प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

शिल्पकला- शिल्पकला या नांवाखालीं विशेषतः वास्तुशिल्प व मूर्तिशिल्प हीं मोडतात. वास्तुशिल्प सौंदर्याच्या दृष्टींने जगांत कसें प्रगत झालें याचा इतिहास ''वास्तुसौदर्यशास्त्र'' या लेखांत आलाच आहे. इमारती वगैरेंचें शिल्प कसें असतें याची माहिती स्थापत्यशास्त्रांत येईलच. या लेखांत केवळ जागतिक मूर्तिशिल्पाचा विचार करणें आहे. पाश्चात्य मूर्तिशिल्पाविषयीं थोडक्यांत विवेचन ''कला'' या लेखांत (ज्ञा.को.वि. १०, पृ. १५ पासून पुढें) केलेंच आहे. आतां या ठिकाणीं केवळ भारतीय मूर्तिशिल्पाचा विचार करुं.

मूर्तिशिल्प व चित्रकला हे दोन कलासंप्रदाय हिंदुस्थानांत प्राचीन काळीं स्वतंत्रपणें फारसे अस्तित्वांत नव्हते. केवळ वास्तुशिल्पाला सौंदर्याची जोड म्हणून यांचा उपयोग करण्यांत येई. ईजिप्त, ग्रीस, रोम या देशांतल्याप्रमाणें प्राचीन काळच्या स्वंतत्र बनविलेल्या मूर्ती आपणांस आढळत नाहींत. देवालयांतून किंवा लेण्यांतून घडविलेल्या किंवा खोंदविलेल्या मूर्ती मात्र दिसतात. धर्माचें एक साधन म्हणून केवळ या शिल्पाला कांहीं महत्व असे. तेव्हां भारतीय मूर्तिशिल्पाचा अभ्यास करतांना त्याचें धार्मिक दृष्टीनें महत्व सदोदित लक्षांत ठेविलें पाहिजे.

भारतीय मूर्तिशिल्पाचे मुख्य दोन भाग पडतात (१) गांधारशिल्प, व (२) दाक्षिणात्यशिल्प. या दोन शिल्पसंप्रदायांत इतर शिल्पांचा अतंर्भाव होतो. तेव्हां याच दोन शिल्पपद्धतींचें वर्णन पुढें दिलें आहे.

कोणत्याहि मानववंशामध्यें स्वतंत्रपणें केलचा विकास होण्यास मुख्य आधार त्यांतील उपासनासंप्रदाय होत. ॠग्वेदकालीं पंजाबमध्यें आर्य लोक असतांना ते अस्पष्ट स्वरुपाच्या निसर्गशक्तींची उपासना करीत. वैदिक दैवतेतिहासामध्यें पणीसारख्या दैत्यानें चोरुन नेलेल्या गाईंच्या म्हणजे पर्जन्याच्या इंद्र वगैरे देवतांनीं केलेल्या सुटकेची कथा वारंवार आळी आहे. व अशा रीतीनें या वादळाच्या रुपकपूर्ण आख्यायिकेंत सर्व देवतांनीं भाग घेतलेला दिसतो. ही गोष्ट भारतीय शिल्पइतिहासाच्या दृष्टीनेहि अत्यंत महत्वाची आहे. ह्या देवतांमध्यें शक्रदेवतेस बरेंच महत्व आहे. कारण, बुद्धेत्तरकालीन सूत्रग्रंथांमध्यें या एकाच देवतेला विशेष निश्चित स्वरुप आलेलें दिसतें. वैदिक दैवतेतिहासांतील इतर अनेक स्पष्ट देवतांची कल्पना शिल्पप्रतिमांमध्यें स्पष्ट मांडणें ही गोष्ट प्राचीन काळीं अगदीं अशक्य होती.

वैदिक कालांत यज्ञसंस्थेचें महत्व विशेष असल्यामुळें, कलाविषयक किंवा शिलपकलाविषयक निदर्शनाची त्यावेळीं जरुरच भासली नव्हती तथापि इतक्या प्राचीन कलांतहि श्येन वगैरे प्राण्यांच्या आकारांच्या वेदी (चिती) करण्याची प्राथमिक अवस्थेंतील कला दृष्टीस पडते. पण सामान्यतः प्रतिमा कलेविषयीं असें वेदकालचें फारच थोडें ज्ञान उपलब्ध आहे. वैदिक आर्यांनां आरुयुक्तचक्राची कल्पना कलाकौशल्याचा उत्तम नमुना म्हणून वाटत असावी. कारण ॠग्वेदामध्यें अशा चक्रांच्या सुंदर सुंदर उपमांचे उल्लेख आढळून येतात. बौद्ध लोकांनीं ह्याच चक्राचा पुढें धार्मिक चिन्ह म्हणून स्वीकार केला. दगडी इमारतींविषयीं विचार करुं लागलों तर संरक्षणाकरितां दगडांच्या मजबूत भिंती व राजांचीं मृत शरीरें जमीनींत पुरुन त्यांवर तयार केलेलीं ओबडधोबड व वर निमुळतीं होत गेलेलीं दगडीं स्मारकें ह्यांच्या अस्तित्वाची कल्पना केली पाहिजे. व ह्याच पद्धतींतून बुद्धकालीन स्तूपरचनेची पद्धत निघाली असावी.

इंडो- जर्मानिक म्हणून म्हटल्या जाणार्‍या वंशांतील निरनिराळया लोकांच्या इतिहासांत ख्रि.पू. पांचवें शतक अत्यंत महत्वाचें आहे. मानव जातीच्या इतिहासावर ज्या राष्ट्रांनीं आपल्या संस्कृतीची प्रथम छाप बसविलीं तीं राष्ट्रें म्हणजे भारतीय आर्य, इराणी व ग्रीक हीं तीन राष्ट्रें होत तेव्हां या तिन्ही राष्ट्रांतील संकृतीचा तुलना करुन परस्परांवर त्यांचा काय परिणाम झाला हें पाहिलें पाहिजे. भारतीय शिल्पाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करावयाचा म्हणजे कंदर शिल्पावशेषांचे नमुने निश्चित करण्याकरितां हिंदुस्थानाबाहेरील चिनी, तिबेटी, जपानी वगैरे शिल्पांचे नमुने अभ्यासिले पाहिजेत.

गांधारशिल्प परंपरा- हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवरील देशास प्राचीन भारतीय वाङ्‌मयांत गांधार ही संज्ञा दिली आहे. ह्या देशांत सांपडणार्‍या असंख्य शिल्पप्रतिमा, खोदलेले खांब, बौद्धविहार व स्तूप इत्यादि उपलब्ध झालेल्या अवशेषांचा गांधारशिल्प या नांवानें उल्लेख केला जातो. काबूल खोरें व हिंदुस्थानची सरहद्द या भागांतील बहुमोल पुराणवस्तुविषयक अवशेष ८०-९० वर्षांपूर्वी सी.मॅसन्, कं. कोर्ट वगैरे मंडळीनीं प्रसिद्धीस आणली; माणिक्यल वगैरे स्तूप उघडे करण्यांत आले व बरीचशीं ग्रीकोबॅक्ट्रियन व शक नाणीं त्याचप्रमाणों कांहीं शिल्पनमुनें दृष्टोत्पत्तीस आले. इसवी सन १८४९ मध्यें पंजाबप्रांत ब्रिटिश वर्चस्वाखालीं आल्यावर यूसफजैसारख्या प्राचीन भूप्रदेशांतून असंख्य शिल्पकामें संशोधिलीं गेलीं. यानंतर १८६६ सालीं क्रिस्टल पॅलेसच्या आगीमुळें बरेच अवशेष नष्टप्राय झाले; परंतु तेव्हांपासून हिंदुस्थानसरकारनें सर्व प्राचीन स्थलांचें संशोधन करवून पुष्कळसे शिल्पकलाविषयक अवशेष जमा केले व हिंदुस्थानांतील निरनिराळया पदार्थसंग्रहालयांस वांटून दिले. पुष्कळ संशोधकांनीं स्वतःच कांहीं अवशेष जमविले आहेत, व कांहीं अवशेष एक अगर अनेक मार्गांनीं ब्रिटिश म्यूझियम, बर्लिन-एथ्नोग्रॅफिकल म्यूझियम वगैरे संस्थांच्या ताब्यांत गेले आहेत.

या सर्व प्रतिमाशिल्पासंबंधीं एक अशी विशेष गोष्ट दिसून येते कीं, हे बहुतेक सर्व अवशेष गांधार देशाची प्राचीन पुरुषपुर नांवाची राजधानी ज्या जागीं होती, ती पेशावरच्या नजीकची जागा जमालगढी तख्त इ.बाही, शहर-इ-बहिलोन व स्वात (सुवास्तु) जिल्ह्यांतील अनेक प्राचीन जागा या ठिकाणीं सांपडल्या आहेत. भारतीय शिल्पांचा अभ्यास करुन त्याविषयीं पहिलें शास्त्रीयविवेचन फर्ग्युसन या सुप्रसिद्ध संशोधकानें केलें. त्यानंतर कनिंगहॅम्, बेली, कोले, व्हिन्सेट स्मिथ, एम् सिनार्द वगैरे अनेक संशोधकांनीं या अवशेषांचें निरनिराळया दृष्टीनीं परीक्षण केलें आहे.

गांधारशिल्पाच्या कक्षेंत येणारे जे कांहीं थोडे शिलालेख आहेत त्यांची कालमर्यादा एका अनिषर्णत शकाच्या १०३ सालापासून ३८४ पर्यंतची आहे एकंदर शिल्पविकास कालाची मर्यादा ख्रिस्ताच्या पहिल्या पांच शतकांची आहे. कारण सातव्या शतकांत हिंदुस्थानांत प्रवास करुन गेलेल्या ह्युएनत्संग नांवाच्या सुप्रसिद्ध चिनी प्रवाश्याला ह्या प्राचीन इमारती अगदीं मोडकळीस आलेल्या दिसून आल्याबद्दल त्यानें उल्लेख केले आहेत. ह्यांपैकीं अत्यंत प्राचीन शिल्पावशेषांमध्यें शुद्ध ग्रीक विषयांचें खोदकाम करण्यांत आलें आहे. ह्यानंतरची विकासाची पायरी म्हटली म्हणजे कित्येक शिल्पांवर दिसून येणार आदर्शभूत व त्याच वेळीं नैसर्गिक परिस्थितीचें निदर्शन करण्याचा केलेला उपक्रम होय. ह्याप्रकारच्या शिल्पामध्यें ग्रीक, रोमन किंवा ख्रिस्ती अशा शिल्पपद्धतीचा उपयोग केल्याचें स्पष्ट दिसून येतें. प्राचीन एटरुस्कन शिल्पपरंपरेशीं गांधारशिल्पाचें ह्या दृष्टीनें फार सादृश्य आहे. एकंदर गांधारशिल्पामध्यें बौद्धषभिक्षूंच्या निदर्शनामध्यें पुष्कळ ठिकाणीं ग्रीकशिल्प आदर्शभूत ठेविल्याचें दिसतें; व ह्या दृष्टीनें पहातां गांधारवास्तुशिल्प हें तत्पूर्वीच्या परकीयशिल्पाचें अपत्यच आहे असें म्हटलें पाहिजे. परंतु त्यामध्यें केवळ हिंदुधर्माखेरीज इतर कोणत्याहि विषयांचें व इतर धर्मांतील महानुभाव साधू किंवा त्यांच्या संबंधींच्या दंतकथा ह्या गोष्टींचें निदर्शन करण्यांत आलें नसल्यामुळें ह्या शिल्पाचा हिंदुजीवनक्रमाशींच पूर्ण संबंध आहे.

आतां आपण गांधारशिल्पांतील निरनिराळया उपलब्ध प्रतिमांवर तयार करतांना तत्सदृश कोणत्या ग्रीक नमुन्यांचा परिणाम झालेला दिसतो याचें विवेचन करूं. ह्या प्रकारच्या शिल्पप्रतिमांमध्यें गौतमबुद्धची प्रतिमा अत्यंत महत्वाची आहे. कांहीं शिल्पांमध्यें गौतमबुद्ध हा एक पायापर्यंत लांब झगा घातलेल्या तरुणमनुष्याच्या स्वरुपांत दाखविला आहे. ह्यांपैकीं जुन्या प्रतिमाशिल्पांतील बुद्धचा चेहरा अपोलो ह्या ग्रीक देवतेच्या चेहर्‍यासारखा दिसत असून उत्तरकालीन प्रतिमांमध्यें ह्याच चेहेर्‍यावर हिंदुत्वाच्या खुणा स्पष्ट दिसतात. कांहीं शिल्पांत गौतमबुद्ध यानें हिंदुपद्धतीप्रमाणें पद्मासन घातलें आहे असें दाखविलें असून कांहींमध्यें उजवा हात वरकरून तो उभा असल्याचें दाखविलें आहे. ह्या सर्वशिल्पांतील पोशाखाची पद्धत ग्रीक तर्‍हेची दिसते असें शास्त्रज्ञाचें म्हणणें आहे.ह्या सर्व प्रतिमांमध्यें गौतमबुद्धाच्या चेहेर्‍या सभोंवतीं दिव्यत्वसूचक असें एक प्रभामंडळ दाखविलें असून हें ग्रीक लोकांपासून घेतलें आहे.

प्राचीन अशोककालीन शिल्पपरंपरेपेक्षां गांधारशिल्पपरंपरेंत असा विशेष आहे कीं, अशोककालीन शिल्पांमधील प्रतिमांच्या निदर्शनामध्यें देवतेचे वैयक्तिक गुणधर्म दाखविण्यांत येत नाहींत व याच्या उलट गांधारशिल्पामध्यें प्रत्येक देवतेच्या विशिष्ट गुणधर्मांचें निदर्शन करण्यांत आलें आहे. अशोककालीन शिल्पांमध्यें वज्रा, कमल, फुलें किंवा वाहनें एवढेच देवतांचे विशिष्ट गुणधर्म दाखविण्यात येतात. तेव्हां ह्यापेक्षां गांधारशिल्पामध्यें जास्त निदर्शन कशा प्रकारचें असतें ही गोष्ट निरनिराळीं उदाहरणें घेऊन दाखवूं.

ह्यांपैकीं ब्रह्मा या देवतेच्या शिल्पप्रतिमा घेतल्या तर त्यांमध्यें ह्या देवतेचें एकंदर स्वरुप ब्राह्मणी थाटाचें दाखविण्यांत आलें असून पीटर ह्या ग्रीक देवतेशीं ह्या प्रितमांचें विलक्षण सादृश्य दिसतें. ह्या शिल्पांतील पोशाखपद्धत अगदीं ग्रीक तर्‍हेची असून देवतेच्या हातांमध्यें वज्रा, कमल वगैरे दिव्यत्वसूचक वस्तू दाखविण्यातं आलेल्या नाहींत.

