विभाग विसावा : वऱ्हाड- साचिन
श्रीनगर- हिंदुस्थान, काश्मीर संस्थानची राजधानी. हें शहर झेलमच्या दोन्ही तीरावर बसलेलें असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची ५२५० फूट आङे. १९०१ सालीं या शहराची लोकसंख्या सुमारें १। लक्ष होती. झेलमच्या उजव्या तीरावर अर्वाचीन श्रीनगर असलेल्या ठिकाणीं, प्राचीन राजा दुसरा प्रवरसेन हा सहाव्या शतकांत राज्य करीत होता. कल्हणानें असें लिहिलें आहे कीं, या शहरांत ३६००००० घरें असून हवेल्या गगनचुंबित आहेत. मिर्झा हैदर व अबुल फजल यांनींहि आपल्या लेखांत श्रीनगरच्या उंच देवदारी हवेल्यांचा उल्लेख केला आहे.
श्रीनगरमध्यें व त्याच्या आसपास प्रेक्षणीय स्थळें बरींच आङेत. श्रीनगरच्या आसपास, शालीमार, निषात, बादशाही बाग वगैरे सुंदर बाग आहेत. नदीच्या डाव्या तीरावर शेरगढी म्हणजे डोग्रा राजांचा अर्वाचीन राजवाडा व नदीपलीकडे सुंदर घाट आणि वसंत बाग आङे. उजव्या तीरावरच खालच्या बाजूला शहा हमदान नांवाची सुंदर व सर्व काश्मीरमध्यें अत्यंत पवित्र मानलेली मशीद आङे. उजव्या तीरापासून थोडयाशा अंतरावर, नदीचें वळण व हरिपर्वत यांच्यामध्यें जुम्मा मशीद आहे. नूरजहाननें बांधलेली दगडी मशीद, हरिपर्वताच्या खालच्या बाजूला असलेलें महदूम साहेबाचें थडगें, व पीर दस्तगीर आणि नक्षबंदी यांचीं थडगीं हीं होत. ज्या नदीच्या कांटीं हें शहर आहे तिच्यांतून नावा चालतात; व दलर आणि अंचार तळयापर्यंत कालवे गेलेले आहेत. आसपासचा प्रदेश अत्यंत सुपीक आङे.
श्रीनगर येथें एके काळीं प्रख्यात असलेला, शाली तयार करण्याचा धंदा हल्ली नाममात्र राहिला आङे. चांदीचीं, तांब्याचीं आणि पितळेचीं भांडी, गिलिटाचें काम, लांकडी कातकाम हीं कामेंहि येथें चांगलीं होतात; येथील कातडीं पाकिटें फार टिकाऊ असतात. काश्मीरचे कागद एके काळीं प्रसिद्ध आसून, सर्व हिंदुस्थानांतून त्यांनां मागणी येत असे. लाखकाम व लांकडांवरील नक्षीकाम हीं येथें चांगल्यापैकीं होतात. येथें संस्थानचें हायस्कूल व रुग्णालय असून चर्चमिशनरी सोसायटीच्याहि शिक्षणविषयक व वैद्यकीय संस्था आङेत.