतांहि त्याला स्वतःला अगदीं मोकळेपणें चलनशील असें रहावयाचें आहे आणि म्हणूनच पुष्कळशा खंडाखंडांनीं तो मणिस्तंभ झालेला आहे, व त्या सर्व खडांनां मणके हें नांव मिळालें आहे. या सर्वांचे मिळून चार गट केलेले आहेत (१) सात मणके मानेचे; (२) बारा मणके पाठीचे अथवा वक्षस्थळाचे; (३) पांच मणके कमरेचे अथवा पोटाच्या भागाचे व (४) त्रिकास्थि आणि गुदास्थि. त्रिकास्थि ही पांच विभाग मिळून झालेली आहे. या विभागांचा जाणत्या माणसांत एक जीव होऊन त्यांची संबंध एकच अस्थि झालेली असते. अगदीं मूळची गुदास्थि चार तुकडयांची होती, व ही अस्थि म्हणजे हें आदिकालचें शेंपूट म्हणजे पुच्छ होतें या गोष्टीची ती साक्ष देत आहे. प्रत्येक मणक्याला पुढीलबाजूनें अंग (बॉडी) व पाठीमागच्या बाजूला कमान आहे. या कमानीला पोकळी आहे व त्या पोकळीमधून पृष्ठमज्जारज्जु जाते. प्रत्येक मणक्याला ठराविक असे जोडून पुढें आलेले भाग आहेत. कमानीच्या अग्राला म्हणजे शेंडयाला कंटकतुल्य भाग आहेत. यांपैकीं पुष्कळसे भाग हाताला चाचपून कळतात. बाजूंनां तिर्यंक् पुढें आलेले भाग आहेत व ते पाठीच्या भागांत फांसळयांच्या अस्थींनां संभाळून धरण्याला मदत करतात. याशिवाय ज्यांच्यांशीं संधि जुळून यावयाचा अशा पुढें आलेल्या भागांच्या दोन दोन जोडया आहेत. एक जोडी मणक्याच्या वरच्या भागांत व एक जोडी खालच्या भागांत आहे.

आकृति नं. ७ व नं. ८ मध्यें एक पाठीचा व एक कमरेचा मणका दाखविला आहे. पाठीच्या व कमरेच्या मणक्याच्या घाटांत जरा फरक आहे. कमरेचा मणका सर्वांहून मोठा आहे. याचें अंग बळकट व मागल्या अंगाहून पुढें जाड आहे. एका बाजूपासून दुसर्‍या बाजूपर्यंतची रुंदी आहे ती पुढच्या अंगापासून मागच्या अंगाच्या लांबीपेक्षां अधिक आहे. पडदे आंखूड, जाड व रुंद असे आहेत. कंटकतुल्य भाग जाड, रुंद व चतुष्कोणाकार आहेत. वरचे कर्णतुल्य भाग खोलगट व मागें व आंत झुकलेले आहेत, आणि खालचे भाग गोलबाह्य व पुढें व बाहेर झुकलेले आहेत. कण्याचें छिद्र मानेच्या मणक्याच्या छिद्रापेक्षां मोठें असतें. पक्षतुल्य भाग लांब, पातळ व बाहेर झुकलेले असतात.

मणिस्तंभांत प्रत्येक मणक्याचें अंग दुसर्‍या मणक्यावर बसलेलें आहे. परंतु या दोन्ही अंगांच्या मध्यें एक लवचिक पटाची गादी आहे. त्या गादीला पुष्टमणीची अंतःकूर्चा म्हणतात, व या कुर्चेचा उपयोग संघर्षणप्रतिबंधक असा होतो, म्हणजे पाठीच्या कण्याला बाहेरुन धक्का बसल्यास तो आंत मण्यांनां जाऊन पोहोंचतांना तो आघात कमी करण्याकडे या कूर्चांचा उपयोग होतो.

मानेच्या पहिल्या मणक्याला शिरोधरास्थि म्हणतात, कारण तो मणका मस्तकगोल सांभाळून धरतो. शिरोधरास्थि व शिरःपृष्ठास्थि या दोहोंमध्यें मानेचें डोलवणें व  मानेचें हलवणें ही क्रिया चालते हें मागें सांगितलेंच आहे. शिरोधरास्थीला अंग नाहीं, परंतु ती जागा त्या अस्थीच्या पुढचाच जो दुसरा मणका, त्या मणक्याचा पुढें आलेला जो भाग आहे त्या भागानें भरुन काढली आहे. त्या भागाला कीलकास्थि म्हणतात, व यानें दंताकृति उंचवटा झालेला आहे. शिरोधरास्थीसह डोकें एका बाजूचें दुसर्‍या बाजूला चक्राकार फिरलें जातें तें या कीलकास्थीच्याचबोंवती होय. कीलकास्थीला तीर्यकबाजूनें एक पट्टा गेलेला आहे व त्याच्यायोगानें ती अस्थि शिरोधरास्थीच्या अग्रभागासन्मुख जेथच्या तेथें धरली गेली आहे. या पट्टयामधून जर ही कीलकास्थि निसटली तर पृष्ठमज्जारज्जूवर एकदम एका एकीं मोठा दाब बसेल व त्याचा परिणाम ताबडतोब मरण हा होईल. मानेचा कांटा मोडून घडणारा मृत्यु हें याचेंच प्रत्यंतर होय.

त्रिकास्थि- ही फारच मजबूद व पाचरीच्या आकाराची अस्थि आहे, व ती दोन्ही श्रोणिफलकांच्यामध्यें बरोबर बसलेली आहे. बाल्यावस्थेनंतर पाठीचे सर्व मणके एकमेकांशी जुळून आल्यावर संबंध मणिस्तंभाला चार जागीं वांक अथवा वळणें येतात. पहिला लहानसा वांक मानेच्या भागांतला आहे व तो पुढील बाजूकडे अंतर्गोल असतो; दुसरा बांक पाठीच्या भागांतला आहे व तो पुढील बाजूंकडे अंतर्गोल असतो. तिसरा वांक कमरेच्या भागांतला आहे व हाहि पुन्हां पुढील बाजूकडे बाह्यगोल असतो; आणि सरतेशेवटीं चौथा अगदीं थोडासा बांक त्रिकास्थि व गुदास्थि यांचा आहे व तो पुढील बाजूला अंतर्गोल आहे.

वक्षःस्थलाला अस्थिमय आणि कूर्चामय भिंत आहे. कारण मागील बाजूला पाठीच्या मणक्यांशिवाय दोन्ही बाजूंनां बरगडीच्या कूर्चांसह फांसळया आणि पुढील बाजूला उरोस्थि आहे. उरोस्थि ही लांब, चपटी अशी अस्थि आहे. तिचे सहजगत्या तीन भाग होणारे आहेत. पहिल्या म्हणजे वरच्या भागाला जत्रूचा संयोग झाला आहे, आणि दुसर्‍याचा फांसळीच्या कूर्चांच्या कांहीं भागांसह पहिल्या फांसळीच्या कुर्चाहि त्याच भागाला जडल्या आहेत. उरोस्थीचा दुसरा भाग पहिल्या भागाला जडला असून त्याचा जोडकोन स्पष्ट आहे. या भागाला दुसर्‍या फांसळीच्या बाकी राहिलेल्या कूर्चा जडून राहिल्या आहेत आणि त्याच कूर्चांनां इतर सर्व खर्‍या फांसळयांच्या कूर्चाहि पुन्हां जडलेल्या आहेत. उरोस्थीचा तिसरा म्हणजे अगदीं खालचा भाग आयुष्यांत उतारवय होईपर्यंत कूर्चामयच राहतो (आकृति नं. ९ पहा).

वक्षःस्थलाच्या आंतील भागांत जीं अंतरिंद्रियें आहेत त्यांचें संरक्षण करण्याला उरोस्थि फारच मदत करते. फांसळयांची जी एकंदर मालिका आहे तींत १२ जोडया येतात (आकृति नं. ९ पहा). यापैकीं सात जोडयांच्या मिळून सत्पपार्र्श्वस्थी म्हणजे खर्‍या फांसळया झालेल्या आहेत. म्हणजे त्याचा अर्थ असा कीं, या सात फांसळयांच्या जोडया पृष्ठमण्याशीं पाठीमागच्या बाजूला जडून राहिल्या आहेत इतकेंच नाहीं तर त्या पुढील बाजूलाहि कूर्चांच्या मध्यस्थीनें उरोस्थीचया बाजूंनां जाऊन जडल्या आहेत. बाकीं राहिलेल्या पांच जोडयांनां मिथ्यापाश्र्वास्थी म्हणजे खोटया फांसळया म्हणतात. या पाचांपैकीं तीन जोडयांच्या म्हणजे आठव्या, नवव्या व दहाव्या जोडीच्या कूर्चा वरील फांसळयांच्या कूर्चांनां जाऊन जडल्या आहेत, व अकरावी व बारावी या ज्या आतां दोन जोडया राहिल्या त्या जोडया पाठीमागें मणक्यांशीं जाऊन जडल्या आहेत. त्यांनां मोकळया अगर तरंगत राहणार्‍या फांसळयांच्या जोडया असें म्हणतात. सर्व फांसळया पाठीमागून पुढें उतरत्या, सपाट अशा बसलेल्या आहेत. त्यामुळें श्वास आंत घेतांनां त्या जेव्हां वर उचलल्या जातात तेव्हां छातींतील पोकळी जास्त वाढली जाते. वक्षःस्थळाला वरच्या बाजूला द्वार आहे व तें द्वार पाठीचा पहिला मणका, कुर्चांसह पहिल्या दोन फांसळया, आणि उरोस्थीचा वरचा भाग यांनीं मर्यादित झालेलें आहे. या द्वारामधून इंद्रियरचनेचे निरनिराळे भाग मानेकडून व मानेकडे गेलेले आहेत. पोट अथवा उदर यापासून वक्षस्थल स्नायूच्या आड बिंतीनें अलग राखलें गेलें आहे. या स्नायूच्या आड भिंतीला मध्यपटल म्हणजे छाती व पोटाच्या भागामधील पडदा असें म्हणतात. तथापि या मध्यपटलालाहि महत्वाचीं द्वारें आहेत.

ऊर्ध्वशाखा व अधःशाखा यांच्या अस्थी- ऊर्ध्वशाखांचे सोईवार असे चार गट करतां येतात ते असे (१) अंसचक्रास्थि, जत्रु आणि अंसफलक हा एक गट झाला (२) बाहु अथवा भुज या दुसर्‍या गटांत प्रगण्डास्थि अथवा भुजास्थि आली. (३) हात. (कोंपराच्या खालीं मनगटापर्यंत) या तिसर्‍या गटांत बहिःप्रकोष्ठास्थि व अंतःप्रकोष्ठास्थि अथवा कर्पूरास्थि यांचा समावेश होतो. (४) चौथा गट म्हणजे मनगट आणि कर अथवा पंजा; या गटांत मणिबंधास्थी, करभास्थी आणि करांगुल्यस्थी या अस्थी आल्या. येणेंप्रमाणें ऊर्ध्वशाखांचे चार गट झाले व प्रत्येक गटांत कोणते भाग घ्यावयाचे तें सांगितलें.

जत्रु अथवा अक्षक म्हणजे गळसरीचें हाड- या अस्थीचा आकार किल्लीसारखा दिसतो. या अस्थीला दोन बांक आहेत व ही अस्थि आंतल्या बाजूनें उरोस्थीच्या वरच्या तुकडयाशीं सांधून गेली आहे. या अस्थीचा मुख्य धर्म खांदा मागच्या बाजूला आवरून धरणें व वरील अवयवाचा म्हणजे हाताचा धडाशीं संयोग करून देणें हा होय.

अंसफलक म्हणजे खवाटा ही अस्थि रुंद, सपाट आणि त्रिकोणाकृति आहे. या अस्थीला पुढें आलेले असे तीन भाग आहेत. पहिला भाग - मागला, आंतील अथवा कण्याचा कांठ. हा भाग तिन्हीं भागांमध्यें लांब, पाठीच्या कण्याकडे झुकलेला असा आहे. दुसरा भाग - फलकास्थीचा बाह्य उंचवटा हा होय. हा कांहीं त्रिकोणाकार असून बाहेर, पुढें व वर असा झुकलेला आहे, आणि वरुन खालच्या भागाकडे चापट झाला आहे. तिसरा भाग - काकचंच्वाकृति उंचवटा. हा जाड, गोल आणि वांकडा असा आहे व तो अंसफलकाच्या मानेजवळ सुरु होतो. या काकचंच्वाकृति भागाचा जत्रूच्या बाहेरील शेंडयाशीं संधि होतो. अंसफलकाच्या वरील व बाहेरच्या कोनाशीं, ज्या कोनावर फलकास्थीचा बाह्य उंचवटा व काकचंच्वाकृति उंचवटा हे येऊन ठेपले आहेत त्या ठिकाणीं जो एक उथळ खळगा आहे. त्याला अंसपीठ म्हणतात. या खळग्याशीं भुजास्थीचा संधि झाला आहे. अंसफलक हा अगदीं मोकळेपणानें हलणारा भाग आहे, व मुख्यत्वें स्नायूंच्याच योगानें तो धडाशीं गुंतून राहिला आहे.

प्रगण्डास्थि अथवा भुजास्थि म्हणजे दंडाचें हाड- ही अस्थि लांब आहे. तिचे, एक नळी व त्या नळीचीं दोन्हीं बाजूंचीं दोन शेवटें असे दोन विभाग आहेत. वरच्या शेवटाला शीर्ष म्हणतात. या शीर्षाचा निमगोल व वर आलेला असा उंचवटा आहे. त्याचा संधि अंसपीठाशीं जालेला आहे. भुजास्थिशीर्षाखालीं दोन भाग आहेत. हे भाग ज्यांच्यांत गांठाळपणा आलेला असे आहेत. त्यांपैकीं बाहेरचा भाग मोठा आहे. या दोन भागांमध्यें पन्हाळी अथवा खांचणी आहे. ही पन्हाळी अथवा खांचणी द्विशिरस् स्नायूच्या लांब कंडराकरितां आहे. भुजास्थीला दोन ग्रीवा आहेत. त्यांपैकीं एक ग्रीवा म्हणजे मान; ही रचनागतसंबंधाची समजावयाची. वरील वाक्याचा स्पष्टार्थ अशा कीं; डोक्याखालीं मान एकच असावयाची हा नैसर्गिक रचनागतसंबंध आहे. असें असून भुजास्थीला दोन ग्रीवा आहेत असें वर सांगितलें. तेव्हां अर्थांतच पहिल्या ग्रीवेला रचनागतसंबंधींग्रीवा असें म्हटलें व दुसरी ग्रीवा ही तद्यतिरिक्त होय. पहिली ग्रीवा म्हणजे भुजास्थिशीर्ष व गांठाळलेले भाग यांच्यामधली जी खांचण ती होय. दुसरी ग्रीवा म्हणजे गांठाळलेल्या भागाखालीं आकुंचन झालेला भाग होय. भुजास्थीच्या नळीला पाठीमागें आंतून खालीवर अशी एक खांचणी आहे. त्या खांचणीला स्नायुपृष्ठवंशीय प्रणाली म्हणतात. या खांचणींत एक धमनी व मज्जातंतू हीं असतात. भुजास्थीच्या खालील शेवट पसरट झालेलें आहे; व त्यांत दोन खांचण्या आहेत, त्यांपैकीं एक पुढें आहे, तिला काकचंचुसदृशपरिखा म्हणतात व दुसरी पाठीमागें खोल खांचणी आहे तिला कर्पूरशीर्षपरिखा म्हणतात. यांच्यांत आणखी भरीला दोन पर्वांगें आहेत, त्यांपैकीं आंतील पर्वांग मोठें आहे, व त्याच्यामागून एक मज्जातंतु जातो. मज्जातंतूला जर ठोका बसला तर फार कळ येते, या अस्थीला बहुतेक 'लीलास्थि' म्हणतात. भुजास्थीच्या खालच्या शेवटाला दोन संधिभाग आहेत. त्यांपैकीं बाहेरचा संधिभाग बहिःप्रकोष्ठास्थीकरतां आहे आणि आंतला भाग अथवा कर्पूरास्थि अंतःप्रकोष्ठास्थीकरतां आङे. भुजास्थीच्या शेवटावर (जीं शवेट मनुष्याच्या बाल्यावस्थेंत नळीपासून निराळी असतात त्यांच्या) पुष्कळशीं छिद्रें दिसून येतात. या छिद्रांतून रक्तवाहिन्या त्या अस्थीमधील सत्वरुप द्रव्याचें पोषण करण्याला जातात. शिवाय पुन्हां आणखी भुजास्थीच्या नळीला एकच छिद्र आहे तें अस्थींच्या त्या भागाचें पोषण करणार्‍या धमनीसाठीं. रक्तवाहिन्या जाण्याची जी वर व्यवस्था सांगितली ती व्यवस्था शरीरांतील बहुतेक लांब अस्थींत आहे.

बहिःप्रकोष्ठास्थि- म्हणजे कोंपरापासून मनगटापर्यंतच्या दोन हाडांपैकीं बाहेरचें लहान हाड. ही अस्थि लांब आङे. तिचे, एक नळी व दोन शेवटें असे विभाग आहेत. वरच्या शेवटाला शीर्ष म्हणतात, व त्याचा भुजास्थि व कर्पूरास्थि यांबरोबर संधि आहे. या शीर्षाखालीं ग्रीवा आहे, तिला आंतल्या बाजूनें वर आलेला उंचवटा आहे, त्याला सूक्ष्मग्रंथि म्हणतात. खालच्या शेवटाला बाह्यप्रदेशीं पुढें आलेला असा भाग आहे त्याला कीलकाकृति उंचवटा म्हणतात, व मागच्या बाजूला पन्हाळी अथवा खांचणी आहेत त्या जागा स्नायुपुच्छ अथवा कंडरा यासाठीं आहेत. बहिःप्रकोष्ठास्थीच्या खालच्या शेवटाचा कर्पूरास्थीच्या खालच्या शेवटाशीं पुन्हां संधि झालेला आहेच.

कर्पूरास्थि अथवा अंतःप्रकोष्ठास्थि- कोंपरापासून मनगटापर्यंतच्या दोन हाडांपैकीं आंतलें मोठें हाड. कर्पूरास्थीच्या वरच्या टोंकाला दोन वर आलेले बिंदू आहेत, पैकीं एक पुढील भागाचा बिंदु आहे, त्याला काकचंच्वाकृति उंचवटा म्हणतात व दुसरा पाठीमागील बिंदु आहे त्याला कर्पूरशीर्षप्रसर म्हणतात. कोपराचा जो उंचवटा बनलेला आहे तो कर्पूरशीर्षप्रसर यानेंच आलेला आहे. या दोन बिंदूंमध्यें एक खोल पुट आहे त्याचा भुजास्थीबरोबर संधि झाला आहे, व त्या बिंदूच्या बाह्य भागाला अतिशय उथळ असा दबलेला भाग आहे. तो भाग बहिःप्रकोष्ठास्थीचें डोकें त्यांत बसण्याकरितां आहे. कर्पूरास्थीच्या नळीला पाठीमागून अगदीं चांगली दिसणारी कडा आहे व ती त्वचेखालून चांचपली म्हणजे हाताला स्पष्ट लागते. कर्पूरास्थीच्या खालच्या भागाला शीर्ष म्हणतात. त्याला खालून कीलकाकृति प्रसर जडलेलें आहे.

मणिबंध अथवा मणिबंधास्थी- मनगटाच्या अस्थी निरनिराळया अशा आठ आहेत, त्यांच्या दोन ओळी आहेत, व प्रत्येक ओळींत चार चार अस्थी आलेल्या आहेत. त्यांपैकीं प्रत्येक अस्थीचा संधि आपापल्या शेजारच्या अस्थींशीं झालेला आहे.

करभास्थि- म्हणजे हाताच्या तळव्याची अगर पंजाची अस्थि. करभास्थि ही पांच अस्थी मिळून झालेली आहे, व त्यांच्यायोगानें करतलाच्या सांगाडयाचें काम बनलेलें आहे. करभास्थींचा संधि वर मणिबंधांतील दुसर्‍या रांगेंतील अस्थींशीं आणि खालीं आंगठा व बोटें यांच्या पहिल्या पेरांच्या अस्थींशीं झालेला आहे.

बोटांची नांवें- अंगुष्ठ, तर्जनी, मध्यमा, अनामिका व कनिष्ठिका. पेरांच्या अस्थी प्रत्येक बोटाला तीन तीन आहेत. मात्र आंगठयाला दोनच पेरीं आहेत. शेवटच्या पेराचा आधार नखाला आहे म्हणून त्या पेराला नखाचें पेर म्हणतात.