बौद्धांच्या देवतांतील मुख्य शक्र ही देवता आहे. ह्या देवतेच्या हातांतहि वज्रा असावें असें प्रथम वाटतें, परंतु एकंदर शिल्पाकडे पाहिलें तर अनेक शिल्पांतील निरनिराळया व्यक्तींच्या हातांत वज्रा दिलेलें दिसतें परंतु विशेषतः ज्या शिल्पप्रतिमांमध्यें गौतमबुद्धाच्या उत्तर आयुष्यांतील अनेक प्रसंग दाखविले आहेत, त्यांमध्यें प्रत्येक ठिकाणीं बुद्धाच्या जवळ अगर थोडें एका कोपर्‍यांत एक चमत्कृतिजनक व्यक्ति हातांत एक कांहींतरी जाड लांकडाच्या आकाराचें आयुध घेतलेली दाखविली आहे.

जे. बर्जेस याच्या मतें ही प्रतिमा वज्रापाणी नामक देवाची असावी. बौद्ध आख्यायिकांमध्यें वज्रापाणी हा पूर्वजन्मीं एका चक्रवर्तीचा मुलगा असतांना त्यानें बौद्धधर्मास साहाय्य करण्याचे व्रत आचरिलें व त्यामुळें तो बुद्ध, धर्म आणि संघ यांचा रक्षक असा तेहतीस स्वर्गांचा राजा झाला, असें सांगितलें आहे. ह्या दृष्टीनें पाहतां निर्वाणप्रसंगनिदर्शक शिल्पांमध्यें वरील वज्रापाणी देवाची प्रतिमा, मस्तकावर हात ठेवलेली अगर बाहू उंच केलेली किवां निर्वाण स्थितींतील बुद्धाकडे बोट दाखवीत असलेली निदर्शित करण्याचें कारण दुःखातिरेक किंवा विस्मय हे मनोविकार दाखवावयाचें असावें. जे. बर्जेसच्या मतें या वज्रापाणीच्या प्रतिमाशिल्पाची कल्पना ग्रीक देवता ज्युपिटर ह्याच्या आकृतीपासून घेतली असावी.

ह्यानंतरची महत्वाची देवता मार ही होय. निरनिराळया शिल्पांमध्यें ह्या देवतेचें निरनिराळयापद्धतीनीं निदर्शन करण्यांत आलें आहे. तथापि ह्या देवतेचा एक ठराविक नमुना होता. उत्तरकालीन शिल्पप्रतिमांमध्यें ही देवता हातांत धनुर्बाण घेतलेली, दिसण्यांत तरुण, अशी दाखविली आहे व हिचें सादृश्य हिंदुधर्मांतील काम किंवा स्मर ह्या देवतेशीं किंवा ग्रीकांच्या एरोस देवतेशीं स्पष्ट दिसून येतें. एका शिल्पामध्यें गौतम हा आपल्या कंथक नांवाच्या अश्वावर बसून भिक्शु होण्याकरितां राजद्वाराबाहेर जात असतांना दाखविला असून त्यामध्यें उत्तरकालीन ग्रीक शिल्प नमुन्यावरहुकूम एक द्वाराधिष्ठात्री अशी तेजोमंडळयुक्त देवता त्या ठिकाणीं दाखविली आहे. एका सुप्रसिद्ध शिल्पामध्यें गया येथील बोधिवृक्षाखालीं तपाचरण करीत असलेल्या बुद्धास मोह किंवा भीति दाखविण्याकरितां निघालेल्या मार सैन्याचें निदर्शन केलें आहे. या शिल्पाची रचना खुबीदार आहे. त्यामध्यें प्रथम ग्रीक पद्धतीचे पोशाख घातलेले सैनिक दाखविले असून त्याच्या वरील दुसर्‍या ओळींत अक्राळविक्राळ स्वरुपाचे दैत्य दाखविण्यांत आले आहेत. ह्या शिल्पांतील मधोमध दिखविलेल्या व्यक्तीचा अक्राळविक्राळपणा काढून टाकला तर तिच्या हातांतील मुद्रल व अंगावरील प्रावरणपद्धति यावरून हरक्यूलिस ह्या ग्रीक देवतेचें स्मरण होईल.

या गांधारशिल्पांमध्यें शोभेकरितां म्हणून सिंहावर, हातांत वीणा घेऊन बसलेली अशी सरस्वतीदेवतेची प्रतिमा वारंवार आढळून येते. ह्याच्या उलट प्राचीन अशोककालीन शिल्पांमध्यें सीरी (श्री) नांवाची देवता वारंवार आढळून येते. गांधारशिल्पांतील सरस्वतीदेवतेनें चीन, जपान, तिबेट, इत्यादि परदेशांतील बौद्ध संप्रदायांमध्यें फार महत्वाचें स्थान प्राप्त करुन घेतलें आहे. ह्यावरून उत्तरेकडील बौद्ध संप्रदायाच्या प्रतिमारचनेचा गांधारशिल्पाशीं असलेला संबंध जास्त दृढ करण्यास सरस्वतीदेवतेची प्रतिमा साधनीभूत होते.

गांधारशिल्पामध्यें नागांचें निदर्शन प्राचीन शिल्पांप्रमाणेंच केलेलें आहे. बहुतेक शिल्पांमध्यें ह्या नागांच्या प्रतिमा बुद्धापुढें शरण आलेल्या दाखविल्या असून त्या प्रतिमांचे अधोभाग मनुष्यदेहासारखे नसल्यामुळें ते पाण्यांत बुडलेले किंवा स्थंडिलाआड न दिसतील असे दाखविण्यांत आले आहेत, व डोक्यावर नागाच्या फणा दाखविल्या आहेत. कांहीं शिल्पांमध्यें ह्या नागांनीं बुद्धाच्या पद्मासनास हातांनीं तोलून धरल्याचें दाखविलें आहे. गांधारशिल्पांमध्यें ह्या प्रकारच्या शिल्पाची एक प्रतिमा बरीच महत्वाची आहे ही प्रतिमा एका नागस्त्रीची असून ती ओबडधोबड आहे. ह्या शिल्पामध्यें ह्या नागस्त्रीचा उजव्या बाजूचा स्तन अनावृत असा दिखविण्यांत आला असून तिचा चेहरा दुःखानें विकृत झालेला दाखविला आहे व मस्तकाच्या मागच्या भागापासून वर एक निघालेला नाग एका गरुडपायानें चोंचींत धरलेला दाखविला आहे. ही शिल्पप्रतिमा ग्रीकांच्या गनीमिड देवतेची अनुकृति आहे ही गोष्ट सिद्ध झाली आहे. कनिंगहॅम याचें असें मत आहे कीं, ही प्रतिमा बुद्ध जन्मानंतर सात दिवसांनीं स्वर्गारोहण करणार्‍या माया नामक गौतमाच्या आईची आहे. परंतु हें मत युक्त दिसत नाहीं. बौद्ध जातककथांमध्यें गरुडानें नागिणी पळवून नेल्याच्या पुष्कळ कथा आढळतात. सुप्रसिद्ध नागानंद नाटक अशाच प्रकारच्या कथेला अनुलक्षून रचिलेलें आहे. तिबेटकडील उत्तर परंपरेंत  अशाच नमुन्याचा गरुडपक्षी एका नागकन्येच्या स्तनाचें आपल्या चोंचीने विदारण करीत असलेला अनेक शिल्पांमध्यें दाखविला आहे.

दुसर्‍या कांहीं नायू मठांतील शिल्पांमध्यें कांहीं सुंदर स्त्रिया दाखविल्या आहेत. ह्यांचा पोशाख इराणी पद्धतीचा असून अंगावरील कर्णभूषणें, माळा, बांगड्या वगैरे अलंकार हिंदु पद्धतीचे आहेत. पोशाखावरुन ह्या प्रतिमा माया नामक बुद्ध मातेच्या दिसत नाहींत; तर सांची येथील स्तूपाच्या द्वारावर शोभेकरितां काढलेल्या नर्तकीप्रमाणें वरील शिल्पामध्यें दाखविलेल्या स्त्रियाहि नर्तकीच असाव्यात अथवा ह्या यक्षणिंच्या प्रतिमा असाव्यात बुद्धाची आई माया व तिची बहीण प्रजावती ह्यांच्या प्रतिमा ग्रीक पोशाखामध्यें दाखविल्या आहेत. ह्या प्रकारच्या शिल्पामध्यें बुद्धजन्मप्रसंगाचें शिल्प अत्यंत महत्वाचें असून त्यामध्यें माया ही सालवृक्षाचा मोहोर तोडण्याकरितां हात वर करीत आहे व तिच्या उजव्या कुशींतून बाळ रुपधारी गौतम बाहेर पडत आहे, व ब्रह्मा, शक्र इत्यादि देव नुकत्याच जन्मलेल्या बालकाचें अभिनंदन करीत आहेत असा प्रसंग दाखविला आहे. ह्याच प्रकारच्या उत्तरकालीन शिल्पामध्यें माया ही अगदीं एखाद्या नर्तकीप्रमाणें दिसते. ह्या बाबतींत स्वाभाविकपणें अशी कल्पना येते कीं, बौद्ध आख्यायिकांचा विकास एका ठराविक नमुन्याबरहुकूम तयार झालेल्या शिल्पामुळें झाला असावा. गांधारशिल्पांमध्यें गौतमाच्या मातेची शिल्पप्रतिमा मूळ नमुन्याहून पोशाख वगैरेंच्या दृष्टींनीं भिन्न असल्यामुळें ओळखतां येण्यासारखी आहे.

बुद्धनिर्वाणप्रसंगदर्शक कांहीं शिल्पांमध्यें एक सर्व शरीर वस्त्राच्छादित केलेली, दाढी नसलेली, व डोक्याला एक प्रकारचें शिरोवसन घातलेली व्यक्ति आढळून येते. या व्यक्तीच्या डाव्या हातांत एक दंड दिलेला आहे; व त्यावरून तो यमदूत असावा असें कांहींनीं अनुमान केलें आहे. परंतु बौद्ध आख्यायिकांतील एकंदर संदर्भ पाहतां ही प्रतिमा काश्यप नांवाच्या बुद्धशिष्याची असावी. कारण, काश्यपाविषयीं अशी आख्यायिका सांगतात कीं, बुद्धाच्या परिनिर्वाण प्रसंगीं तो जवळ नव्हता; व जेव्हां त्याला बुद्धाच्या आजाराची हकीकत समजली तेव्हां तो, गौतमाचें निर्वाण झाल्यावर त्याजजवळ जाऊन पोहोंचला. अशा रीतीनें गांधारशिल्पांतील देव किंवा दानव यांच्या प्रतिमांची माहिती आहे.

त्यानंतर मनुष्यव्यक्ति निदर्शित केलेल्या प्रतिमाशिल्पाविषयीं बोलावयाचें म्हणजे त्यांत ब्राह्मणवर्गाचें निदर्शन जास्त करण्यांत आलें आहे. या शिल्पाकरितां अशोक काळांतील नमुने उपलब्ध होते. या शिल्पांतील ब्राह्मण दाढया व जटा वाढलेले, साधे पोशाख केलेले व म्हातारपणामुळें हातांत टेकण्याकरितां दंड घेतलेले असे दाखविले आहेत. याखेरीज दुसर्‍या भिन्न भिन्न परिस्थितींतील स्त्रीपुरुषांच्या प्रतिमांविषयीं बोलावयाचें म्हणजे त्यांमध्यें दोन शिल्पपद्धतीचे प्रकार आढळून येतात. सामान्यतः असें म्हणतां येईल कीं, गौतमबुद्ध, राजे लोक, देवता वगैरेंच्या प्रतिमा ग्रीक आदर्शाबरहुकूम तयार केल्या आहेत; व इतर कमी महत्वाच्या प्रतिमांमध्यें हे फरक अगदीं थोडया प्रमाणांत दिसतात. तथापि, अशा प्रकारच्या अगदीं ओबडधोबड प्रतिमाशिल्पांमध्येंहि शुद्ध ग्रीक पद्धतीचे नमुने सांपडणें शक्य आहे. या दृष्टीनें राजेलोकांच्या प्रतिमा व त्यांतील भूषणपद्धत यांचा विचार करणें प्राचीनेतिहासाच्या दृष्टीनें फार महत्वाचें आहे. यांपैकीं अत्यंत महत्वाच्या शिल्पांमध्यें अत्यंत जुनी हिंदू पोशाखपद्धत आढळून येते;  व दुसर्‍या कांहीं शिल्पांमध्यें पुष्कळ सैनिक, घोडेस्वार वगैरे परकीय चालींच्या पोशाखांमध्यें आढळून येतात. भारतीय शिल्पांतील असाच एक महत्वाचा भाग म्हटला म्हणजे तत्कालीन संस्कृत वाङ्‌मयांतून 'यवनानी' या नांवानें सुप्रसिद्ध असलेल्या परकीय देशांतील राजप्रतिहारी या होत. या प्रतिमांचे पोशाख ग्रीक पद्धतीचे आहेत. या दृष्टीनें पाहतां उत्तरेकडील बौद्ध संप्रदायाची परंपरागत माहिती जास्त संशोधिली पाहिजे; व त्याकरितां तिबेट, चीन, जपान इत्यादि प्रदेशांतील बौद्ध शिल्पांचे परस्पर संबंध कशा प्रकारचे आहेत, याचेंहि अवलोकन केलें पाहिजे; व यानंतर गांधारशिल्पाचा जास्त सुव्यवस्थित अभ्यास करणें शक्य होणार आहे.

या काळांतील अत्यंत परिचरयाची व मौजेचीं शिल्पें म्हटलीं म्हणजे बुद्धाच्या महापरिनिवार्णासंबंधींचीं होत. सामान्यपणें त्याजविषयीं विशेष गोष्टी सांगतां येतील त्या येणेंप्रमाणें - (१) मरणोन्मुख शाक्य मुनींच्या उंच बिछान्याखालीं बसलेली एका भिक्षूची लहान आकृति. (२) हातांत वज्रा धारण केलेली वज्रापाणी. (३) शेजारीं असलेली एक नग्न व्यक्ति.(४)दोन सालवृक्ष व त्यांच्या शाखाविस्तारामध्यें दाखविलेल्या वनदेवता. (५) गौतमाच्या पायथ्याशी कधीं हातांत दंड असलेली किंवा कधीं नसलेली अशी बुद्धभिक्षूची आकृति. (६) देवता वगैरे इतर परिचारक. या सहा प्रकारच्या व्यक्तींचा परिचय करुन घेण्याकरितां आपणांस बौद्ध कथांचें साहाय्य घेतलें पाहिजे.

