विभाग विसावा : वऱ्हाड- साचिन
शैवसंप्रदाय- हिंदुस्थानांतील एक प्रमुख धर्मसंप्रदाय शिव देवतेची निरनिराळया स्वरूपांत भक्ति करणार्या लोकांचा हा संप्रदाय होय. वैष्णवसंप्रदायाइतकाच महत्वाचा हा संप्रदाय असून या संप्रदायाचे असंख्य अनुयायीं आहेत. या संप्रदायाचा उगम वैदिक काळापासून दृष्टोत्पत्तीस येतो. वैदिक काळीं सृष्टीच्या भयानक स्वरूपाच्या देवतेला रुद्र हें नांव देण्यांत आलें व त्याची पूजा केली असतां तो भक्तावर दया करतो म्हणून तो शिव आहे, शंकर आहे असें रुद्राचें वर्णन करण्यांत येऊं लागलें. पुढें हळू हळू रुद्र देवतेला प्राधान्य येत जाऊन, उपनिषदकाळीं रुद्र ही सर्वश्रेष्ठ देवता मानली जाऊं लागली. श्वेताश्वतरोपनिषदांत रुद्र शिवाचें सर्वश्रेष्ठ देव म्हणून वर्णन केलें आहे. अथर्वशिरस् उपनिषदांतहि रुद्रशिवाचें माहात्म्य वर्णन करण्यांत आलें आहे.
पुराणांपैकीं विष्णुपुराणांत शिवाचें वर्णन अवैदिक देवता याअर्थी केलेलें आढळतें. त्यामुळेंच दक्षानें त्याला यज्ञिय हवि दिला नाहीं. शिवाला तेथे स्मशानवासी व अनार्यांचा देव असें सामान्यपणें म्हटलें आहे. अनार्यांच्या देवतांचा समावेश ज्यावेळीं निरुपायानें ब्राह्मणीं धर्मांत करणें भाग पडलें व ब्राह्मणीधर्माचें रुपांतर जेव्हां विस्तृत अशा हिंदुधर्मांत झालें त्यावेळीं क्रमाक्रमानें शिवाला वरच्या पायरीचें देवत्व देण्यांत आलें. ब्राह्मणीधर्माच्या काळींहि शिवाला जे सजीव बळी देण्याचे अनार्यांचे बहुविध प्रकार होते, ते समूळ नष्ट झाले नव्हते. त्यावेळीं शिवाला जरी आर्यदेवतांत समाविष्ट केलें होतें, तरी त्याची पूजाअर्चा खालच्या वर्गाच्या समाजांतच विशेष होत होती व त्याला अनुसरुन शिवाजी स्त्री काली अथवा भवानी (हीहि मूळची अनार्यांचीच देवी होय) हिलाहि देवत्व लाभले होतें. या कारणामुळें अद्यापिहि कांहीं (दक्षिणेंतील) ठिकाणीं शंकराच्या देवळांत खालच्या (परियासारख्या) जातीचें पुजारी आढळतात. हिंदुधर्माचा जसा जास्त प्रसार झाला तसें शंकराचें हिडिस व अनार्य स्वरुप जाऊन त्याला सुंदर व आर्य स्वरुप मिळालें व त्याचा समावेश हिंदूच्या मुख्य देवतांमध्यें होऊं लागला; एवढेंच नव्हे तर हिंदूंच्या प्रसिद्ध त्रैमूर्तीतील एक स्थान त्याला मिळालें. शैवधर्मावर बौद्धधर्माचा परिणाम होऊन शंकराला देण्यांत येणारे सजीव बली समूळ नाहींसे झालें. पण पुढें हिंदुधर्माच्या प्रसाराच्या वेळीं व सांप्रतहि खालच्या जातींनां सजीव बळी देण्यास आडकाठी नव्हतीं. दक्षिण हिंदुस्थानांत शैवमत व संप्रदाय फार आहे. तिकडे वारुळाची पूजा करणें हेंहि या संप्रदायांतील एक अंग मानतात. वीर अथवा साधुपुरुष यांच्या समाधीवर प्राचीन काळीं जो खुमेचा अथवा पूजेचा दगड बसवीत तो शंकराच्या लिंगासारखा असे त्याची खूण म्हणून पुढें शंकराच्या देवळांत मूर्तीऐवजीं (शाळुंकेसहित) लिंगस्थापना होऊं लागली. महायानपंथांतील स्तूपपूजा हीच पुराणकालांत प्रचलित झालेली लिंगपूजा होय. वास्तविक लिंग व शाळुंका म्हणजे जगांतील आद्यपुरुषप्रकृतींची एक प्रकारचीं (इंद्रियविषयक) स्मारकें होत. बंगाल्यांत शक्तिपूजा (शंकराची स्त्री) जास्त असून दक्षिणेंत लिंगपूजा (लिंगायत वगैरे जातींत) जास्त आहे. कापालिक, कालामुख,नकुलीश पाशुपत इत्यादि प्राचीन शैवपंथ होते.