अधःशाखांच्या अस्थीचें साम्य ऊर्ध्वशाखांच्या अस्थींशीं आहे, आणि त्यांचेहि उर्ध्वशाखांच्या अस्थींप्रमाणें चार गट करतां येणारे आहेत ते गट पुढें दिल्याप्रमाणें - पहिला गट (१) कटिरमेखला अथवा बस्तिप्रदेश; (२) श्रोणिफलकास्थि, म्हणजे ढुंगण किंवा कमरेचा खवाटा; हा एक गट झाला. दुसरा गट - मांडी अथवा जंघा. यांत ऊर्वस्थि ही अस्थि आली. तिसरा गट-तंगडी; या गटांत (आ.नं. ४ व ६) जानुफलकासह अंतर्जंघास्थि आणि (आ.नं. ५) बहिर्जंघास्थि या अस्थी आल्या. चौथा गट - गुल्फ म्हणजे घोटा आणि पाऊल; या गटांत (आ.नं. ७,८,९) पादास्थि, प्रपदास्थि आणि पादांगल्यास्थि या अस्थी आल्या. आपल्या समोरील दुसर्‍या जोडीदार अस्थीसह श्रोणिफलक आणि त्रिकास्थि मिळून कटील अथवा बस्तिप्रदेशाचा भाग झालेला आहे. हा बस्तिप्रदेश पोटाच्या खालच्या बाजूला तसराळयाच्या पोकळ आकारासारखा भाग आहे. श्रोणिफलक ही अनियमित व वेडयावांकडया आकाराची अस्थि आहे. मनुष्याच्या वाल्यावस्थेंत या अस्थीचे तीन विभाग असतात, व पुढें पुढें ते एकमेकांशीं एकजीव  होऊन जातात. या तीन भागांचीं नांवें अशीं - नितंबास्थि, जघनास्थि व आसनास्थि. आसनास्थीवर फार मजबूत व वर आलेला असा ध्यानांत येण्यासारखा उंचवटा आहे. या उंचवटयाला ग्रंथिलता अथवा गांठाळपणा म्हणतात. या भागावर आपण बसतों. नितंबस्थिच्या पुढच्या भागीं असाच एक दुसरा वर आलेला उंचवटा ध्यानांत येण्यासारखा आहे त्याला अग्रवर्ती ऊर्ध्वकशेरुका म्हणतात. दोन्ही जघनास्थी पुढील भागीं येऊन मिळतात व त्यायोगानें जघनास्थिसंधि झाला आहे व कटीराच्या वर्तुळाच्या अग्रभाग बनलेला आहे. जघनास्थि व आसनास्थि या दोहोंमध्यें एक मोठें छिद्र आहे. त्याला चर्मसदृशछिद्र म्हणजे ढालीच्या आकारासारखें छिद्र (चर्म ढाल) म्हणतात. या छिद्राची बाहेरु पोकळी खोल आहे परंतु खालपर्यंत त्या पोकळीला जागा अपूर्ण आहे नितंबोलूखल अथवा वंक्षणोलूखल ती हीच जागा होय, व याच जागेमध्यें ऊर्वस्थिशीर्ष बसतें म्हणजे मांडीच्या हाडाचें डोकें ज्यांत बसतें ती ही वाटी होय.

ऊर्वस्थि अथवा मांडीचें हाड- शाखांच्या सर्व अस्थींत ही अस्थि सर्वांत लांब व मजबूत आहे. या अस्थीच्या वरच्या टोंकाला निमगोल डोकें आहे, व त्या डोक्यावर संधिबंधनाकरतां खळगा आहे. डोक्यावर अगदीं खालींच त्याची मान आहे, आणि त्या ठिकाणीं दोन पुढें आलेले भाग ठळक दिसणारे आहेत त्यांनां महाशिखरक व लघुशिखरक म्हणतात. या अस्थीच्या दांडयांचा आकार समपार्श्र्वाचा आहे, व त्या दांडयाला मागें साफ कांठ आहे. या अस्थीचें खालचें टोंक पसरट आहे व त्याला दोन पर्वांगें म्हणजे गांठाळलेलीं वाटोळीं टोकें आहेत. त्या टोंकांचा संधि अंतर्जंघास्थीच्या वरील टोंकांशीं आणि जानुफलकाशीं झालेला आहे. या पर्वांगांच्या मागच्या सपाट पृष्ठभागाला गुडघ्याच्या खळगीचा ऊर्वस्थीचा घाट म्हणतात. अंतर्जंघास्थि हें गुडघ्यापासून घोटयापर्यंतच्या दोन हाडांपैकीं आंतलें मोठें हाड आहे.

अंतर्जंघास्थि ही पायाची पुढची नळी (नडगी) आहे आणि ही तंगडीच्या अस्थींतील मोठी आंतली अस्थि होय. या अस्थीचें वरील टोंक मोठें झालेलें आहे व त्याला दोन गांठाळीं आहेत, व त्या गांठाळयानां ऊर्वस्थीच्या पर्वांगाबरोबर जुडण्याला दोन संधिभाग आहेत, आणि बाहेरच्या बाजूला बहिर्जंघास्थीकरितां एक लहानसें तोंड आहे. अग्रभागीं या अस्थीच्या डोक्याच्या खालीं एक सूक्ष्मग्रंथि लहान गांठ आहे व त्या गांठीपासून खालीं जात राहिलेली कडा आहे हिला पायाची पुढची नळी म्हणतात. ही नळी त्वचेच्या खालीं आहे. अंतर्जंघास्थीच्या खालच्या टोंकाला पुढें आलेला भाग आहे त्याला अंतर्गुल्फ म्हणजे आंतला घोंटा (हातोडीच्या डोक्याच्या आकारासारखें हाड) म्हणतात.

जानुफलक- म्हणजे गुडघ्याची वाटी. ही अस्थि कोपरपुढें आलेल्या हाडाशीं सारखवट आहे (कोपराचें पुढें आलेलें हाड म्हणजे कर्पूरास्थिशीर्षप्रसर). जानुफलक ही तिलकाकृति अस्थि आहे, ही अस्थि स्नायूंच्या कंडारामध्यें वृद्धि पावलेली आहे. ऊर्वस्थीच्या पर्वांगाशीं जानुफलकाचा संधि आहे.

बहिर्जंघास्थि- गुडघ्यापासून घोटयापर्यंतच्या दोन हाडांपैकीं बाहेरचें हाड. ही अस्थि लांब व सडपातळ आहे, तिला वरच्या टोंकाला डोकें व खालच्या भागाला अणकुचीदार प्रसर म्हणजे पुढें आलेलें टोंक आहे, त्याला बहिर्गुल्फ अथवा बाहेरचा घोंटा म्हणतात. वरच्या बाजूला बहिर्जंघास्थीचा संधि अंतर्जंघास्थीशीं होतो, व खालच्या बाजूलाहि पुन्हां अंतर्जंघास्थीशीं संधि होऊन आणखी गुल्फमुख्यास्थींबरोबर देखील संधि होतो. गुल्फमुख्य ही पादास्थीमधील महत्वाची अस्थि आहे.

पावलाच्या सात अस्थी आहेत- त्यांपैकीं गल्फमुख्यास्थि ही आंतील व बाहेरील गुल्फास्थींच्यामध्यें आहे. पावलाच्या अस्थींत दुसरी एक मोठी अस्थि आहे तिला पार्श्वस्थि म्हणतात. ह्या अस्थीमुळें पावलाच्या पाठीमागचा टांचेचा अथवा खोटेचा भाग झाला आहे.

प्रपदास्थि- पायाच्या चवडयाच्या म्हणजे प्रपदास्थींच्या हाडांची संख्या पांच आहे. या अस्थी हाताच्या पंजाच्या म्हणजे करभास्थींच्यापेक्षां लांब व अधिक सडपातळ अशा आहेत. प्रपदास्थींचा संधी मागच्या बाजूला पादास्थींबरोबर व पुढच्या बाजूला पादांगुल्यस्थींच्या पहिल्या पेराबरोबरच झालेला आहे हाताच्या बोटांच्या पेरांप्रमाणेंच पायाच्या बोटांचीं पेरें तीन तीन आहेत. मात्र पायाच्या आंगठयाचीं पेरें दोनच आहेत. पायांच्या अस्थींनीं पावलाची पुढून मागेंपर्यंत सुंदर कमान बनलेली आहे. या कमानीचा पाठीमागचा स्तंभ आंखूड आहे व त्या स्तंभांत पार्ष्ण्यस्थि व गुल्फमुख्य यांचा कांहीं भाग हे आलेले आहेत. अग्रभागाचा स्तंभ लांबट आहे, व त्यांत प्रपदास्थींची वाटोळीं डोकीं व इतर पादास्थी हीं येतात. हा पुढील स्तंभ आणि पार्ष्णिं म्हणजे टांच या दोहोंवर मिळून आपण चालतों. पावलाची जी कमान झालेली आहे तिच्यामुळें पावलाला चिवटपणा आलेला आहे (आकृति नं. १२ पहा). ही कमान ज्या पावलाला नसते तें पाऊल चपटें होतें.

स्नायुव्यूह

शरीरांतील सांधे व त्यांनां हलविणारे स्नायू- शरीरांत ज्या जागीं दोन किंवा दोहोंहून अधिक हाडें परस्परांशीं येऊन मिळतात ती सांध्याची जागा होय, व त्या जागेला खीळ, सांधा, संधि या संज्ञा दिलेल्या आहेत. निरनिराळया सांध्यांच्या भागांशीं निरनिराळीं हाडें एकमेकांवर स्नायूंच्या क्रियेनें फिरतात. संधींच्या तीन जाती आहेत (१) चल किंवा सचेष्टसंधि (हालणारे सांधे) अशा प्रकारचे सांधे शरीरांत बहुसंख्याक आहेत, उदाहरणार्थ - कर्पूरसंधि (कोंपराचा सांधा). (२) अनुवर्तिनसंधि (नमतें. पडतें घेणारा सांधा); या जातीच्या संधीच्या हालचालीचें मर्यादाक्षेत्र फारच थोडें असतें, उदाहरणार्थ - पृष्टमणींचे संधी म्हणजे पाठीच्या मणक्यामधील संधी. (३) अचल अथवा स्थिर संधी, (न हालणारे सांधे). अशा जातींच्या संधींची संख्या शरीरांत फारच थोडी आहे, उदाहरणार्थ मस्तकाच्या डंबरीच्या अस्थींचे संधी.

बहुतेक संधींच्या घडणुकींत पुढें दिलेल्या निरनिराळया रचना समाविष्ट होतात (१) अस्थि (हाडें) (२) अस्थिकूर्चा (मृदु अस्थींचें वेष्ठन). (३) संधिबंधनें (सांधे बांधून घेण्याचे बंद). (४) संश्लेशिका (आंतून सांधे मढविणारी त्वचा). अस्थींचा परस्परांशीं संबंध येण्याच्या ज्या जागा असतात, त्या जागांच्या ठिकाणच्या अस्थींचे भाग बहुतेक करुन पसरट असतात, आणि अशा त्या पसरट भागामधून जर छेद केला तर असें दिसून येईल कीं, तो अस्थींचा भाग मधमाशांच्या पोंळयासारख्या रचनेचा बनलेला आहे, त्याला जालसदृशपट ही संज्ञा दिलेली आहे, तो पट घट्ट, आटोपशीर अशा अस्थींच्या पातळ थरानें वेष्टित झालेला आहे (आकृति नं. १३ पहा).

अस्थिकूर्चा म्हणजे मृदु अस्थीचें वेष्टन. हें अस्थीच्या शेवटाला वेढून राहतें, आणि तें मृदु अस्थीचें वेष्टन अस्थीचा तो भाग गुळगुळीत, नितळ अशा पृष्ठभागाचा करुन ठेवतें कांहीं संधिभागांत विशिष्ट प्रकारची अस्थिकूर्चा (मृदु अस्थीचें वेष्टण) असते, तिला तन्तुमय अस्थिकूर्चा म्हणतात. ही तन्तुमय अस्थिकुर्चा दोन अस्थींमध्यें संघर्षणप्रतिबंधक अशी होते. संघर्षणप्रतिबंधक म्हणजे कोणत्याहि दोन वस्तूंमध्यें बसणारा आघात नाहींसा करण्याचें साधन होणें. पाठीच्या मणक्यांच्या संधींत ज्या तन्तुमय अस्थिकुर्चा आहेत त्या अशाच प्रकारच्या संघर्षणप्रतिबंधक आहेत. संधिबंधनें हे अस्थींनां बांधून घेणारे तंतुमय बंद आहेत. ह्या बंदांचा उपयोग अस्थींनां एकमेकींशीं बांधून घेण्यांत झालेला आहे. हालचाल करण्यास मोकळीक राहील इतक्या बेतानें ही बंधनें ढिलीं आहेत, व कांहीं जागीं तर अतिशय हालचाल करतां येईल इतक्या मानानें त्या ढिलेपणाची मर्यादा आहे. संश्लेशिका म्हणजे आंतून सांधे मढविणारी त्वचा. या त्वचेच्या योगानें सांध्यांचा आंतील भाग मढविलेला आहे. या सांधे मढविणार्‍या त्वचेमधून एक पातळ पदार्थ (द्रव) बाहेर निघत असतो व तो न उकळलेल्या अंडयांत जसा पांढरा बलक असतो त्याच्यासारखा असतो. या द्रवाचा उपयोग अस्थिकुर्चांवर पृष्ठभाग वंगण घालून जसा बुळबुळीत ठेवावा तशा बुळबुळीत राखण्याकडे होतो. या द्रवाला श्लेषण (वंगण) ही संज्ञा आहे.

सांध्यांमधून निरनिराळया प्रकारच्या हालचाली म्हणजे चलन होतें. ह्या निरनिराळया जातींच्या हालचालींचे चार गट होतात (१) कोनीयचलन अथवा वर्तुळाकार गति; असा जातीची हालचाल कूर्परसंधींत म्हणजे कोंपराच्या सांध्याच्या हालचालींत दिसून येते. (२) संसर्पीचलन (सरपटत होणारी हालचाल); अशा जातीची हालचाल मणिबंधीय संधींत म्हणजे मनगटाच्या सांध्यांत होणारी दिसून येते. (३) चक्रावर्तन अथवा चक्रगति (चाकासारखी हालचाल); या प्रकारची हालचाल कोंपरापासून मनगटापर्यंत आंगठयाच्या बाजूचें हाड म्हणजे बहिःप्रकोष्ठास्थि आणि मनगटाच्या दोन हाडांपैकीं मोठें हाड म्हणजे अंतःप्रकोष्ठास्थि आणि मनगटाच्या दोन हाडांपैकीं मोठें हाड म्हणजे अंतःप्रकोष्ठास्थि या दोन हाडांमध्यें दिसून येते. (४) शंक्वाकार वर्तुळ परिभ्रमण; याचा स्पष्टार्थ असा कीं, जेव्हां शक्य तितक्या सर्व कोनीय गती (हालचाली) एकामागून एक जलदीनें करण्यांत आल्यावर एक प्रकारची गति दृष्टीपुढें प्रत्यक्ष उघड येते त्या गतीला शंक्वाकार वर्तुलपरिभ्रमण असें म्हणतात. उदाहरणार्थ, बावखडांच्या सांध्याशीं हात वाटोळा गरगर फिरवीत राहिलें असतां अशा प्रकारची हालचाल (गति) त्या ठिकाणीं होणारी दृष्टीस पडते.

कोणत्याहि सांध्यामधील ज्या ऐच्छिक, (इच्छानुवर्ती)( गती म्हणजे माणसाला आपल्या इच्छेनें करतां येणार्‍या हालचाली आहेत त्या, अस्थींनां जे स्नायू जडले गेलेले आहेत त्या स्नायूंच्या मधील आकुंचनानें प्राप्त होतात. शरीरांत विशेष महत्वाचे जे चलसंधी आहेत त्यांचें त्रोटक वर्णन देणें अवश्य असल्यामुळें तें यापुढें दिलें आहे.

ऊर्ध्वशाखांचे संधी, (१) अक्षकोरःसंधि-म्हणजे गळयाच्या सरीचें हाड व उराचें हाड या दोहोंचा सांधा. हा सांधा गळयाच्या सरीच्या हाडाचें आंतील बाजूचें टोंक व उराच्या हाडाचा वरचा भाग या दोहोंमध्यें झालेला आहे. संधिगत आंतली जी तंतुमय कूर्चा आहे तिच्या योगानें हा अक्षकोर-संधि त्याच्या दोन अर्धांत विभागला गेला आहे. ही संधिगत आंतली तंतुमय कूर्चा गळसरीच्या हाडाचा वरचा व मागचा कांठ आणि खालीं पहिल्या फांसळीची कूर्चा ह्यांस बद्ध झालेला आहे. हाताचा धडाशीं कांहीं अंशीं संयोग अक्षकोर-संधीमधूनच झालेला आहे. (२) अक्षकांसफलकसंधि-जत्रु अथवा अक्षका म्हणजे गळसरीच्या हाडाचें बाहेरचें शेवट व अंसफलकाच्या म्हणजे खवाटयाच्या हाडाचा उंचवटा या दोहोंमधील हा सांधा होय. (३) अंससंधि म्हणजे खांद्याचा सांधा. शरीरांत अतिशय मोकळेपणानें चलन करणारा असा संधि म्हणजे अंससंधि होय. या सांध्याला उलूखलसंधि म्हणतात, म्हणजे त्याचा मराठींत स्पष्ट अर्थ 'उखळामुसळाचा सांधा असा आहे. या संधींत ज्या अस्थींचा समावेश झालेला आहे त्या अस्थी म्हणजे वरच्या बाजूला अंसपुट, खवाटयाच्या हाडामधील उथळ वाटीसारखा असलेला भाग आणि खालच्या बाजूला भुजास्थीचें वाटोळें असलेलें डोकें या होत. या दोन्ही पृष्ठभागांपैकीं प्रत्येक पृष्ठभाग संधिगत अस्थिकूर्चेनें वेष्टित झालेला आहे. या संधीचें मुख्य संधिबंधन बोंडाप्रमाणें पोकळ असें आहे. या बोंडाप्रमाणें पोकळ बंधनानें या संधीचा सर्व भाग वेढून गेलेला आहे, परंतु या सांध्याला मोकळेपणानें चलन मिळेल इतक्या बेतानें हें बंधन ढिलें आहे. या टोपणासारख्या वेष्टणाच्या आंत अंसपुटाचें संधिबंधन अंसपुटाच्या सभोंवार कांठाला व आंतील खळगीला बद्ध झालेलें आहे. ज्या स्नायुला दोन डोकीं आहेत अशा स्नायूचें लांब अग्र म्हणजे पुच्छ-ज्याला द्विशिरसस्नायूची दीर्घकंडरा म्हणतात. तदी या खांद्याच्या उलूखलसंधीमधून जाऊन भुजास्थीच्या डोक्याच्या वर गेलेली आहे, आणि त्या ठिकाणीं ती कंडरा (स्नायूपुच्छ अथवा स्नाय्वग्र) अस्थिबंधनाच्या नात्यानें आपलें कार्य करते म्हणजे त्या ठिकाणीं त्या स्नायुपुच्छाचा अस्थिबंधनासारखा उपयोग होतो. (४) कूर्परसंधि (कोंपराचा सांधा), (आकृति नं. १५ पहा) या संधींत वरती बहिप्रकोष्टास्थि (कोंपरापासून मनगटापर्यंत आंगठयाच्या बाजूचें हाड), आणि खालीं अंतःप्रकोष्ठास्थि (कोंपरापासून मणगटापर्यंतच्या दोन हाडांपैकीं मोठें हाड) असा या दोन हाडांचा समावेश झालेला आहे. या संधीला कोरसंधि (बिजागरीचा सांधा) असें म्हटलें आहे.

शरीरांतील सर्व संधींत या जातीचा संधि बरोबर परिपूर्ण असा बिजागरीचा सांधा आहे. बहिःप्रकोष्ठास्थी व अंतःप्रकोष्ठास्थि या दोन अस्थींत त्यांच्या वरच्या शेवटाकडे व खालच्या शेवटाकडे जे संधी आहेत ते चित्ताकर्षक आहेत, अर्थांतच त्यांच्याबद्दल विचार करणें जरुर आहे. अंतःप्रकोष्ठास्थीच्या वरती जें मंडलाकार संधिबंधन आहे त्या संधिबंधनांत बहिःप्रकोष्ठास्थीचें डोकें गरगर फिरतें, व इकडे खालच्या टोंकांकडे बहिःप्रकोष्ठास्थि ही अंतःप्रकोष्ठारथीच्या डोक्याभोंवती गरगर फिरते. ही या संधींत नैसर्गिक योजना किती बहारीची आहे !

मणिबंधसंधि (मनगटाचा सांधा)- या सांध्यातं वरती बहिःप्रकोष्ठास्थीच्या खालच्या शेवटाचा आंतला पृष्ठभाग आहे, आणि अंतःप्रकोष्ठास्थीच्या डोक्याखाली तन्तुमय कूर्चा आहे, व खालीं मणिबंधास्थिसंघाच्या पहिल्या ओळीच्या तीन अस्थी आहेत.

अधःशाखांचे संधी- प्रत्येक श्रेणिफलक (कमरेची फळी) हा त्रिकास्थीशीं (माकडहाडाच्या वरच्या बाजूच्या त्रिकोणाकृति हाडाशीं) व आपल्या दुसर्‍या जोडीदार श्रोणिफलकाशीं जुडलेला आहे. त्याच्या त्या जुडग्यांत जो संधि झाला आहे तो अनुवर्तिनसंधि म्हणून जो एक संधीचा प्रकार आरंभींच सांगण्यांत आला तशा प्रकारचा संधि आहे.

श्रोणिसंधि- मांडीच्या खुब्याचा सांधा. हा संधि म्हणजे परिपूर्ण असा उलूखलसंधि (उखळामुसळाचा सांधा) आहे. या संधींत ऊर्वस्थीचें अथवा जंघास्थीचे म्हणजे मांडीच्या हाडाचें डोकें, श्रोणिफलकाच्या नितंबोलूखलांत म्हणजे कमरेच्या फळीच्या हाडांत-मांडीचें हाड ज्यांमध्यें बसतें अशी जी वाटी आहे त्या वाटींत अगदीं तंतोतत बसलेलें आहे. या सांध्यांत मुख्य अस्थिबंधनें बोंडाप्रमाणें पोकळ अशा प्रकारचीं असून तीं बंधनें त्यांनां आणखी साहाय्यकारी अशा बंधनांनीं मजबूद झालेलीं आहेत. या मुख्य अस्थिबंधनांच्या आंतून नितंबोलूखलाचें अस्थिबंधन म्हणजे कमरेच्या फळीच्या हाडांत मांडीचें हाड ज्यामध्यें बसतें त्या वाटीचें बंधन आहे, व तें त्या वाटीच्या कांठाच्या सभोंवार आहे. त्या वाटीच्या खालच्या बाजूला जो करकोचा अगर जी खाप आहे ती खाप संधिबंधनाचा जो आडवा तिर्कस पट्टा त्या खापेमधून गेला आहे त्या पट्टयानें भरून निघाली आहे आणि सरतेशेवटीं बहुतेक ज्याला वाटोळें म्हणतां येतें असें अस्थिबंधन मांडीच्या हाडाच्या डोक्यावर असलेल्या दबलेल्या भागाला व उखळीच्या तळाला बद्ध होऊन राहिलें आहे.

