विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शिलाजित- सर्व रोगांवर चालणारें एक रामबाण औषध हें रक्तशुद्धिकारक असून पौष्टिक आहे. तांबडा, निळा, पांढरा व काळा अशा याच्या चार जाती आहेत. याचे रेतीसारखे पांढर्या रंगाचे कण असतात. त्यास गोमूत्रासारखा वास येतो रुचि खारट असते. हा सध्यां दुषर्मळ आहे. काळा शिलाजित चिकट, तुळतुळीत असून गुग्गुळासारखा दिसतो. सध्यां वैद्यलोक हाच वापरतात. हिमालय, विंध्य, सह्याद्रि हे पर्वत मे, जून महिन्यांत उन्हानें तापले म्हणजे खडकांतून चिकाप्रमाणें शिलाजित बाहेर पडतो. शिलाजित नेहमीं अशुद्ध स्थितींत सांपडतो. मग तो शुद्ध करुन घेतात.
शिलाजित विस्तवावर ठेवला असतां अथवा कढविला असता त्याच्या अंगचे औषधी धर्म नाहींसे होतात. शिलाजित चांगला शुद्ध केलेला असल्यास तो पाण्यांत विरघळला पाहिजे. शिलाजिताच्या अंगीं पदार्थ नासूं न देण्याचाहि गुण आहे. पाय मुरगळला असतां तेथें शिलाजिताचा लेप दिला असतां चांगला उपयोग होतो. अग्निमांद्य, यकृतविकार, दमा, स्वप्नावस्था, मूतखडा इत्यादि विकारांवर शिलाजित देतात. (भिषग्विलास)