काश्मीर मधील शैवसंप्रदाय- काश्मीरमधील शैवसंप्रदायाच्या दोन प्रमुख शाखा अगर पंथ आहेत. पहिल्या पंथाचें नां स्पन्दशास्त्रपंथ व दुसर्याचें नांव प्रत्यभिज्ञापंथ असें आहे. पहिल्यापंथाचा प्रवर्तक वसुगुप्त हा होय. या पंथाचे शिवसूत्राणि व स्पंदाकरिका असे दोन प्रमाणग्रंथ आहेत. वसुगुप्त हा आठव्या शतकाच्या अखेरीस होऊन गेला असावा. या पंथाचें तत्वज्ञान असें- शिव हा जगताचें प्रधान अगर निमित्तकारण नसून, केवळ इच्छेच्या जोरावरच तो जग निर्माण करतो व त्याचा नाश करतो. आत्मा व परमात्मा एकच होत. नाद उर्फ वाणी पासून मल उत्पन्न झाल्यामुळें आत्म्याला परमात्म्यैक्याचें ज्ञान होत नाहीं. याप्रकारची जाणीव होण्याला शिवाची कडक भक्ति हाच उपाय होय. प्रत्यभिज्ञापंथाचा संस्थापक सोमानंद हा दहाव्या शतकाच्या पहिल्या पादांत होऊन गेला. त्याचा शिवदृष्टि हा ग्रंथ या पंथाचा प्रमाणग्रंथ होय. याशिवाय त्याचा शिष्य उदयाकर याचेंहि या पंथासंबंधींचे ग्रंथ प्रमाण मानले जातात. या दोन्ही पंथांच्या तत्वज्ञानामध्यें जो थोडा फरक आहे तो म्हणजे प्त्यभिज्ञापंथाच्या मतें जीवशिवैक्याची प्रतीति प्रत्याभिज्ञेमुळें होते हा होय. बाकीं दोन्हीं पंथांचें तत्वज्ञान सारखेंच आहे. या दोन्हीं पंथांमध्यें प्राणायाम, योगसाधन इत्यादिकांवर भर दिला जात नाहींच; व त्यामुळें पाशुपत अगर कापालिक पंथाप्रमाणे हा पंथ अघोर वाटत नाहीं. शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाचा काश्मीरमधील शैवसंप्रदायावर बराच परिणाम झालेला आढळतो.
वीरशैवलिंगायत संप्रदाय- ९।१० व्या शतकांत काश्मीरमध्यें दोन शैवसंप्रदाय उदयास आले. त्याचप्रमाणें ११ व्या शतकाच्या उत्तरार्धांत कर्नाटक प्रांतांत वीरशैव अगर लिंगायत पंथ उदयास आला. वीरशैवपंथाचा प्रवर्तक बसव हा होय अशी समजूत आहे. तथापि बसवापूर्वीहि हा पंथ अस्तित्वात असून बसवानें या पंथाला भरभराटीला आणिलें असें अलीकडच्या शोधावरून सिद्ध झालें आहे व या पंथाची स्थापना ब्राह्मणेतरांनीं आराध्य नांवाच्या ब्राह्मणांच्या नेतृत्वाखालींच केली. शिवाचीं लिंगस्वरुपामध्यें हे भक्ति करीत म्हणून त्यांचें लिंगायत हें नांव पडलें. लिंगायत धर्माचे, केदारनाथ, श्रीशैल, बलेहळळी, उज्जनी व काशी या ठिकाणींपांच प्रसिद्ध मठ आहेत. लिंगायत धर्मामध्यें भक्तीला प्राधान्य दिलेलें आढळतें. रामानुजाच्या विशिष्टाद्वैत मताचा या पंथाच्या तत्वज्ञानावर बराच परिणाम झालेला आढळतो. 'वीरशैव' पहा.
द्रविडदेशांतील शैव संप्रदाय- दक्षिण हिंदुस्थानांत शैवसंप्रदाय केव्हां अस्तित्वांत आला यासंबंधीं नक्की सांगतां येत नाहीं. तथापि सहाव्या सतकामध्यें तामिळ देशांत शैवपंथ चांगल्या स्थितींत उत्कर्ष पावत होता असें कांचीपूर येथील देवालयांतील शिलालेखावरून दिसतें. त्यानंतरच्या काळांतहि तामिळ देशांत शैव संप्रदाय फोफावतच गेला. तामिळ देशांतील शैव संप्रदायाचें वाङ्मयहि विपुल आहे. या वाङ्मयाचे ११ संग्रह प्रसिद्ध आहेत. यांपैकीं पहिल्या तीन संग्रहांचा कर्ता तिरुज्ञानसंबंदर असून, तीन ते सहा पर्यंतच्या संग्रहांचा कर्ता अप्पर हा आहे. सातवा संग्रह सुंदर नांवाच्या साधूचा आहे. या सात संग्रहांनां वेदांइतकें प्रमाण मानण्यांत येत असून त्यांनां देवारम् अशी संज्ञा आहे. आठव्या संग्रहाचें नांव तिरुवासगम् असें असून त्याचा कर्ता माणिक्कवासगर होय. या संग्रहाला तामिळ शैव संप्रदायाचें उपनिषद् म्हणून मानतात. वरील ११ संग्रह व पेरीय पुराण हें तामिळ शैवांचें पवित्र वाङ्मय होय. याशिवाय निरनिराळया संतानआचार्यांची १४ पुस्तकें सून त्यांनां सिद्धांतशास्त्र असें म्हणतात. या सर्व ग्रंथकारांमध्यें तिरुज्ञानसंबंदर हाच श्रेष्ठ मानण्यांत येतो. हा बुद्ध व जैन धर्माचा कट्टा द्वेष्टा होता व त्याच्या प्रत्येक पदिगामध्यें बौद्ध अगर जैन धर्माची निंदा आढळते. तामिळ शैवसंप्रदाय हा केवळ भक्तिमार्गी संप्रदाय आहे. तथापि या भक्तिमार्गी वाङ्मयाच्या बुडाशीं एखादें शैवसिद्धांतदर्शन असलें पाहिजे असें मानण्याला जागा आहे.
अशा रीतीनें हिंदुस्थानांतील निरनिराळया भागांत शैव संप्रदाय आढळून येतो. शैव संप्रदायाचे साधारणतः दोन पोटवर्ग पडतात. पहिला पाशुपतशैव व दुसरा आगमशैव. पहिल्या वर्गांत पाशुपत, नकुलीश पाशुपत, कापालिक, नाथ, गोरक्षनाथ व रसेश्वर यापंथांचा समावेश होतो. दुसर्या वर्गांत शैव सिद्धांतवादी, तामिळ शैव, काश्मीर शैव व वीरशैव या पंथांचा अंतर्भाव होतो.