जानुसंधि- ढोंपराचा सांधा अथवा गुडघ्याची खीळ (आकृति नं. १७ अ व १७ आ पहा). या जानुसंधींत म्हणजे ढोंपराच्या सांध्यांत वरील बाजूला जंघास्थीचीं म्हणजे मांडीच्या हाडाचीं दोन पर्वांगें म्हणजे हाडाचीं गांठाळलेलीं टोकें आहेत. तीं आणि खालच्या बाजूला अंतर्जंघास्थीचें म्हणजे तंगडीच्या दोन हाडांपैकीं जें एक मोठें हाड आहे त्याचें पसरट झालेलें डोकें, आणि पुढील बाजुला जानुफलकाचा म्हणजे गुडघ्याच्या वाटीचा पाठीमागचा भाग अशा या सर्वांच्या संयोगानें जानुसंधि म्हणजे गुडघ्याचा सांधा झाला आहे. या सांध्याच्या सर्व अस्थी एका ठिकाणीं धरून राखण्यासाठीं या जागीं पुष्कळच अस्थिबंधनें आहेत. अग्रवर्ती म्हणजे पुढील भागाचीं, पश्चादूर्ती म्हणजे पाठीमागच्या भागाचीं व पार्श्ववर्ती म्हणजे बाजूकडील बागाचीं अशीं अस्थिबंधनें या जानुसंधीत आहेत, व तीं सर्व बंधनें मिळून संबंध एक टोंपणासारखें बंधन झालेलें आहे. या संधीच्या अंतर्भागांत क्रूसाकार, (क्रूसाच्या आकृतिसारखीं) दोन संधीबंधनें व दोन अर्धचंद्राकार संधिगत तंतुमय कूर्चा आहेत, व या अशा दोन्ही जातींच्या बंधनांचा उपयोग आपण उडी मारतों त्यावेळीं संघर्षणप्रतिबंधक होतो. जानुसंधींत बहिर्जंघास्थीचा अंतर्जंघास्थीशीं सांधा झाला आहे तो अंतर्जंघास्थीच्या वरच्या टोंकाशीं झाला आहे.

गुल्फास्थि (आकृति नं. १८ पहा)- म्हणजे घोटयाचा सांधा (कोरसंधि). बिजागराचा सांधा म्हणून जो सांध्याच्या प्रकारांत एक प्रकार आहे त्या जातीचा हा गुल्फसंधि आहे. या संधींत समाविष्ट झालेल्या अस्थी म्हणजे वरच्या बाजूला जंतर्जंघास्थि व तिच्याबरोबरच आंतल्या बाजूनें तिची घोटयाच्या बाजूची आंतली अस्थि, आणि बाहेरच्या बाजूनें बहिर्जंघास्थीची बाहेरच्या घोटयाची अस्थि अशा अस्थी आङेत. येणेंप्रमाणें आंतल्या व बाहेरच्या बाजूंच्या अस्थींनीं जी एक कमान झालेली आहे त्या कमानींत गुल्फास्थि अथवा घोटयाचें मुख्य हाड बसलेलें आहे.

खालचा जबडा आणि दोन्ही बाजूंच्या आंखाच्या म्हणजे कानशिलांच्या अस्थी-ज्यांनां शंखास्थी म्हणतात त्यांच्या सांध्याबद्दल विचार करणें महत्वाचें आहे. हनुशंखसंधि म्हणजे खालचा जबडा व शंखास्थी (दोन्ही बाजूंच्या आंखांच्या अस्थी) यांचा संधि होय (आ.नं. १९ पहा). या संधीमध्यें अंतर्संधिगत तंतुमय कूर्चा आहे. अगदीं आरंभीं संधीचे तीन गट सांगितले व त्यांत अनुवर्तिनसंधि या प्रकारचा एक संधीचा गट सांगितला, तशा त्या अनुवर्तिन संधीच्या योगानें पृष्ठमणींतील म्हणजे पाठीच्या मणक्यांतील कित्येक मणके एकमेकांशीं संयोग होऊन राहिले आहेत व त्यामुळें त्यांनीं मणिस्तंभ म्हणजे पाठीचा कणा लवचिक करुन सोडला आङे.

वस्तुतः व्यवहारांत शरीरांतील ज्या वस्तूला मांस असें म्हटलें जात आहे त्याला कारणीभूत स्नायू हे आहेत. स्नायूंनीं शरीरांतील अस्थींनां पांघरुण घालून शरीरांतील भाग मृदु करण्याचा बराचसा अंश त्यांनींच उचलला आहे. ज्यांच्यामध्यें रक्त आहे असा शिरा अथवा वाहिन्या यांची संख्या स्नायूंत फार असल्यानें स्नायूंचा रंग लाल असतो. तन्तुमय पटाच्या योगानें स्नायू हे अस्थींनां बद्ध झालेले आहेत, व त्या तन्तुमय पटांनां स्नाय्वग्र अथवा स्नायुपुच्छ ही संज्ञा आहे. हीं स्नायुपुच्छें अग्रेसर म्हणजे अग्रगामी, पुढें चालणारीं अशीं दिसतात. ज्यामध्यें चलन फार थोडें म्हणजे ज्यांत हालचाल फार कमी अशा भागाशीं जेथें स्नायु चिकटलेला असतो त्या ठिकाणाला स्नायूचें मूळ म्हणतात, व ज्या स्नायूच्यामुळें जो भाग हलावयाचा असतो त्या भागाकडे त्या स्नायूचें बद्धस्थान म्हणतात. स्नायूंपैकीं ज्या कित्येक मुख्य मुख्य स्नायूंनां अनुलक्षून या ठिकाणीं सांगावयाचें आहे ते मुख्य स्नायू म्हणजे आतांपर्यंत वर वर्णन केलेल्या अवयवांच्या संधींत ज्या स्नायूंचा समावेश झालेला आहे ते स्नायू होत. असा या मुख्य स्नायूंचें बहुधा सोईवार पुढील दोन गटांत वर्गीकरण होतें (१) आकुंचकस्नायू; जे स्नायू साध्यांनां लववितात ते स्नायू व (२) प्रतानक स्नायू; जे स्नायू सांध्यांनां ताणतात अगर लांबवितात ते स्नायू.

अंससंधीच्या म्हणजे खांद्याच्या सांध्याभोंवतीं दोन महत्वाचे स्नायू आहेत. त्यापैकीं एकाला अधिस्कंध किंवा तिकोनी स्नायू म्हणतात, व दुसर्‍यास गरिष्टउरःप्रच्छदस्नायु किंवा उरोजस्नायु असें म्हणतात. वरील दोन स्नायूंपैकीं अधिस्कंधस्नायूनें खाद्याच्या वर्तुलाकार वळणाची बांधणी केली आहे व तो स्नायु भुजास्थीला म्हणजे हाताच्या हाडाला शरीराशीं काटकोनांत वर उजलून घेतो. गरिष्ठउर प्रच्छदस्नायु अथवा उरोजस्नायु हा ऊराचा मोठा स्नायु आहे व तो हाताला पुन्हां शरीराच्या बाजूशीं खालीं आणतो. कर्पुराला म्हणजे कोंपराला लवचिकपणा मुख्यत्वें द्विशिरस् (ज्याला दोन डोकीं आहेत असा स्नायु) या स्नायूच्या योगानें आलेला आहे, म्हणजे कोंपराचें आकुंचन द्विशिरस् स्नायूच्या योगानें होतें व कोंपर ताणलें जाणें अगर लाब केलें जाणें याला कारण त्रिशिरस्क (तीन डोकीं असलेला) स्नायु होतो व तो भुजास्थीच्या पाठीमागच्या बाजूंत असतो.

हातांच्या बोटाकडे जाणार्‍या विशिष्ट स्नायूंची संख्या पुष्कळच आहे. बोटानां अति नाजुक हालचाली करण्याची आवश्यकता फार असते, व तीं सर्व कामें मनाप्रमाणें स्नायूंच्या मुळेंच बजावलीं जातात.

तळहात पालथा म्हणजे उपडा करून जेव्हां हात टेबलावर ठेवला जातो तेव्हां त्याला विवर्तित करतल म्हणतात. व तोच तळहात उताणा म्हणजे उलथा केला तर त्याला उतान करतल म्हणतात. ह्या ज्या करतलाच्या म्हणजे तळहाताच्या दोन निरनिराळया हालचाली झाल्या त्या घडवून आणणारे जे दोन विशिष्ट स्नायू आहेत त्यांस अनुक्रमें विवर्तक स्नायू आणि उत्तानक स्नायु म्हणतात.

श्रोणिसंधि- मांडीच्या खुब्याचा सांधा. हा मोठया व शक्तिमान स्नायूनें लवचिक झाला आहे, उदरांतल्या उदरांतच कटिमण्यापासून म्हणजे कमरेच्या मणक्यापासून आणि तसाच लहान आंतडयाच्या खालच्या भागाच्या अस्थीपासून हा स्नायु निघतो. या स्नायूला कटिबस्तिसूक्ष्मांत्रमूलसंबंधीस्नायु (बस्तिप्रदेश व लहान आंतडयाचा खालचा भाग यासंबंधी स्नायु) असें म्हणतात. या स्नायूचा पुढील विस्तार अधिनितंबस्नायूनें झालेला आहे. अधिनितंबस्नायु म्हणजे आपण बसतांना ज्या मोठया घट्ट स्नायूवर बसतो तो स्नायु होय.

गुडघ्याच्या मागें जी धोंडशीर अथवा घोडशीर आहे तिला मंदिरशिरा असें नांव आहे. ''धोंडशीर तोडून लंगडा करणें'' हा भाषणसंप्रदाय यावरून पडलेला आहे. गुडघ्याला लवचिकपणा या मंदिरशिरागत स्नायूनेंच आलेला आहे. हा स्नायु मांडीच्या पाठीमागच्या भागांत असतो. ज्या स्नायूच्या चतुःशिरस्कप्रतानकस्नायु म्हणतात. हा स्नायु जानुफलक म्हणजे गुडघ्याच्या वाटीशीं बद्ध आहे. पिंडिकागत स्नायूनें म्हणजे पोटरीच्या स्नायूनें पायाचीं बोटें रोखलीं जातात. पिंडकस्नायु (पोटरीचा मोठा स्नायू) व पोटरीचा सुतल स्नायु यांच्या पृठयस्थीशीं म्हणजे टांचेच्या हाडाशीं संयोगाला आकिलीज कंडरा म्हणजे धोंडशीर असें म्हणतात. ही कंडरा देखील टांच अथवा खोट वर उचलते. पायाची बोटें आंखडून धरण्याचें कार्य पायाच्या पुढील भागाचे जे स्नायू आहेत ते करतात. तळपायांत पुष्कळच तोकडे तोकडे स्नायू आहेत, ते स्नायू पावलाच्या लांबीवरील कमान कायम राखण्याला व पावलाची स्थितिस्थापकता व पावलाचा लवचिकपणा कायम राखण्याला मदत करतात.

वक्षःस्थल म्हणजे छाती अथवा ऊर आणि उदर या दोहोंमध्यें जी कमानदार स्नायुघटित अथवा स्नायुमय आडभिंत आहे तिला मध्यपटल म्हणतात. हें मध्यपटल अथवा मधला पडदा हा श्वासोच्छवास करण्याचा महत्वाचा स्नायु आहे.

येणेंप्रमाणें शरीरांतील मुख्य मुख्य सांधे व त्यांनां हालविणार्‍या मुख्य मुख्य स्नायूंचा या भागांत विचार झाला. याशिवाय ज्या सांध्यांचा या ठिकाणीं नामनिर्देश झाला नाहीं असे पुष्कळच सांधे राहिले आहेत, सांध्यांनां निरनिराळीं नेंवें, ते ज्या अस्थीचे संधी आहेत त्या अस्थींच्या अनुरोधानें, ते ज्या भागांत आहेत त्या भागांच्या अनुरोधानें, व त्यांचा जसा आकार दिसतो त्या आकाराच्या अनुरोधानें दिलेलीं असतातद. तसेंच स्नयूंबद्दल पहातां अगदीं मुख्य मुख्य स्नायूंचा नामनिर्देश वर झाला. परंतु सर्व स्नायूंचा विचार करणें म्हणजे अजमासें २२९ स्नायूंचा विचार करावा लागेल. प्रत्येक स्नायूचें नांव, त्याचें मूळ, त्याचें बद्धस्थान, व त्याची क्रिया या गोष्टी अचूक माहीत असणें फार महत्वाचें आहे. स्नायूंनां जीं निरनिराळीं नांवें दिलेलीं आहेत तीं त्यांची आकृति, स्थान, आकारमान; त्यांचा झोक, क्रिया, उथळपणा, खोलपणा इत्यादिकांच्या अनुरोधानें दिलेलीं असतात.

पचनेंद्रियव्यूह.

महास्त्रोत- खाल्लेल्या अन्नाचा शरीराला पोषक असा उपयोग व्हावा, त्यानें शरीराचे पट पूर्ववत ताजेतवाने करावे म्हणून त्याचें निरनिराळया प्रकारचें रुपांतर होणें पार अवश्य आहे. हें रुपांतर महास्त्रोताच्या प्रदेशांत होत असतें. महास्त्रोत म्हणजे मुखापासून जठरापर्यंत अन्न नेणारा व अपानद्वारें मलविसर्जन करणारा असा जो मुखापासून गुरुद्वारापर्यंत मळ आहे तो होय. म्हणून आपल्याला या महास्त्रोताचा विचार त्याच्या आरंभापासून शेवटापर्यंत केला पाहिजे. त्याचप्रमाणें महास्त्रोताशीं ज्या पिंडांचा संबंध येतो, ते पिंड म्हणजे, आंतरोत्सर्ग करणारे म्हणजे विमोचनानें वस्तू वेगळया काढणारे हे एक, आणखी त्याच्याशिवाय इतर दुसर्‍या जातींचे, या सर्वांचाहि विचार त्याच्याबरोबर केला पाहिजे.

या महास्त्रोताच्या प्रदेशाला तोंडापासून आरंभ होतो. पोकळीच्या पुढील भागीं ओंठांनीं तोंडाचें संरक्षण केलें आहे. ओंठांच्या मागें खालच्या व वरच्या अशा दांतांची जोड ओळ आहे. दांतांचीं नावें व त्यांचा क्रम याबद्दल माहिती मागें दिली आहेच तिकडे लक्ष्य देणें जरुर आहे. मुखाच्या जागेंत जें स्नायुघटित अथवा स्नायुमय इंद्रिय आहे त्याला जिव्हा म्हणतात. जिव्हा हें फार मोकळेपणानें चलन करणारें असें इंद्रिय आहे व ती पीटिकांनीं म्हणजे वर उचलून आलेल्या अशा अति बारीक उंचवटयांनीं झांकून गेलेली आहे. या पीटिका तीन जातींच्या आहेत, म्हणजे कांहीं पीटिका लांब व सडपातळ, केसराकृति म्हणजे तंतूच्या आकारासारख्या आहेत. त्यांची संख्या फारच असते; कांहीं पीटिका शंक्वाकृति अथवा भूछत्राकृति म्हणजे जमीनीवर जीं अळंबीं उगवतात व ज्यांनां छत्री म्हणतात तशा आकाराच्या आहेत, व त्यांची संख्या फार थोडी असते. सरतेशेवटीं सात किंवा नऊ पीटिका दोन ओळींत बसलेल्या अशा जिभेच्या मागच्या बाजूला असून त्यांच्या त्या ओळींचा आकार इंग्रजी ''ए'' या वर्णाक्षरासारखा आहे. या उंचवटयांनां भोंवतालीं कड आङे म्हणून त्यांनां उन्नतभागयुक्त पीटिका असें म्हटलें आहे, व आंतून दबलेली अगर चल असलेली भिंत त्या प्रत्येक पीटिकेच्या भोंवतालीं आहे.

तोंडाच्या दोन्ही बाजूंनां दोन्ही गालांच्या आंतील पृष्ठभाग आहे, आणि तोंडाच्या वरच्या बाजूला कठिण तालु, (कठिण टाळा) आहे, या कठिण तालूला लागूनच तोंडाच्या पाठीमागें मृदुतालु आहे, व हा मृदुतालु जसा कांहीं पडद्यासारखाच टांगलेला आहे. या मृदुतालूनें तोंड आणि सप्तपथ म्हणजे अन्नमार्गाचा वरचा भाग अथवा घसा यांमधील रंध्र अथवा भोंक कांहीं अंशीं बंद करून टाकलें आहे. मृदू तालुच्या दोन्ही बाजूंनां पुढें व मागें पडदे आहेत त्यांनां घशाचे पुढचे व मागचे स्तंभ म्हणतात. या दोन्हीं स्तंभांच्या मध्यें अमृतकळा म्हणजे गरसा अथवा घशाच्या गांठी आहेत आणि मधोमध वर लोंबत राहिलेली उपजिव्हा म्हणजे पडजीभ आहे.

सप्तपथ म्हणजे घसा ही शंक्वाकृति अथवा गोपुच्छाकार पोकळी तोंडाच्या पाठीमागच्या बाजूला आहे. या पोकळीला सात प्रवेशद्वारें आहेत. ती सांत प्रवेशद्वारें येणेंप्रमाणें - (१) तोंड (२) स्वरस्त्रोत म्हणजे शब्देंद्रिय अथवा श्वासनलिकेचा प्रारंभ. (३) अन्ननलिका म्हणजे घशापासून पकाशयापर्यंत जाणारी अन्ननळी (४-५) दोन नासापश्चिमद्वारें-घशाजवळील दोन नाकपुडीचीं द्वारें; (६-७) नासासप्तपथापासून जाणार्‍या दोन कर्णनलिका म्हणजे घशाजवळील दोन नाकपुडीचीं द्वारें व घसा यांपासून कानाकडे जाणार्‍या दोन नळया. येणेंप्रमाणें हीं सात प्रवेशद्वारें घशामध्यें आहेत. सप्तपथ म्हणजे घसा व जठर म्हणजे पक्काशय अथवा कोठा यांमध्यें असणारा जो पचनक्रियेसंबंधीं प्रदेश त्याला अन्ननलिका अथवा अन्नमार्ग म्हणतात. ही नळी आपल्या मार्गांत हृदयाच्या पाठीमागें असणारा वक्षःस्थलाचा भाग आक्रमून जठरांत प्रवेश करण्यासाठीं मध्य पटलांत घुसली आहे. मध्यपटल म्हणजे उदर आणि वक्षःस्थळ अथवा ऊर यांमधील कमानदार स्नायूमय आडभिंत होय.

जठर अथवा पक्काशय हें स्नायूघटित असें मोठें पोकळ इंद्रिय उदराच्या वरच्या भागांत किंवा मध्य पटलाच्या जवळच खालीं आहे. प्रस्तुत ज्या प्रदेशाचा विचार चालू आहे त्या प्रदेशाचे बहुतेक भाग-जे उदराच्या पोकळींत आहेत ते गुळगुळीत व चकचकीत आवरणत्वचेनें झांकले गेलेले आहेत व त्या आवरणत्वचेला उदरांतर्वेष्टन अथवा पर्यंत्रक असें नांव आहे. या उदरांतर्वेष्टनानें उदराच्या पोकळींतील झांकलेले भाग परस्परांनां न घासतां एकमेकांवरून सहज सरपटतात. उदराच्या ज्या भिंती आहेत त्यांचा आंतील पृष्ठभाग देखील या अशाच आवरणत्वचेनें आंतून मढविला गेलेला आहे. अशा या रक्तजलत्वचेच्या कवच्याखालीं स्नायूसंबंधीं तंतूंचा थर आहे, व स्नायुसंबंधीं तंतू त्यांवर पट्टे नसलेल्या अशा स्वरूपाचे आहेत. हे तंतू निरनिराळया दिशांनीं पण मुख्यत्वें इंद्रियाला गुरफटून घेऊन जातील अशा बेतानें असतात, आणि अशा या स्नायुघटित आच्छादनाच्या आंत श्वेष्मल त्वचा असते व ती पाचक द्रवाचा आंतरोत्सर्ग म्हणजे विमोचन करीत असते. पक्काशयाच्या इंद्रियाच्या बाबतींत वर सांगितल्याप्रमाणें जो आंतरोत्सर्ग होत असतो त्या आंतरोत्सर्गाला जाठररस म्हणतात (आयुर्वेदीक वैद्यकविषयज्ञांपैकीं कांहीं लोकांचे असें मत आहे कीं संस्कृत वैद्यक ग्रंथांत जो ''क्लेदक श्लेष्मा'' वर्णलेला आहे त्याचें इंग्लिश वैद्यक ग्रंथकार सांगत असलेल्या जाठररसाशीं साम्य आहे). जठराच्या डाव्या मोठया शेंडयाला जाठरतल अथवा काळजासंबंधी किंवा हृदयासंबंधीं शेंडा असें म्हणतात; जो उजवा निमुळता लहान शेंडा आहे त्याला आंत्राकडील जठराचें द्वार म्हणतात आणि या जठराच्या द्वाराशीं लघ्वंत्र म्हणजे लहान आंतडें सुरु होतें. जठराची वरची कडा तोकडी व अंतर्गोल अशी आहे व खालची कडा लांब आणि बाह्यगोल आहे. वरच्या कडेला अल्पतर बांक आहे व खालच्या कडेला मोठा बांक आहे. या मोठया बांकापासून उदरांतर्वेष्टनाचा पदर लोंबत असतो. हा उदरांतर्वेष्टनाचा मोठा लोंबता पदर लहान आंतडयाच्या पुढील भागीं त्या आंतडयांनां पुढें गुंडाळण्याच्या वस्त्राप्रमाणेंच दिसतो. पक्काशयाचा संयोग त्याच्यापुढील भागांत डाव्या बाजूच्या खालच्या फांसोळया, यकृताची डावी पाळी, आणि उदराच्या अग्रवर्ती म्हणजे पुढील भिंतींचा कांहीं भाग यांच्याशीं संलग्न झाला आहे.

