विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शिरःशोणित मूर्च्छा (ऍपोप्लेक्सी)- मेंदूतील धमनी फुटून मनुष्य एकदम बेशुद्ध होतो त्या रोगास हें नांव आहे. कांहीं विकृतींमुळें मेंदूच्या रक्तवाहिन्यांत रक्त गोठतें व म्हणून प्रवाहास प्रतिबंध झाल्यामुळें मेंदूचें पोषण न होऊन मेंदूच्या शरीरावर हुकमत चालविण्यांत व्यत्यय येऊन बेशुद्धीसहित अगर बेशुद्धीशिवाय अर्धांगवायु होतो. रक्तस्त्राव हळूहळू होत राहिल्यास अर्धांगवायु झाल्यानंतर शुद्धि कमी कमी होऊं लागते. अशा रीतीनें रक्त गोठण्याचीं कारणें म्हणजे ताप, रक्त दोष, रक्ताशयाचे दोष हीं होत.
कारणें- चाळीस वर्षांपुढील वयांत हा रोग विशेषेंकरुन होतो. याचीं कारणें अनेक आहेत (१) ज्या मनुष्याच्या अंगांत रक्त पुष्कळ असून मान आंखूड व पोट मोठें असतें; (२) ज्यांच्या कुटुंबांत पूर्वी वाडवडिलांत हा रोग झालेला असतो (३) ज्यांचा बहुतेक काळ ऐषआरामांत जातो; (४) ज्यांनां मूत्रपिंडाची, रक्ताशयाची अथवा रक्तवाहिन्या विकृत होण्याची व्यथा झालेली असते; (५) पुष्कळ वेळ रक्तप्रवाह ज्या मार्गानें होत असतो तो मार्ग एकाएकीं बंद झाल्यानें देखील मेंदूंत रक्तसंचय जास्त होतो; (६) दारु, तंबाखू अगर अफू यांच्या अतिसेवनानें; (७) उन्हांत अति हिंडण्यानें; (८) आहाराबाहेर खाल्ल्यानें; (९) शौचाच्या वेळीं अगर लघवी करतांना कुंथल्यानें अशा प्रकृतीच्या माणसास हा रोग होतो.
लक्षणें- कधीं रोगी एकाएकीं बेशुद्ध होऊन पडतो व श्वास घोंटाळतो, व त्याचा घोरण्याप्रमाणें मोठा आवाज होतो व या घोरण्याबरोबर एका बाजूचाच फक्त गाल फुगतो. तोंडांतून लाळ गळते. नाडी मंद व पूर्ण भरेलली अशी चालते. डोळयांतील बाहुली विस्तृत होते व बुबुळें वर पापण्याखालीं फिरतात. याप्रमाणें तास दोन तास निश्चेष्ट पडल्यानंतर पुढें दिल्यापैकीं कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारांत रोगाचें स्थित्यंतर होतें; (१) रोग्याचें शरीर थंडगार पडून अंगास घाम सुटतो; मलमूत्रविसर्जन नकळत होतें, व नाडी क्षीण होत जाऊन मृत्यु येतो. (२) अगर रोगी हळूहळू सावध होत जाऊन पूर्वीप्रमाणें नीट होतो. (३) किंवा रोगी शुद्धीवर येतो पण त्यास पक्षाघात हा रोग होऊन त्याचें अर्धांग लुलें पडलेलें असतें.
उपाय- या रोगाचीं पूर्वचिन्हें ज्या माणसांत दृष्टीस पडतात त्यानें उन्हांत फार हिंडूं नयें, मेंदूस अथवा शरीरास फार श्रम देऊं नयेत, दारु पिऊं नये, जागरण करुं नये, आधाशीपणानें खाऊं नये व फार कुंथूं नये. त्यानें साधें अन्न खावें, उघडया हवेंत फिरावें,त निजतांना उंच उशीवर डोकें टेवून निजावें आणि मस्तकावर सकाळसंध्याकाळ थंड पाणी ओतावें. शौचास अवरोध होऊं देऊं नये, घेर्या येतील, डोकें जड वाटेल, घोळणा फुटेल तर सडकून जुलाब घ्यावा, मानेवर पलिस्तर मारावें अथवा पोत घ्यावी. अशक्तपणामुळें अशीं चिन्हें होत असतील तर पौष्टिक अन्न व लोह यांचें सेवन करावें. रोगी जर सशक्त असेल, त्याची नाडी जोरानें चालत असेल, व मानेच्या आणि मस्तकाच्या शिरा जोरानें उडत असतील तर शीर कापून रक्त काढावें अथवा मस्तकावर जळवा लावाव्या. जेथें स्वच्छ हवा असेल अशा थंड जागेंत रोग्यास डोक्याखालीं उंच उसें देऊन निजवावें. डोक्यावर थंड पाण्याची घडी ठेवावी अथवा बर्फाची पिशवी डोक्यावर ठेवावी औषध घशाखालीं उतरत असल्यास जुलाबाचें औषध द्यावें. क्यालोमेल आणि जालप अथवा सोनामुखी आणि विलायती मीठ यांचा जुलाब द्यावा. औषध घशाखालीं उतरण्याची स्थिति नसेल तर जिभेवर जयपाळाच्या तेलाचे एक दोन थेंब टाकले म्हणजे जुलाब होतील. पायाच्या पोटर्यांवर मोहरी लावावी. गुदद्वारांतून प्रवाही अन्नाची व औषधाची पिचकारी मारावी. रोगी बरा होऊं लागेल तर त्यास फार संभाळावें.त्यास साधें अन्न द्यावें. दारू देऊं नये. उष्ण औषधें देऊं नयेत. त्याचें मन सुप्रसन्न राहील असें करावें. तो रागावेल अथवा अन्य प्रकारें त्याचें मन क्षुब्ध होईल असें करुं नये. उपदंश असल्यास त्यावर पोटॅशियम आयोडाइड मोठया प्रमाणांत द्यावें.