विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शिराझ- इराणांतील फार्स प्रांताची राजधानी या शहरीं आहे. महंमद बी युसफ थाकेफी यानें हें शहर इ.स. ६९३ त वसविलें. इराणचें आखात व सिराझ यांमध्यें दुर्गप डोंगर आहेत. शहराभोंवतीं मातीची ठेगणी भिंत व खंदक आहे. शहराचे ११ भाग असून एका भागांत केवळ ज्यू लोकांची वस्ती आहे. लोकसंख्या ६० हजार आहे. घरें बहुधां लहान आहेत व रस्ते अरुंद आहेत. शिराझचें ''विद्यामंदिर'' (सीट ऑफ नॉलेज)हें नांव अद्याप कायम आहे. येथें मुसुलमान राजांनीं बांधलेलीं अनेक कॉलेजें आहेत. जुन्या भव्य इमारतींपैकीं व मशिदींपैकीं बहुतेक नादुरुस्त झाल्या आहेत. आसपास पुष्कळ रम्य बागा आहेत. यांपैकीं एका बागेंत सी.जे.रिच्, बगदादचे ब्रिटिश रहिवाशी, व बाबिलोन आणि कुषर्दस्तान यांचे शोधक १८२१ सालीं मरण पावले. येथें खुलारच्या प्रसिद्ध द्राक्षांपासून दारू काढली जाते, पण धार्मिक समजुतींमुळें ती भरपूर काढण्यांत येत नाहीं. हिंवाळयांत हवा निरोगी असते, पण उन्हाळयांत खराब असते.