लघ्वंत्र म्हणजे लहान आंतडीं यांचे तीन भाग आहेत (१) तस्त्यंत्र; (डीओडेनम्. या इंग्लिश शब्दाच्या मूळ लॅटिन शब्दाचा अर्थ ''बारा या संख्येचें प्रमाण असा आहे. संस्कृत वितस्ति या शब्दाचा अर्थ ''बारा बोटांचें माप'' असाच आहे. म्हणून डीओडेनम्ला वितस्त्यंत्र हा शब्द अगदी बरोबर आहे.) (२) मध्यांत्र अथवा रिक्तांत्र (जेजुनम् हा इंग्लिश शब्द ज्या मूळ लॅटिन शब्दावरून झाला त्याचा मूळ अर्थ ''रिकामा'' असा आहे. म्हणून याला रिक्तांत्र हा शब्द बरोबर आहे.) आणि (३) अंत्यांत्र. संबंध वितस्त्यंत्राची लांबी सुमारें नऊ इंच आहे, अथवा बारा बोटाच्या रुंदीइतकी ती लांबी आहे. पाठीच्या कण्याच्या उजव्या बाजूला आंत्राकडील दाराजवळ वितस्त्यंत्राचा आरंभ होतो, व तेथें घोडयाच्या नालासारखें वांकण घेऊन दुसर्‍या कटिमण्याच्या सुमारें सपाटीपावेतों डाव्या बाजूकडे तें ओलांडून गेलेलें आहे. तेथपासून पुढें रिक्तांत्राला आरंभ झाला आहे. वर सांगितलेल्या वितस्त्यंत्राच्या वांकणानें स्वादुपिंडाच्या अथवा अग्रयाशय (आर्यवैद्यकाप्रमाणें पँक्रिएसला अग्नाशय हें नांव अगदीं बरोबर आहे. परंतु आतांपर्यंत पँक्रिएसला अमानकपिण्ड अथवा स्वादुपिण्ड म्हटलें आङे. जठराग्नि हा शब्द अग्नयाशयावरून प्रचारां आला असला पाहिजे.) याच्या डोक्याला कवटाळून घेतलें आहे. रिक्तांत्र व अंत्यांत्र हीं दोन्हीं मिळून एकमेकांवर वेटोळीं होऊन पडलेली नळी सुमारें वीस फूट लांबीची आहे. ही नळी उदरांत वेष्टनाच्या चुणीला टांगून राहिली आहे, व ती चूण उदराच्या पाठीमागच्या भिंतीला चिकटलेली आहे, तिला लघ्वांत्रावरणत्वचा म्हणज लहान आंतडयांनां चिकटलेली त्वचा असें म्हणतात; त्यामुळें ही लहान आंतडीं तुलनात्मक दृष्टीनें पाहिली असतां अगदीं मोकळेपणानें चलन करणारीं अशीं आहेत, परंतु त्यांचीं वेटाळी अथवा वळया परस्परांशीं व उदराच्या भिंतींशी निकट संयोगांत आहेत, त्यांच्यांत अंतर म्हटलें तर वास्तविक स्थितींत संभवरूप अंतर धरतां येईल इतकेंच आहे.

स्थूलांत्र म्हणजे मोठीं आंतडीं. हीं सुमारें सहा फूट लांब असतात, व त्यांचे पुन्हां तीन विभाग केलेले आहेत ः (१) अंधांत्र, (२) बृहदंत्र अथवा स्थूलांत्र व (३) मलाशय अथवा गुदकांड, अंधांत्र हें एका बाजूनें बंद केलेली अशी एकमुखी पिशवी उदराच्या उजव्याबाजूला श्रोणिफलकास्थीच्या म्हणजे कमरेच्या फळीच्या हाडाच्या वरच्या भागाजवळ आणि लहान आंतडयाचा स्थूलांत्राशीं जेथें संयोग झाला आहे त्या स्नानाखालीं आहे. कृमिरुप अथवा जंतासारखी एक अरुंद नळी सुमारें तीन किंवा चार इंच लांबीची अंधांत्राच्या खालच्या बाजूपासून उत्पन्न होऊन वर निघाली आहे, या नळीला आंत्रपुच्छ असें म्हणतात.

ज्या ठिकाणीं लहान आंतडें मोठया आंतडयाला जाऊन मिळत आहे त्या जागीं आवरणत्वचेच्या दोन चुणी आहेत त्यांनीं आंत्रसंधिपटल म्हणजे लहान आणि मोठया आंतडयांच्या संयोगस्थानाचा पडदा बनला गेला आहे, त्याचा उपयोग मोठया आंतडयांत समाविष्ट झालेल्या वस्तू परत लहान आंतडयांत येऊं नयेत म्हणून त्या परत फिरण्याला प्रतिबंधक असा होतो. स्थूलांत्र म्हणजे मोठें आंतडें. हें चार विभागांनीं झालेलें आहे (१) ऊर्ध्वस्थूलांत्र (२) तीर्यस्थूलांत्र, (३) अधःस्थूलात्र आणि (४) अवग्रह चिन्हाकार स्थूलांत्र. हे विभाग म्हणजे एका चौकोनाच्या तीन बाजूंसारखे आहेत. आणि त्याचें संबंधिस्थान कसें आहे तें आकृति नंबर २३ मध्यें दाखविलें आहे. महास्त्रोताचा मलाशय अथवा गुदकांडाचा शेवट तेथें होतो, आणि तो गुदद्वाराशीं बाहेरच्या भागाला उघडतो. सूक्ष्म मांसमय कण एकमेकांशीं चिकटून झालेले व पुष्कळ केशवाहिन्यांनीं युक्त असे मांसपिण्ड जे अन्नमार्ग नलिकेच्या आंत असलेले दिसतात ते खेरीज करुन ज्या इतर मांसपिंडांचा संबंध पचनेंद्रियव्यूहाशीं आलेला आहे ते मांसपिंड म्हणजे लालोत्पादक पिण्ड अथवा लालापिण्ड, प्लीहा आणि स्वादुपिण्ड हे होत.

चिकट, बिलबिलीत असा जो द्रव तोंडामध्यें दिसतो ज्याला लाला अथवा मुखरस म्हणतात त्या द्रवाचा आन्तरोत्सर्ग करणारे जे लालापिण्ड आहेत ते मुखाच्या दोहापैकीं प्रत्येक बाजूला तीन तीन आहेत. ते (१) उपकर्णपिण्ड अथवा कर्णोपवर्ती लालोत्पादक पिण्ड, (२) हनुलालापिण्ड म्हणजे खालच्या दाभाडाखालील पिण्ड, आणि (३) जिवहाधरिका पिण्ड हे होत. उपकर्णपिण्ड हे कानाच्या खालीं पुढच्या बाजूला आहेत आणि खास लालोत्पादक अशा पिण्डांत हे उपकर्णपिण्ड सर्वांत मोठे आहेत. प्रत्येक उपकर्णपिंडाचा नळ तोंडात वरील दाढेच्या दुसर्‍या दांताजवळ सुटतो. या पिंडाचा जेव्हां दाह होतो तेव्हां ते गालफड अगर गालगुंडें ठरविलें जातें. हनुलालापिण्ड हे खालच्या दाभाडाच्या प्रत्येक बाजूला एक असें आहेत. या पिण्डांचे नळ मुखाच्या जागेवर जिभेच्या अग्राखालीं येऊन सुटतात. जिव्हाधरिका पिंडांनीं जिभेच्या खालील कंगोरे तयार केलेले आहेत. व त्या प्रत्येक पिंडाला कित्येक तळ आहेत व बहुतेक सर्व प्रत्येकीं निरनिराळा असा तोंडांत जिभेखालीं सुटला आहे.

शरीरांत यकृत हा सर्वांत मोठा मांसपिंड आहे. त्याचें वजन मोठया माणसांत ५० पासून ६० औंसांच्या म्हणजे १२५ तोळयांपासून १५० तोळयापैक्षां कमी नसतें. हें इंद्रिय उदराच्या वरच्या भागांत, मध्यपटलाच्या खालीं लगतच आणि बहुतेक उजव्या बाजूला असतें. याला दोन मुख्य पालिका म्हणजे पाळया आहेत. त्यांपैकीं उजवी पाळी मोठी व डावी पाळी लहान आहे. याचा वरील पृष्ठभाग गुळगुळीत व बाह्यगोल असून तो मध्य पटलाच्या खालच्या अंतर्गोल पृष्ठभागाशीं अगदीं बरोबर जुळता होऊन गेलेला आहे. यकृताचा खालचा पृष्ठभाग अनियमित आकारांत आहे. या पृष्ठभागांत कित्येक भेगा, लहान लहान पाळया, पित्ताशय व तसेंच यकृतांत जाणार्‍या व त्यांतून बाहेर पडणार्‍या वाहिन्या आहेत.

ज्या रक्तांत पचलेलें आणि शोषून घेतलेलें अन्न आहे असें रक्त जठर, अंत्र, प्लीहा आणि स्वादुपिंड यांमधून एका मोठया अशुद्ध रक्तवाहिनीनें म्हणजे शिरेनें यकृताच्या आडव्या भेगेशीं येऊन पोहोंचतें. त्या शिरेला यकृतांतील (सपित्त रक्तवाहणारी) शीर अथवा कोष्ठगतशिर म्हणतात, ती आडव्या भेगेशीं येऊन मिळाल्यावर दोन शाखांत विभागली जाऊन, यकृतांतील जड द्रव्यांतल्या द्रव्यांत केशसदृश, अति सूक्ष्म अशा केशवाहिन्यांत घुसून जाते. या केशवाहिन्यांचा दुसर्‍या दोन मोठया वाहिन्यांत पुन्हां एकत्र ठिकाणीं जमाव होतो.त्यांनां यकृतासंबंधीं वाहिन्या म्हणतात व त्या आपण स्वतः दुसर्‍या एका वाहिनींत येऊन सुटतात, ती वाहिनी मध्य पटलांतून हृदाकडे जाऊन हृदांत मोकळी होते. यकृताला याशिवाय आणखी भरीला रक्त यकृतासंबंधी धमनी आहे तिच्यामधून मिळतें. यकृतेंद्रिय पित्ताचा आंतरोत्सर्ग करीत असतें, व तें पित्त यकृतासंबंधीं जे दोन नळ आहेत त्यांच्या द्वारें यकृतांतून जाऊन कांहीं अंशानें पित्ताशयांत साठविलें जातें व कांहीं अंशानें वितस्त्यंत्रांत पित्तनलिकेच्या मार्गानें जातें.

प्लीहा हें गर्द जांभळा करडा अशा रंगाचें इंद्रिय आहे, आणि साफ निक्षून म्हणावयाचें म्हणजे हा मांसपिंड नाहीं; कारण त्याला नळ नाहीं. याचें वजन सुमारें सहा औंस म्हणजे पंधरा तोळे असतें. या इंद्रियाचा बाहेरील पृष्ठभागाचा संबंध मध्यपटलाशीं येतो आंतल्या पृष्ठभागाचा संबंध जठर आणि डावा मूत्रपिण्ड यांच्यांशीं येतो.

स्वादुपिण्ड हा जठराच्या मागच्या बाजूला, पृष्ठवंशाशीं तिर्कस असा असतो. याला डोकें, अंग व शेंपूट आहे. याचा नळ सामान्य पित्तवाहिनीबरोबरच वितस्त्यंत्रांत जाऊन सुटतो. हें इंद्रिय कांहींसा लाळेच्या स्वरुपाचा आंतरोत्सर्ग करतें व त्याला स्वादुपिण्डरस म्हणतात.

अभिसरणव्यूह.

पचनेंद्रियव्यूहानें जो पुष्टिकारक आहार तयार केला, आणि फुफ्फुसांनीं आपल्यामध्यें जी हवा घेतली, त्यांची येथून तेथून सर्व शरीरभरवाटणी व्हावी म्हणून, एक द्रव-ज्याला रक्त म्हणतात आहे, त्याचें वाहिन्यांमधून अभिसरण चाललेलें असतें, व त्या द्रवाला पुढें ढकलण्यालालागणारा जो जोर तो स्नायुघटित इंद्रिय (ज्याला हृद् म्हणतात) याच्यापासून उत्पन्न होत असतो.

रुधिर- स्वतःरुधिर हें त्याच्या दोन अंगभूत पदार्थांनीं झालेलें आहे (१) प्रवाही भाग -रक्तजल अथवा जीवनरस (२) घनभाग - रक्तजलावर तरंगत राहणारे घन कणपिण्ड. हे पिण्ड दोन जातीचे असतात (अ) रक्तपिण्ड; यांची संख्या फार असते आणि त्यांच्या उभयांतर्गोल वर्तुलाकार वडया असतात; (आ) श्वेतपिण्ड; हेच खरे पिण्ड म्हणावयाचे व ते दर पांचशें रक्तपिण्डांनां एक श्वेतपिण्ड या प्रमाणांत असतात (आकृति नं. २५ पहा).

रक्तवाहिनीपासून जेव्हां रक्त बाहेर काढून घेण्यांत येतें तेव्हां तें नेहमीं जलद थिजून जातें, त्याचा अर्धवट घट्ट असा गोळा होतो व त्यानंतर त्यांतील द्रवभाग जो रक्तरस (रक्त थिजल्यानंतर त्यांतील सुटें होणारें पाणी) तो निथळून जातो.

रक्तवाहिन्या- (१) धमन्या अथवा शुद्ध रक्तवाहिन्या, (२) केशवाहिन्या, (३) शिरा अथवा अशुद्ध रक्तवाहिन्या आणि (४) हृद् यांच्या योगानें शरीरांत रक्त वांटले जातें; आणि त्यांच्या विभागाचे तीन गट केलेले आहेत (अ) व्यूहविषयक रुधिराभिसरण, (आ) फुफ्फुसविषयक रुधिराभिसरण व (ज्ञ) यकृतासंबंधीं रुधिराभिसरण (आकृति नं. २६ पहा).

शरीराच्या पटांकडे हृदापासून रक्त नेणार्‍या ज्या वाहिन्या त्यांनां धमन्या म्हणतात. धमन्या ह्या आंतमध्यें स्नायुमय भिंत असलेल्या अशा नळया आहेत, आणि प्राणी मेल्यावर त्या नेहमीं रित्या झालेल्या अशाच दिसतात, व त्याच कारणामुळें पूर्वकालीन पाश्चात्य लोकांची त्यांच्या त्या वेळच्या अपूर्ण शोधांमुळें अशी चुकीची समजूत होऊन राहिली कीं, मरणानंतर ज्या या नळया रिकाम्या दिसतात त्यांमध्यें प्राण्याच्या सजीव स्थितींत हवा भरलेली असून ती शरीरांत खेळत राहिली असली पाहिजे. या नळया म्हणजे शुद्धरक्तवाहिन्या आहेत, सजीव स्थितींत त्यांच्यांत हवा नव्हे तर शुद्ध रक्त वाहत असतें ही जर मुळीं कल्पनाच नव्हती, तर मग पूर्वकालीन लोकांनीं त्यांच्या त्यांत हवा असते या समजुतीला धरून त्यांनां त्या अर्थाचा बोधक ''आर्टरीज'' हा शब्द दिला यांत आश्चर्य नाहीं. अजूनहि इंग्रजी वैद्यकांत हाच शब्द कायम आहे. त्याचें कारण तो फार वर्षें रुढ होऊन बसलेला व ''शास्त्रात् रुढिर्बलीयसी'' या वचनाप्रमाणें पाहतां तो शब्द आतां निघणें शक्य नाहीं.

मराठी वैद्यकांत शुद्ध रक्तवाहिनीला ''धमनी'' हा शब्द वापरला आङे. धमनी या शब्दांत मूळ धातूचा अर्थ ''ध्मा'' ''फुंकणें'' असा आहे. तेव्हां मूल धातूवरुन शब्दसिद्धीकडे पाहतां कल्पना हवेचीच दिसते, व हा शब्द ही शुद्धरक्तवाहिनी या अर्थाचा बोधक होत नाहीं. तेव्हां जी वाट ''आर्टरी'' या शब्दाची इंग्रजींत तीच वाट मराठींत ''धमनी'' या शब्दाची होईलसें वाटतें. पण दोहोंकडे हेच शब्द रुढ असल्यामुळें येथेंहि तेच वापरण्याला हरकत नाहीं. व नाडी, शिरा आणि धमनी या तिन्ही शब्दांचे माल्स्वर्थ, प्रो. आपटे, प्रो. रानडे यांच्या कोशांत जे अर्थभेद दिलेले आहेत त्या सर्वांचा गोषवार्‍यानें विचार करुन, वस्तूंनां व विशिष्ट खूण धरण्यासाठीं घोटाळा न होईल अशा बेतानें विशिष्ट संज्ञा देणें इष्ट आहे म्हणून, ''आर्टरी'' याला ''धमनी'' आणि व्हेन याला ''शिरा'' हेच शब्द येथें कायम केले आहेत. अर्थातच हे दोन्हीहि शब्द वस्तुस्थितिभेददर्शक अर्थाला किंवा त्यांतील मूल धात्वर्थाला तंतोतंत धरून नाहींत हें उघड आहे. विशिष्ट संज्ञा देऊन खूण धरण्याची व घोटाळा न होऊं देण्याची त्यांत सोय झाली हेंच काय तें आहे. अडचणीच्या प्रसंगीं नाइलाजास्तव असे शब्द योजावे लागतात व ते रुढ होऊन गेल्यानें ''शास्त्रात् रुढिर्बलीयसी'' या वचनाप्रमाणें ते शास्त्रांतून फेटाळून लावतां येत नाहींत त्याचें उदाहरण ''आर्टरी'' या शब्दाचें इंग्रजी वैद्यकांतलें वर दिलेलें आहेच. असो, आथां मूळ विषयाकडे पुन्हां वळूं.

शरीराच्या पटांकडे हृदापासून रक्त नेण्याच्या ज्या वाहिन्या त्यांनां धमन्या म्हणतात. धमन्या ह्या आंतमध्यें स्नायुमय भिंत असलेल्या अशा नळया आहेत.

धमन्यांचे विभाग आणि प्रतिविभाग होत होत अखेर त्यांची केशसदृश अशा अति बारीक केशवाहिन्यांपर्यंत विभागणी होते. या केशवाहिन्यांच्या निरनिराळया भागांचें जर एकत्र क्षेत्रफळ काढलें तर तें धमन्यांच्या क्षेत्रफळापेक्षां पुष्कळ पटीनें अधिक होईल या अतिसूक्ष्म केशवाहिन्या आस्ते आस्ते परस्परांनां मिळत मिळत त्यांच्यापेक्षां मोठया, त्यांहून मोठया अशा वाढत्या नळया होत जातात, त्यांनां शिरा म्हणतात. धमन्या आणि शिरा यांच्यांत मोठी खूण ही आहे कीं, शिरांच्या भिंती धमन्यांच्या भिंतीपेक्षां फार पातळ असतात, त्यांच्यांत स्नायुपट थोडा असतो आणि त्यांच्यांत एखांगी पडदे कमजास्त प्रमाणांत पूर्ण असे असतात. विषय स्पष्ट कळावा, समजुतींत घोटाळा होऊं नये म्हणून धमन्यांची आणि शिरांची कामगिरी शरीरांत कशी चालली आहे तें थोडक्यांत सांगतों. धमन्या ह्या हृदापासून शुद्ध रक्त वाहून नेऊन शरीराच्या सर्व पटांनां पोहोंचविणार्‍या नळया आहेत, व त्या आपली कामगिरी बजावण्यासाठीं हृदापासून निघतांना प्रथम मोठया स्वरूपांत राहून पुढें आस्ते आस्ते लहान लहान स्वरुप धारण करतां करतां अखेर अतिसूक्ष्म अशा केशतुल्यवाहिन्यांच्या स्वरुपानें शरीराच्या सर्वपटरुपी भूमींत रक्तरुपी जीवनाचें सिंचन करीत असतात. इकडे शिरा या अशुद्ध रक्तवाहिन्या आहेत, व त्या शरीराच्या पटरुपी भूमींतून प्रथम अतिसूक्ष्म अशा केशवाहिन्यांच्या स्वरुपांत अशुद्ध रक्त शोषून घेऊन आस्ते आस्ते मोठें असें स्वरुप धारण करीत करीत त्यांनीं गोळा केलेलें अशुद्ध रक्त मोठया स्वरुपांत राहून हृदामध्यें परत नेऊन सोडीत असतात. हें अशुद्ध रक्त हृदांत गेल्यावर तें पुन्हां कोणत्या कारखान्यांत शुद्ध होतें व त्या कारखान्यांत शुद्ध झाल्यावर हृदांतून सर्व पटांकडे जाण्यासाठीं त्यांत परत कसें फिरतें तें आतां क्रमाक्रमानें पुढें सांगण्यांत येईल; म्हणजे मग हे नाडीचक्र कसें चाललें आङे, व हा रुधिराभिसरणव्यूह निसर्गानें कसा रचला आहे तें लक्षांत येईल (आकृति नं. २६ अ पहा.)

