विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शूलगव- एक स्मार्त पशुयज्ञ. यासंबधीं उल्लेख ज्ञानकोश विभाग २ पृष्ठ २२० येथें आलाच आहे. बहुतेक गृह्यसूत्रांतून याचा विधि सांगितला आहे. आपल्या घरांतील गुरांनां एखादा रोग झाला असेल तर हा शूलगव करावयाचा असे. हें शूलगवकर्म गांवाच्या बाहेर (जेथून गांव दिसणार नाहीं) मध्यरात्री अगर सूर्योदयापूर्वी पहाटेस करावयाचें असे. आश्वलायन गृह्यसूत्रांत याचें विधान अध्याय ४ मध्यें (खंड ९) सांगितलें असून सामान्य स्मार्त पशुयागाचें विधान पहिल्या अध्यायांत (खंड ११) सांगितलें आहे. बौधायन गृह्यांत शूलगवास बैल न मिळाल्यास मेंढा अथवा बोकड घ्यावा असें सांगितलें आहे. पारस्कर गृह्यसूत्रांत शूलगवाचें सर्व विधान सांगून शेवटीं पशु न मिळेल तर पायसानें शूलगवासंबंधीं योग करावा असें सांगितलें आहे.