विभाग विसावा : वऱ्हाड- साचिन
शोण अथवा शोणभद्रा- उत्तरहिंदुस्थानांतील ही एक मोठी नदी आहे. हिलाच रामायणादि पुराणांत सुवर्णनदी असें नांव आहे. हिचें उगमस्थान नर्मादानदीजवळच अमरकंटक पहाडांत असून, ही प्रथम उत्तर व नंतर पूर्वेकडे वाहात जाऊन, दिनापूरच्या पलीकडे १० मैलांवर गंगानदीस मिळते. हिची लांबी सरासरी ४८७ मैल आहे. हिंदु लोक ही नदी फार पवित्र समजतात. कारण हिचें पाणी शाहाबाद, गंगा व पाटणा इत्यादि ठिकाणीं कालव्याच्यायोगानें नेलें आहे. हिचें ऐतिहासिक महत्वहि बरेंच आहे, कारण पाटलीपुत्र म्हणजे हल्लीचें जें पाटणा शहर तें पूर्वी हिच्याच कांठीं होतें असें ग्रीक भूगोलवेत्यांचें म्हणणें आहे.