हृद्- हे स्नायुघटित पोकळ इंद्रिय आहे, तें  वक्षःस्थळांत मध्यरेषेवर स्नानस्थित आहे, परंतु डाव्या बाजूकडे बरेंचसें विस्तृत झालें असून, मध्यपटलाच्या वर लगतच आहे. ज्याला हृत्कोश म्हणजे हृदाच्या भोंवतालची त्वचेची पिशवी म्हणतात त्या आवरणत्वचेनें तें वेढून गेलेलें आहे. हा हृत्कोश दोन थरांचा आहे; पैकीं एक थर हृदाला अगदीं अंगासरसा वेष्टून आहे, व दुसरा थर जरा सैल लपेटून आहे. या दोन्ही थरांचे त्यांच्या परस्परांशीं असलेल्या संबंधांत आलेले पृष्ठभाग गुळगुळीत आहेत, त्यामुळें उदराच्या पोकळींत समाविष्ट असलेल्या इंद्रियांनां त्यांच्या चलनक्रियेला जशी उदरांत वेष्टणापासून सुलभता मिळते तशीच सुलभता हृदाला त्याच्या आवरणत्वचेपासून मिळते. मुख्यतः हें इंद्रिय ज्या विशिष्ट जातींच्या स्नायुपटानें बनलें गेलें आहे, तशा जातीचा स्नायुपट शरीरांत इतर कोठेंहि दिसणारा नाहीं. मोठया माणसांत हृदाचें वजन सुमारें नऊ औंस म्हणजे साडेबावीस तोळे असतें. याचा आकार कांहींसा शंक्वाकार म्हणजे निमुळता आहे, त्याचा तळ अगर बुडखा अगदीं वरच्या बाजूला, आणि शिखर अगर शेंडा खालच्या बाजूला डावीकडे आङे. हृदाचें जेव्हां आकुंचन होतें तेव्हां त्याच्या शिखराचा ठोका नेहमींच्या जागीं म्हणजे, डाव्या बाजूच्या ५ व्या व ६व्या फांसळयांच्या कूर्चांमध्यें उरोस्थीच्या डाव्या कडेपासून सुमारें तीन इंचांवर, अथवा डाव्या स्तनाच्या एक इंच आंत व तीन इंच खालीं या जागेवर तो स्पर्शानें समजतो अगर दृष्टीलाहि कळून येतो. हृदयामध्यें चार पुटें आहेत, तीं त्याच्या डाव्या व उजव्या अशा प्रत्येकबाजूला दोनदोन आङेत. डाव्या बाजूला दोन आङेत त्यांनां वामहत्कषर्णका आणि वाममहाहृत्पुट म्हणतात, व उजव्या बाजूला दोन आहेत त्यांनां दक्षिणहृत्कषर्णका व दक्षिणमहाहृत्पुट असें म्हणतात. हृत्कषर्णकांत शिरा घेऊन रित्या होतात, आणि महाहृत्पुटांपासून धमन्या सुटतात. हृदेंद्रियाचा व्यापार कसा चालला आहे तो कळावा म्हणून या प्रत्येक पुटाचें थोडे वर्णन दिलें पाहिजे.

तुलनात्मक दृष्टीनें पाहतां दक्षिणहृत्कषर्णका पातळ भिंतीची आहे व तिच्यांत स्नयुएटहि फार थोडा आहे. या कषर्णकेच्या आनुषंगिक भागाचा आकार कांहींसा कुत्र्याच्या कानासारखा आहे, त्यावरून या पुटाला कषर्णका हें नांव पडलें आहे. या कषर्णकेंत दोन मोठया शिरा-ज्यांनां ऊर्ध्व बृहत्शिरा आणि अधोबृहत्शिरा म्हणतात त्या येऊन सुटतात. या शिरांपैकीं पहिली डोकें, मान, हात व छाती यांमधील रक्त गोळा करुन आणून सोडते, व दुसरी उदर आणि अधःशाखा म्हणजे पोट आणि पाय यांमधील रक्त आणून सोडते. स्वतःहृदाच्या शिराहि याच पुटांत रक्त सोडतात. (आकृति नं. २७ पहा). दक्षिण महाहृत्पुटाच्या भिंतींत दक्षिण कषर्णकेच्या भिंतीपेक्षां स्नायुपट पुष्कळ अधिक आहे. या महाहृत्पुटाचें त्याच बाजूच्या कषर्णकेशीं दळणवळणष त्या दोहोंमध्यें एक द्वार आहे, त्या द्वारानें आहे. या द्वाराला दक्षिणमहाहृत्पुटसंबंधीं कषर्णकाद्वार म्हणतात. या दाराच्या तोंडावर एक द्वारपाल एकांगी पडदा आहे, त्या पडद्याला त्रिस्कंध पडदा म्हणतात. (या पडद्यांत अणीदार कमानीच्या झालरीचे तीन बांक एका बिंदूंत मिळतात असा हा पडदा आहे). महाहृत्पुटांच्या भिंतींवर ज्या पीटिका (वर उचलून आलेले सूक्ष्म उंचवटे) आहेत त्यांमधून निघालेले स्नायुमय दोरे या पडद्याच्या स्कंधांनां जोडलेले आहत. अशा वर्णनाचा हा पडदा त्या द्वाराच्या तोंडाशीं आहे व त्याचा विशिष्ट उपयोग होतो तो असा कीं, तो पडदा महाहृत्कषर्णकेंतील रक्ताला महाहृत्पुटांत जाण्याला मोकळीक देतो. पण महाहृत्पुटांतील रक्ताला उलट महाकषर्णकेंत मात्र जाऊं देत नाहीं. महाहृत्पुटाचा जर तिर्य छेद केला, तर तें पुट अर्धचंद्राकार आहे असें दिसतें. प्रत्येक महाहृत्पुटांत सुमारें चार औंस र मावेल. दक्षिणमहाहृत्पुटाच्यावर डावीकडील कोपर्‍यामधून पुढें येणारी फुफ्फुसधमनी आहे. ही धमनी शिरागत रक्त म्हणजे अशुद्ध रक्त हृदयापासून फुफ्फुसांकडे शुद्ध होण्याकरितां नेत असते. या धमनीच्या आरंभस्नानाशीं तीन अर्धचंद्राकार पडदे आङेत. वामहृत्कषर्णका ही पुष्कळशी दक्षिण हृत्कषर्णकेसारखीच आहे. तिच्यामध्यें चार द्वारें, (कधीं कधीं फक्त तीनच) असतात. फुफ्फुसांतून शुद्ध रक्त परत आणणार्‍या फुफ्फुसशिरा या कषर्णकेंत येऊन सुटतात. वाममहाहृत्पुटाची भिंत दक्षिण महाहृत्पुटाच्या भिंतीपेक्षां पुष्कळ घट्ट आहे, व या पुटाचा तिर्य छेद करुन पाहिला असतां हें पुट वर्तुलाकार दिसतें. या महाहृत्पुटाचें याच बाजूच्या कषर्णकेशीं दळणवळण वाममहाहृत्पुटांसंबधीं कषर्णकाद्वारानें झालेलें आहे. त्या द्वाराच्या तोंडाशी दोन स्कंद असलेला पडदा आहे. त्याला द्विस्कंध पडदा अथवा विषय मुकुटवजा पडदा म्हणतात. शरीरांत सर्वांत मोठी धमनी-जिला महाधमनी म्हणतात. जी व्यहविषयक रुधिराभिसरणाचा आरंभ ती धमनी-वाममहाहृत्पुटाच्यावर उजव्या कोपर्‍यामधून निघते (आकृति नं. २८ पहा).

या महाधमनीच्या तोंडाशी जसें फुफ्फुसधमनीच्या तोंडाशीं पडदे आहेत त्याचप्रमाणें तीन अर्धचंद्राकार पडदे आङेत. या धमनीच्यावर फुगून आलेले तीन विस्तार आहेत त्यांपैकीं दोहोंमधून दोन मुकुट धमन्या निघतात त्या मूळ हृदयाचेंच पोषण करतात. दोन्हीं महाहृत्पुटांमध्यें पुढून व मागून दिसणारी अशी खोबण आहे त्यामुळें दोन्ही पुटांचे विभाग ध्यानांत येण्यासारखे आहेत. हृत्करणिका व महाहृत्पुट हे देखील त्यांच्यामध्यें असलेल्या दबलेल्या भागामुळें विभागलेले दिसतात. दोन्ही हृत्कषर्णकांमध्यें जी आडभिंत आहे तिला हृत्कर्णाविटप म्हणतात. कधीं कधी मोठया माणसांतसुद्धां हे विटप पूर्ण झालेले नसूं शकतात. वाममहाहृत्पुटाच्या टोंकामुळें हृदाचा शेंडा बनला गेला आहे. मध्यपटलाच्या खालीं जठराचा त्याचपटलाच्यावर हृदाशीं जो संबंध आहे तो लक्षांत आणून ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. हृदाच्या पुढील पृष्ठभागाच्या कांहीं भागाच्या कडेला आपल्या वेष्टणासह डाव्या फुफ्फुसाचा भाग आच्छादून आहे. हृत्कोशाच्या दोन्हीं बाजूला फुफ्फुसें आहेत आणि हृद व फुफ्फुसें यांच्यामध्यें येणारें फुफ्फुसवेष्टण आहे. हृदयाच्या पाठीमागें अन्ननलिका आणि महाधमनीचा वक्षःस्थलासंबंधींचा भाग आहे, आणि त्यांच्यामागें पृष्ठमणी आहेत.

आतां याच ठिकाणीं थोडक्यांत फुफ्फुसांसंबंधीं व यकृतासंबंधीं रुधिराभिसरणाचें वर्णन देणें फार सोईस्कर आहे. म्हणून तें अगोदर देऊन, नंतर मग व्यूहविषयक रुधिराभिसरणाचें वर्णन करुं.

(१) फुफ्फुस विषयक रुधिराभिसरण (आकृति नं. २६ व २६ अ पहा) शिरागत रक्त अथवा अशुद्ध रक्त दक्षिण महाहृत्पुटाकडून फुफ्फुस धमनीमध्यें चढविले जातें. जेव्हां दक्षिणमहाहृत्पुट सैल होतें तेव्हां महाधमनींतील त्या पुटाकडे त्याच्या त्या मोठया झालेल्या पोकळींत आंत येऊं पाहतें, परंतु तोंडावर अर्धचंद्राकार जे पडदे आहेत ते त्या रक्ताला परत फिरण्याला प्रतिबंध करतात. याप्रमाणें महाधमनींतील रक्त परत मागें न फिरतां पुढेंच चालूं लागतें, व तें फुफ्फुसधमनीचे जे भाग आहेत, ज्यांनां फुफ्फुस धमनीच्या उजवीकडीलव डावीकडील शाखा म्हणतात, त्या शाखांमधून अनुक्रमें उजव्या व डाव्या फुफ्फुसांत जातें. नंतर तें रक्त जें आरंभीं मोठया वाहिन्यांतून होतें तें फुफ्फुसांत गेल्यावर फुफ्फुस द्रव्यांत अतिबारीक अशा केशवाहिन्यांच्या स्वरुपांत घुसून राहतें. या ठिकाणीं असणार्‍या केशवाहिन्या शरीरांतील इतर कोणत्याहि पटांतील असणार्‍या केशवाहिन्यांपेक्षां जाड असतात. फुफ्फुसांत हवेच्या पेशी म्हणजे हवेच्या अति सूक्ष्म पिशव्या आहेत. त्या सर्व पिशव्यांभर फुफ्फुसांतल्या केशवाहिन्या पसरून जातात, व फुफ्फुसांनीं आपल्यामध्यें घेतलेली जी हवा तिच्यांतील प्राणवायु रक्ताला आपल्यामध्यें शोषून घेण्याला मोकळीक देतात. त्यानंतर त्या केशवाहिन्या पुन्हा एकत्र ठिकाणीं जावयाला लागून त्यांच्या हळू हळू मोठयामोठया वाहिन्या बनूं लागतात, व सरतेंशेवटीं फुफ्फुसांतून चार विभागांत फुफ्फुसशिरा म्हणून हृदाकडे परत येतात आणि वामहृदयकषर्णकेंत प्रवेश करतात. मागें रक्त शुद्ध होण्याचा कारखाना कोठें आहे तें पुढें सांगू म्हणून म्हटलें त्याचा आतां या ठिकाणीं उलगडा झाला, रक्त फुफ्फुसांत शुद्ध होतें व फुफ्फुसशिरांच्यावटे तें मग हृदाकडे परत येतें. हृदांत प्रथम वामकषर्णकेंत उतरतें, तेथून वामहृत्पुटांत येतें व त्या पुटांतून महाधमनीवाटे सर्वशरीराच्या पटांनां शुद्ध रक्त जातें. शिरांबद्दल आतां येथें एक गोष्ट विशेष ध्यानांत धरावयाची ती ही कीं, इतर शिरा या अशुद्ध रक्तवाहिन्या आहेत फुफ्फुसशिरा मात्र फुफ्फुसांत शुद्ध झालेलेंच रक्त वाहणार्‍या आहेत.

(२) यकृतासंबंधीं रुधिराभिसरण- हें एक विशिष्ट जातींचें रुधिराभिसरण आहे. (आकृति नंबर २६ व २६ अ पहा.) या अभिसरणांत अशुद्ध रक्त चाललें आहे पण त्यांत पोषक द्रव्यांची जमा पुष्कळ आहे. ही सर्व जा उदराच्या पोकळींत जो महास्त्रोताचा प्रदेश आहे त्या प्रदेशांतून वस्तुतः गोळा झालेली आहे. मलाशय, अवग्रहचिन्हाकारस्थूलांत्र आणि अधःस्थूलांत्र यांच्या बहुतेक शिरा एका ठिकाणीं मिळून एक शिरा होते तिला लघ्वांत्रावरणत्वचेची अधोशिरा म्हणतात. ही शिरा प्लीहापासून रक्त परत नेणारी जी प्लीहासंबंधीं शीर तिला जाऊन मिळते. नंतर ही फ्लीहासंबंधीं शीर लघ्वांत्रावरणत्वचेसंबंधीं ऊध्वशिरेला जाऊन मिळते, व त्याच शिरेंत बाकी राहिलेल्या मोठया आंतडयामधील व सर्व लहान आंतडयांमधील रक्त येत असतें. प्लीहासंबंधीं शिरा व लघ्वांत्रावरण त्वचेसंबंधीं ऊर्ध्व शिरा या दोन शिरांच्या संगमाला कोष्ठगत शिरा म्हणतात. (अंत्र, प्लीहा, आणि जठर यांमधील अशुद्ध रक्त यकृताकडे वाहून नेणारी जी शीर तिला कोष्ठगत शिरा हें विशिष्ट नांव आहे.) कोष्ठगत शिरेला जठरांतून शिरांचे फांटे येऊन मिळतात, नंतर त्या त्या शिरेचे दोन विभाग होतात, पैकीं एक विभाग म्हणजे एक शाखा यकृताच्या उजव्या पाळीकडे जाते, व एक शाखा यकृताच्या डाव्या पाळीकडे जाते. यकृतेंद्रियांत त्या दोन्ही शाखा गेल्यावर त्यांचे प्रतिविभाग केशवाहिन्यांच्या स्वरुपांत होतात. त्यानंतर त्या केशवाहिन्या पु्हां एकत्र होऊन त्यांच्या यकृतांतील शिरा बनतात, आणि त्या सर्व अधोबृहत् शिरेमध्यें येऊन सुटतात, आणि तेथून अखेर हृदाच्या दक्षिण हृत्कषर्णकेला जाऊन पोहोंचतात.

यावरून आतां हें लक्षांत येईल  कीं, यकृतासंबंधीं रुधिराभिसरणांत त्या अभिसरणाच्या दोन्ही टोंकांनां केशवाहिन्यांचा एक गट यकृतेंद्रियाच्या द्रव्यांत आहे.

(३) व्यूहविषयक रुधिराभिसरण (आकृति नं. २६, २६ अ पहा.) शरीरांतून शुद्ध रक्त वाहून नेणारी महाधमनी प्रथम वाममहाहृत्पुटांतून एकटी निघून अनंत लहानमोठया व अतिसूक्ष्म फांटयांनीं शरीराच्या सर्व पटांनां शुद्ध रक्त पोहोंचवते नंतर सर्व पटांतील अशुद्ध रक्त गोळा करुन प्रथम अनंत फांटयांनीं व मग त्या सर्वांचा एक नळ होऊन ती शिरा अशुद्ध रक्त हृदांत परत नेते, तेथून तें रक्त फुफ्फुसांत जाऊन शुद्ध होऊन पु्हां परत हृदाकडे सर्व पटांनां वांटण्याकरितां येतें. येथपर्यंत हा विषय वर सर्व दिलेल्या वर्णनांवरून ध्यानांत येईल. मध्यंतरी याच रुधिराभिसरणाच्या आख्यानांत योग्य प्रसंग आला म्हणून लागलीच वर कलम (१) व कलम (२) या खालीं फुफ्फुसासंबंधीं व यकृतासंबंधीं रुधिराभिसरण या दोन्ही गोष्टी सांगून टाकल्या. त्यामुळें हा विषय बराच स्पष्टपणें पुढें मांडला गेला. धमन्यांचे फांटेहि पुष्कळ व ज्या भागांनां रक्त पोहोंचवण्याचे ते भागहि पुष्कळ, तेव्हां त्या सर्वांचीं नांवें व त्यांचा क्रम वाचतां वाचतां सकृद्दर्शनीं भाग घोंटाळयासारखा वाटणारा आहे. परंतु क्रमाक्रमानें लक्षांत नीट आणून वाचित गेल्यावर घोंटाळा होणार नाहीं. आम्ही तरी फार खोल तपशिल न देतां, कारण या लहानशा ग्रंथांत तो देतां येणेंहि शक्य नाहीं, ठळकच गोष्टी सांगणार आहों. कारण स्थूलरुपरेखा दाखवावयाचा हाच उद्देश आहे. मुख्य विषयच जेथें अतिशय तपशिलानें भरलेला त्या ठिकाणीं त्याचा स्थूलभागहि थोडाबहूत तरी तपशिलाचा असावयाचाच, व तो टाळतां येणें शक्य नाहीं, व पुढें मांडित आहों त्यापेक्षां हा विषय जास्त सोपा मांडतां येणार नाहीं. म्हणून वाचकांनीं जरा जास्त लक्ष घालून वाचणें हेंच महत्वाचें आहे. बरोबर कल्पना यावी म्हणून अगदीं योग्य असा लहानसा दृष्टांत देतों. शेत जमीनीच्या लहान मोठया असा चटसार्‍या तुकडयांनां पाणी पोहोंचविलें जाऊन त्यांच्यांत पीकपाणी उत्तम यावें, ते सर्व भाग सुपीक रहावेत म्हणून प्रथम पाण्याचा मोठा (सांठा) तलाव बांधून त्याचा प्रथम मोठा नळ काढून मग त्याचे लहान बारीक लागतील तसे फांटे काढून सर्व भागांनां पाणी पुरविण्याची व्यवस्था करण्यांत येते. त्याचप्रमाणें हृदरुपी रक्ताच्या तलावांतून प्रथम महाधमनीचा मोठा नळ निघून नंतर त्याच्या अनंत फांटयांनीं शरीररुपी क्षेत्रांतील पटरुपीं जमीनींच्या तुकडयांनां रक्तरुपीं जीवन पोहोंचविण्याची नैसर्गिक व्यवस्था आहे, तेव्हां आतां या व्यूहविषयक रुधिराभिसरणांत ही नैसर्गिक व्यवस्था कशी आहे त्याचें ठळक वर्णन द्यावयाचें आहे, व तें देतांनां शीर, मान, आणि शरीराच्या शाखा हातपाय यांच्यासंबंधीं विशेष तपशीलवार लक्ष दिलें पाहिजे. हृदाच्या वामवाहिन्यांकडे विशेष तपशीलवारलक्ष देऊं. हृदाच्या वाममहाहृत्पुटापासून शुद्ध रक्त घेऊन महाधमनी निघते हें वर पुष्कळ वेळां सांगितलेलेंच आहे. वर्णनाच्या सोईसाठीं महाधमनीचे तीन विभाग केले आहेत. (१) महाधमनीची कमान. (२) उरोधमनी.(३) उदरीयधमनी. महाधमनीची कमान आणि उरोधमनी हे भाग वक्षः स्थलाच्या  पोकळींत आहेत आणि उदरीय धमनीही उदरांत आहे. महाधमनीनें ध्यानांत येण्यासारखा बांक खाल्ला आहे म्हणून त्याला महाधमनीची कमान म्हटलें आहे. ही कमान म्हणजे हा महाधमनीचा पहिला भाग होय. हा भाग हृदाच्या डावीकडून निघाल्यावर लवकरच उजव्याबाजूकडे फुफ्फुस धमनीच्या पाठीमागें जाऊन तेथून आपला रस्ता फिरवून पृष्टवंशाला तिर्कस होऊन पुन्हां एकवार डाव्या बाजूकडे आलेला आहे. कांहीं विशेष महत्वाच्या धमन्या सुमारें पांचांची संख्या, या कमानीपासून निघाल्या आहेत. महाधमनीचा उगम झाल्यावर लागलीच तिच्यापासून दोन मुकुटधमन्या निघाल्याचें मागें सांगण्यांत आलेलेंच आहे. महाधमनीच्या कमानीच्या शिखरांपासून तीन मोठया वाहिन्या निघतात, त्या शिर (डोकें), मान व हातपाय यांनां रक्त पुरवण्यासाठीं आहेत. त्या तिहींपैकीं पहिली, अगदीं उजवीकडची, तिला अनामक धमनी म्हणतात, नंतर आली डाव्या मानेची धमनी, तिला सामान्य वामग्रैवेयक धमनी म्हणतात आणि सरते शेवंटीं जी तिसरी राहिली तिला वामअधोजत्रुधमनी म्हणतात. या तिन्ही वाहिन्यांची विभागणी कशी झाली आहे तें पुढें सांगण्यांत येईल. हा महाधमनीचा कमानीचा भाग, ज्याला पहिला भाग म्हटलें तो वजा केल्यावर बाकी राहिलेला महाधमनीचा भाग उराच्या प्रदेशांतून उभ्या रेषेंत खालीं जात आहे, तो कांहींसा पृष्ठवंशाच्या डाव्या बाजूला आणि नलिकेच्या पाठीमागें आहे. ही महाधमनी उराच्या प्रदेशांतून जात असतां पंजर मध्यस्थ भागांतून म्हणजे बरगडयांच्या मधल्या जागेंत धमन्यांच्या जोडया जोडया सोडीत चालली आङे, त्या जोडयांनां पंजरमध्यस्थ धमन्या म्हणतात. याप्रमाणें मार्गांत शाखा सोडीत जातां जातां शेवटच्या पृष्ठमणीच्या सुमारें सपाटीपर्यंत आल्यावर ही महाधमनी उदरांत प्रवेश करते तेथून ती सारखी चौथ्या कटिमणीच्या खालच्या कडेपर्यंत जाते नंतर तेथें आणि पृष्ठवंशाच्या किंचित डाव्या बाजूला तिच्या दोन शाखा होतात, त्यांपैकं एका शाखेला दक्षिण सूक्ष्मांत्रमूल धमनी आणि दुसर्‍या शाखेला वामसूक्ष्मांत्रमूल धमनी म्हणतात. महाधमनीच्या या ठिकाणच्या या भागापासून अनंत शाखा निघतात त्या उदराच्या भिंतींकडे व उदराच्या पोंकळींत समाविष्ट वस्तूंकडे गेलेल्या आहेत; त्यांत दोन महत्वाच्या धमन्या आहेत त्या मूत्रपिंड धमन्या होत. मूत्रपिंड धमन्या ह्या दोन्ही बाजूंच्या मूत्रपिंडाकडे चालल्या आहेत.