गांधारशिल्पाच्या विशेषापैकीं एक चमत्कृतिजनक विशेष असा आहे कीं, या शिल्पांमध्यें व्यक्तींच्या पूर्णत्वास पोहोंचलेल्या प्रतिमांशेजारी प्राथमिक अवस्थेंत आढळून येण्यासारख्या ओबडधोबड आकृती सांपडतात. वर उल्लेखिलेल्या बुद्धनिर्वाणासंबंधीं शिल्पांमध्यें असेच प्रकार आढळून येतात, व तिबेट, चीन, जपान इत्यादि देशांतील उत्तरकालीन शिल्पांचें निरीक्षण केलं असतां त्यांमध्यें या जुन्या गांधारशिल्पांचेंच अनुकरण केलेलें दिसून येतें. जसजशी बौद्धकथांमध्यें जास्त मनोरंजकता व चमत्कृतिजनकता येऊं लागतसे, तसतसें बुद्ध निर्वाणासंबंधीं शिल्पांमध्येंहि गौतमाच्या मुख्य शिष्यांखेरीज अनेक देव, दानव, नाग, गरुड इत्यादिकांच्या प्रतिमा दिसूं लागतात व पूर्वीच्या विशिष्ट व्यक्ती नाहींशा झालेल्या दिसतात. या प्रकारची उपपत्ति लावून दाखविण्याकरितां व्हिन्सेंट स्मिथ यानें अशी क क्लुप्ति लढविली आहे कीं, या प्राचीन बौद्धशिल्पाकृतींमधील विषय ग्रीक व रोमन दफन पेटिकाशिल्पांवरून घेतलेले आहेत.

दुसर्‍या कांहीं शिल्पांमध्यें शिल्पांची योजना एकच ठरलेली असून फक्त व्यक्तींच्या आकृतीमध्येंच फरक पडलेला दिसून येतो. लुंबिनी बागेंतील बुद्धजन्म, गौतमाचा गृहत्याग, त्याचप्रमाणें त्यानें केलेले चमत्कार इत्यादिसंबंधाचीं शिल्पें या प्रकारांत येतात. यांपैकीं गौतमानें केलेल्या चमत्कारांसंबंधीं शिल्पांची रचनापद्धत थोडक्यांत पुढीलप्रमाणें आहे -

या शिल्पांमध्यें मधोमध डावीकडून आलेल्या बुद्धाची प्रतिमा, त्याच्याच शेजारीं वज्रापाणी व कोठें कोठें इतर शिष्यमंडळी दिसत असून गौतम लोकांनां धर्मोपदेश करीत असल्याचें दाखविलें आहे. हीं दिसण्यांत सारखीं दिसणारीं शिल्पें वस्तूतः एका ठराविक कथेचीं निदर्शक नसून ज्या ज्या वेळीं बुद्धानें चमत्कार किंवा धर्मांतर घडवून आणलें, त्या त्या वेळच्या स्मरणार्थ तयार झालीं आहेत. याखेरीज कोठें कोठें एकाच शिलापटावर अनेक प्रसंगांचा संयोग केलेला आढळतो.

सांची येथील स्तूपाच्या पूर्वद्वारावरील शिल्पांत दिग्दर्शित केलेलें उरुविल्वकाश्यप यांचें धर्मांतर या विषयावर गांधारपरंपरेमध्यें बरींच शिल्पें आढळतात. यांपैकीं एका शिल्पामध्यें बुद्ध हा मधोमध दाखविला असून त्याच्या भोंवतालीं आठ उपासक दाखविले आहेत. बुद्धाच्या पायाखालीं पाण्याची धार दाखविली असून तीवर तो उभा आहे व त्याच्या मुखाभोंवतीं असलेल्या प्रभामंडलांतून अग्नीच्या ज्वाला निघत असलेल्या दिसून येतात. या ठिकाणीं बुद्धाबद्दल, अग्नि आणि जल या महातत्वांवर अंमल चालविणारा महापुरुष या नात्यानें, पूज्यता दाखविलेली दिसते. उपरिनिषर्दष्ट उरुबिल्व चमत्काराचा हा थोडक्यांत उल्लेख आहे असें म्हणतां येईल. यानंतर अभिनिष्कमणप्रसंगाच्या शिल्पांमध्यें जमालगढी येथें सांपडलेली व सध्यां लाहोर येथें पदार्थसंग्रहालयांत ठेवलेली प्रतिमा जास्त महत्वाची आहे. या शिल्पांत अभिनिष्क्रमणकथेच्या दोन अवस्था दर्शविल्या असून शिल्पपद्धतींच्या दृष्टीनें यामध्यें अनेक प्रकारच्या आकृती आढळून येतात. या शिल्पांतील कमानी ग्रीको-रोमन थाटाच्या असून खांबाच्या खालील बैठकी भारतीय पद्धतीच्या व खांबावरील भाग इराणी पद्धतीची नक्षी असलेले दिसत असून कठडयाची पद्धत बुद्धकालीन आहे व गोलची ग्रीक अगर रोमन पद्धतीची दिसते. ह्या शिल्पाच्या वरील अर्धांत गौतम हा बिछान्यावर टेकलेला दाखविला असून भोंवतालच्या स्त्रियांपैकीं एकपादपीठावर पाय ठेवून गौतमाशेजारीं बसलेली, दुसरी मागें उभी राहून वारा घालीत असलेली व बाकींच्या स्त्रिया निरनिराळीं (मुरली, वीणा, तबला, टाळ इत्यादि) वाद्यें वाजवीत असलेल्या व दोन नर्तकी खांबापलीकडे नाचत असलेल्या दाखविल्या आहेत. त्याचप्रमाणें खालच्या अर्धांत गौतम हा आपल्या पत्नीच्या बिछान्यावर बसूनविचार करीत असलेला दाखविला असून भोंवतालीं त्याच्या विचाराचे विषय अशा त्या गायक स्त्रिया झोंपी गेल्या आहेत व बिछान्यामागें दोन व्यक्ती दाखविल्या आहेत. उजव्या व डाव्या बाजूकडील खिडक्यांतून हातांत भाला घेतलेल्या यवनानी स्त्रीरक्षक उभ्या असून वरील सज्जांतून सूर्यचंद्रादि देव व विशाखा नक्षत्राचा दर्शक वृषभ दाखविला आहे.

एकाच शिलापटावर निरनिराळया प्रसंगांच्या शिल्पनिदर्शनांचें एकत्रीकरण करण्यानें पुनः पुर्वीच्याच शिल्पपद्धतीचा अवलंब केल्यासारखें होतें. गांधारपरंपरेंतील विहारामध्यें खालच्याबाजूस मुख्य मुख्य प्रसंग अर्धवर्तुलाकार शिल्पांत दाखविले असून त्यांजवर लहान लहान आकृति असलेल्या कमानी आहेत. कित्येक शिल्पांमध्यें गौतमबुद्धाची प्रतिमा मधोमध असून भोंवताली उजव्या-डाव्या बाजूस इतर उपासक व वरखालीं निरनिराळया आकृती खोदल्या आहेत. याशिवाय दैत्य, नाग, देवइत्यादिकांच्या प्रतिमा बुद्धावर पुष्पवर्षाव करीत असलेल्या दाखविल्या आहेत.

कांहीं कांहीं शिल्पांमध्यें निरनिराळया भागांचा तुटकपणा दाखविण्याकरितां मजले कोरण्यांत आले असून हीं शिल्पकामें मोठमोठया यात्राप्रसंगीं मिरवीत नेण्याची बौद्ध लोकांची वहिवाट असे. त्याचप्रमाणें मध्यभागीं बुद्धची मूर्ति कोरलेले व वरखालीं निरनिराळी लहान लहान अर्धवर्तुळाकार प्रतिमा असलेले पोलादाचे शिल्पनमुने गांधारपरंपरेमध्यें अत्यंत महत्वाचे आहेत व अशाच प्रकारची शिल्पें तिबेट, चीन, जपान इत्यादि ठिकाणच्या बौद्ध सांप्रदायिक कलांमध्यें आढळून येतात. ह्या सर्व गोष्टींवरून एवढी गोष्ट मात्र निःसंशय सिद्ध होते कीं, गांधारशिल्पाचा उत्तरेकडील बौद्धसंप्रदायाच्या कलाविकासास पुष्कळ उपयोग झालेला आहे; व ह्या संप्रदायांतील सांप्रतच्या प्रतिमारचनेशीं परिचय झाला असतां प्राचीन गांधारशिल्पांविषयींच्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांवर प्रकाश पडण्याचा संभव आहे. ह्या प्रतिमाशिल्पांनां शोभा यावी म्हणून निरनिराळया प्रकारच्या लहान लहान प्रतिमा एका रांगेनें शिल्पा सभोंवतीं काढण्यांत येतात, ह्यांपैकीं प्रत्येक प्रतिमा कोण्या देवतेची आहे हें ठरविणें अशक्य आहे; तथापि त्यांतील मुख्य मुख्य प्रतिमांची ओळख पटली पाहिजे.

ह्यांपैकीं गरुडाच्या उभ्या प्रतिमांचा वरील तुळईस खांबासारखा आधाराकरितां उपयोग करण्याची प्राचीन शिल्पाप्रमाणें गांधारशिल्पांतहि चाल होती. किंवा एखादेवेळीं गरुडाच्या ऐवजीं बुद्धाची एकटीच किंवा भोंवतालीं उपासक असलेली प्रतिमा खांबावर खोदण्यांत येत असे. परंतु ह्या सर्वांपेक्षां अत्यंत महत्वाची स्तंभप्रतिमा 'क्रियोफोरस' या नांवाच्या मेषवाहकाची होय.ख्रिस्ती शिल्पामध्यें 'आदर्शभूत मेंढपाल' ह्याची निदर्शक अशी शिल्पप्रतिमा व उपरिनिषर्दष्ट बौद्धशिल्पावर आढळणारी प्रतिमा ह्यांमध्यें इतकें चमत्कारिक सादृश्य आढळून येतें कीं, त्यावरून ह्या कालांत ख्रिस्ती शिल्पाशीं झालेल्या गांधारशिल्पाच्या परिचयाची कल्पना स्मिथला आली यांत नवल नाहीं. कारण ह्या प्रतिमांवरील पोशाखाची तर्‍हा सारखीच आहे, व बौद्ध स्मारकामध्यें दुसर्‍या कोणत्याहि ठिकाणीं अशी प्रतिमा आढळून येत नाहीं. तथापि त्या शिल्पावरून कोणत्या बौद्ध कथेचें निदर्शन होत असावें ह्याचा अंदाज करतां येत नाहीं. परंतु लाहोर येथील पदार्थसंग्रहालयांतील एका शिल्पामध्यें एक मनुष्य दुसर्‍या एका बसलेल्या व्यक्तीच्या पायापाशीं कांही पैसे ओतीत आहे असें दाखविलें आहे. तेव्हां प्राचीन शिल्पांतील रुपांतर झालें असावें.

या निधिवाहकाच्या शिल्पासंबंधानें दिक्पालांच्या बौद्ध आख्यायिकांमध्यें थोडी माहिती मिळते. लाहोर येथील पदार्थसंग्रहालयामध्यें एका सिंहासनावर बसलेल्या व अनेक अलंकार, मुकुटांदिकांनीं शरीर सुशोभित केलेल्या एका राजाचें शिल्प ठेविलें आहे. त्यामधील प्रतिमा कुबेराची असावी. त्याच्या शेजारीं एक यक्षाची लहानशी प्रतिमा उभी दाखविली आहे व पायांशीं एक निधिवाहक सोन्याच्या नाण्यांची थेली ओतीत आहे असें दाखविलें आहे. अशाच प्रकारचें दुसरें एक लोकपालाचें शिल्प ब्रिटिश म्यूझियममध्यें आहे. या शिल्पाशीं लाहोरच्या संग्रहांलयांतील एका भारतीय शक राजाच्या प्रतिमेची तुलना केली असतां विशेष महत्वाचे असे दोन मुद्दे विचार करण्यासारखे आहेत ते (१) एका मुख्य व्यक्तीबोंवतीं लहान लहान प्रतिमा दाखविणें; याविषयीं एवढेंच म्हणतां येईल कीं, ज्यावेळीं शिल्पकलेची अवनति सुरु होते, त्यावेळीं भोंवतालच्या चाकर नोकरांच्या प्रतिमांपेक्षा मुख्य सम्राट राजे वगैरे व्यक्तींच्या प्रतिमा मोठया असतात. (२) या शिल्पांत दाखविलेल्या आकृतींचे एका ठराविक मुखवटयासारखे चेहेरे पाहतां खरे राजे, लोकपालाप्रमाणें शिल्पांमध्यें निदर्शित केले असणें संभवनीय आहे किंवा काय ? या प्रकारच्या मुद्दयांचा विचार जास्त संशोधन झाल्यावर कदाचित होईल, अशी आशा आहे.

इतर किरकोळ शिल्पें- आतांपर्यंत वर्णन केलेल्या शिल्पप्रतिमांखेरीज दुसरी पुष्कळ किरकोळ प्रसंगांचीं निदर्शक अशीं शिल्पें गांधारपरंपरेंत आहेत. एका शिल्पांत गौतमबुद्धानें जन्मल्याबरोबर टाकलेल्या सात पावलांचा ऐश्वर्यसूटक प्रसंग दाखविला असून त्यामध्यें वज्राधारी शक्र, हातांत कमडंलु घेतलेला ब्रह्मदेव वगैरे कांही देवता दाखविल्या आहेत. असाच दुसर्‍या एका शिल्पामध्यें बालरूप बुद्ध हा उजव्या हातानें स्वर्ग व डाव्या हातानें पृथ्वी दाखवीत असल्याचा प्रसंग आहे. व सांप्रतच्या चीन, जपान इत्यादि देशांतील बौद्ध आख्यायिकांमध्यें बुद्धासंबंधीं असेंच वर्णन आढळून येतें. दुसर्‍या एका शिल्पांत असितॠषि व शुद्धेदन यांच्या भेटीचा प्रसंग दाखविला असून अजंठा येथील एका शिल्पावर असित हा अर्भकस्वरुपी गौतमास घेऊन उभा असल्याचें दाखविलें आहे. एका शिल्पामध्यें विमलव्यूह बागेमध्यें अनेक देवांनीं गौतमास जन्मल्याबरोबर घातलेल्या स्नानाचा प्रसंग दाखविला आहे. दुसर्‍या एका शिल्पामध्यें पर्णशालेंत बसलेल्या एका ब्राह्मण तपस्व्यास बुद्ध उपदेश करीत आहेव त्याच्या पाठीमागें वज्राधारी शक्रदेव उभा आहे असें दाखविलें आहे. हा पर्णशालेंतील तपस्वी गयाकाश्यप असावा,. या एकंदर शिल्पांची परस्परांशीं तुलना केली असतां गांधारशिल्पकलेवर मूळ भारतीय कल्पनांचा किती परिणाम झाला व एका उच्चतर, आदर्शभूत ध्येयानुसरा गांधारशिल्पकलेनें परकीय शिल्पनमुने घेऊन नवीन कृती कशा निर्माण केल्या हें जाणण्यास पुष्कळ मदत होणार आहे. बुद्ध इंद्रशैल गुहेमध्यें राहून तपाचरण करीत असतां, इंद्रानें तेथें जाऊन त्याचा सन्मान केल्याची आख्यायिका प्रसिद्धच आहे; व हा प्रसंग स्वात येथील एका शिल्पामध्यें दाखविला आहे.

