विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शिसे- रासायनिक संज्ञा स. परमाणुभारांक २०७.१. ही धातु फार प्राचीन काळापासून माहीत आहे. रोमन लोक पाणी नेण्याकरितां शिशाचे नळ करीत असत. हरताळ (मुरदाड शिंग), शेंदूर सीससिरकीत हे पदार्थ इ.स. आठव्या शतकांत उपलब्ध होते. शिसें शुद्ध स्थितींत क्वचितच आढळतें. हें मुख्यत्वेंकरुन गॅलीना या खनिज द्रव्याच्या रुपानें ठिकठिकाणीं सांपडतें. याच्या खाणी इंग्लंड (डर्बीशायर, कंबरलंड, यॉर्कशायर, कॉर्नवाल इत्यादि ठिकाणीं), जर्मनी, ऑष्ट्रिया, स्पेन, अमेरिकेंतील संयुक्त संस्थानें, मेक्सिको, ब्राझिल व हिंदुस्थान या देशांत आहेत. १९०५ सालीं इंग्लंडांतून २५००० टन शिसें निघालें. त्याच सालीं स्पेन देशांतून १७९००० टन शिसें निघालें. अमेरिकेंतून३१९७४४ टन, व जर्मनींतून १५२५९० टन शिसें निघाले.
गॅलनापासून शुद्ध शिसें काढण्याची रीत फार सोपी आहे. गॅलीना हवेंत तापवितात म्हणजे त्यांतील गंधक जळून जातो व शिसें शिल्लक राहतें. शिशांत चांदीचा थोडा अंश असतो पण ही चांदी अलग करण्याचें काम फार कठिण पण फार महत्वाचें आहे. पूर्वी शिसें एका कढईंत घालून त्यावरून हवा जोरानें जाऊं देत असत. म्हणजे शिशाचा हरताळ होऊन चांदी शिल्लक रहात असे. याला पॅटिम्सन पद्धत म्हणतात. इस. १८४२ मध्यें दुसेरी पद्धत प्रचारांत आळी. चांदी व शिसें यांचें मिश्रण वितळवून त्यांत जस्त घालतात म्हणजे चांदी व जस्त यांचा मेल (ऍलोंय) बनतो. नंतर जस्त ऊर्ध्वपातनक्रियेनें उडवून देतात म्हणजे चांदी शिल्लक राहते. याला पार्कस पद्धत म्हणतात. शिसें पांढर्या रंगाचें असतें. व त्यावर निळया रंगाची झांक मारते. हें फार चकाकत नाहीं. कारण यावर नेहमीं गंज चढलेला असतो. हें फार मऊ असून वांकवितां येतें. याचें विशिष्टगुरुत्व ११.३ आहे. सेंटिग्रेडच्या ३२७ अंशांवर तें वितळतें व १५०० अंशांवर त्याची वाफ होते. उघडया हवेंत यावर गंज फार लवकर चढतो. शिसें प्राणवायूशीं दोन प्रकारांनीं संयोग पावतें; एक हरताळ; याचा रंगांत उपयोग होतो. व दुसरा शेंदूर (सिंदूर), सीसकर्बनित; याचा उपयोग तोंडाला रंग लावण्याकडे करतात. हा एक प्रकारचा सफेता आहे पण हा लवकर काळा पडतो. सीससिरकित साखरेप्रमाणें गोड असतें. शिसें किंवा त्याचें कोणतेंहि लवण विषारी आहे.त तें पोटांत गेल्यास लगेच पोटांत दुखूं लागतें व जुलाब होऊं लागतात. अशा वेळेस वांतीचीं औषधे द्यावीत व सिंधुगंधकित द्यावें. बहुधां जीं माणसें कांच, रंग, मातीचीं जिल्हईचीं भांडीं, चाकू, कात्र्या, ग्यासच्या व पाण्याच्या नळयांच्या कारखान्यांत असतात त्यांपैकीं पुष्कळांच्या पोटांत शिसें जाते व पुढें त्यांस रोग होतात. हिंदुस्थानांत शिशाची एकच महत्वाची खाण आहे. ती म्हणजे ब्रह्मदेशांतील बाडिनची होय. तींतून १९२३ सालीं १६८१८१११ रुपये किंमतीचें ४६०६० टन शिसें निघालें.