सामान्य सूक्ष्मांत्रमूल धमन्या मोकळया आहेत, व त्यांचे लवकरच बहिःसूक्ष्मांत्रमूल धमनी व अंतःसूत्रक्ष्मांत्रमूल धमनी असे विभाग झाले आहेत. त्या विभागांपैकीं बहिःसूक्ष्मांत्रमूल धमनी बस्तिप्रदेशाच्या कडेनें (ओटीपोटीच्या कडेनें) जाऊन पायांकडे जाते, व अंतःसूक्ष्मांत्रमूल धमनी खुद्द बस्तिपदेशाच्या पोकळींत जाऊन तेथच्या समाविष्ट वस्तूंनां रक्ताचा पुरवठा करते,व पुन्हा आपल्या कांहीं शाखा नितंब (ढुंग) व विटप (दोन मांडयांच्या मधली गुरुद्वारापासून जननेंद्रियापर्यंतची जागा) यांच्याकडे पाठवते.

शीर व मान यांच्या धमन्या- मानेच्या दोन्ही बाजूंनां सामान्य अशी वाहत असणारी एक धमनी आहे तिला ग्रैवेयक धमनी म्हणतात, ती ठुसठुस अशी वाहत असलेली पुष्कळ माणसांत हाताला लागून कळते. उजव्या बाजूची ग्रैवेयक धमनी ही अनामक धमनीपासून निघते, व डाव्या बाजूची ग्रैवेयक धमनी ही थेट महाधमनीपासून निघते. कंठस्थलीं असणार्‍या मृद्वस्थीच्या अथवा कंठकूर्चेच्या वरच्या कांठाच्या सपाटीशीं - कंठकूर्चा हा शब्देंद्रियाचा अथवा स्वर स्त्रोताचा भाग मानेच्या वरच्या भागाशीं हाताला तेव्हांच लागून कळतो - ग्रैवेयक धमनीचे दोन विभाग होतात त्यांपैकीं बहिग्रैंवेयक धमनी हा विभाग चेहरा, माथा तोंड आणि घसा यांनां पुरवठा करतो, आणि दुसरा विभाग अंत ग्रैंवेयक धमनी ही प्रत्यक्ष मेंदूला पुरवठा करणार्‍या धमन्यांपैकीं मुख्य धमनी होय. तशीच देखील मानेकडे वर गेलेली पण जी फार खोल राहिलेली आहे, कारण जी ग्रैवेयक मण्यांचीं तिर्य श्रृंगें म्हणजे वर आलेले तिर्कस् उंचवटे यांच्या अल्प छिद्रांत एशी एक धमनी आहे तिला वर्तकी धमनी म्हणजे पृष्ठमणीविषयक धमनी म्हणतात; ही देखील धमनी मानेच्या दोन्ही बाजूंनां आहे. (ही धमनी म्हणजे ज्या धमनीचें वर्णन पुढें येणार आहे त्या अधोजत्रु धमनीची शाखा आहे). ही वर्तकी धमनी अंतग्रैवेयक धमनीप्रमाणेंच डोक्याच्या कवटींत प्रवेश करते. या ठिकाणीं दोन वर्तकी धमन्या परस्परांनां मिळून त्यांची मस्तकाच्या तळाची म्हणून एक धमनी तयार होते. ही मस्तकाच्या तळाची धमनी तीहि पण आपल्या पाळीनें दोन भागांत विभागली जाते, व मेंदूच्या तळाशीं अंतग्रैवेयक धमन्यांचा जो वेढा आहे ज्याला 'वुइलिस् सर्कल' म्हणतात. त्या वेढयांत अगदीं मोंकळेपणें गुंतागुतीनें फिरून नंतर मग मेंदूंत जाऊन वांटली जाते. यावरून हें ध्यानांत येल कीं, मज्जातंतूच्या चलनाचें मध्यवर्ती ठाणें जो मेंदू त्याला धमनीगत रक्ताचा सडकून पुरवठा झाला आहे.

ऊर्ध्वशाखेच्या धमन्या- दक्षिण सामान्य ग्रैवेयक धमनी बरोबरच अनामक धमनीपासून येणारी दक्षिण अधोजत्रु धमनी आहे, व वामअधोजत्रुधमनी ही थेट महाधमनीपासून निघत आहे. दोन्ही अधोजत्रुधमन्यांनीं पहिल्या फांसोळीवर कमान केली आहे व नंतर त्या कांखेंत गेल्या आहेत, त्या ठिकाणीं त्यांनां कक्षानुगा धमन्या, (कांखेच्या धमन्या) हें नांव मिळालें आहे. या कक्षानुगाधमन्या आपल्या मार्गांत जात असतांना जत्रु म्हणजे गळसरीच्या हाडाच्या वरती ठुसठुस वाहात असलेल्या दाबून पाहिल्यानें हाताला कळून येतात, आणि पहिल्या फांसोळीच्या वर सहज चेपतां येतात. अधोजत्रु धमनी आपल्या मार्गाच्या पहिल्या भागांतच एक महत्वाचा फांटा सोडते त्याला वर्तकी धमनी म्हणतात, हें वर सांगण्यांत येऊन गेलेंच आहे. कांखेच्या बहुतेक भागांत आंत खोल राहून वाहणारी ही कक्षानुगा धमनी कांखेचा प्रांत आक्रमून जाते; नंतर ती कांखेच्या जागेच्या खालच्या कांठाशीं बाहुगतधमनी होते. कांखेच्या दोन्ही दुमडीच्या मधल्या जागेचा पुढचा तिसरा हिस्सा व मागचा दोनतृतीयांश हिस्सा या दोन्ही हिश्शांच्या संगमबिंदुपासून तों भुजास्थीच्या दोन्ही पर्वांगाच्या (हांडांच्या गांठाळलेल्या वाटोळया टोंकांच्या) मधील अर्धभागाच्या बिंदूपर्यंत, आणि कोपर्‍याच्या मोडीच्या एक इंच खालीं अशी जर एक रेषा काढली तर ती रेषा बाहुगत धमनीचा मार्ग दाखविणारी होईल. बाहुगत धमनीचे वर सांगितलेल्या ठिकाणीं गेल्यावर तेथें दोन विभाग होतात. (आकृति नं. ३० पहा.) ही धमनी आपल्या मार्गाच्या सर्व वाटभर वरवर राहून वाहणारी अशी आहे, आणि भुजास्थीच्या वरती अगदीं सहज चेपून धरली जाण्यासारखी आहे. ज्या दोन भागांमध्यें ही धमनी विभागली जाते त्यांपैकीं एक भाग अंगुष्ठमूलाश्रित धमनी म्हणजे आंगठयाच्या मूळाजवळची नाडी, व दुसरा भाग अंतःप्रकोष्ठीयधमनी हे होत. पुढच्या हाताच्या (कोंपरापासून मनगटापर्यंतच्या) बाहेर बाजूनें मूळ सुरवातीच्या बिंदूपासून तों थेट मनगटाशीं जेथें हाताला ठुसठुस चालत असलेली अशी लागते त्या जागेपर्यंत ही अंगुष्ठमूलाश्रित धमनी बहुतेक सरळ रेषेंत वाहत असणारी अशी आहे, व हिलाच हाताची नाडी असें म्हणतात. नंतर ही धमनी हाताच्या (पंजाच्या) बाहेरच्या बाजूला वळून पहिल्या व दुसर्‍या करभास्थींच्यामध्यें लगेच करतलांत बुडून जाते. अंतःप्रकोष्ठीय धमनी ही प्रथम बांक घेऊन वाहत येते, नंतर पुढच्या हाताच्या कोपरापासून मनगटापर्यंत हाताचा खालचा दोनतृतीयांश भाग व वरचा भाग यांच्या संगमस्थानीं ती धमनी आल्यावर मग तेथून पुढें मनगटापर्यंत उभ्या सरळ रेषेंत वाहत येते, आणि मग करतलांत जाते. अंतःप्रकोष्टीय धमनीच्या वरच्या भागांत तिच्यापासून एक धमनी निघते ती पुढच्या हाताच्या मागच्या बाजूचें पोषण करण्याला जाते. खुद्द करतलांत धमन्यांच्या दोन कमानी झाल्या आहेत. एक अगदीं वरवरची ती करतलांत वरुन खालीं अर्ध्या रस्त्यावर आहे, व दुसरी कमान आंत खोल असलेली ती वर सांगितलेल्या अर्ध्याच्या कांहींशीं वर आहे.

अधःशाखेच्या धमन्या-बहिःसूक्ष्मांत्र मूलधमनी वरच्या भागांत जाते, कटिकपालाचा ऊर्ध्व अग्रवर्ती पृष्ठवंश म्हणजे कडेच्या हाडाच्या पृष्ठवंशाचा वरील पुढचा भाग आणि जघनास्थिसंधि या दोहोंच्या मधील अर्ध रस्त्यावर जरुर लागल्यास ही धमनी गुह्यरोम प्रदेशाच्या हाडांवर चेपून धरतां येणारी आहे. मांडींतील धमनीला जंगास्थिगत धमनी म्हणतात. (आकृति नं. ३१ पहा.) पाय बाहेरच्या बाजूला चक्रगति असा फिरवला आणि किंचित आंत वांकवून घेतला, आणि नंतर वर जी बहिःसूक्ष्मांत्र मूल धमनीची चेपून पाहण्याची जागा सांगण्यांत आली त्या जागेपासून, ऊर्वस्थीच्या म्हणजे मांडीच्या हाडाच्या पर्वांगांत वरती म्हणजे हाडाच्या गांठाळलेल्या टोंकाच्या वरती जो उंचवटा हाताला लागतो तेथपर्यंत एक सरळ रेषा काढली, तर या जंघास्थिगत धमनीचा मार्ग रेखाटतां येईल. या रेषेचा वरचा दोनतृतीयांश भाग ही जंघास्थिगत धमनी झाली, आणि खालचा एकतृतीयांस भाग राहिला तेथच्या धमनीला मंदिरगत धमनी म्हणजे ढोंपराच्या मागच्या बाजूची धमनी म्हणतात, ही धमनी जंघास्थिगत धमनीचाच विस्तार होय. मंदिरगत धमनी ही जानुसंधीच्या पाठीमागे असते, आणि त्या संधीच्या सुमारें दोन इंच खालीं त्या धमनीचे दोन भाग होतात, त्यांनां अग्रवर्ती आणि पश्चाद्वर्ती अंतर्जंघास्थिगत धमन्या म्हणतात. अग्रवर्ती अंतर्जंघास्थिगत दमनी ही अंतर्जंघास्थि आणि बहिर्जंघास्थि या दोहोंच्या मधून तंगडीच्या दर्शनी भागाला बाहेरच्या बाजूवर जाते. (आकृति नं. ३१ पहा.) ही धमनी प्रथम अगदीं खोल राहिली आहे पण तंगडीच्या खालच्या भागांत ती उंच वरवर आली आहे व घोंटयाच्या पुढच्या पृष्ठभागांत मागच्या आणि पुढच्या घोंटयांच्यामध्यें अर्ध रस्त्यावर ही धमनी वहात असलेली हाताला कळून येते. या धमनीचा तसाच पुढें विस्तार पावलाच्या मागची धमनी या रुपानें पावलाकडे जातो, व तेथें ती लवकरच पहिल्या दुसर्‍या प्रपदास्थीमधून म्हणजे पायाच्या चवडयाच्या हाडामधून तळपायांत बुडी मारते. पश्चाद्वर्ती अंतर्जंघास्थिगत धमनी ही उघडपणें तंगडीच्या पाठीमागें आंतील बाजूला असणार्‍या मंदिरगत धमनीचा विस्तार आहे. ही धमनी सुद्धं तिच्या वरच्या भागांत खोल अशीच राहिली आहे, व तेथून तिची एक मोठी शाखा फुटते तिला बहिर्जंघास्थिस्नायुग्रत धमनी म्हणतात, ही तंगडीच्या मागच्या भागच्या बाहेरच्या बाजूवर बहिर्जंघास्थीला अगदीं निकट अशी वाहते. आंतल्या घोंटयांजवळ पश्चाद्वर्ती अंतर्जंघास्थिगत धमनी वाहत असलेली हाताला कळते, आणि लवकरच तिचे बहिर्पादतल व अंतर्पादतल धमन्या असे विभाग होऊन त्या धमन्या अनुक्रमें बाहेरच्या व आंतल्या तळपायाला रक्ताचा पुरवठा करतात.

आतांपर्यंत वर ज्या धमन्या सांगण्यांत आल्या त्या बहुतेकांच्या समागमेंच जाणार्‍या शिरा असतात, त्या खोल राहणार्‍या आहेत, पण त्यांशिवाय त्यांच्या भरीला पुष्कळ शिरांची संख्या आहे व त्या अगदीं वर वर वाहणार्‍या अशा आहेत. या वरवर वाहणार्‍या शिरा फुगून लठ्ठ होण्याला फार पात्र असतात त्यासाठीं त्यांच्यापैकीं कांहींचा नामनिर्देश या ठिकाणीं केला पाहिजे. ऊर्ध्वशाखांत बाहु जर कोंपराच्या वरती मुठींत घट्ट पकडून धरला तर कित्येक शिरा त्या सांध्याच्या समोर इंग्रजी 'एम्' या वर्णाक्षराच्या आकृतींत उमटलेल्या दिसतील. कांहीं माणसांत बहिठस्थ शिरा ग्रैवेयक धमनीबरोबरच खोल राहिलेली आहे. अधःशाखांत तंगडीच्या भागांत आंतलीं 'सफिना' नामक शिरा ही फूगुन लठ्ठ होण्याचें पुष्कळ वेळा हें स्थान असतें. ही शीर पावलाच्या वरच्या भागांत कमानीसारखी राहून तिचा आरंभ होतो, नंतर तीं आंतल्या घोटयाच्या पुढील बाजूशीं वर चढते व ती तंगडीच्या आंतल्या बाजूनें ऊर्ध्वंस्थीच्या आंतील पर्वांगाच्या पाठीमागें जाऊन, तेथून मांडीच्या आंतल्या बाजूनें 'पोपट्र्स लिगॅमेंट'च्या अगदीं जवळ खालपर्यंत येते. ( पोपट्र्स लिगॅमेंट म्हणजे कटिकपालाचा कांटा व जंघनास्थीचा कांटा या दोहोंमध्यें जो तंतुमय पट्टा आहे व जो ताण दिला असतां भासमान होणार असतो तो). तदनंतर ही 'सफीना' नामक शिरा खोल शिरून जंघास्थिगत धमनीच्या आरंभ स्थानाच्या बाजूनें जंगास्थिगत शिरेला मिळण्याला जाते.

श्वासोच्छवांसेंद्रीयव्यूह

उच्च वर्गाच्या इतर प्राण्यांप्रमाणेंच सकल मानवी प्राण्यांनां आपल्या शरीरांतील सर्व पटांनां प्राणवायु पोहोंचावा म्हणून रक्तांत हवा घेण्याची फार जरुरी आहे म्हणून शरीरांत एक विशिष्ट उपकरण ठेवलें आहे, व त्याच्या योगानें बाहेरची हवा रक्ताच्या अगदीं निकट सन्निध येते. हें उपकरण म्हणजे ज्यांत पोकळ, पेशीमय अशीं दोन इंद्रियें आहेत व ज्यांनां फुफ्फुसें म्हणतात तें होय, आणि त्यांत बाहेरची हवा त्या इंद्रियांत नेण्याकरितां कांहीं नळया आहेत. आपण नाकावाटें किंवा तोंडावाटें वातावरणांत श्वासोच्छवास करूं शकतों, पण या दोन द्वारांत नाक हें योग्य द्वार होय म्हणून नाक हें घ्राणेंद्रियाची जागा असून त्याशिवाय श्वासोच्छवासेंद्रियव्यूहाचाहि एक भाग आहे.

ज्या नाकपुडया नासाविटप अथवा नासापटलानें एकमेकांपासून निराळया झाल्या आहेत, अशा त्या पुढच्या नाकपुडयांवाटें नासापुटांत प्रवेश करणारी हवा नासापुटांतील जागा आक्रमून, नाकाच्या पाठीमागच्या द्वारांतून नासासप्तपथांत अथवा घशाच्या वरच्या भागांत जाते. नंतर ज्या ठिकाणीं स्वर अथवा ध्वनि उत्पन्न होतो त्या स्वरस्त्रोताच्या अगर शब्देंद्रियाच्या वरतीं जें द्वार आहे तेथें ती हवा जाऊन पोहोंचते.

शब्देंद्रियाच्या घटनेंत स्पष्टपणें मोठया तीन एकेरी अस्थिकूर्चा, व तीन जोडया अतिशय बारीक कूर्चांच्या आलेल्या आङेत व त्या सर्व एकत्र मिळून शब्देंद्रियाचें बाहेरचें घाटकाम बनलें आहे, व या रचनेचे सर्व भाग एकमेकांवर सरकणारे आहेत (आकृति नं. ३२ पहा.). या कूर्च्यांपैकीं म्हणजे मृद्वस्थींपैकीं सर्वांत मोठी जी कूर्चा तिला कंठकूर्चा म्हणता, आणि जिव्हास्थीच्या खालीं लगतच, मानेच्या मध्यरेषेंत ही चांचपून पाहिल्यानें कळतें. पुरुषांत ही कंठकूर्चा अतिशय स्पष्ट ध्यानांत येण्यासारखा असा उंचवटा असतो, याला इंग्रजींत-बहुतेक 'आडाम्स ऍपल' म्हणतात, व आपण कंठमणी म्हणतों. या कूर्चेचीं पार्श्व भागाचीं दोन्हीं अर्धें पुढील बाजूला एकमेकांशी मिळून आलेलीं आहेत, परंतु पाठीमागच्या बाजूला एकमेकांपासून पुष्कळ दूर झालेलीं मुद्रिकाकार कूर्चा ही कंठकूर्चेच्या लगतच खालीं आहे, आणि हिचा आकार सीलाच्या आंगठीसारखा आहे, व श्वासोच्छवासविषयक मार्गाशीं संबंध असलेल्यांत आंगठीच्या पूर्ण आकाराची अशी ही एवढीच कूर्चा आहे. ती पुढच्या बाजूला अरुंद असून मागच्या बाजूला रुंद आहे. ज्यांनां दर्व्याकार अथवा खजाकाकार कूर्चा म्हणतात, (ज्या पिरामिडच्या आकारासारख्या आहेत) ज्या अतिशय लहान परंतु फार महत्वाच्या आहेत, त्यांची जोडी मुद्रिकाकार कूंर्चेच्या पाठीमागच्या बाजूंत तिच्यावरती चढलेली आहे. दर्व्याकार कूर्चांपैकीं प्रत्येक कूर्चेंच्या पुढच्या आणि खालच्या कोनाशीं एक तंतुमय पट्टा जडलेला आहे त्याला ध्वनिजनक रज्जु म्हणतात, व या पट्टयाच्या दुसर्‍या टोंकानें तो पट्टा पुढल्या भागी कंठकूर्चेच्या पाठीमागच्या पृष्ठभागाशीं कायम करुन टाकला आहे. ध्वनिजनक रज्जूच्या दर्व्याकार कूर्चाशीं जडलेल्या दोन्ही पट्टयांमधील जें द्वार त्याला श्वासमार्गाची फट अथवा चिरण म्हणतात. ध्वनिजनक रज्जूंचे पुढील भागीं जे संयोग झालेले वर सांगितलें त्या संयोगास्थानांच्यावर पर्णाकार कूर्चा आहे. ही कूर्चा अन्न गिळतांनां शब्देंद्रियाचें वरचें द्वार झांकून घेतें, आणि त्यायोगेंकरुन अन्न शब्देंद्रियांत जाऊं देत नाहीं. या पर्णाकार कूर्चेला कंठवारपाल अगर श्वासमार्गाचा पडदा म्हणतात.

शब्देंद्रियाच्या मागोमाग येणारी श्वासनलिका आहे, हिलाच कंठनाळ अथवा नरडी हीं नांवें आहेत, व इंद्रिय रचनेंत शब्देंद्रियापासून तों लघुश्वासनलिकेपर्यंत राहणारा जो भाग तोच हा भाग होय. ही श्वाननलिका कुर्चामयवलयांच्या मालिकेनें बनविलेलीं आहे. हीं कुर्चावलयें श्वासनलिकेच्या मागील बाजूला अपूर्ण राहिलेलीं आहेत, परंतु पुढच्या बाजूला तंतुमय पटांच्या योगानें एकमेकांशीं जडलेलीं आहेत, व त्याच तंतुमय पटानें मागच्या बाजूला मोकळी राहिलेली जागा भरून काढली आहे. शब्देंद्रियाच्या पाठींमागें अन्ननलिका म्हणजे घशापासून पक्काशयापर्यंत जाणारी नळी आहे. शब्देंद्रियाच्या खालच्या भागाच्या दोन्ही बाजूला आणि श्वासनलिकेच्या वरच्या भागांत भरीव, घट्ट असें ग्रंथिवत इंद्रिय आहे, पण त्या इंद्रियाला नळ नाहीं, म्हणजे प्रवाही पदार्थ वाहून नेणारी नलिका त्याला नाहीं. या घन इंद्रियाचीं दोन अर्धें, श्वासनलिकेच्या तिसर्‍या आणि चौथ्या कडीच्या मध्यरेषेंत आडवी अशीं एकमेकांला त्यांच्यामध्यें येणार्‍या एका भागानें जडलेलीं आहेत, व त्या भागाला त्या इंद्रियाची मान अथवा त्याचा आकुंचन झालेला भाग म्हणतात. वर सांगितलेल्या सबंध इंद्रियाला कंठस्थळीं असणारा विशेषग्रंथी किंवा कंठग्रंथि म्हणतात. अगदीं लहान मुलांत या कंठग्रंथीसारखें दुसरें एक ग्रंथिमय इंद्रिय श्वासनलिकेच्या खालच्या भागांत पुढील बाजूला असतें. या दोन्ही ग्रंथींच्या तें श्वासोच्छवासेंद्रिय व्यूहाच्या लगत असण्यापलीकडे त्यांचा त्या व्यूहाशीं जवळचा संबंध कांहीं नाहीं. परंतु सोईसाठी त्यांचा या ठिकाणी नामनिर्देश केला इतकेंच काय तें आहे.

सुमारें साडेचार इंच लांबीवर श्वासनलिकेचे दोन भाग होतात, व तेथें तिला दोन आंखुड नळया फुटतात त्यांनां लघुश्वासनलिका म्हणतात, व त्यांची सामान्य रचना श्वासनलिकेसारखीच असते. दक्षिण श्वासनलिका ही वाम लघुश्वासलिकेपेक्षां जारमोठी आहे, तिच्यापेक्षां अधिक क्षितिजसमांतर म्हणजे आडवी अशी आहे (आकृत नं. ३२). या लघुश्वासनलिकेपैकीं प्रत्येकीचे भाग, त्यांचे प्रतिविभाग होत जातां जातां त्यांच्या लहान, त्याहून अधिक लहान अशा वाहिन्या बनतात. (या वाहिन्या म्हणजे रक्तवाहून नेणार्‍या वाहिन्या नव्हेत, तर त्या हवा वाहून नेणार्‍या वाहिन्या होत हें लक्षांत येईलच) या वाहिन्या फुफ्फुसांच्या सर्व भागांतून घुसून, सरतेशेवटीं त्या जेथें समाप्त होतात त्या ठिकाणीं त्यांच्या पेशींचे म्हणजे हवेच्या अथिसूक्ष्म पिशव्यांचे गटच्या गट बनवतात. या हवेच्या पेशींनां गराडा घालून फुफ्फुस धमन्यांपासून निघालेल्या अनंत केशवाहिन्या असतात, व त्यांच्यामुळें रक्त या पेशींतून भरलेल्या हवेशीं अगदीं निकट संबंधांत येतें.

यावरून हें लक्षांत येईल कीं, फुफ्फुसें ही स्पंजासारखीं सच्छिद्र लवचिक अशा मोठया पिशव्या आहेत, व त्या उराच्या पोकळींत हृद व त्यापासून निघणार्‍या धमन्या, अन्ननलिका यांनीं व्यापून बाकीच्या राहिलेल्या जागेंत दोन्ही बाजूंनां बरोबर बसलेल्या आहेत. फुफ्फुसें गुळगुळीत व लवचिक अशा आवरणत्वचेनें झांकलीं आहेत, व त्या त्वचेला पंजरांतस्त्वचा किंवा फुफ्फुस वेष्टण म्हणतात, व त्याच आवरण त्वचेनें छातीच्या भिंतीचा आंतील पृष्ठभाग व मध्यपटलावरील पृष्ठभाग या दोहोंनां मढवून सोडलें आहे.

या आवरणत्वचेच्या ज्या भागानें फुफ्फुसांचा भाग झांकला आहे त्या भागाला शरीरपुटांतर्गतवस्त्वाच्छादक फुफ्फुसवेष्टण व ज्या भागानें छातीच्या भिंती मढविल्या आहेत त्या भागाला भित्याच्छादक फुफ्फुसवेष्टण म्हणतात. हे जे दोन भाग सांगितले म्हणजे, फुफ्फुसांनां झांकणारा व छातीच्या आंतील भिंती मढविणारा या दोहोंमध्यें जी पोकळ जागा राहते तिला फुफ्फुसवष्टणासंबंधीं पोकळी म्हणतात. ही पोकळी थोडयाशा रक्तरसाच्या द्रवानें बुळबुळीत करुन टाकण्यांत येत असते, त्यामुळे श्वासोच्छवासाच्या वेळीं छातीच्या होणार्‍या हालचालींत फुफ्फुसें उराच्या भिंतीवर त्या भिंतींशीं घर्षण न होतां सरपटत असतात. दोन्ही फुफ्फुसांत मोठें असणारें जें उजवें फुफ्फुस त्याला तीन पाळया म्हणजे वाटोळया वळणाचे भागआहेत, पण ज्या अर्थी हृदयानें डाव्या भागांत जागा व्यापून टाकली आहे त्यामुळें डावें फुफ्फुस लहान आहे, व त्याला फक्त दोनच पाळया आहेत. प्रत्येक फुफ्फुसाचाच वरचा भाग निमुळता आहे व त्या भागाला शेंडा म्हणतात. व इकडे खालचा रुंद भाग मध्यपटलाच्या ऊर्ध्व बहिःपृष्ठभागावर स्थिर आहे व त्या भागाला बूड म्हणतात. दोन्हीं फुफ्फुसें बाहेरुन बाह्यगोल परंतु आंतून अंतर्गोल आहेत. फुफ्फुसांत आंतल्या बाजूला त्यांच्या शेंडया आणि बुडख्यामधील अंतराच्या सुमारें अर्ध्या रस्त्यावर फुफ्फुसांचें मूळ म्हणून ज्याला म्हटलें गेलें आहे तें आहे, व या मूळांत फुफ्फुस धमनी फुफ्फुसायात शिरा, लघुश्वासनलिका व तिच्याबरोबर तिच्या रक्तवाहिन्या, त्याचप्रमाणें लसिकावाहिन्या अथवा शोषक रसवाहिन्या व मज्जातंतु इतक्या गोष्टी आलेल्या आहेत.

उत्सर्जकव्यूह व शोषणक्षमव्यूह.

उत्सर्जकव्यूह-शरीराच्या पटांत रासायनिक व इतर जातींचीं जीं निरनिराळीं स्थित्यंतरें होत असतात, त्यांमुळें निरनिराळया टाकाऊ अशा वस्तू उत्पन्न होतात, व त्या जर शरीरांत राहिल्या गेल्या तर त्यांच्यापासून शरीराला अपाय होऊं शकतात. यासाठीं निसर्गानें काहीं इंद्रियांची तरतूद करून ठेवली आहे व त्या इंद्रियांच्यामुळें त्या टाकाऊ वस्तू मोकळया होऊन दूर केल्या जाताता, या इंद्रियांनां मलोत्सर्जक अथवा उत्सर्जक इंद्रियें म्हणतात. या उत्सर्जक इंद्रियांची वर्गवारी येणेंप्रमाणें (१) मूत्रपिंडअथवा वृक्कासंबंधीं म्हणजे मूत्रपिंडासंबंधीं इंद्रियें व त्यांबरोबर त्यांचे नळ (मूत्रनलिका) आणि त्यांच्या अन्तरोत्सर्गाकरितां भाजन, मूत्राशय; (२) त्वचेचे स्वेदविमोचक अथवा धर्मविमोचक पिंड; (३) यकृत् (४) अंत्र; (५) फुफ्फुसें. येणेंप्रमाणें हीं पांच इंद्रियें उत्पन्न होणार्‍या टाकाऊ वस्तूंचा निकाल लावण्यासाठीं आहेत. यांपैकीं स्वदेविमोचकपिण्ड आणि मूत्रपिण्ड यांचा या भागांत विचार करण्यातं यावयाचा आङे, बाकीच्यांचा विचार करण्याची आतां गरज नाहीं कारण त्यांबद्दल खुलासा याच्या मागचे जे भाग लिहिले गेले त्यांच्यांत झालेलाच आङे.

मूत्रपिंडांची दोन संख्या आहे व ते उदराच्या पाठी मागच्या बाजूला वरच्या कटिमण्यांच्या दोन्ही बाजूला राहिलेले आहेत. त्या प्रत्येक मूत्रपिंडाची लांबी सुमारें चार इंच, रुंदी अडीच इंच, आणि जाडी दीड इंच आहे, व प्रत्येकाचें वजन सुमारें साडेचार औंस म्हणजे सव्वा आकरा तोळे भरेल. आकारांत ते काहीसें अंडाकृति आहेत व त्यांची बाहेरची कडा बाह्यगोल व आंतली कडा अंतर्गोल आहे, म्हणजे वस्तुतः त्यांचा आकार उडदाच्या दाण्याच्या आकारासारखा आहे. मूत्रपिंड हे चरबीच्या गोळयांत पुरुन गेलेले आहेत व त्याच चरबीला प्रचारांत 'सुइट्' म्हणतात, त्याचा अर्थ मूत्रपिंडांच्याभोंवतीं सांचलेला घट्ट चरबीचा पट अथवा व समयपट असा आहे, मूत्रपिंडांच्या सभोंवार टोपण अथवा तंतुमय कवच आहे. आंतील भागांत एका जागीं, ज्या जागेला बीजनाभी म्हणतात तेथें उदरगत धमनीचीच जी एक मोठी शाखा जी वृक्कधमनी ती प्रवेश करते, आणि अधोबृहत् शिरेला जाऊन मिळणारी वृक्कशिराहि त्याच जागेपासून मूत्रपिंडाच्या नळासह म्हणजे मूत्रवाहक नलिकेसह निघते (आकृति नं.३४ पहा).

ही एक गोष्ट ध्यानांत येईल कीं रक्ताचा मोठा प्रवाह एकसारखा मूत्रपिण्डविषयक इंद्रयांच्या वाहिन्यामधून चालला आहे, त्या इंद्रियांपासून टाकाऊ वस्तू दूर केल्या जात आहेत आणि त्यांत पाणी निराळें काढून घेण्यांत येत असतें, त्या पाण्यानें ज्याला मूत्र म्हणतात तो उत्सर्ग बनवला जाऊन तो द्रव मूत्र नलिकांवाटें पोकळ असें जें स्नायूमय इंद्रिय ज्याला मूत्राशय म्हणतात त्यांत खालीं उतरून गोळा होत असतो. हा मूत्राशय उदराच्या खालच्या भागांत कटीर अथवा बस्तिप्रदेशांत जघनास्थिसंधीच्या पाठीमागें अगदीं जवळ असा आहे. त्याचा आकार अंडाकृति किंवा शंक्वाकार असा आहे, आणि त्याला तीन द्वारें आहेत. पैकीं दोन द्वारें ज्या ठिकाणीं मूत्रनलिका येऊन संपतात त्या ठिकाणीं म्हणजे पाठीमागच्या खालच्या भागांत आहेत, आणि तिसरें द्वार ज्याला मूत्रपथ म्हणतात त्या पन्हळीचा जें आरंभस्थान तें होय, या मूत्रपथावाटे मूत्र बाहेर सुटतें. या मूत्रपथाच्या सुमारें आरंभाशीं म्हणजे मूत्राशयाच्या मानेशीं वर पट्टे नसलेल्या अशा जातीच्या स्नायूंच्या तंतूंचा जमाव त्या मानेभोंवतीं रचला गेला आहे, आणि अशा या स्नायुमय तंतूनें तोंडावरचा एक बंदाचा स्नायू झालेला आहे, या बंदाच्या स्नायूचें जेव्हां आकुंचन होतें तेव्हां मूत्राच्या बाहेर येणार्‍या प्रवाहाला प्रतिबंध होतो.

स्वेदविमोचक अथवा धर्मविमोचक पिण्ड हे शरीरांत पराकाष्टेचे असंख्य आहेत, व कांहीं इंद्रियांत तर ते असेच आहेत, जसें कांखा, नाक आणि कपाळ. हे पिंड त्वचेमध्यें असतात व पुष्कळशा वेंटाळीं घातलेल्या नळ्या व त्यांबरोबर द्रव वाहून नेणारा नळ यांनीं हे घटित असतात, हा द्रव वाहून नेणारा नळ बाह्यत्वचा अथवा अगदीं वरच्या कातडीमधून जात असतांना बाटलीचें बूच काढण्याच्या स्क्रूसारखा तो पीळ भरलेला असतो. या पिंडांनां रक्ताचा पुरवठा चांगला होत असतो.

शोषणक्षमव्यूह- हा व्यूह नलिका आणि शोधकमांसपिंड यांनीं घटित आहे म्हणजे, या व्यूहांत या गोष्टी भरलेल्या आहेत. या नलिकांनां लसिका अथवा शोषण केशवाहिन्या व लसिका वाहिन्या म्हणतात, व या वाहिन्या लसिकापिंडांतून जाऊन, नंतर एकत्र मिळून त्यांचे मुख्य दोन प्रवाह होतात, त्यांपैकीं जो मोठा प्रवाह त्याला उरोनलिका म्हणतात. हे दोन्ही प्रवाह आपण स्वतः प्रत्येक बाजूला एक असे मानेच्या मूळाशीं अंतःकंठस्थ शिराव अधोजत्रुशिरा यांच्या संगमांत जाऊन सुटतात. शरीराचे सर्व पटलसिकाकेशवाहिन्यांत मुरलेले आहेत. पटांनां आपल्यामध्यें वस्तू घेण्याचें दुहेरी कार्य साधत आहे म्हणजे, महास्त्रोताच्या प्रदेशांत पचवलेल्या वस्तु ज्यांनां धातुप (अन्न पोटांत गेल्याबरोबर प्रथम त्यांचा आमरस बनतो. नंतर या आमरसापासून धातुप व मल हीं उत्पन्न होतात. धातुप लसिका वाहिनींत जातो; व मल मलाशयांत जातो.) म्हटलें आहे त्याचा पुष्कळसा भाग त्यांनां मिळतो. आणि इतर पटांत प्रमाणबाह्य म्हणजे वाजवीपेक्षां जास्त झालेला द्रव शोषण करण्याला सांपडतो.

पचनेंद्रियव्यूहाचया लसिका अथवा शोषकवाहिन्या अंत्रांच्या भिंतींत मनस्वी आहेत, आणि त्या एकत्र मिळून त्यांच्या मोठमोठया वाहिन्या बनतात व त्यांनां अन्नरसवाहिन्या म्हणतात. लहान आंतडयांनां चिकटलेल्या त्वचेंत म्हणजे लघ्वांत्रावरण त्वचेंत राहिलेल्या लसिकापिंडांच्या जाळीच्या भोंकांतून त्या अन्नरसवाहिन्या आपल्यांतील समाविष्ट वस्तू नेऊन बाहेर काढून त्या वस्तूंचा मोठा अंश उरोनलिकेच्या रुंदावलेल्या भागांत, ज्या भागाल धातुपाशय म्हणजे पचवलेल्या अन्नाचा रस ठेवण्याची जागा म्हणतात त्यांत नेऊन सोडतात. या धातुपाशयापासून हा नळ पुढें तसाच मध्यपटल व वक्षःस्थळ यांमधून वर जाऊन तो वरती सांगण्यांत आल्याप्रमाणें कंठस्थशिरा व अधोजत्रुशिरा यांच्या संगमाला जाऊन मिळतो. धडाच्या आणि हातांपायांच्या लसिकावाहिन्यांचे सामान्यपणें एक वरवरचा व दुसरा खोल असणारा असे दोन विभागांचे जोड आहेत. त्यांचा उद्भव पटांच्या अशभूत भागांच्यामधील असणार्‍या जागांत होतो, आणि कांहीं लांब अगर तोकडा मार्ग वाहून गेल्यावर त्या वाहिन्या लसिकापिंडांत जातात, व तेथें त्यांच्यांतील समाविष्ट वस्तू गाळून शुद्ध होतात. या लसिकापिंडांपैकीं मुख्य मुख्य पिंडांची जागा माहीत असणें फार महत्वाचें आहे, कारण लसिकेचें शोधन करण्याच्या अनुक्रमांत हे पिंड असतांना त्यांचा स्वतःचाच दाह होण्याच पुष्कळ वेळा संभव असतो. डोकें, चेहरा, कान, तोंड, आणि तोंडाच्या आंत असलेले त्याचे रचनागत भाग यांच्या लसिका वाहिन्या जबडयाच्या खालीं व मानेच्या वरच्या भागाचे दोन्ही पार्श्वभाग यांत असलेल्या कितीतरी लसिकापिंडांत जातात.

कांखेंत लसिका पिंडांचे तीन गट आहेत, पहिलागट कक्षागत शिरांच्या समवेत जाणारा, या गटांत ऊर्ध्वशाखांच्या लसिका वाहिन्या जातात. मात्र भुजा व पुढचे हात यांच्या आंतल्या बाजूच्या लसिकावाहिन्या या गटांत जात नाहींत, त्या आपली लसिका भुजास्थीच्या आंतील पर्वांगांच्या किंचित् वर स्थित असा जो लसिकापिंड आहे त्या एकांतच नेऊन टाकतात, त्या पिंडाला पर्वांगोपरिस्थ पिंड म्हणतात. दुसरा गट म्हणजे ही एक लसिका पिंडांची माला कांखेच्या मागच्या घडीच्या पुढील भागांतून खालीं उतरली आहे, व यांच्यांत येणार्‍या लसिकावाहिन्या या खांदा व पाठीचा वरचा भाग यांमधून येणार्‍या आहेत. तिसरा लसिकापिंडाचा गट कांखेच्या पुढच्या घडीच्या पाठीमागच्या भागांतला आहे, या पिंडांत उराच्या भिंतीच्या लसिकावाहिन्या जातात व त्यांतच स्तनांच्या पुष्कळशा लसिकावाहिन्यांचा समावेश आहे.

आडसंधींत अथवा जांघाडांत लसिका पिंडांचे दोन गट आहेत, त्यांपैकीं एक गट कटिकपालाचा कांटा व जघनास्थीचा कांटा या दोहोंमध्यें जो तंतुमय पट्टा आहे त्या पट्टयाच्या वरती बहुतेक क्षितिज समांतर असा स्थित आहे, व या गटांत ज्या भागांच्या लसिकावाहिन्या जाता ते भाग येणेंप्रमाणें - उदराची भिंत, ढुंगणाचा भाग धरून पाठीचा खालचा भाग, गुदद्वारापासून जननेंद्रियापर्यंत दोन्ही मांडयांच्या मधला भाग अथवा गुदद्वाराच्या भोंवतालचा प्रदेश. दुसरा गट वर सांगितलेलया 'पोपटर्स लिगॅमॅटच्या' खाली लंब असा आहे, आणि गटाच्या लसिका पिंडांत अधःशाखांच्या लसिका वाहिन्या जाऊन सुटतात, मात्र त्यांत टांचेच्या व तंगडयांच्या पाठीच्या बाजूच्या लसिकावाहिन्या येत नाहींत, त्या वाहिन्या गुडघ्याच्या सांध्यांत ढोंपराच्या मागच्या बाजूंत जे लसिकापिंड आहेत त्यांत जातात.

मज्जातंतुव्यूह.

शरीराच्या निरनिराळया पटांपासून होणारें ज्ञान त्या पटांच्या मालकाकडून जाणलें जावें म्हणून तें स्वीकारण्याचें एखादें मध्यवर्ती ठाणें असण्याची फार जरुरी आहे, व त्या ठाण्याला तें ज्ञान पोहोंचविण्याच्या मार्गांची गरज आहे; त्याचप्रमाणें हेंहि पण खरें आहे कीं, शरीराच्या कोणत्याहि भागाचें चलन उत्पन्न करण्यासाठीं ज्या स्नायूला आकुंचन करण्याला जागृत करावयाचें, त्या स्नायूमध्यें मूळ चेतना उत्पन्न करण्याला अगर ती चेतना परावृत्त करुन एखाद्या मार्गानें त्या स्नायूकडे पाठविण्याला एखादें केंद्रस्थानहि पाहिजे. हीं कार्यें घडवून आणण्याला ज्या विशिष्ट पटांची नेमणूक झाली आहे त्यांच्याकडून हे व्यापार चालतात, व त्याच पटांनीं मज्जातंतुव्यूह घटित आङे. वर सांगितलेल्या गोष्टींच्या भरीला मज्जातंतुव्युहाचा आणखी एक भाग मनुष्यांत आणि उच्चवर्गाच्या प्राण्यांत आहे, व तो भाग रक्तवाहिन्यांच्या क्रियांचें व उदर आणि वक्षःस्थान यांच्या पोंकळयांतील निरनिराळया समाविष्ट वस्तूंचें नियमन करतो. म्हणून मज्जातंतुव्यूहांत निरनिराळे परंतु ज्यांचा एकमेकांशीं संबंध आहे असे दोन भाग येतात, त्यांपैकीं एका भागाला मस्तिष्कपृष्ठरज्जूमज्जातंतुव्यूह व दुसर्‍या भागाला आनुकंपिकमज्जातंतुव्यूह म्हणतात. मस्तिष्कमज्जारज्जूसंबंधीं भागांत एक मध्यवर्ती स्थान आहे तें दोन भागांचें मिळून झालेलें आहे, ते भाग म्हणजे मस्तिष्क आणि मज्जारज्जू हे होत, आणि त्यांच्याच भरीला ज्यांच्यावाटें परिवर्तक प्रेरणा पोहोंचविल्या जातात त्या मज्जातंतूंच्या ओळी अथवा मज्जातंतूंचे दोरक आहेत, त्यांनां मस्तिष्कीय आणि पृष्ठवंशीय मज्जातंतू असें म्हणतात. आनुकंपिक मज्जातंतुव्यूहाच्या भागाला केव्हां केव्हां ज्ञानतंतुमंडलगतव्यूह असें म्हटलें आङे, या व्यूहांत ज्ञानतंतुग्रंथींची दुहेरी सांखळी अथवा मज्जातुंपिंडांचे गट येतात, या पिंडांचा परस्परांशीं संयोग यांच्या दरम्यान येणार्‍या मज्जातंतूसंबंधीं दोरकांनीं झालेला आहे, व या पिंडांनां पृष्ठवंशीय मज्जातंतू येऊन मिळाले आहेत, किंवा या पिंडांनीं पृष्ठवंशीय मज्जातंतूकडे अगदीं निकट सन्निध अशा आपल्या शाखा सोडल्या आहेत. प्रत्येक ज्ञानतंतूच्या ग्रंथीपासून पुन्हा आणखी कांहीं मज्जातंतूंचे भाग निघाले आहेत त्यांचा कल एकमेकांनां मिळून जाळें बनवण्याकडे फार असतो, त्याला मज्जातंतुसंघात म्हणजे मज्जातंतूंचें जाळें म्हणतात, या तंतूंचीं शेवटें शरीराच्या पुटांतील सर्व समाविष्ट वस्तूंकडे वाटलीं गेलीं आहेत.