जाककथांच्या निदर्शनामध्यें गौतमापूर्वीचा चोविसावा पुरुष जो दीपंकर बुद्ध, त्याच्या वेळीं होऊन गेलेल्या सुमेधाचें शिल्प फारच लोकप्रसिद्ध आहे. या सुमेधासंबंधीं अशी आख्यायिका सांगतात कीं, हा सुमेध किंवा मेध पूर्वजन्मीं मैत्रेय बोधिसत्वाचा शिष्य असतांना त्याला भद्रा नांवाच्या वरुणकन्येपासून कांहीं निळीं कमळें मिळालीं ती त्यानें बुद्धावर उधळलीं व दीपंकर बुद्धाच्या मार्गामध्यें लोळण घेऊन, आपल्या जटांवर पाय देऊन दीपंकर जाईल असा बुद्धीनें त्यानें आपल्या जटा पसरून पुढील जन्मांत शाक्यमुनीच्या रुपानें अवतीर्ण होण्याची इच्छा सफल करुन घेतली असा प्रसंग दोन तीन शिल्पांमध्यें दाखविला आहे. बौद्ध शिल्पांतील अत्यंत आवडीच्या विषयांपैकीं एक, वाराणशी नगरीमध्यें गौतमानें केलेलें प्रवचन हा होय. या शिल्पामध्यें पांच तपस्वी बुद्धाचा उपदेश ऐकत बसलेले असून त्रिशूळ व धर्माचें निदर्शक चिन्ह जें चक्र तें दाखविण्यांत आलें आहे. दुसर्‍या अशाच एका शिल्पामध्यें गौतमास बुद्धत्वाची प्राप्ति झाल्यानंतर दोन व्यापार्‍यांनीं प्रथमच दिलेल्या उपहाराचा प्रसंग निदर्शित केला आहे. या प्रसंगीं ज्यावेळीं गौतमास भिक्षापात्राची आवश्यकता वाटूं लागली, त्यावेळीं चार राजांनीं प्रथम चार सुवर्णपात्रें, नंतर चार रौप्यपात्रें गौतमास दिलीं; परंतु गौतम त्याचा स्वीकार करीना. शेवटीं त्या चौघांनी चार मृण्मय पात्रें आणलीं आणि बुद्धनें त्या चौघांमध्यें मत्सर उत्पन्न होऊं नये म्हणून त्या चारी पात्रांचें एक पात्र करवून त्याचा स्वीकार केला.

गांधारशिल्पाच्या एकंदर विकासाचा संबंध महायानपंथाशीं दिसून येतो ही गोष्ट खरी आहे. तथापि एकंदर साधनसामग्रीचा विचार, कोणत्याहि प्रकारच्या धार्मिक कल्पनांत न गुरफटतां स्वतंत्रपणें करणेंच इष्ट आहे. एकंदर सर्व बाजूंनीं स्वतंत्रपणें विचार केला तर असें दिसून येईल कीं, उत्तरकालीन बौद्ध किंवा ब्राह्मणी शिल्पकृतींची जननी गांधारशिल्पपरंपराच होय.

गांधारशिल्पपरंपरेचा उत्तरकालीन भारतीय शिल्पकलेवर पुष्कळ परिणाम झालेला दिसून येतो. तथापि, पूर्वशिल्पपरंपरेंतील नमुन्यांमध्यें फरक झालेला नसून एकंदर शिल्परचनेमध्यें तिबेट, चीन, जपान इत्यादि देशांतील अर्वाचीन शिल्पकलेचें निरीक्षण केलें असतां पूर्वीच्या शिल्परचनेच्या मानानें उत्तरकालीन बौद्ध शिल्पांमध्यें पूर्ण रुपांतर झालेलें दिसत नसून फक्त शिल्परचनापद्धत भरहुत व सांची येथील प्राचीन शिल्पांहून भिन्न आहे. हा प्रकार गौतमबुद्धची प्रतिमा शिल्पांत शिरल्यामुळें घडून आला आहे. या शिल्पांतील बुद्धाच्या प्रतिमेभोंवतीं पूर्वीप्रमाणेंच प्रभामंडळ दाखविलें जातें व बाकींच्या प्रतिमा कमी जास्त महत्वाप्रमाणें जवळ किंवा दूर दाखविल्या जातात. अमरावती येथील कठडयांवरील शिल्पांची दर्शनयी बाजू या दृष्टीनें फार महत्वाची आहे. रोमन पद्धतीप्रमाणें या कठडयांमधील स्तंभांवर मधोमध निळीं कमळें दाखविण्यांत आलीं आहेत. या उत्तरकालीन शिल्पांतील एकटया प्रतिमा प्राचीन पद्धतीनुरुप असून फक्त त्यांमध्यें जास्त सुबकपणा दिसून येतो व या प्रतिमांच्या पोशाखपद्धतीवर गांधारशिल्पाचा अप्रत्यक्षपणें कां होईना, परिणाम झालेला दिसतो. अमरावती शिल्पांतील सुंदर, चित्तवेधक अशा बायकी चेहेर्‍यावर ग्रीक शिल्पाचा परिणाम झालेला उघड दिसतो. ('अमरावती' पहा). इतकें असूनहि एकंदर शिल्पामध्यें भारतीयत्वाचा ठसा पूर्णपणें राखला गेला आहे व भारतीय कलेनें परकीय कलाविषयक गोष्टी पूर्ण आत्मसात् करुन घेऊन त्यांतील परकीयपणा नाहींसा करुन टाकिला आहे.

दक्षिण हिंदुस्थानांतील मूर्तिशिल्प.

उत्तर व दक्षिण हिंदुस्थानीय शिल्पकला त्या त्या विभागांतील लोकांप्रमाणेंच भिन्न आहेत. आज आपण दक्षिण हिंदुस्थानांत जी संस्कृति पाहतों ती बव्हंशीं औदीच्य असून तींत मूळच्या आर्यपूर्व अन्य संस्कृतीचा फारसा मागमूस दिसत नाहीं. चेर, चोल आणि पांडय यांच्या वेळची संस्कृति औदीच्य संस्कृतीहून थोडीशी वेगळी होती. साहसप्रिय लोकांनीं उत्तरेकडून येऊन द्रविड जातींत हळू हळू आपल्या संस्कृतीचा प्रसार केला. म्हणजे जास्त व्यापक कल्पना (चातुर्वण्यकल्पना) त्याबरोबर संस्कृत शब्द इत्यादिकांचा प्रसार दक्षिणेंत झाला.

शिल्पप्रारंभाचें अगस्त्यास श्रेय- दक्षिणात्य शिल्पशास्त्राचा इतिहास लिहितांना अगस्त्याचा उल्लेख प्रथम केला पाहिजे. अगस्त्याचा उल्लेख प्रथम केवळ शिल्पशास्त्रांतच नाही पण अनेक शास्त्रांत करावयास पाहिजे. वेदांत लोपामुद्रापति म्हणून ज्याचा उल्लेख आहे किंवा राम वनवासांत असतांना ज्याच्या आश्रमीं उतरले होते तो लोपामुद्रापति अगस्त्य तो हाच असणें शक्य नाहीं. रामाच्या काळांत दंडकारण्यातं वसती करतांना दाखविलेला अगस्त्य हा वैदिक अगस्त्य असणेंहि शक्य वाटत नाहीं. तथापि दाक्षिणात्य संस्कृतींत अगस्त्याचें नांव मोठें आहे ही माहिती रामायणाच्या प्रस्तुत आवृत्तिकारास असावी. हा अगस्त्य कोणीहि असो, यानें तामिळ वाङ्‌मय व कला नांवारुपास आणिली. याचें म्हणून समजण्यांत येणारें 'शिल्पशास्त्र' अगदींच अप्रसिद्ध आहे. दक्षिणहिंदुस्थानीय कलेच्या दृष्टीनें 'आगस्तीय सकलाधिकार' हा ग्रंथ विशेष महत्वाचा म्हणतां येईल. दक्षिण हिंदुस्थानांतील मूर्तिकर्माला वळण लावणारा हाच पहिला ग्रंथकार असून, मूर्तीच्या प्रमाणांविषयींचे यानें घालून दिलेले नियम 'काश्यपीय' 'सारस्वतीय' अंशुमान वेद-कल्प' इत्यादि पुढील शिल्पग्रंथांत घेतलेले आहेत व अद्यापहि दक्षिणेंतील 'स्थपती'(मूर्तिकार) ते पाळतात. अगस्त्याचा 'सकलाधिकार' हा ग्रंथ तेजावरच्या राजग्रंथसंग्रहालयांतच कायतो हस्तलिखितांत सांपडतो. या ग्रथांत पुढील विषय आहेत प्र. १लें; मानसंग्र प्र. २ रें. उत्तमदशताल. प्र. ३ रें, मध्यमदशताल. प्र. ४थे; अधमदशताल. प्र. ५ वें; प्रतिमालक्षण प्र. ६वें; वृषभवाहनलक्षण प्र. ७वें; नरेश्वरविधि प्र. ८वं; षोडशप्रतिमालक्षण प्र. ९वें; दारुसंग्रह. प्र. १० वें; मृत्संस्कार प्र. ११ वें; वर्णसंस्कार.

दक्षिणेंत अगस्त्याच्या वेळीं शिल्पकारांनीं सुरू केलेली कला कशा प्रकारची होती हें या ग्रंथावरून समजतें; शिवाय शिवाच्या सोळा प्रतिमा कशा कराव्या याची जी यांत माहिती दिली आहे तीवरून शैवसंप्रदाय त्याठिकाणीं साकार प्रस्थापित झाला होता, व कारागिरांनां अनेक सुंदर विषय मिळाले होतें असे दिसतें.

जरी दक्षिणभारतीय कलेची पुढील काळांतील वाढ वैष्णवसंप्रदाय व तत्वज्ञान यांच्यामुळें झाली असली तथापि ती कला सर्वांशीं प्रारंभीं तरी शैव होती यांत शंका नाहीं. शैवसंप्रदायांतील बर्‍याचशा देवमूर्ती अगस्त्यकाळांतील वळणावर आहेत. अगस्त्यमुनि पहिल्या पांडया राजाचा गुरु व मंत्री होता असें सांगतात; तेव्हां त्याचा हा सकलाधिकार ग्रंथ इतका प्राचीन आहे.

कश्यप- अगस्त्याचें नांव ज्याप्रमाणें कलेच्या इतिहासांत महत्वाचें आहे त्याप्रमाणेंच कश्यप व मय यांचेंहि आहे. अगस्त्यानंतर दक्षिण हिंदुस्थानच्या कलेतिहासांतील दुसरें नांव कश्यपाचेंच होय. प्राचीन धर्मग्रंथकार व वैशेषिक पंथाच्या संस्थापकाचा (कणादाचा) पिता जो कश्यपॠषि तो हाच असावा असें भोळे ग्रंथकार म्हणतात. 'काश्यपीय' या शिल्पग्रंथाचा कर्ता म्हणून कश्यप दक्षिणेंत सुप्रसिद्ध आहे. आजतागाईत दक्षिण हिंदुस्थानांतील कारागिरांनां हा ग्रंथ आधारभूत असून, मूर्तीची घडण व प्रमाण या विषयींचे यांतील नियम अद्याप पावेतों लहान मुलांकडून पाठ करवून घेतात. कश्यपाच्या लेखांतील 'अंशुमान वेदकल्प' हा भाग जास्त प्रसिद्ध असून, त्यांत केवळ शिल्पासंबंधीं माहिती आहे.

मय- कश्यपाच्यामागून दक्षिणभारतीय कलेशीं संबद्ध असलेला पुरुष मय होय. याचा 'मयमत' हा शिल्पग्रंथ प्रसिद्ध आहे. यानें केलेले म्हणून समजण्यांत येणारे कांही ग्रंथ येणेंप्रमाणें (१) मयमत किंवा मयमतवास्तुशास्त्र. (२) मयशिल्प. (३) मयशिल्पशतिका व (४) शिल्पशास्त्राविधानम्. यांतील शेवटचा ग्रंथ पांच प्रकरणी असून त्यांत केवळ मूर्तिरचनेचाच उहापोह आहे; मूळ मयमताचा हा एक खंड आहे असें मानण्यांत येतें. इतर ग्रंथांतून देवालयाशिल्पाची माहिती दिली आहे. कलेसंबंधांत तो अगस्त्य व कश्यप यांच्या अलीकडचा आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.

नग्नजित्- या कलेंतील पुढचा एक मार्गदर्शक पुरुष नग्नजित् हा होय. यानें ऐतिहासिक व्यक्तिशिल्पावरग्रंथ लिहिले आहेत. बृहत्संहितेंत ज्या प्रकरणांत (अध्याय ५८, श्लो. ४) प्रतिालेखनाविषयीं विचार केला आहे त्यांत नग्नजिताला प्रमाणभूत मानिला आहे. याचा कोणत्याहि ग्रंथ हल्ली उपलब्ध नाहीं. जे अठरा वास्तुशास्त्रोपदेशक सांगितले आहेत त्यांत नग्नजित् आहे.

जय, परजय आणि विजय- तारानाथनें इ.स. १६०८ च्या सुमारास लिहिलेल्या भारतीय कलेतिहासांत आढळणारी दक्षिण हिंदुस्थानांतील संप्रदायांची माहिती विश्वसनीय धरून चालण्यास हरकत नाहीं. तो लिहितो कीं, 'जेथें बौद्धसंप्रदाय असे तेथें कुशल धार्मिक कारागीर आढळत, पण ज्या ठिकाणीं म्लेंच्छसत्ता असे तेथें यांचा अभाव दिसे. पुन्हां जेथें तीर्थ्य धर्ममतें (पुराणहिंदुधर्म) दिसत त्या ठिकाणीं अनभिज्ञ कारागीर उदयास येत. जरी 'पाकम' (ब्रह्मदेश) आणि दक्षिणप्रांत यांत अध्याप मूर्तिकर्म चालू आङे, तथापि त्यांच्या कारागिरीचे नमुने तिबेटांत आल्याचें दिसत नाहींत. दक्षिणेंत तीन कारागिरांचे मोठे संप्रदाय आहेत; ते जय, परजय आणि विजय हे होत.' परंतु दक्षिणेंतील मूर्तिकर्मसंप्रदायांचे अध्वर्यू म्हणून यांची कीषर्त इसवी सन १६०० च्या सुमारास तिबेटापर्यंत पोंचली होती. चोलराजांच्या आश्रयाखालीं १० व्या शतकापर्यंत जी शैवमूर्ति शिल्पाची भरभराट झाली त्या अमदानीच्या काळांत ही त्रैमूर्ति असावी.

अगस्त्याचा दक्षिणेंत वसाहत करण्याचा हेतु, आर्यसंस्कृति सर्व स्वरूपांत द्रविड जातींत आणून, द्राविडी संस्कृतीवर या नवसंस्कृतीचा शिक्का माराव हा होता. तेव्हां या उत्क्रांतीसाठीं कांहीं जुन्या द्रविडी गोष्टीनां आर्य बनवावें लागलें. नव्या आर्य चालीरीती या लोकांत घुसडून द्याव्या लागल्या. आर्य देवांनां द्रविडी बायका केल्या. कार्तिकस्वामीसारख्या ब्रह्मचार्‍याला देखील दोन दोन बायका दिल्या; जे देव आर्य देवतासंघांत मिसळण्यासारखे नव्हते त्यांनां ग्रामदेवता म्हणून ठेवून दिलें. या धारणमिश्रणक्रियेच्या वेळी आर्य मूर्तिकारांनां आर्य देवतांचें मूळचें स्वरूप व प्रामाण्य नवीन वातावरणांत कायम ठेवणें अत्यावश्य दिसलें. तेव्हां कदाचित अगस्त्यानें व त्याच्या अनुयायांनीं ध्यानमंत्र लिहून देवतांचें पूर्वीचे स्वरूप व ध्यान अखंड राहूं देण्याची जी योजना केली ती किती आवश्यक होती हें दिसून येईल. दक्षिण हिंदु स्थानांत मूर्तिकर्मावर जे ग्रंथ आहेत त्या सर्वांतहे ध्यानमंत्र दिलेले असून व ते मूर्तिकारानें मुखोद्वत करावयाचे असतात. या ध्यानमंत्रांबरहुकूम ते मूर्ती बनवितात. दक्षिणेंत आज आढळणारीं बहुतेक मूर्तीची कामें सर्वसामान्य लक्षणें आणि वळण या दृष्टीनें पाहतां उत्तर हिंदुस्थानांतील धार्मिक परंपरेस सोडून नाहींत असेंच आढळून येईल. उत्तर हिंदुस्थानांतील धार्मिक कलेंत जेवढें म्हणून श्रेष्ठ होतें तेवढें सर्व अगस्त्यादींनीं दक्षिण हिंदुस्थानच्या कलेंत गोंवून त्यांनां शाश्वतस्वरुप दिलें.

या उत्तरभारतीय परंपरेला सोडून असलेला दुसरा एक कलासंप्रदाय दक्षिणेंत आहे, त्याला द्राविडीकलासंप्रदाय म्हटल्यास योग्य होईल. दक्षिणेंत शैव पंथाचा पगडा असतांना या संप्रदायानें वेरूळ व मामलज्पुरम् येथील शिल्पांत आविष्कृत होणारी जुनी कला पुढें चालू ठेविली व तिला नमुनेदार वळण दिलें. यापुढील काळांत दक्षिणेंत नवीन वसाहतवाल्यांचा ओघ येऊन त्यानें इतिहासपूर्वकालीं अगस्त्यादींनीं जो ब्राह्मणसंप्रदाय दक्षिणेंत स्थापिला त्याला पुनरुत्थान दिलें हे नवीन लोक वैष्णव, भागवतसंप्रदायी असून त्यांनीं आठव्या शतकांत तेलगु, कन्नड आणि तामिळ राज्यांत ठाणें दिलें नवव्या व दहाव्या शतकांत जेव्हां मुसुलमानांच्या स्वार्‍या वारंवार होऊं लागल्या तेव्हां यांची संख्याहि वाढली. दक्षिणभारतानें उत्तरभारतापासून स्पूर्ति मिळविण्याची शेवटची वेळ नायक राजे व तंजावरचे मराठे राजे यांच्या अमदानींतील होय.

शैवकलेची वाढ- ललितविस्तरासारख्या बौद्धग्रंथांवरून पाहिलें असतां बौद्धसंप्रदायापूर्वी शिवोपासना हिंदुस्थानांत प्रचलित होती असें दिसतें. ख्रिस्तपूर्ण दुसर्‍या शतकांतल्या पतंजलीच्या काळीं मयूर्यमूर्तिकार शिव, स्कंध आणि विशाखा यांच्या प्रतिमा करुन विकीत व बराच पैसा मिळवीत (पाणिनीच्या ५-३-९९ सूत्रावरील पातंजल भाष्य पहा). यावरून या देवमूर्तीनां बरीच मागणी होती हें सिद्ध होतें. (इ.ऍं. ३८ पृ. १४९). शैव देवस्थानांपैकीं महत्वाचीं अशीं वेरूळचीं देवालयें इ.स. ७६० मध्यें खोदलीं गेली आहेत व मामलज्पुरम् येथील तीन शिवलेणीं सहाव्या सातव्या शतकांत पलज्व राजांच्या अमदानींत तयार झाली. पलज्व, पांडय व चोल राज शैव होते. चोल घराण्यांतील शैव राजांनीं देवळांची जी मालिका गुंफिली ती भारतीय शिल्पकलेचे उत्कृष्ठ संप्रदाय बनली आहे; वास्तुशिल्पाप्रमाणें मूर्तिशिल्पालाहि चोल राजांनीं चांगला आश्रय दिला. पूर्वीच्या शिवाच्या लिंगस्वरूपांत कारागिराला आपलें कसब दाखविण्यास मुळींच जागा नव्हती. पुढें दक्षिण हिंदुस्थानांतील शैवपंथांत शिव, पार्वती, सुब्रह्मण्य इत्यादि अनेक शिवकथापुराणांतील मूर्तिची कल्पना निघून मूर्तिलेखनाला पुष्कळ सामुग्री मिळाली. या मूर्तिचें ध्यान मू्र्तिकारांकरितां लिहिलेल्या संस्कृत ग्रंथांतून आढळतें.

प्रत्येक देवालयांत मूल-विग्र किंवा ध्रुव-वेर याप्रधान लिंगचिन्हाखेरीज पंचलोहधातूच्या दुसर्‍या कांहीं बोगमूर्ती किंवा उत्सवविग्रह भक्तांच्या भावनांनां चालन देण्याकरितां मांडल्या जातात, त्यांचे उत्सव व मिरवणुकी काढतात. सामान्यतः गाभार्‍याभोंवतालच्या प्रकारांत किंवा त्याच्या वाटेवर या भोगमूर्ती बसविल्या असल्याकारणानें यात्रेंकरुंच्या मार्गांतील तीं जणुंकाही प्रेक्षणीय कलागृहेंच बनतात. या उत्सवमूर्तीचे अति महत्वाचे समूह त्रिचनापली येथील प्रख्यात लेणें व जंबुकेश्वराचें देवालय, आणि तंजावर येथील बृहदीश्वराचें देवस्थान यांतून अद्याप दृष्टीस पडतात.

दक्षिणेंतील मूर्तिकार वापरीत असलेलें शिल्पशास्त्र व मूर्तिशास्त्र यांवरील ग्रंथ संस्कृत असून, दक्षिणहिंदुस्थानांत संस्कृत पुराणें ज्यावेळीं रचिलीं गेलीं त्यावेळचे ते दिसतात. शिवाय मूर्तिकर्माची चाल फार जुनी असून, ती कम्मालर, स्थपति, विश्वकर्मा किंवा रथकारिक या नांवांनीं ओळखल्या जाणार्‍या एका विशिष्ट कसबी जातीकडे असे. तेव्हां या कारागिरांची शिल्पांत नैपुण्य संपादून स्वतंत्र जात होण्यापूर्वी बराच काल लोटला असावा. चोलकालीन शैवकलेच्या अभ्यासास चोलराजांनीं देवास अर्पण केलेलीं दानें (देवदानें) विचारांत घेणें अत्यंत महत्वाचें आहे. या दानांत आपल्या दृष्टीनें विशेष महत्वाचीं दानें म्हणजे मूर्ती आणि दीप. या बाबतींतसर्व दर्जाच्या लोकांनीं मोठया चढाओढीनें राजांचें अनुकरण केलेलं दिसतें. या देवदानांतील मूर्तीचे तीन वर्ग पाडतां येतील (१) उत्सवमूर्ती; यांत मुख्य देवतेचीं निरनिराळीं रुपें असत. कधीं कधीं नागरिक खासगी रीतीनें देवळें बांधून त्यांत चांदीसोन्याच्या किंवा पंचलोहाच्या मूर्ती बसवीत. (२) शैव साधूंच्या मूर्ती; अशा साधूंच्या मूर्ती सर्व देवळांतून आहेत. म्हैसूरजवळच्या नंजनगुडी येथील देवळांत सर्व शैवसंतांची एक संबंध मालिकाच आहे. (३) देवळें बांधणार्‍यांच्या किंवा दानें देणार्‍यांच्या मूर्ती; या एकजातीच्या व उपासनाध्यानांत असलेल्या प्रतिमा असतात; खरी दात्याची हुबेहुब मूर्ति बहुधां नसते. दीप दोन प्रकारचे असत एक आरतीकरितां व दुसरें नंदादीपाकरितां. पुष्कळसे दीप फार सुरेख नक्षीदार केलेले असत; एका स्त्रीनें हातांत दीप धरला आहे असा या दीपलक्ष्मी तयार केल्या जात. दीपलक्ष्मी करण्याची चाल इसवी सन पहिल्या शतकापासूनची तरी आहे. दक्षिण हिंदुस्थानांतील पंचलोहमूर्तिकारांनीं या दीपलक्ष्मी करण्याच्या कामांत आपलें बरेंच कौशल्य खर्च केलेलें दिसतें.

ज्याकाळीं राजे व सामान्य लोक देवस्थानांवर इतका दानांचा भडिमार करीत त्याकाळीं मूर्तिकारांची विशेष चलती असल्यास नवल नाहीं. या मूर्तीच्या अतोनात मागण्या व पुरवठयामुळें शिल्पसंप्रदाय जिवंत राहून, स्थपतींचीवाढ झाली. चोलकालापूर्वी देशांत जरी हे स्थपती होते तरी या काळांत त्यांनां जो धार्मिक आश्रय मिळाला त्यायोगानें त्यांची कला परिणतावस्थेस पोंचली. हे स्थपतीबहुधां खेडेगांवांतून रहात. शैवांप्रमाणे या काळीं वैष्णवांनींहि शिल्पकारांनां आपलीं कामें सांगितलीं होतीं. शैवमूर्तीप्रमाणें कृष्ण व वैष्णवसाधु यांच्या मूर्तीहि दक्षिणभारतीय मूर्तिशिल्पाच्या वैशिष्टयाचा नमुना म्हणून पुढें करण्यासारख्या आहेत. पुष्कळ प्रमुख शिवालयांतून विष्णूच्या मूर्ती सांपडतात; तंजावरच्या देवस्थानांत गोपुरांवरील सर्व शिल्प व वैष्णवसंप्रदायाचें असून, प्राकारांतील सर्व बांधणी शैव पंथांतील आहे.


शिल्पशास्त्रांतील तत्वें- या लोहमूर्तिशिल्पसंप्रदायाचा अभ्यास करण्यास मूर्तिकार कोणते नियम पाळीत व कोणते प्रयोग करीत हें पाहणें उपयुक्त होईल. जिच्या मूर्ती करावयाच्या त्या धातूला हे कारागीर पंचलोह (म्हणजे पांच प्रकारच्या धातू) असा परिभाषिक शब्द वापरतात. या मिश्रधातूंत तांबे, रुपें, सोनें, पितळ आणि कथील अशा पांच धातू असतात. मिश्रणांत तांबें जास्त प्रमाणांत असून, हल्ली चांदी व सोनें बहुधां त्यांत घालीत नाहींत. हल्लीच्या बहुतेक मूर्तीच्या मिश्रधातूंत पुढील प्रमाणांत धातू एकत्र केलेल्या गेल्या असताता - १० भाग तांबें, एकद्वितीयांश भाग पितळ आणि एकचतुर्थांश भाग कथील. मूर्ति ओतण्याची पद्धत अशी - प्रथम मूर्ति हव्या तेवढया आकाराची मेणाची बनवून तीवर मऊ मातीचें जाड कवच चढवितात. ती सरळ उभी राहण्याकरितां तारांचा उपयोग करतात. नंतर उष्णता लावून ही मेणाची प्रतिमा वितळवितात, व अशा रीतीनें जो पोकळ सांचा तयार होतो त्यांत मिश्र धातु ओततात. ही धातु नीट बसून थंड झाल्यावर मातीचें आच्छादन काढून घेतात व तयार झालेल्या मूर्तीवर कानस वगैरे चालवून तिला सुंदर आकार देतात.

शिल्पशास्त्रांतील नियमांनीं बद्ध झाल्यामुळें शिल्पकाराच्या स्वतंत्र बुद्धीला फारच थोडा वाव मिळतो परंतु एकाच मूर्तीच्या अनेक प्रतिमा (उदाहरणार्थ गणेश किंवा नटराजः तुलनेकरितां पुढें घेतल्यास असें आढळून येईल कीं, कारागिराच्या भिन्न भिन्न रुचिकौशल्यानुसार त्या घडविलेल्या असून त्यांत कारागिराच्या कल्पकतेलाहि वाव मिळाला आहे. सूत्रें व नियम हीं कमी प्रतीच्या व अकुशल अशा कसब्यांनांच केवळ बंधनकारक म्हणून असतात. खर्‍या कारागिराला आपलें कौशल्य दाखविणयास तीं मुळींच आडकाठी आणीत नाहींत.

दक्षिण हिंदुस्थानांतील शिल्पग्रंथांतील नियमांचे तीन वर्ग पडतात (अ) ध्यान, (आ) लक्षणें व (इ) शरीरावयांचीं मापें व त्यांचा परस्परांशीं संबंध. चेहरा हा शारीरपरिमाणाचा मूलमान (युनिट) धरतात. त्याला ताल अशी पारिभाषिक संज्ञा आहे. शुक्रनीतिसाराच्या चवथ्या अध्यायांत व त्याचप्रमाणें बृहत्संहितेच्या प्रतिमालक्षण नांवाच्या अठ्ठावन्नाव्या अद्यायांत सामान्य मानवी शरीरावयवांचीं परिमाणें आढळतात. त्याप्रमाणें पाहतां पुरुष अष्टताल असावा, कोणाहि पुरुषाची उंची अष्टतालापेक्षां कमी असेल तर त्याला वामन म्हणावें अशें शुक्रनीति सांगते. साधारण स्त्रीमूर्ति सात ताल उंच असावी, मूल पांच ताल असावें. अष्टतालावरचीं परिमाणें दव, राक्षस, वगैरे अतिमानुष मूर्तीकरितां असतात; उदाहरणार्थ दैवी मूर्ती नऊ ताल उंच असून राक्षसी दहा ताल उंच असतात, असें शुक्रनीति सांगते. बृहत्संहितेवरून पाहतां सर्वोत्कृष्ट मनुष्याची उंची एकशेआठ अंगुलें म्हणजे मध्यम नवताल असते व सामान्य माणसाची उंची शहाण्णव अंगुलें म्हणजे अष्टताल असते, व सामान्य माणसापेक्षां खालच्या मनुष्याची उंची चौर्‍याऐशी अंगुलें असतें. या बाबतींत सोलोनी आणि दक्षिण भारतीय शिल्पग्रथ शुक्रनीति वगैरे ग्रंथांशीं थोडा विरोध दाखवितात. गणेश आणि कृष्ण यांच्या मूर्ती सोडून इतर सर्व देवतांचीं उंची आठ तालाहून म्हणजे शुक्रनीतींतील सामान्य मनुष्याच्या उंचीहून जास्त आहेत. जास्त उंची असणें हें शौर्याचें लक्षण समजण्यांत येत असे.

ताळ परिमाणाचे बारा भाग पाडले असून प्रत्येक भागाला अंगुल अशी संज्ञा आहे. तालामध्यें कवटी धरीत नसून कपाळाच्या शेवटापासून खालीं हनुवटीपर्यंतची उंची ही एक ताल होय. मूर्तीची निरनिराळी उंची सांगितली असल्याकारणानें त्यांच्या चेहर्‍यांची लांबी सारखी असूं शकणार नाहीं. उदाहरणार्थ नवताल आणि दशताल इतकी उंची असलेल्या देवमूर्तीचे चेहरे सारख्याच लांबीचे नसतात हें उघड आहे. शिवाय नवताल आणि दशताल ह्यांच्यांमध्यें सुद्ध उत्तम, मध्यम आणि अधम असे तीन वर्ग आहेत. प्रत्येक वर्गांतील अवयवांचीं मापेंहि दिलेली असतात.

खालील देवतांच्या मूर्ती उत्तम दशताल प्रमाणानुसार कराव्यांत असें शिल्पग्रंथांत सांगितलें आहे (१)ब्रह्मा, (२) विष्णु, नारसिंह, नारायण, वराह आणि विष्णूंचीं इतर रुपें; (३) शिव किंवा महेश्वर, रुद्र, नटराज इत्यादि शिव प्रतिमा. मध्यम दशताल हें प्रमाण केवळ स्त्री-देवतांच्या मूर्तीनां-विशेषतः ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या शक्तींनां लावितात. काश्यपीयांत पुढील दैवी मूर्ती मध्यम दशताल कराव्यात असें लिहिलें आहे  - उमार, सरस्वती, दुर्गा, उषा,व्योमदेवी, लक्ष्मी, सप्तमातृका आणि ज्येष्ठादेवी. पुढील मूर्ती अधम दशतालांत घातल्या आहेत - चंद्र, सूर्य, कर्तिकेय, अश्विनीकुमार, चंडेश, क्षेत्रपाल आणि इंद्र. संतांच्या मूर्ती हल्लीच्या परिपाठाप्रमाणें अधम नवताल असून त्यांच्या स्त्रियांच्या मूर्ती मानुषी प्रमाणांत म्हणजे अष्टताल असतात. गणेश आण बाळकृष्ण ह्यांच्या मूर्ती पंचताल असून शुक्रनीतींल मुलांच्या बाबतींत सांगितल्याप्रमाणें त्यांचें डोकें पायांच्या मानानें बरेंच मोठें केलेलें असतें.

मूर्तीचीं पांच मापें घेतात तीं येणेंप्रमाणें (१) मान - प्रत्येक मूर्तीचें ठराविक नवताल, दशताल इत्यादि. (२) प्रमाण - मूर्तीची रुंदी किंवा आडवा विस्तार. (३) उन्मान - मूर्तीची उंची किंवा खोली. (४) परिमाण - मूर्तीच्या एखाद्या अवयवाचा घेर. (५) उपमान - शरीराच्या निरनिराळया अंगांचें एकमेकांपासूनचें किंवा ब्रह्मसूत्रापासूनचें सापेक्षमापन. मापनाच्या प्रत्येक वर्गांतील क्षेत्रफळें किती असावींत या विषयीं सामान्य नियम आहेत.

दक्षिण हिंदुस्थानांतील मूर्तीतील वैशिष्टय म्हणजे त्यांचे अंगविक्षेप आणि वक्रता हे असल्याकारणानें त्याविषयीं थोडेसें विवेचन करणें अवश्य आहे. सहज उभें राहणें आणि उत्कृष्टपणें तोल संभाळणें या सौंदर्यशास्त्रदृष्टीनें महत्वाच्या वाटणार्‍या गोष्टी कारागिरांच्या उपयोगाकरितां लिहिलेल्या पुस्तकांतून धड आणि पाय यांच्या स्थितिवक्रतेसंबंधीं दिलेल्या नियमांवरून घडविल्या आहेत. जरी हे नियम अति प्राचीन आहेत तरी अलीकडील शिल्पाभ्यासकाकरितां जुन्या व सुव्यवस्थित अशा कांहीं शिल्पज्ञांच्या ग्रंथांतून ते बहुधा उदघृत केले सावेत. कधीं कधीं दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे नियम अगदीं तंतोतंत, गषर्भत अर्थ न समजून पाळल्याकारणानेंपुढील काळांत मूर्तीत एक प्रकारचा कृत्रिमपणा व ताठरपणा येऊन मूळच्या सौष्ठवाच्या कल्पनेला रुढीचें स्थिर स्वरूप आलें.

उत्तर हिंदुस्थानांतील अति प्रसिद्ध अशी मूर्तीची त्रिबंग किंवा त्रिवंक ठेवण भारतीय शिल्पकलेच्या अभ्यासकांनां कृष्णाच्या प्रतिमा आणि तसेंच कोनारक, भुवनेश्वर व पुरी येथील निरनिराळया मूर्ती यांच्यावरून फार परिचित झाली असली पाहिजे दक्षिण हिंदुस्थानांतील शिल्पग्रंथांतून त्रिवंग आढळत नाहीं. तथापि शैवमूर्तीच्या अनेक ध्यानमंत्रांवरून त्या त्रिवंग आकाराच्या कराव्यात असा गषर्भत अर्थ निघतो. शिवशक्तीच्या एका स्वरुपाचें नांव त्रिवंगी देवी असें आहे. त्रिवंगाऐवजीं येथील शिल्पशास्त्रग्रंथांत आवंग, समवंग आणि अतिवंग असा तीन वेगवेगळया शरीराच्या ठेवणी सांगितल्या आहेत. शेवटली (अतिवंग) ठेवण उत्तरेकडील शिल्पकारांच्या त्रिवंगठेवणीची एक पद्धत म्हणतां येईल. समपादसूत्रापासून कंबर आणि धड यांच्या होणार्‍या च्युतीवर या ठेवणीची उभारणी असते (जेव्हां मूर्तीचें शरीर सरळ व ताठ असतें, त्यावेळीं तिचे बरोबर दोन भाग करणारी जी मध्यरेषा तिला समपादसूत्र असें नांव आहे).

समवंग ही ठेवण चंद्रशेखर (टागोरसंग्रह, कलकत्ता), शिवसूर्य (कोलंबो संग्रहालय) आणि सुब्रह्मण्य (तंजावर येथील बृहदेश्वराचें देवालय) यांसारख्या मूर्तीत उत्तमप्रकारें दिसून येतें. कर्तिकेय आणि चंद्रशेखर या मूर्तीतींल स्थितिदर्शक गुण त्यांच्या समवंग ठेवणीवर अवलंबून आहे. शांतता व स्वस्थता दाखविण्याच्या कामीं या ठेवणीचा उपयोग केलेला दिसतो. आवंग ठेवणीचें उदाहरण मद्रास म्यूझियममधील चंद्रशेखराची मूर्ति, तंजावर जिल्ह्यांतील वद्रंगम् गांवच्या जंबुकेश्वर देवालयांतील परमेश्वराची मूर्ति, पॅरिस येथील म्युसेग्यूमेटमधील गौरीची मूर्ति, आणि तंजावर येथील बृहदेश्वरदेवालयसंग्रहालयांतील पारवै नाचियर ही मूर्ति, इत्यादि होत. या ठेवणींतील दोन पायांमधील भेद असा कीं, एक पाय ताठ असून दुसरा पाय वांकविलेला किंवा वर उचललेला असतो. त्यामुळें शरीराचा तोल एकाच पायावर धरल्यासारखा वाटतो. समवंग आणि आवंग ठेवणींतील भेद दोन पायांमधील अंतरावरुन दिसून येतो. आवंगामध्यें दोन आंगठयांतील अंतर सोळा अंगुलें असतें, व समवंगामध्यें अठरा, व अतिवंगामध्यें वीस असतें. घोटयांमधील अंतर प्रत्येक ठेवणीच्या बाबतींत वर दिलेल्या अंतराच्या एकतृतीयांश असतें. नटराज आणि गजहामूर्ति या अतिवंगठेवणीच्या अमर्याद प्रकारांत वरील नियम मानला जात नाहीं. शरीराच्या वंगामुळें मूर्तीत एक प्रकारचे आविर्भाव उत्पन्न करण्याची कला जी दक्षिणभारतीय शिल्पकलेंत दृग्गोचर होते, तिला तोड म्हणून हिंदुस्थानांत दुसरीकडे कोठेंहि आढळणार नाहीं. तंजावर येथील बृहदेश्वरदेवालयसंग्रहामध्यें कालसंहारमूर्ति, मद्रास म्यूझियममधील चंद्रशेखराची मूर्ति आणि वद्रंगम् येथील परमेश्वरस्वामीची मूर्ति यांच्या ठेवणीमुळें उत्पन्न झालेलें सौष्ठ पाहून मूर्तिकाराच्या कल्पकतेविषयीं आश्चर्य वाटल्याखेरीज रहात नाहीं. या मूर्तीच्या विशेष प्रकारच्या आविर्भावामुळें त्यांच्यांत नैसर्गिक सौष्ठव दिसून येतें. अशा प्रकारच्या कांहीं सुंदर मूर्ती नेपाळी बौद्धांत आढळतात.

या मूर्तीतील दुसरें कलावैशिष्टय म्हणजे हातांची व बोटांची ठेवण हें होय. ही विशिष्ट ठेवण उत्तर हिंदुस्थानांतील मूर्तीतून आढळत नाहीं.

हात आणि बोटें यांच्या चालनांत भारतीय शिल्पकार मूर्तीच्या नमःस्थितीचें चित्र उभें करतो असें म्हणण्यास हरत नाहीं. आध्यात्मिक चिंतन, सात्विक आनंद, यांचें दिग्दर्शन अंगचालनानें करण्यांत दक्षिणभारतीय शिल्पकार फार पटाईत दिसतात. या मूर्तीच्या कांहीं ठेवणी, आविर्भावव चालना पाश्चात्य मनाला कृत्रिम वाटण्याचा संभव आहे. पण अतिमानुष व दैवी प्राण्यांच्या ठिकाणीं कल्पिलेले हेच अंगविक्षेप मनुष्यजातीच्या भावना व कृती यांच्यामुळें उत्पन्न होणार्‍या मानवी अंगविक्षेपाहून अगदीं भिन्न असणें साहजिक आहे. भावना-संस्कृतिसदृश अशी बाह्मक्रियासंस्कृति उघड करुन दाखविण्यास अंगचालनांच्या सुंदर युक्त्या त्यांनीं योजल्या होत्या. जेव्हां एखादी हिंदु देवता आपल्या हातांत त्रिशूळ किंवा चक्र धारण करत, तेव्हां ती हंगेरीच्या ग्रीक  झीयसप्रमाणें (ब्रिटिश म्यूझियममधील) हातांत घट्ट न धरतां तें आयुध सहज लीलीनें दोन बोटांत नाचविल्याप्रमाणें धरितें; राहिलेलीं बोटें सुंदर काटकोनांत खालीं लोंबत ठेविलेलीं असतात. यांतील कांहीं ठेवणी सुकुमारता आणि सौदर्य यांनीं खचून इतक्या सजीव दिसतात कीं त्यांच्या दर्शनानें आश्चर्य व आल्हाद वाटल्यावांचून रहात नाहीं. शुक्रचार्यांनें या चालनांनां दिव्यक्रिया असें वैशिष्टयदर्शक नांव दिलें आहे. सामान्यतः मानवी क्रिया व विक्षेप यांच्याहून या अगदी भिन्न असतात. या भिन्नत्वामुळेंच अतिमानुषरुपें मानुषी आकाराचीं करतां येणें शक्य होतें. डॉ. कुमारस्वामीनें एके ठिकाणीं ''भारतीय शिल्प जों जों मनुष्याप्रमाणें दिसूं लागतें, तों तों तें पूर्णत्वास कमी कमी पोंचत जातें'' असें म्हटलें आहे. कसेंहि असलें तरी येवढें खरें कीं, या मुद्रा आणि आविर्भाव यांच्या योगानें भारतीय मूर्तिकाराला उत्कृष्ट सौंदर्यगुण प्रकट करण्यास चांगली वाव मिळाली. भारतीय कलेंत जर कोणती शक्ति खरीखुरी अनन्य साधारण असेल तर ती क्रियाविष्करणाची होय. वर सांगितलेल्या हस्तक्रिया आणि मुद्रा (अंगुलिक्रीडा) यांच्यापैकीं कांहीं भारतीय शिल्पाच्या सर्व संप्रदायांतून आढळतात तर कांहीं काळ स्थानिक संप्रदायांतून दिसतात. शैवांच्या पंचलोहमूर्तीत आढळून येणार्‍या कांहीं हस्तचेष्टा नाटयशास्त्रांत दिलेल्या नाटयाविर्भावावरुन उचलल्या असाव्यात व कांहीं कारागिरांनीं आपल्याच डोक्यांतून काढल्या असाव्यात असें दिसतें. या हस्तचेष्टांचें सविस्तर वर्णन ''अभिनय या लेखांत केलेलें आहे तें पाहावें.

अभय आणि वरदहस्त यांपैकीं वरदहस्त हा दक्षिण हिंदुस्थानांतील मूर्तिशिल्पांत विशेष आढळून येतो. सीलोनच्या संध्यानृत्यमूर्ति नांवाच्या शिवाच्या तांडवनृत्यकारी मूर्तीत उजवा हात अशा तर्‍हेचा आहे.

अलंकार- दक्षिणभारतीय लोहमूर्तीतील इतर वैशिष्टय अलंकारामंडनें हीं होत. मंडनाच्या कांमीं उपयोगांत आणली जाणारी अति महत्वाची पद्धत म्हणजे कटिबंध किंवा कमरपट्टा होय. ह्याला पुढील बाजूस राक्षसाचें तोंड असलेला फांसा असतो व त्याखालीं माळा लोंबत असतात. याला ''अरुपोनमालै'' म्हणतात. त्याचप्रमाणें मांडयांवर लोंबणार्‍या तोरणांनां ''ऊरुमालै'' अशी संज्ञा आहे.

कर्णभूषणाखालील खांद्यावर पडणार्‍या अशाच मालांनां ''बाहुमालै'' असें नांव आहे. बौद्ध शिल्पसंप्रदायांत कटिबंधाचा सर्रास उपयोग करीत असें अनुराधपूर येथील बौद्ध द्वारपालाची मूर्ति पाहिल्यास कळून येईल. कर्णभूषणें हीं चांगली नक्षीदार असत. रत्नकोदरबंधम् (वक्षस्थलावरील रत्नजडित पट्टा) बौद्धशिल्पांतून उठून दक्षिण हिंदुस्थानांतील मूर्तीचा एक आवश्यक भाग होऊन बसला, व त्याला दक्षिण संप्रदायाचें एक विशिष्ट स्वरूप प्राप्त झालें आहे.

दक्षिण भारतीय शैव मूर्तीत उजव्या पायाला गुढघ्याखालीं एक बारीक घंटा बांधलेली बहुधां दिसून येते. उदाहरणार्थ मद्रास-पदार्थसंग्रहालयांतील ''सुखासीन मूर्ति'' पहा. शिरोभूषण आणि मुकुट हीं इकडील मूर्तीत इतर ठिकाणांहून निराळीं दिसतात. किरीटम्, करंड-मुकुटम्, जटा मुकुटम् बहुधांवैष्णव मूर्तीच्या डोक्यावर असतें, करंड मुकुटम् स्त्री-देवतांच्या मस्तकावर असतो, आणि जटा-मुकुटम् शिवाच्या निरनिराळया मूर्तीच्या शिरावर दिसतो. चंडिकेश्वर आणि संत यांच्या ठिकाणीं जटाबंधम्चा उपयोग करावा असें सांगितलें आहे. प्रभातोरण किंवा प्रभामंडळ हें पूर्वी शिव तांडवनृत्य करीत असतां त्यांच्याभोंवतीं ज्वालामंडळ असलेलें दाखविण्याकरितां योजीत. हल्ली ते सर्व मूर्तीभोंवतीं असतें. हें मंडळ मूर्तीहून निराळें असून तें धातुमय असतें. तें सिंहासनांत खोचून उभें केलेलें असतें. वैष्णव मूर्तीच्या ठिकाणीं प्रभातोरणावरील ज्वालांनां दुसराच एखादा नक्षीदार आकार दिलेला असतो. कोठें कोठें प्रभामंडलाच्या कमानीवर दैत्यमुख दृष्टीस पडतें.

चोलकालीन व तत्पूर्व शैवकला संप्रदाय- पंचलोहमूर्ति ज्या चोलकालीन कलेचें अंग आहे, त्याचा इतिहास व विकास देण्यापूर्वी तत्पूर्वकालीन शैवकलेचीं प्राचीन स्वरूपें लक्षांत घेणें अत्यावश्य आहे. अगस्त्य आणि कश्यप यांच्या ग्रंथांत नटराज, अर्धनारीश्वर, कालसंहार, त्रिपुरांतक, गंगाधर, विराटेश्वर, गजहामूर्ति इत्यादि विविध शैवमूर्तीचें लेखन सांगितले आहे. शिवाचें नटराज हें स्वरुप केवळ दक्षिण हिंदुस्थानांतच प्रामुख्यानें आढळतें. याच्या मूर्ती आणि देवळें यांची मोठी संख्या दक्षिणेंत जी दिसून येते, तीवरून याची तिकडें लोकमान्यता किती होती, हें कळून येणार आहे.

शैवमूर्तिकर्माचा प्रथम उल्लेख इ.स. च्या तिसर्‍या शतकांत पॉरीफेरी यानें केला असून तो उत्तर हिंदुस्थानांतील एका गुहेंतील अर्धनारीश्वरासारख्या मूर्तीसंबंधानें आहे. अतिशय प्राचीन वाङ्‌मयीन उल्लेख पाणिनि (ख्रिस्तपूर्व चौथें शतक) आणि पतंजलि (ख्रिस्तपूर्व दुसरें शतक) यांच्या ग्रंथांतील होय. शिवताण्डवाची प्राचीन मूर्ति बदामीस आहे. बदामी येथील लेणीं इ.स. ५७८ च्या सुमारास खोदलेलीं दिसतात. त्यानंतर कांजीवरम् येथील कैलासनाथाच्या देवळांत नटराजाची खोदीव मूर्ति दिसते. हें देऊळ पलज्व शिल्पकारानें इ.स. ६७५ च्या सुमारास बांधलें असावें. मामलज्पुर येथें चार हातांच्या शिवमूर्ती दिसतात. त्या सातव्या शतकांतल्या आहेत. ऐहोळ येथील ब्राह्मणी लेण्यांत दहा हातांची नटराजाची मूर्ती आहे. ती कैलासनाथ देवळांतील मूर्तीहून प्राचीन आहे. ऐहोळचें लेणें इ.स. ६५५ ते ६८० या काळांतलें आहे. शैवकलेच्या अभ्यासकांनां आकर्षण करणारें शैवपंथातील दुसरें स्थल म्हणजे वेरुळचीं लेणीं होत. दशावतार लेणें (इ.स. ६५०-७५०) आणि लंकेश्वर लेणें (इ.स. ७५०-८५०) या दोन शिल्पदृष्टया प्रमुख अशा लेण्यांतून नटराजाच्या मूर्ती आहेत. शिवतांडवाचें आणखी एक ऊर्ध्व तांडव (म्हणजे पाय वर करुन नाचणें) नांवाचें स्वरुप तिरुमल नायकाच्या छत्रांत आणि तारामंगलम् येथील कैलासनाथ देवळांत आढळतें. यांत कला फारशी दिसत नसली तरी मूर्तिलेखनाच्या वैशिष्टयाचा एक प्रकार म्हणून त्याचें महत्व आहे. त्यानंतरचे प्रमुख शैवकलासंप्रदाय घारापुरी (८वें शतक) आणि भुवनेश्वर (१२-१३ वें शतक) येथें दृष्टीस पडतात. हे दोन संप्रदाय अगदीं भिन्न भिन्न आहेत. चोल संप्रदायाशीं त्यांची तुलना करतां चोलसंप्रदाय श्रेष्ठ ठरतो, व तो अद्याप हयांत आहे. बाकीचे दोन पुढील काळावर आपली छाप न ठेवतां लवकरच नामशेष झाले.

दक्षिण भारतीय लोहमूर्तीचा अतिशय प्राचीन नमुना लेडन येथील ''रिज्क एथ्रॉग्राफिश्च म्युझिएम्'' नांवाच्या पदार्थसंग्रहालयामध्यें असून तो जावामध्यें सांपडला आहे. त्याची धाटणी व बैठक यांवरून शैवकालीन ताम्रशिल्पसंप्रदायाच्या निदान दोन तीन शतकें तरी पूर्वीच्या काळांतील तो असावा. जावा येथील शिल्पकारांनीं तो बनविला नाहीं हें खास. हिंदुस्थान आणि जावा यांच्यांत दळणवळण असतांना बरतखंडांतून ज्या अनेक मूर्ति जावांत गेल्या त्यांतील ही एक दिसते. बौद्धंनीं जावांत वसाहत करण्यापूर्वी हिंदु वसाहत जी त्या ठिकाणीं झाली त्या आद्य वसाहतकाळची ही मूर्ति असावी. सहाव्या शतकांतील पलज्व काळची ती असावीसें दिसतें. ही उमामहेश्वराची मूर्ति  डाव्या मांडीवरपार्वतीला घेऊन सुखासनांत बसलेल्या शिवाची आहे. आणखी दोन हरिहरांच्या मूर्ति जावांतील अनेक मूर्तीपैकीं असून त्यांची गरुड व वृषभ हीं वाहनें पायांखालच्या आसनावर बारीक कोरलेलीं दिसतात. या वहानांवरूनच विशिष्ट देवता कोणत्या हें ओळखतां येतें. एरव्हीं दक्षिण हिंदुस्थानांतील नेहमींच्या शिव-विष्णु मूर्तीशीं यांचें मुळींच साम्य दिसत नाहीं. ही देवतेच्या पायांशीं आसनावर लहानशी वाहनाची आकृति काढण्याची चाल एका दक्षिण भारतीय शिल्पसंप्रदायांतील आहे.

वर उल्लेखिलेली जावांतील उमामहेश्वरमूर्ति काश्यपीय ध्यानमंत्रबरहुकूम असल्यानें ती शिवपार्वतीची आहे असें ओळखतां येतें. हा काश्यपीयांतला ध्यानमंत्र असा -

उमासहितं ध्यानम्
पद्मा-स्थान-सुखासनं त्रिनयनं संधिस्थ-गौरी-मुखा-लोक-स्मेर-मुखं जटामुकुटयु-खंडेंदुमौलिं सितम्। वामालिंगित-वाममन्यकरयो-स्तंकं मृगं वीव्रतम् ।
शेषं सव्यकराभयप्रद-मुमायुक्तं महेशं भजेत् ॥

यावरुन दक्षिण हिंदुस्थानांतील मूर्तिकारांचें वाङ्‌मय किती जुनें होतें हें कळून येईल. जावांतील ह्याविशिष्ट आकाराच्या मूर्तीसारखी एकहि मूर्ति शैवांत आढळत नाहीं. कदाचित वैष्णवशिल्पकारांनीं विष्णूच्या मांडीवर लक्ष्मी बसली आहे अशी, वरील उमासहित मूर्तीप्रमाणें लक्ष्मीनारायणाची प्रतिमा बनविण्याची पद्धत उचलली असावी. हें शिवपार्वतीचें स्वरुप जाऊन त्या जागीं ''सोमास्कंदा'' सारखीं दुसरीं कांहीं स्वरुपें प्रचारांत आलीं. सोमास्कंद म्हणजे (स-उमा-स्कंद) शिवसहित उमा आणि स्कंद ही त्रैमूर्ति होय. पुढील काळच्या कांहीं मूर्तीतून पार्वतीला अंकावर न बसवितां शिवापासून थोडया दूर अंतरावर उभी केलेली दिसते.

पुढें चोल कारकीर्दीत तेराव्या शतकापर्यंत देवस्थानें राजांच्या आश्रयाखालीं निर्माण होत असतां मूर्तिकर्माची बरीच चलती झाली. तिसरा कुलोत्तुग (इ.स. ११७८-१२१५) यानें त्रिभुवनेश्वर नांवाचें सुंदर देवालय बांधलें. त्यांतील कांहीं लोहमूर्ती शिल्पकलेच्या दृष्टीनें उच्च दर्जाच्या असून चोलकालीन शिल्पाचे सुंदर नमुने म्हणून त्यांची गणना करतां येईल. पुढील काळांत सुद्धं एखाददुसरी उत्कृष्ट मूर्ति सांपडते. तंजावर आणि त्रिचनापल्ली जिल्ह्यांतून कांहीं जुनाट ओसाड देवळांतज्या कांहीं जुन्या मूर्ती सांपडल्या त्या पुष्कळ यूरोपियन संग्राहक यांनीं मिळविल्या असून कांहीं पॅरिस येथील म्युसेग्युऑट, हॉलंड म्युझियम, इत्यादि यूरोपखंडांतील पदार्थसंग्रहालयांत प्रदर्शनार्थ ठेवल्या गेल्या आहेत. कित्येक तर अद्याप देवालयांतून व त्यांखालील भुयारांतून दडविल्या गेल्या असतील. तेव्हां सर्व मूर्ती अवलोकिल्याखेरीज दक्षिणभारतीय लोहमूर्तिशिल्पाचा अभ्यास पुरा झाला असें म्हणतां यावयाचें नाहीं.

धातुमुर्ती ओतण्याचा प्रघात अद्यापपावेतों आहे. चोल राजांनीं जसा स्थपतींनां आश्रय दिला होता, त्याचप्रमाणें त्यांच्या वंशजांनीं व इतर लोकांनीं पुढें तो कायम ठेविला. पुढें मदुरेचे नायक राजे व तंजावर येथील मराठी राजे हे शैव असून चोलकालीन कलेला उत्तेजन देण्याचा त्यांनीं प्रयत्न केला. विजयानगरच्या राजांनींहिं धार्मिक कृत्यांत अतोनात पैसा वेंचला. विजयानगरचा दुसरा देवराय (इ.स. १४२०-१४४३) याच्याकडे अबदूर रझाक नांवाचा जो इराणी वकील आला होता त्यानें आपल्या प्रवासवृत्तांत विजयानगरच्या राज्यांतील एक पंचलोह धातूच्या देवळाचा उल्लेख केला आहे. विजयनगरचा कृष्णराय (इ.स. १५१० ते १५२९) आणि त्याच्या दोन राण्या, तसेंच व्यंकटपतिराय यांचे धातूचे पुतळे तिरुमलइ टेंकडीवरील देवळांत आहेत.

दक्षिण हिंदुस्थानचा स्थपति देवाच्या सेवेंत असे.कारण त्याचें काम धार्मिक असे. तो राजाचा कारागीर नसून शिवाचा कारागीर असे. या धार्मिक कारागिरांची वस्ती एका ठिकाणाहूनदुसर्‍या ठिकाणीं जात असे. सीलोनला देखील अधिराजेंद्र चोलाच्या वेळीं ती होती. त्यांचीं प्रमुख वस्तीचीं ठिकाणें तंजावर, त्रिचनापल्ली, दक्षिण-उत्तर अर्काट, सालेम आणि रामनाद हीं होत. हल्ली फक्त स्वामीमलई या लहानशा गांवींच अशा कारागिरांची सुमारें दहा घराणीं आपला वंशपरंपरेचा धंदा चालवितांनां दिसतात. देवळें बांधण्याचा काळ संपल्यावर खासगी माणसांनीं देवालयाला अर्पण करण्याकरितां मूर्ती तयार करण्याचें काम लोहमूर्तिकारांनां सांगून त्यांचे अस्तित्व कायम राखलें.पुढें फक्त बायकाच असीं देवदानें करूं लागल्या. स्वामीमलई येथील मूर्तिकारांनां अद्यापिहि इकडून तिकडून काम मिळतें. पण देवळांतून मूर्ती स्थापण्याची किंवा नजर करण्याची पद्धत पार बुडाली आणि लोहमूर्तिकाराला आपली कला संवर्धन करण्यास वाव कमी कमी मिळूं लागला. या स्वामीमलईच्या कारागिरांनां मद्रासच्या सरकारी कलाशिक्षणालयांत गुंतवून देण्याचा प्रयत्न होऊन हल्ली कांहीं जण तेथें शिक्षकाचें काम करीत आहेत. मद्रासच्या व्हिक्टोरिया टेकनिकल इन्स्टिटयूटनें यांच्याकडे बरींचशीं कामें देऊन लोहमूर्तिकारांचा अति पुरातन संप्रदाय कायम ठेवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

सीलोनमध्यें पोलोन्नरुव येथील शिवालयांत शैव पंथाच्या पंचलोह मूर्ती सांपडल्या असून त्या हल्ली सीलोन म्युझियममध्यें ठेवण्यांत आल्या आहेत. कलाभ्यासाच्या कामीं त्या महत्वाच्या आहेत. त्यांपैकीं सुंदर मूर्तीची प्रतिमा अतुलनीय व कलेचा एक सर्वोत्कृष्ठ नमुना म्हणतां येईल. या संशोधित मूर्ती हिंदुस्थानांतून आल्या कीं, त्या सीलोनी कारागिरांनींच बनविल्या याविषयीं मोठा वाद आहे. सीलोनांतील बौद्ध संप्रदायानें पाषाण व धातुशिल्प बरेंच प्रवृद्ध केलें याविषयीं शंका नाहीं. पण पोलोन्नुरवच्या शैव मूर्तीचा बौद्ध कलापरंपरांत वाढलेल्या सीलोनी कारागिरांशीं संबंध लावणें चुकीचें होईल. शैवधर्म सिंहली लोकांत मुळींच शिरला नव्हता. त्यांनां चोल लेखांतून शिवद्रोही म्हणून संबोधण्यांत येतें. पोलोन्नरुव येथें व कायती लहानशी शैव वसाहत होती. अकराव्या शतकाच्या आरंभीं सुमारें पाउणशें वर्षे सिंहलद्वीप चोलांच्या ताब्यांत होतें. तेव्हां तेवढया अवधींत त्यांनीं शैवमूर्ती ओतल्या असतील हे संभवत नाही. पोलोन्नरुव येथील शिवस्थान पहिल्या राजराजाच्या कारकीर्दीत या द्वीपाच्या उत्तर भागांत जे तामिळी शैव येऊन राहिले होते त्यांच्याकरितां चोलांनीं तें बांधलें असावें, व तेथील मूर्ती बहुधां हिंदुस्थानातून इकडे देवळांत बसविण्याकरितां नेल्या असाव्या. पुढें या सुंदर शैवमूर्ती पाहिल्यावर स्थानिक सिंहली कारागिरांच्या मनांत त्यांची नक्कल करण्याचें येऊन त्यांनीं पूर्वज्ञान किंवा शिक्षण नसतांना कांहीं मूर्तीची घाटणी उचलम्याचा प्रयत्न केला असें वाटतें. एरव्हीं काश्यपीयामध्यें नटराजाची मूर्ति बनविण्याचे पाठ अवगत असलेला कारागीर, कोलंबो म्यूझियममध्यें ठेवलेल्या नटराजाच्या मूर्तीचे हात व पाय इतके बेडौल तयार करणार नाहीं. शैवमूर्तिकाराच्या नियमांप्रमाणें खांदे आणि मान यांच्यावरून काढलेली जी आडवी रेषा म्हणजे 'हिक्कासूत्र' त्याच्यावर हात जातां कामा नये हा नियम या ठिकाणीं पाळलेला दिसत नाहीं. अशीं आणखीं अनेक उदाहरणें देतां येतील. सीलोनी आणि दक्षिण भारतीय कलेमधील खरा संबंध असा कीं, जुन्या बौद्ध शिल्पकारांनीं वापरलेले मूर्तीच्या अंगावरील दागिने, वस्त्रें आणि शिरोभूषणें पुढच्या शैवशिल्पकारांनीं आपल्या मूर्तिकर्मांत जशींच्या तशीं घेतलीं व तीच सीलोनमधील तत्कालीन बौद्ध मूर्तिशिल्पांत आढळतात. उदाहरणार्थ सीलोनचा दगडी नागद्वारपाल घ्या. याचा रत्नकोदरबंध (कमरपट्टा), अरुणोन मलई (व्याघ्रमुखी फांसा) आणि कडेच्या माळा या गोष्टी दक्षिण भारतीय लोहशिल्पांतील आहेत हें उघड उघड दिसतें. दक्षिण भारतीय मूर्तीमध्यें सुंदरमूर्तीस्वामी व चंडेश्वर या पोलोन्नरुव येथें सांपडलेल्या मूर्ती खरोखरच नमुनेदार आहेत. माणिक्कवाचक अप्पर आणि तिरुज्ञानसंबंध या मूर्तीप्रमाणें चंडेश्वराच्या मूर्तीतहि साधेपणा आणि स्वतंत्र बनावट आढळून येते. तेथील शिवसूर्यची मूर्तीहि कलेच्या दृष्टीनें फार सुबक आहे. दक्षिण भारतीय लोहशिल्पसंप्रदायांत रामपंथानें बर्‍याच उत्कृष्ट मूर्तीची भर टाकली आहे. त्याचें एक नमूनेदार उदाहरण म्हणजे साउथ कन्सिंग्टन म्यूझियममधील हनुमानाची मूर्ति होय. रामनाद तुलाक्यांत अनेक देवळांतून राम, सीता आणि लक्ष्मण, हनुमान व जांबुवान यांच्या मूर्ती आढळून येतात. कांहीं हनुमानाच्या मूर्तीचे हात पसरलेले जे दाखविले असतात ते एकएका हातावर एक एक लिंग ठेवण्याकरितां म्हणून असतात. कारण अशा स्थितींत ठेवलेल्या हनुमानाच्या हातावर लिंगें ठेवल्याचें कांहीं पंचायतनांतून आढळून आलें आहे, व हनुमानाला काशीहून दोन शिवलिंगें आणण्याकरितां रामानें पाठविल्याची कथाहि आहे. सीतेच्या मूर्ती करण्यांत कारागिरांचा गोंधळ झालेला दिसतो. कारण तिच्या डाव्या हातांत कमळ आणि उजवा हात खालीं सोडलेला शी प्रघाताप्रमाणें तिची पुष्कळ वेळां मू्र्ती बनविली गेलेली दिसत नसून शिवकामसुंदरी म्हणजे पार्वतीच्या नमुन्यावर डावा हात लोलहस्त असलेली आढळून येते.

शिव, विष्णु किंवा राम यांच्या संप्रदायांत न येणारा असा आणखी एक मूर्तीचा वर्ग आङे. यांतील मूर्ती सूर्य संप्रदायाशीं सबंद्ध असलेल्या दिसतात. राहु, केतु, शुक्र, चंद्र, बुध, शनि आणि बृहस्पति या ग्रंहांच्या प्रतिमा त्यांत येतात. मूर्तिकारांनां वैष्णव आळवारांच्या मूर्ती करण्याचेंहि बरेंचसें काम मिळालें होतें. पण शैव संतांच्या मूर्तीप्रमाणें वैष्णव संताच्या मूर्तीचें काम उठावदार दिसत नाहीं. कांहीं जैन धातुमूर्तीहि संशोधल्या गेल्या आहेत. पण त्या कांहीं एका स्वतंत्र नमुन्यावर केलेल्या दिसत नाहींत, या संशोधनाचें केवळ एकच महत्व आहे तें हें कीं कांहीं मूर्तीवर कारागिरांचीं नांवें खोदलेलीं सांपडतात. ही चाल भारतीय शिल्पात फार क्वचितच आढळून येते.

उपसंहार.

भारतीय कलेंतील या एका श्रेष्ठ संप्रदायाचें प्रमुख वैशिष्टय म्हणजे त्याची शोषक धार्मिक वृत्ति होय.धार्मिक कृत्यांकरितां शास्त्रोक्त मूर्ती पाहिजेत म्हणून प्रथम या कलेचें अस्तित्व झालें; तेव्हां ज्या धार्मिक सूत्रांनीं ही कला जखडली गेली तेंच सूत्र प्रमाण धरून धार्मिक दृष्टीनें तिच्याकडे पहावें हें उचित होय, धार्मिक दृष्टि आणि कलाविषय दृष्टि ह्या अगदीं भिन्न आहेत हें खरें आहे. कारागीर आपल्या शिल्पांत जे तेज घालतो तेंच धार्मिक मनुष्याला दिसतें असें नाहीं . उत्तम कला म्हणजे आविर्भाव होय. आणि जर एखाद्या कारागिरानें आपल्या मनांत बिंबलेल्या तत्वाला मग तें वैय्यक्तिक व क्षणभंगुर किंवा धार्मिक, आध्यात्मिक, प्रौढ, तर्किक, यांपैकीं कोणतेंहि असो मूर्ती स्वरुप देण्यातं सिद्धि मिळविली तर त्याचा कलाविषय कलेच्या उच्च नियमास अनुसरून झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं. अशा तर्‍हेचें प्रमाण धरून दक्षिणभारतीय मूर्तिकारांच्या मूर्ती परीक्षिल्या तर या त्यांच्या शास्त्राबरहुकूम बनविलेल्या गोष्टी यशस्वी अशा उतरल्या असून अति उच्च दर्जाचे ते कलाविषय होत असे आढळून येईल. यांचें धार्मिक महत्व वगळलें तरी लोहमूर्तिकारांचीं हीं कामें सर्व देशांच्या आणि सर्व कालांच्या शिल्पप्रामाण्यानुरुप उतरलीं आहेत यांत संशय नाहीं. प्रथम या धातुशिल्पसंप्रदायाचीं इतर भारतीय शिल्पसंप्रदायाशीं तुलना करुन मग मोठया मानवकलासंघांत याचें स्थान कोणतें इकडे वळूं.

बौद्ध आणि शैव मूर्तिशिल्प- इसवीसनच्या सातव्या शतकांत हळू हळू दक्षिण हिंदुस्थानांत र्‍हास पावणारी शुद्ध बौद्धकलापरंपरा व आठव्यापासून चवदाव्या शतकापर्यंत संबंधिंत झालेली ही शैवकला ह्या अगदीं वेगळया आङेत. बौद्धपंथाची वर कमान असतां भारतीय शिल्पकारांनां जें उत्कृष्ट शिक्षण मिळालें तें दक्षिणभारतीय मूर्तिकारांच्या पदरांत पडून त्यांनीं तें इतकें सजीव व सौंदर्यशाली केलें कीं, त्या काळच्या बौद्ध अनुयायांनां सुद्धां ती हातोटी साधली नाहीं. सीलोन, नेपाळ आणि जावा या ठिकाणीं मुख्यत्वेंरुन सांपडणार्‍या कांहीं थोडया महायानी पंथाच्या धातुमूर्ती सोडून दिल्यास बौद्धशिल्प बहुतेक विश्राम अवस्थेंत असणार्‍या मूर्ती करण्याकडेच खर्च झालेलें दिसून येतें. दक्षिणभारतीय संप्रदायांतील स्त्रीरुपाच्या प्रतिमांतहि क प्रकारचें वैश्ष्टिय असून बौद्धशिल्पांत नाहींत असे अगदीं नवीन नमुने त्यांत निर्माण केले आहेत. पार्वती किंवा इतर स्त्रीदेवतांच्या मूर्तीची कल्पना बौद्ध कलेंतील तारा व तिचीं अनेक तांत्रिक स्वरुपें यांच्यावरुन आलीं नाहीं हें खास. शिवकामसुंदरी, कोपनहेगन संग्रहालयांतील गौरी आणि आधारशक्ति यांसारख्या मूर्तीनीं दक्षिणेंतील शैव कारागिरानें भारतीय मूर्तिशिल्पाला अगदीं नवीन जोड दिली आहे. जरी बौद्ध आणि शैव मूर्तीच्या कल्पनेंत कांहीं साम्य दिसत असलें तरी आठ ते चौदा या शतकांमधील दक्षिण भारतीय मूर्तिकारांनां जी मूळ स्फूर्त मिळाली ती सहाव्या आणि आठव्या शतकांच्या दरम्यान केव्हां तरी तयार झालेल्या मामलज्पुर येथील पाषाणशिल्पावरुन होय. आठवें आणि पंधरावें शतक या काळामध्यें बहुतेक धातुमूर्ती ओतल्या गेल्या असून पंधराव्या शतकापुढें या शिल्पाचा र्‍हास होत गेला. धातुमूर्तिकाराबरोबरच पाषाणशिल्पकारांची प्रगति होत जाऊन अवडैय्यर कोविल, कोरंग नधम् आणि सोळाव्या शतकांतील ताडपत्री व सतराव्या शतकांतील मदुरेंतील देवालय या ठिकाणीं पाषाणशिल्पकला शिखरास पोंचून तिला एक नवीन वळण लागलें.

भारतीय आणि ग्रीक मूर्तिशिल्प- या भारतीय शिल्पांतील धाटणी व कसब यूरोपांतील प्राचीन अभिजातशिल्पापेक्षां अगदीं भिन्न आहे. या भारतीय धातुमूर्तीचें प्रख्यात ईजिप्त शिल्पसंप्रदायांतील मूर्तिशीं कांहींसें साम्य दिसतें. तथापि ईजिप्त, इटली किंवा ग्रीस यांतील आपणांस परिचित असलेल्या कोणत्याहि धार्मिक कलेपेक्षां शैव मूर्तिकारांच्या दैवी किंवा अतिमानुष मूर्ती त्या कितीहि जडबुद्धीनें तयार केलेल्या असोत अत्यंत श्रेष्ठ आहेत यांत शंका नाहीं. ग्रीकांची मानवी जीविताची कल्पना ग्रीकशिल्पकारांनां मुर्तीची कल्पना मानवी करतांना बांधली आणि पूर्णपणें विकास पावलेलें निरोगी असें जें मानवी शरीर तीच देवमूर्ति अशी सामान्य ग्रीकांप्रमाणें ग्रीक कारागिरांची कल्पना झाली. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे ग्रीकांचे देव हे श्रेष्ठ व सुंदर माणसें असत, तेव्हां ग्रीक कारागिरांचें काम माणसांनां देवांच्या जवळ जवळ न्यावयाचें नसून देवांनां माणसांकडे ओढण्याचें असे. तेव्हां ते देवांच्या मूर्ती माणसांप्रमाणें बनवीत. मानवी जीविताविषयीं भारतीयांची कल्पना धार्मिक तत्वज्ञानांत सांठविली असून त्यांची धांव एकसारखी अनंताकडे असते व व्यक्ति, काल आणि देश यांची बंधनें तोडून टाकण्याची त्यांची इच्छा असते. तेव्हां साहजिकपणें धार्मिक कलेंत आणि त्यांतल्या त्यांत मूर्तिशिल्पांत स्वतःचें परिणत रुप म्हणून मूर्ती बनविल्या नसून कांहीं तरी अविचल व शाश्वत रुप पुढें ठेवण्याकरितां त्या तयार केल्या. भारतीय कलेला मनमोहक व शृंगारिक मर्ती बनविणें साधलें नसतें. उलट आपली कला अविकारी आणि अतींद्रियात्मक करुन या सगुण रुपापलीकडे मनाला गूढ व आनंदपूर्ण अशा कल्पनांच्या अभावात्मक जगांत नेऊन सोडावें हें तिचें ध्येय असे. तेव्हां भारतीय मुर्तिकार देवांच्या मूर्ती करतांना आपल्या ग्रीक बंधूंप्रमाणें मानवी शारीरस्वरुपाच्या बंधनांनीं जखडला न जातां त्यांनां कांहीं अतिमानुष स्वरुप देण्यास तो स्वतंत्र असतो असें दिसून येईल. (ग्रुनवेडेल-बुधिस्टिक आर्ट इन् इंडिया; गांगोली दि साऊथ इंडियन ब्रॉन्झेस; बर्जेस-एन्शंट मॉन्युमेंट्स इन् इंडिया; फर्ग्युसन, कनिंगहेंम इत्यादिकांचे ग्रंथ.)

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .