विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शुजा- मोंगलबादशहा शहाजान याचा दुसरा मुलगा. हा अजमीर येथें १६१६ त जन्मला. इराणच्या राजघराण्यांतील मिर्झा रुस्तुम सफवी याच्या मुलीशीं याचें लग्न झालें होतें. शहाजहाननें याला बंगालचा सुभेदार नेमिलें होतें. सुभेदार असतांना याचें प्रजेशीं वर्तन फार न्यायाचें व दयाळुपणाचें असे. औरंगझेबाशीं लढतांना खजवा येथें याचा पराभव होऊन (१६५८) हा पळत सुटला ('औरंगझेब' पहा). शेवटीं त्यानें आराकान गाठलें. तेथेंच त्याचा अज्ञान अवस्थेंत अंत झाला. औरंगझेबाचा मुलगा महंमद याला शुझाची मुलगी दिली होती. (सरकार-औरंजजेब; सरदेसाई-मु.रि.वगैरे)