विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शेक्सपिअर विल्यम् (१५६४-१६१६)- सुप्रसिद्ध इंग्लिश कवि व नाटककार. यानें लहानपणीं लॅटिन, फ्रेंच, ग्रीक व इटालिअन या भाषांचा अभ्यास केला. वयाच्या तेराव्या वर्षांपासूनच शेक्सपिअर बापाच्या गरीबीमुळें धंदेशिक्षणाकरितां उमेदवारी करुं लागला. १५८२ सालीं त्याच्यापेक्षां सुमारें आठ वर्षांनीं मोठया असा एका स्त्रीशीं त्याचें लग्न झालें. १५९२ च्या सुमारास नाटककार म्हणून तो जगापुढें येऊं लागला व याव सुमारास त्यानें कांहीं कविताहि प्रसिद्ध केल्या. तो चांगला नट म्हणूनहि प्रसिद्ध होता. 'हॅम्लेट' मधील भूत व 'ऍज यू लाईक इट्' मधील ऍडयाम वगैरे कामें तो स्वतः करीत असे. आपल्या व्यवसायबंधूशीं तो स्नेहभावानें वागे. त्यानें लिहिलेल्या आनंदपर्यवसायी व शोकपर्यवसायी नाटकांच्या तारखा बिनचूक देतां येत नाहींत; तरी पण पुढील तारखा शक्य तितक्या खर्या देण्याचा प्रयत्न केला आहे. (सन १५९१) 'दि कन्टेन्शन ऑफ यॉर्क ऍन्ड लँकेस्टर'. (१५९२) सहावा हेनरी. (१५९३) 'रिजर्ड दि थर्ड'; 'एडवर्ड दि थर्ड'; 'टेमिंग ऑफ दि श्रू'; 'लव्हज् लेबर्स लॉस्ट'; 'रोमिओ ऍंड जुलिअट्' (१५९५) 'मिड समर नाइटस् ड्रीम'; 'दि टू जंटलमेन् ऍच्फ व्हेरोना'; 'किंग जॉन'. (१५९६) 'रिचर्ड दि सेकंड'; 'दि मर्चंट ऑफ व्हेनिस.' (१५९७) (१) 'हेन्री दि फोर्थ' (१५९८) (२) 'हेन्री दि फोर्थ' 'मच् ऍडो अबाउट नथींग् ' (१५९९) 'हेन्री दि फिफ्थ्'; 'ज्युलिअस सीझर' (१६००) 'दि मेरी वाइव्हज् ऑफ विंडसर'; 'ऍज यू लाई इट्' (१६०१) 'हॅम्लेट'; टेल्थ नाइट्' (१६०२) 'ट्रॉइलस ऍन्ड व्रेच्सिडा' 'ऑल्स वेल् दॅट एन्डस् वेल्' (१६०३) या सालीं इलिझाबेथ राणीच्या मरणामुळें व प्लेगमुळें नाटकगृहें बंद होतीं. (१६०४) 'मेझर फॉर मेझर'; 'ऑथेलजे'. (१६०५) 'मॅक्बेथ'; 'किंग लिअर'. (१६०६) ' ऍन्थोनि ऍन्ड क्लिओपार्टा'; 'कोरिऑलेनस्' (१६०७) 'टायमन् ऑफ अथेन्स'; अपूर्ण (१६०८) 'पेरिक्लिस' (कांहीं भाग) (१६०९) 'सिंबेलाइन्'. (१६१०) 'वुइंटर्स टेल' (१६११) 'दि टेंपेस्ट' (१६१२) या वर्षी नाटक लिहिलें नाहीं (१६१३) 'दि टू नोबल किन्समेन्' (कांहीं भाग); 'हेनरी दि एटथ्' (कांहीं भाग).
शेक्सपिअरच्या नाटकांतून कृत्रिमपणा नाहीं असें बेन जॉन्सनचें मत असून तो स्वभावतःच कवि आहे असें मिल्टनचें म्हणणें आहे. त्याचीं नाटकें सुंदर असूनहि असंबद्ध आहेत. प्रेक्षकांतील हास्य व शोक नियंत्रित करण्याची कला जरी शेक्सपिअरच्या वेळीं इतर ग्रंथकर्थ्यांनां अवगत नव्हती तरी पण लोकांचें हास्य व शोक यांवर पूर्ण ताबा ठेवण्यांत त्याचा हातखंडा होता. त्याच्या नाटकांत ध्यैयैक्य असल्याचें आढळून येतें परंतु परिणामैक्य आढळत नाहीं त्याचीं नाटकें स्वंतत्र नसून कोणत्या तरी ग्रंथांत सांपडणार्या आधारांवर रचलेलीं आहेत. इतकेंच नव्हें तर आरंभीं लेखनपद्धतींत सुद्धं त्यानें तत्कालीन लोकांचें अनुकरण केलें. त्यानें नवीन असें कांहींच आरंभिलें नाहीं परंतु त्या काळच्या इतर लोकांच्या अपूर्ण राहिलेल्या वाङ्मयकार्याचा त्यानं यशस्वी रीतीनें शेंवट केला. त्यानें शेवटीं शेवटीं लिहिलेलीं नाटकें तर एखाद्या सुखकर स्वप्नाप्रमाणें वाटतात. जगांतील अरिष्टांचा व संकटांचा शेवट या नाटकांतून गोड दाखवून दयाळु परमेश्वराच्या लीलांतून आशावादी लोकांचा विश्वास खरा असल्यानें त्यानें दाखविलें आहे.
शेक्सपिअरनें लिहिलेल्या चतुर्दशचरणात्मक काव्यांतून स्वतःचें चरित्र त्यानें दिलें आहे असें कांहींचें म्हणणें आहे तर त्या वेळच्या लोकांनां अशा तर्हेच्या काव्याच्या रुपानें निबंध लिहावयाचा नाद असल्यामुळें शेक्सपिअरचीं हीं काव्यें अशाच प्रकारचे निबंध आहेत असें दुसर्या कांहींचें म्हणणें आहे. वृत्तचातुर्यामुळेंच हीं काव्यें मनोवंधक करण्याचा प्रयत्न त्यानें न केल्यामुळें व त्याच्या जोडीला तीं फार सोपीं असल्यामुळें लोकांच्या मनांवर त्यांचा चांगलासा परिणाम होतो. कारण काव्यांतील गूढार्थ त्यांनां समजण्यास फार प्रयास पडत नाहींत. शेक्सपिअर १६१६ सालच्या एप्रिल महिन्यांत २३ तारखेस मरण पावला. शेक्सपिअर ही व्यक्ति झालीच नाहीं. लॉर्ड बेकन यानेंच ही नाटकें लिहिली असा एक प्रवाद आज अनेक वर्षें चालू आहे व त्यावर वादविवाद सुरु आहे.