शरीरांतील मज्जांतूंचें मेंदू हें मोठें केंद्रस्थान आहे. मनुष्य प्राण्यांत तो अतिशय पूर्णतेस आलेला आहे. मोठया माणसांत त्याचें सरासरीनें वजन तीन पौंड म्हणजे दीड शेर असतें. मेंदू हा कवटीच्या खालीं भरलेला असतो त्यामुळें त्याचें संरक्षण चांगलें झालेलें आहे. वरची अस्थिमय भिंत जर दूर केली तर एक चिवट, घट्ट अशी आवरणत्वचा जिचे भाग अस्थीला अगदीं चिकटून राहणारी अशी दृष्टीस पडेल; या आवरणत्वचेला दृढवेष्टण म्हणतात. त्याच्या आंतल्या बाजूस दुसरें अतिशय नाजूक, पारदर्शक असें आच्छादन असतें त्याला तंतुजालवत् आवरणत्वचा म्हणतात, तिसरी एक आवरणत्वचा प्रत्यक्ष मेंदूंतील द्रव्याला अगदीं जवळ चिकटून राहिलेली अशी आहे, व ती पातळ असून तिच्यांत रक्तवाहिन्यांची पुष्कळशी संख्या असते, व त्या रक्तवाहिन्यांमुळें मेंदूंतील द्रव्याचें पोषण होत असतें. या तिसर्‍या आवरणत्वचेला अंतर्मस्तिष्कावरण म्हणतात. तंतुजालवत् आवरण आणि अंतर्मस्तिष्कावरण या दोहोंच्यामध्यें जी जागा आहे त्या जागेंत कांहींसा जलरूप भाग आहे त्याला मस्तिष्क पृष्ठवंशीय द्रव म्हणतात, कारण असा हा द्रव पृष्ठमज्जारज्जूशीं संबद्ध असलेला दृष्टीस पडतो.

मेंदू हें स्वतः ज्यांत गुंतागुंत फार आहे अशें इंद्रिय आहे. त्याचे मुख्य भाग येणेंप्रमाणें (१) मस्तिष्क (२) मस्तिष्कांग किंवा लहान मेंदू यांच्यांत दोन अर्धें आहेत व हा भाग मस्तिष्काच्या मागच्या भागाच्या खालीं आहे. (३) मस्तिष्काच्या पार्श्वभागांच्या पालिका जोडणारे श्वेततंतू. (४) वेणिस्थान (कांड मज्जा). (आकृति नं. ३६ व ३७ पहा.)

वरिष्ठ प्रतीचे चालक शक्तिदायक मज्जातंतू व ज्ञानवाहक मज्जातंतू यांचीं केंद्रस्थानें मस्तिष्कांत आहेत. इच्छाशक्ति व मनोविकार यांचीं स्पष्टपणें दिसणारी मस्तिष्क ही जागा आहे, व त्याचीं समप्रमाण दोन अर्धें आहेत, त्यांनां गोलार्ध म्हणतात. हीं गोलार्धें दोन आहेत, एक दक्षिण गोलार्ध व एक उत्तर गोलार्ध, व तीं एकमेकांपासून त्यांच्यामध्यें जी उभी खोल भेग अथवा चीर आहे तिच्यामुळें निराळीं झालेलीं आहेत, व तशींच ती दोन्हीं गोलार्धें पाठीमागें खालच्या बाजूला क्षितिजसमांतर अशी दुसरी आणखी एक भेग आहे तिच्यामुळें मस्तिष्कांगापासूनहि निराळीं झालेलीं आहेत हीं दोन्हीं गोलार्धें अंशतः परस्परांशीं संलग्न आहेत. प्रत्येक गोलार्धाच्या पृष्ठभागांत अनियमितपणा फार आहे, कारण ते पृष्ठभाग म्हणजे सारखे सपाट दिसणारे नसून त्यांच्याकडे पाहिलें म्हणजे त्यांत पुष्कळशा घडया पडलेल्या आहेत किंवा त्यांत पुष्कळशा वळकटया एकमेकांवर पडलेल्या आहेत असे दिसतात म्हणून त्या पृष्ठभागांत अनियमितपणा आहे असें म्हटलें आहे, परंतु त्या घडयानें किंवा पुष्कळशा एकमेकांवर पडलेल्या वळयानें त्या गोलार्धांचा एकंदर विस्तार पुष्कळ वाढलेला आहे; या घडयांच्या भेगा अथवा चिरांच्या मध्यें (पन्हळी, तास, खोबणी) अतंर्मस्तिष्कावरण आपल्या रक्तवाहिन्यांसह डुबून राहिले आहे. ताज्या मेंदूच्या घडीच्या अगर वळीच्या मधून जर एक छेद केला तर अशी खूण धरतां येईल कीं, बाहेरचा थर कबरट, कसरट रंगाचा आहे, आणि म्हणून त्याला पाढुरवस्तु अथवा आधूसर द्रव्य म्हटलें आहे, अंमळशी त्याचाच खालीं मस्तिष्कीय वस्तु आहे ती पांढुरकी आहे, व त्याला श्वेतद्रव्य म्हटलें आहे. सोईकरितां मस्तिष्काच्या प्रत्येक अर्धाच्या विभागून दोन पालिका अथवा पाळया केल्या आहेत, या पालिकांचें क्षेत्र त्यांच्याच वरती असणार्‍या अस्थींच्या क्षेत्राशीं कांहीसेसें मिळतें आहे व त्या भागांनां अग्रकपालिका अथवा ललाटपालिका; पश्चिमपालिका सीमंतपालिका अथवा पार्श्वकपाल पालिका; चतूकाशंख पालिका अशीं नांवें आहेत. मस्तिष्काच्या अंतःप्रदेशांतहि कित्येक जागा आहेत त्यांनां मस्तिष्काविवर म्हणतात, त्यांच्यामध्येंसुद्धां मस्तिष्कपृष्ठवंशीयद्रव्य भरलेलें आहे. वेणीस्थान अथवा कांडमज्जा हा मध्य मज्जातंतुव्यूहाचा मोठा महत्वाचा भाग आहे, कारण हृदय आणि श्वासोच्छवासेंद्रियांची क्रिया जे मज्जागोलकपुंज नियमित करतात अगर बेतांत ठेवतात ते मज्जागोलकपुंज त्यांच्यामध्यें आहेत, याशिवाय पृष्ठमज्जारज्जु व मस्तिष्क यांनां एकमेकांशीं जोडून देणारी जी मज्जागोलांनीं बनवलेली मज्जारेषा तीमधून जात आहे तिचे प्रदेश या वेणिस्थानांत आहेत.

पृष्ठमज्जारज्जु हा मज्जातंतुद्रव्याचा भरलेला वर्तुळस्तंभ असून तो पृष्ठमण्यांच्या कमानीनें बनवलेला जो पाट अगर कालवा आहे त्यामध्यें राहिलेला आहे. मोठया माणसांत पहिल्या कटिमण्याच्या खालच्या कांठापर्यंत हा पाट पोहोंचलेला असतो, त्याच्याखालीं या पाटांत मज्जारज्जूपासून निघालेले मज्जातंतूंचे मुख्य फांटे असून त्यांचा जुडगा झालेला आहे व त्याला अश्वपुच्छ म्हणतात. (आकृति नं. ३८ पहा.) पृष्ठमज्जारज्जूचें वजन सुमारें एक औंस म्हणजे अडीच तोळे असतें व त्याची लांबी सुमारें आठरा इंच असते. मस्तिष्काप्रमाणेंच पृष्ठमज्जारज्जु हा तीन आवरणत्वचेनें आच्छादित झालेला आहे, व त्या तिन्ही आवरणांनां पुन्हा तशीं तींच नांवें म्हणजे दृढवेष्टण, तंतुजालवत् आवरण आणि अंतर्मस्तिष्कावरण हीं आहेत. मानेच्या प्रदेशांत व पाठीच्या आणि कमरेच्या खालच्या प्रदेशांत हा पृष्ठमज्जारज्जु त्याच्या इतर भागांपेक्षां फार मोठा आहे, कारण त्या भागांतून मोठमोठया आकाराचे निघालेले मज्जातंतू पाय आणि हात यांकडे गेलेले आहेत. (आकृति नं. ३८ पहा.)

मज्जारज्जूचा जर आडवा छेद केला तर असें दिसून येईल कीं त्यांत मागची आणि पुढची मध्यस्थित अशी खांड आहे, या खांडीच्या योगानें तो रज्जु दोन अर्धांत वस्तुतः विभागला गेला आहे, हीं अर्धें संधायक तंतूनें म्हणजे जोडणार्‍या तंतूनें जोडलीं गेलीं आहेत, व त्यांच्या मधोमध अति सूक्ष्म असा कालवा आहे व तोच पृष्ठमज्जारज्जूचा मध्यवर्ती कालवा होय, व जसा मस्तिष्क विवरांत द्रव आहे तसा त्या कालव्यांत द्रव आहे. मज्जारज्जूचें आधूसर अथवा पांढुर द्रव्य हें श्वेत द्रव्याला अंतर्गत असें आहे व तें द्रव्य इंग्रजी वर्णमालेंतील 'एच्' या अक्षराकृतीसारखें रचलें गेलेलें आहे, त्या द्रव्याच्या पुढें आलेल्या भागांनां शृंगवत् पुढें आलेले भाग म्हणतात व हे अग्रवर्ती व पश्चाद्वर्ती असें आहेत, या शृंगवत् भागांनां जोडणारें अंग म्हणजे संधायक तंतू होत. पृष्ठमज्जारज्जूमधील श्वेत द्रव्य जुडग्याजुडग्यासारखें त्याच्यामधील पांढुर अथवा आधूसर द्रव्याच्याभोंवतीं रचलें गेलेलें आहे. (आकृति नं. ३९).

मस्तिष्काच्या म्हणजे मेंदूच्या खालच्या पृष्ठभागापासून मज्जातंतूंच्या जुडग्यांच्या बारा जोडया सुटतात, यांनां मस्तक मज्जातंतू म्हणतात. त्यांपैकीं कांहीं मज्जातंतू असे आहेत कीं ते विशिष्ट ज्ञानेंद्रियांपासून मस्तिष्काकडे गेलेले आहेत. मस्तकाच्या मज्जातंतूंचा जो क्रम मोजला गेला आहे त्याचा आरंभ पुढून होऊन तो मागें मोजीत नेलेला आहे. पहिली जोडी गंधवह मज्जातंतूंची आहे, म्हणजे ते मज्जातंतू वास घेण्याचें जें विशिष्ट इंद्रिय आहे त्याचे आहेत. दूसरी जोडी आहे ती  तेजोवह अथवा दृढमज्जातंतूंची आहे म्हणजे ते मज्जातंतू चक्शुरिंद्रियाचे आहेत. तिसरी जोडी आहे तिच्यांतील मज्जातंतू बुबुळाला हलवणारे जे स्नायू आहेत त्यांपैकीं बहुतेक स्नायूंनां वांटले गेलेले आहेत. चौथ्या जोडीचे मज्जातंतू नेत्रपुट अथवा अक्षिकोश याचा जो विशिष्ट स्नायु आहे त्या प्रत्येक अक्षिकोशाच्या स्नायूकडे गेलेले आहेत. जोडीचे मज्जातंतू फार मोठे आहेत व त्यांत ज्ञानवाहक आणि गतिदायक शकतत्चालक अशा दोन्ही जातींचे मज्जातंतू आहेत, या जोडींतील मोठयाला प्रत्येक मज्जातंतूचे विभागून तीन मोठे भाग झालेले आहेत, ते चेहर्‍याची त्वचा, दांत आणि चर्वणक्रिया करणारे स्नायू यांच्याकडे गेलेले आहेत. या मज्जातंतूंचा कांहीं भाग रसनेंद्रिय म्हणजे चव घेण्याचें जें विशिष्ट इंद्रिय आहे तें म्हणजे जिव्हां तिच्याकडेहि तंतूंचा यथाशक्ति सबंध आहे. सहाव्या जोडीचे मज्जातंतू अक्षिकोशाच्या दुसर्‍या एका स्नायूकडे गेलेले आहेत. सातवी जोडी ही मुखासंबंधीं मज्जातंतूंची आहे व ती मुद्रा, चर्या ही यासंबंधीं स्नायूंनां मज्जांतंतूचा पुरवठा करते. आठवी जोडी ही श्रोत्रेंद्रियाच्या मज्जातंतूची म्हणजे श्रवण करण्याच्या इंद्रियांची आहे. नवव्या जोडीला जिव्हा सतपथ मज्जातंतूंची जोडी म्हणतात, या जोडीनें घशाच्या स्नायूंनां मज्जातंतूंचा पुरवठा केलेला आहे, पण या मज्जातंतूंपैकीं मोठासा भाग म्हणजे तो रसनेंद्रियाच्या मज्जांततूंचा आहे. दहावी जोडी पु्हां मोठमोटया मज्जातंतूंची आहे व तिला जाठर फुफ्फुविषयक मज्जातंतूंची जोडी म्हणतात, या जोडीनें मज्जातंतू फार मोठया विस्तृत भागावर वांटून दिलेले आहेत, शब्देंद्रियें, फुफ्फुसें, हृदय, जठर अथवा पक्काशय आणि यकृत इतक्यांकडे या जोडीनें आपले तंतू सोडून दिले आहेत. आकराव्या जोडीनें मानेंतील कांहीं स्नायूंकडे आपले तंतू सोडले आहेत. बारावी जोडी ही जिव्हा धोभागाच्या म्हणजे जिभेच्या खालच्या मज्जातंतूंची आहे, हे मज्जातंतू जिभेच्या स्नायूंनां चालक शक्तिदायक असे तंतू आहेत. (आकृति ४० पहा.)

पृष्ठमज्जारज्जूच्या पांढुर द्रव्याच्या प्रत्येक अग्रवर्ती श्रृंगापासून मज्जागोलकांनीं बनवलेल्या मज्जारेषांचें एक जुडगें निघालेलें आहे त्याला पृष्ठवंशीय मज्जांतूचें अग्रवर्ती मूळ असें नांव दिलेलें आहे. त्याचप्रमाणें दोन्ही पश्चाद्वर्ती शृंगांकडे एक पश्चाद्वर्ती मूळ गेलेलें आहे व त्याच्या वरती एक वाढ झालेली आहे तिच्यांत मज्जातंतुगोलक आहेत त्यांनां ज्ञानतंतुमंडळ अथवा ज्ञानतंतुग्रंथी म्हणतात. वर सांगितलेलीं दोन्हीं मुळें लौकरच पृष्ठवंशमणिमध्यस्थित अल्प छिद्रांत एका ठिकाणीं येऊन मिळतात व पृष्ठमज्जारज्जूच्या प्रत्येक बाजूपासून जे एखतीस पृष्ठवंशमज्जातंतू निघालेले आहेत त्यांच्यांपैकीं एक हा संयुक्तमूळांचा बनलेला मज्जांततु होतो. मज्जारज्जूच्या अग्रवर्ती मूळापासून निघणारे तंतू स्नायूंकडे जातात व त्यांनां गतिशक्तिदायक मज्जातंतू म्हणतात; पश्चाद्वर्ती मूळांत प्रवेश करणारे मज्जातंतू त्वचा वगैरे भागांतून येणारे असतात. (आकृति नं. ३९ पहा.)

कांडमज्जेचे ग्रैवेयक प्रदेशाचे मज्जातंतू यांच्या आठ जोडया आहेत. तिसर्‍या, चौथ्या आणि पांचव्या या जोडयांपासून मध्यपटलाचे महत्वाचे गतिशक्तिदायक मज्जातंतू निघालेले आहेत त्यां मध्यपटलविषयक मज्जातंतू म्हणतात. पांचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या ग्रैवेयक मज्जांतंतूच्या जोडया व त्यांबरोबर पृष्ठसंबंधीं पहिल्या मज्जातंतूच्या जोडीचा पुष्कळसा भाग या सर्वांचा मिळून एक मज्जातंतुसंघात म्हणजे मज्जातंतूचें जाळें बनलेलें आहे त्याला भुमज्जातंतुसंघात म्हणतात. या मज्जातंतूचे शेवट ऊर्ध्व शाखा म्हणजे हातांकडे गेलेले आहेत. भुजमज्जातंतुसंघातापासून ज्या शाखा निघाल्या आहेत त्या येणेंप्रमाणें (१) अंतःप्रकोष्ठीयशाखा ही हाताच्या आंतल्या बाजूनें चालली आहे, व ती कोंपरापासुन मनगटापर्यंतचा पुढचा हात, भुजा यांच्या स्नायूंनां व त्याचप्रमाणें करंगळी तर्जनी आंगठया जवळच्या बोटाचें अर्ध यांच्या स्नायूंनां मज्जातंतूचा पुरवठा करते. भुजास्थीच्या अंतःस्थ पर्वांगाच्या म्हणजे हाडाच्या गांठाळलेल्या वाटोळया टोंकाच्या पाठीमागें जो मज्जातंतु आहे त्याला व्यवहारांत म्हणजे लोकांच्या भाषेंत लीलास्थि म्हणतात. (२) बाहूच्या मध्यांत जी मध्यगत मज्जातंतुशाखा आहे (दंडाच्या व प्रकोष्ठाच्या मध्यरेषेनें जाणारी) ती देखील कोपरापासून मनगटापर्यंतच्या हाताच्या व हस्त (हँड) यांच्या स्नायूंनां आणि (३,१,२) बाहेरच्या बोटांच्या हाताच्या तळव्याच्या बाजूकडील त्वचेला मज्जातंतूंचा पुरवठा करते. (भुजांच्या स्नायूंतून जाणारा) (३) भुजगमज्जातंतु हा बाहूच्या मागच्या बाजूंत चालला असून तो हाताच्या प्रतानक स्नायूंनां मज्जातंतूचा पुरवठा करतो, आणि त्या सर्पवक्र मज्जातंतूची जी बहिःप्रकोश्ठस्थिसंबंधीं शाखा आहे ती (३,१,२) बाहेरच्या बोटांच्या पाठीकडील पृष्ठभागाच्या त्वचेला तंतूंचा पुरवठा करते.

पृष्ठसंबांधिन्मज्जातंतु; यांच्या बारा जोडया आहेत, आणि त्यांनां पार्श्वकाम्यंतर मज्जातंतु म्हणतात. कटिप्रदेशीय मज्जातंतूच्या पांच जोडया आहेत आणि (त्रिकास्थीच्या छिद्रांतून निघून नितम्ब प्रदेशांतील स्नायूंस पोंचणारे) त्रैकमज्जातंतु यांच्या पांच जोडया आहेत. या कटिप्रदेशीय व त्रैकमज्जातंतूच्या जोडया मिळून दोन मज्जातंतुसंघात बनलेले आहेत व त्यांनीं आपल्या शाखा मुख्यत्वें पायांकडे त्या भागांनां पुरवठा करण्याला सोडल्या आहेत. (मांडीच्या पुढल्या व आंतल्या बाजूंच्या त्वचेंत व स्नायूंत पसरणारी) प्रागूरुत्वस्थ शाखा ही कटिप्रदेशीयमज्जातंतुसंघातापासून निघाली आहे, आणि तिची मोठी शाखा जी त्रैकमज्जातंतुसंघातापासून निघाली आहे ती मांडीच्या पाठीमागल्या बाजूंत आहे व तिला आसनास्थित मज्जातंतु म्हणतात. या दोन्ही शाखास्नायूंनां व त्वचेला पुरवठा करतात. शेवटीं राहिलेली जोडी ती गुदास्थित मज्जांतंतूची होय

या पुस्तकाचा उद्देश शारीरशास्त्राचीं मूलतत्वें सांगण्याचा म्हणजे स्थूल बाह्यरेखा वाचकांपुढें मांडण्याचा आहे. तेव्हां सर्व खंडांप्रमाणें या मज्जातंतुव्यूहाची अगदीं स्थूल माहिती दिली आहे. बारीक सारीक माहितीची विस्तारहि मोठा होईल व विषयहि फार घोटाळयाचा व बिकट आहे. पण या स्थूल माहितीवरून सुद्धं हा मज्जंततुव्यूह म्हणजे हा निसर्गाची केवढी अगम्य लीला आहे इकडे सहज विचार करणारांचें लक्ष लागण्यासारखें आहे. जों जों याच्याकडे लक्ष पोहोंचवून त्याचा खोल खोल शोध, पत्ता काढण्याला आपण जाऊं लागूं तों तों निसर्गाच्या अतर्क्य, अगभ्य, अनंत लीलेनें मन थक्क होऊन त्याच्या ठिकाणीं मन तन्मय होईल व असेंच वाटेल कीं वेदवाणीला स्तुति करतां करतां ती थकली. पण ज्याचा पत्ता लागला नाहीं, असें जर कांही ब्रह्म या शब्दानें म्हणावयाचें असेल तर तें यापासून दूर नाहीं तारायंत्र, तारायंत्राचें मुख्य ऑफीस, मुख्य ऑफिसच्या अनंत शाखा, बातमी घेण्याचीं ठिकाणें व तीं मुख्य ऑफिसाकडे पोहोंचवण्याची व्यवस्था, त्याचप्रमाणें मुख्य ऑफिसांतून बातमी घेऊन अगर तेथचा हुकूम घेऊन तो जिकडे तिकडे ज्याचा त्याला पोहोंचविण्याची व्यवस्था व या सर्व ठिकाणापासून व तत्संबंधीं केलेल्या योजनांपासून जिकडच्या तिकडे, जेथच्या तेथें सुरळीत चालणारे व्यवहार; त्याचप्रमाणें या सर्व आफिसें, शाखा, योजना, व्यव्सथा यांत जरा जर कोठें घोंटाळा जाला तर येथून तेथून सर्व होणारा व्यवहारांतला स्थितिपालट अशा या मनुष्य निर्मित तारायंत्राचें या नैसर्गिक मज्जातंतुव्यूहाच्या तारायंत्राशीं रुपकाच्या दृष्टीनें साम्य करुन पाहूं लागलों म्हणजे मग मनाला एक प्रकारचा मोठा आनंदच वाटणारा आहे. (ले.डॉ.के.व्ही.खरे).

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .