विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
शेख- शेख या शब्दाचा अर्थ विद्वान् असा आहे व आरंभीं तो अरबस्तानांतून आलेल्या पुण्यवान् लोकांस लावीत असत. पण नंतर मुसुलमान झालेल्या हिंदूसहि शेख म्हणूं लागले. शेख जातींत १०६८ पोटजाती आहेत. त्यापैकीं कांहीं महत्वाच्या जाती येणेंप्रमाणें -क्युरेशी, फरुकी, अनसारी, महाजारीन्, क्युरेशीसादिकी, क्युरेशीहश्मी, इत्यादि. यांची एकंदर लोकसंख्या १९११ सालीं ३२१३१३४२ होती. पैकीं बंगालमध्यें २२९५२९४४, आसाममध्यें १७६९६६६ बिहार-ओरिसा प्रांतांत १७०८९३२ व संयुक्तप्रांतांत १३१४८२८ होते. हे सर्वं प्रांतांतून आढळतात.