विभाग विसावा : वऱ्हाड- साचिन
श्रीरंगम्- मद्रास, त्रिचनापल्ली जिल्ह्यांतील एक गांव. हें त्रिचनापल्ली शहरापासून उत्तरेस २ मैलांवर व कावेरी आणि कोलेरुन या कावेरी नदीच्या दोन फांटयांच्या योगानें बनलेल्या बेटाच्या मध्यभागीं आहे. मद्रासला जाणारा मोठा रस्ता त्रिचनापल्लीवरून गेलेला असून, बेटाच्या दोन्हीं बाजूंनां मुख्य जमिनीवर जाण्याकरितां सुंदर पूल बांधलेले आहेत. १८७१ सालीं श्रीरंगम् येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली असून तींत कित्येक खेडयांचा समावेश होतो; पैकीं श्रीरंगम् व जुंबळेश्वरम् हीं दोन प्रमुख होत. गेल्या ४० वर्षांत येथील लोकसंख्या जवळ जवळ दुप्पट झाली असून १९०१ सालीं ती २३०३९ होती. गावांतील विष्णूचें देवालय फार प्रसिद्ध आहे. दक्षिण हिंदुस्थानांत त्याच्याएवढें मोठें दुसरें देवालय नाहीं. या देवालयांत, एकामध्यें एक अशीं सात आवारें असून सर्वांत बाहेरच्या आवाराची लांबी १०२४ यार्ड व रुंदी ८४० यार्ड आहे. गांवांतील बरींच घरें देवळाच्या आवारांतच बांधलेलीं आहेत. सर्वांत आंतल्या आवारांत मध्यभागी शेषशायी रंगनाथस्वामीची मूर्ति आहे. चवथ्या आवारांत ४५० फूट लांबीचा व १३० फूट रुंदीचा सभामंडप (हजार खांबी मंडप) असून त्याला ९४० खांब आहेत. या मंडपांत वैकुंठएकादशीला मोठा उत्सव होतो. हजारखांबी मंडपासमोर शेषगिरिरावाचा मंडप असून त्यांत सुंदर दगडी खोदकाम आहे. देवळाच्या भिंतीवर चोल राजा मदुरैकोंडकोपरकेसरीवर्मा उर्फ पहिला परांतक याच्या वेळचे (दहाव्या शतकाचा पूर्वार्ध) लेख आहेत. कांहीं लेख चोल, पांडय, होयसळ व विजयानगर ह्या घराण्यांच्या वेळचे आहेत. शिलालेखांवरून हें देवालय स. १००० च्या सुमारास बांधलें गेलें असावें.