विभाग विसावा : वऱ्हाड- साचिन
श्लीपदरोग- (एलेफंटिआसिस) या रोगांत फिलेरिया नांवाचे जंतासारखे पण सूक्ष्म कृमी शरीरांतील रक्तवाहिन्यांत, त्वचेखालीं व अन्नरसवाहिन्यांत वास्तव्य करुन त्यांच्या सुरळीत व्यापारास प्रतिबंध करतात. आफ्रिका, हिंदुस्थान, वेस्ट इंडिज बेटें व दक्षिण पासिफिक महासागरांतील बेटें यांत हा रोग आढळतो. या कृमीची मादी ३ इंच लांब व १/१०० ते १/ ९० इंच रुंद असते. नर मात्र लहान असतात. मादी असंख्या अंडीं प्रसवते व तीं वर सांगितलेल्या रक्त, रसादि वाहिन्यांतून वहात जाऊन वर सांगितल्याप्रमाणें असंख्य अंडीं रक्तांत जमतात. हे कृमी ज्याच्या रक्तांत आहेत त्या रोग्यास दंश करुन सोंडेवाटें रक्ताबरोबर हीं अंडीहि शोषून घेतात. डांस आपलीं अंडी पाण्याच्या पृष्ठभागावर घालतात त्यावेळीं हीं कृमींचीं अंडी १/ १६ इंच लांब बाहेर पडतात. हें असलें पाणी माणसानीं न उकळतां प्याल्यामुळें हीं अंडी त्यांच्या रक्त-रसवाहिन्यांत प्रवेश करतात व पुन्हां स्वतःचीं अंडीं उत्पन्न करतात. या कृमींमुळें कधीं कधीं तर कांहीं एक त्रास अगर लक्षणें झालेलीं दिसून येत नाहींत. पण मोठया रस अगर रक्तवाहिनींत मोठे कृमी अडकल्यानें असंख्य कृमी तुंबले जाऊन मग ते दाह व सूज व इतर लक्षणें उत्पन्न करतात. या तुंबलेल्या वाहिन्या फुगून त्यांतील रस नव्या मार्गांनीं जाण्याचा जबरीनें प्रयत्न करतो व अशा रीतीनें मूत्राशय, अंडकोश अगर फुफ्फुसावरण या व अशासारख्या ठिकाणीं येऊन त्या फुगलेल्या वाहिन्या फुटल्यामुळें या वरील पोकळ भागांत पांढरा अन्नरस जमतो व त्यामुळें पिष्टप्रमेह, पिष्टरसवृषणवृद्धि इत्यादि अनेक रोग होतात. व अशाच तर्हेनें पायास सूज येऊन तो कायमचा मोठा होतो. पिष्टप्रमेहांत लघवी बासुंदीसारखी दाट व पांढरी होते. पिष्टरस वृषणवृद्धिरोगांत वृषणाचें वजन व आकार हीं मध्यमपासून तें मणभऱ (कमजास्त) पर्यंतहि वाढतात.
हा रोग दोन्ही पायांस होतोच असा नियम नसतो. किंवा नुसता गुडघ्याखालील थोडा भाग अगर वृषण, कान, ओंठ हात अगर उदराचा खालील भाग या ठिकाणीं सूज येऊन त्वचा जाड व तुकतुकीत दिसते पण बोटांनीं दाबलें असतां खळगा पडत नाहीं. शरीराच्या स्वाभाविक बेचकळया व वळकटया असतात त्या फारच प्रचंड दिसतात, पाय नेहमीच्या दुप्पट-तिपटहि सुजतो. बेचकळयांत घाम व शरीरांतील स्निग्ध कीट सांठललें असतें., अवयवाचा वर्ण नेहमींपेक्षां अधिक काळसर दिसतो. व तो अवयव खरबरीत, वर कोंडा जमला आहे असा व कित्येक ठिकाणीं पुटकुळया आहेत व त्यांपैकीं कित्येकांतून पांढरी लस स्त्रवत आहे असा दिसतो. रोगास सुरुवात होतांना त्या भागांवर कधीं कधीं धांवर्याप्रमाणें अति लाली येते व ज्वरहि येतो. हा ताप बरा झाल्यावर पहिल्यापेक्षां पाय मोठा झाला आहे असें आढळून येतें. कांहीं महिन्यांनीं तेथेंच पुनः सूज येते व पुनः ज्वर येतो. व पाय पहिल्यापेक्षां लठ्ठ होतो. असा क्रम चालून 'हत्तीचा पाय' हें या रोगाचें नांव अधिकाधिक सार्थ होत जातें. कधीं कधीं ही सूज ज्वर आल्याशिवाय अति मंद गतीनें येत असते.
औषधोपचार- या रोगावर औषधिक्रिया निरुपयोगी आहे असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. झाला तर शस्त्रक्रियेचाच उपयोग मात्र बराचसा होतो. उदाहरणार्थ या रोगानं वृषण करणें हें योग्यच आहे. पण हात, पाय इत्यादि इतर अवयवांच्या सुजेवर सर्वदां तसें करतां येत नाहीं. म्हणून या अवयवांनां रबराचे पट्टे बांधून ठेवणें किंवा निजल्यावर रोग्याच्या शरीरापेक्षां उंच अशा तक्क्यावर किंवा लोडावर दूषित भाग ठेवून सूज थोडीशी कमी होते.