विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शालिवाहन राजे- यांनां शातवाहन, शाकवाहन, आंध्रजातीय, आंध्र, आंध्रभृत्य असेंहि म्हणत. यांची पुष्कळशी माहिती ४ थ्या विभागांतील १२ व्या प्रकरणांत दिली आहे. शिवाय 'आंध्र' पहा. सर्व आध्र राजे आपल्याला शातवाहन वंशांतील म्हणवीत असत आणि त्यांच्यांतील पुष्कळजण स्वत:चें नांव शातकर्णी असें ठेवीत. शातवाहन घराणें मूळचें नागवंशीय असून त्यानें ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकांत पाटलीपुत्राचें राज्य जिंकून मग महाराष्ट्रावर स्वारी केली. या शातवाहनांचा आर्य क्षत्रियांशीं शरीरसंबंध होऊन मराठे खुळी निर्माण झाली (मध्ययुगीन भारत, भाग १; राधामाधव विलासचंपू). या शातवाहनांच्या वंशजातीविषयीं विवेचन 'आंध्र' या लेखांत सांपडेल. शालि-साळी-चें भात भर-लेली जी गाडी तिला पाणिनीयकालीं शालिवाहण म्हणत. शालिवाहण हें ज्यांचें विशिष्ट देवक तें घराणें शालिवाहण (न) आडनांव धारण करी. शालिवाहन हें देवक असण्याचें कारण कलिंग व आंध्र प्रांतांत यावेळीं ( व आतांहि) भात हेंच मुख्य धान्य असे. यावरून शालिवाहन हें राजघराणें मूळचें कलिंग किंवा आंध्र देशांतीलच होय. याप्रमाणेंच शाकवाहन शब्दाची फोड होय. कात्यायनाच्या वर्तिकांत शाकपर्थिव शब्द येतो. फार भाजी खाणारे राजे हे आंध्र राजेच असावेत. शातवाहन म्हणजे ज्याच्या गाडीचे घोडे किंवा बैल चलाख आहेत तो. या बैलांचे कान खुणेसाठीं फाडलेले असत. त्यामुळें शातकर्णी शब्द बनला असावा. मूळचे शातवाहन लोक बैलगाडयांनीं व्यापार करीत असावेत. आंध्र राजे दुर्बळ झाल्यावर शातवाहन यांनीं आंध्रभत्य (आंध्रांचे मदतगार) हें नांव धारण करून आंध्र राजांचें राज्य चालविलें. गौतमीपुत्र, वासिष्ठीपुत्र या नावांवरून या शातवाहनांत मातृवंशपद्धत प्रचारांत होती असें दिसते. (राजवाडे-राधामाधवविलासचंपू, प्रस्तावना; स्मिथ-अषर्ल हि. इं; भांडारकर-हिस्टरी ऑफ दि डेक्कन.)