विभाग विसावा : वऱ्हाड- साचिन
श्वासनलिकादाह (ब्रॉकिटिस)- श्वासनलिकांच्या शाखांत जेव्हां दाह उत्पन्न होतो तेव्हां त्या रोगास हें नांव देतात. गोंवर, इन्फ्ल्युएंसा, फुफ्फुसदाह इत्यादि सांथीसारख्या रोगांत हा थोडा फार असतो. तेव्हां त्यास जंतुजन्यदाह असें म्हणावें. दुसर्या तर्हेचें वर्गीकरण म्हणजे श्वेतीव्र अगर दीर्घकालीन दाह हें होय.
तीव्रश्वासनलिकादाह- छातींतील इतर रोगांप्रमाणें ही व्याधि उत्पन्न होण्याचें कारण थंड हवा व तीहि दमट्, तसेंच ओलाव्याच्या ठिकाणीं बसणें उठणें किंवा उष्ण हवेंतून एकदम थंड जागीं जाणें. रोगाचा जोर असेल त्याप्रमाणें लक्षणेंहि सौम्य अगर भयंकर असतात. म्हणजे रोग अति सूक्ष्मनळयांपर्यंत पोंचला असतांना रोग्याची स्थिति कठिणच होते.
लक्षणें- प्रथम शिंका, सर्दी, पडसें, इत्यादि विकार होतात. पण त्यांबरोबर ताप असला व सर्व सरीरास चैन पडेनासें होऊं लागलें म्हणजे कांहीं तरी जबरदुखणें येणार असें समजावें. नंतर या व्याधीचीं लक्षणें लवकरच दिसून येतात तीं अशीं- श्वास जलद चालूं लागून तो घेतांना व बाहेर सोडतांना बारीक 'सू' असा आवाज होऊन घशांत दुःख उत्पन् करणारा कोरडा ठसका व खोकला सुरु होतो. गळयांत छातीच्या मध्यभागीं खोकण्याच्या श्रमानें दुखतें, छाती आंवळून आंत कांहीं कोंडलें आहे असें रोग्यास वाटतें, ही रोगाची प्रथमावस्था होय. यांत व कांहीं थोडया रोग्यांस दम्यासारखी धाप व श्वास लागून त्याचे अतिशय हाल होतात. नंतर थोडया दिवसांनीं खोकल्याबरोबर कफ पडूं लागतो. प्रथम तो थोडा, अति चिकट अगर फेंसाळ असतो. नंतर बराच जास्त सुटूं लागून पिंवळसर रंगाचा पडतो. कफ बराचसा पडूं लागल्यानें रोग्याचें हाल अंमळ कमी होतात. रोग्याचा खोकला जरी मग तीन चार आठवडेपर्यंत लांबला तरी हळू हळू सर्व लक्षणें कमी होऊन रोगी बरा होण्याच्या पंथास लागतो. परंतु बहुधा तेव्हांपासून रोग्याच्या फुफ्फुसांतील रोगप्रतिकारशक्ति कमी होऊन त्यास थोडीहि सर्दी लागलीच बाधूं लागते.
हीं सर्व लक्षणें सौम्य स्वरुपी दाहाचीं- ज्यांत रोगी दगावत नाहीं अशा रोगाचीं झाली. भयंकर स्वरुपाच्या दाहाचीं लक्षणें व कारणें अशीं-वरील दाह अति सूक्ष्म किंवा केशवाहिन्यांत पसरला असतां किंवा रोगोत्पत्तीचा आरंभच तेथून जाला असतां स्थिति बिकट होते, व त्यास सूक्ष्मनलिका फुफ्फुसदाह असें नांव आहे. कारण या सूत्र्म नळया फुफ्फुसांतील हवेच्या कप्प्यापर्यंत पोंचलेल्या असतात. असें झालें म्हणजे वर सांगितेलीं लक्षणें पण अदिक तीव्र स्वरुपांत दिसून येतात. हवा फुफ्फुसांत जाण्यांत प्रतिबंध उत्पन्न झाल्यामुळे प्राणवायूशीं संयुक्त होऊन हवेच्या योगानें रक्ताचें शुद्धीकरण होण्यास अडचण येतें. व रोग्याचें जीवित मोठया धोक्यांत येऊन पडतें. ताप व अस्वस्थता अतिशय वाढते. खोकला तर थांबतच नाहीं व जबर श्वास लागून श्वसनक्रिया अति कष्टानें होऊं लागते. श्वासोच्छवासाच्या वेळीं त्याच्या नाकपुडया उडूं लागतात. यावरून त्याचा श्वासामुळें कोंडमारा होत आहे असें समजावें. शरीर पांढरें अगर काळसर व तोंड व ओंठ काळेनिळे होतात. जीव गुदमरल्यामुळें आडवें मुळींच निजतां येत नाहीं. अशा वेळीं कफोत्सर्जन होऊन खोकला होण्यासारखा इलाज हुषारीनें व तारतम्यानें चालविला नाहीं तर रोग्याची छाती मोकळी न झाल्यामुळें त्याचा शक्तिपात होतो व बेशुद्धि येऊन पुढें वात होतो आणि मग मृत्यु येतो. एवढें सर्व घडून येण्यास दिवसहि फार लागत नाहींत आणि बिचारी कोंवळी अर्भकें तर अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत मृत्युमुखीं पडतात.
सौम्य रोगावरील उपचार- रोग जर साधारण खोकला, पडसें इतकाच असेल तर उबदार अंथरुणांत गरम कपडे घालून जेथें थंड हवा नाहीं अशा ठिकणीं दोन चार दिवस स्वस्थ पडून रहाणें व खाण्यास हलकें अन्न व पिण्यास स्वेदजनक पेयपदार्थ-उदाहरणार्थ गवती चहा, दालचिनी, सुंठ इत्यादि कांचा काढा-एवढें पुरें आहे. यापेक्षां जास्त उपाय, जेव्हां लक्षणें कमी न होतां उलट वाढत आहेत असें आढळून येईल तेव्हां योजण्यांत यावेत व ते उपाय असे-ताप निघून थोडासा घाम यईल असें औषध सुरुवातीस दिल्यानें उपयोग होतो. नंतर पीडादायक खोकल्याचें शमन होऊन कफोत्सर्जन होण्यासाठीं सूक्ष्म प्रमाणांत अफूमिश्रित औषध द्यावें. पण मुलांस मात्र अफूमिश्रित औषध डाक्टराचा स्पष्ट सल्ला घेतल्याखेरीज सूक्ष्म प्रमाणांतहि कधीं देऊं नये. प्रथमपासून शेकण्यानें किंवा गरम कपडयावर टरपेल तेलाचे थोडे थेंब पाडून तो कपडा छातीस गुंडाळल्यानें रोग्यास आराम वाटतो. आणि गोंवर इत्यादि सांथींच्या खोकल्याखेरीज सामान्य खोकल्यामध्यें शेंकणें व सुरुवातीस एखादें सौम्य ढाळक एवढें उपायहि पुरेसे आहेत. सांथीचा दोषी खोकला असेल तेव्हां टरपेन तेल, ऊदमिश्रित अर्क, क्रियासोट किंवा ग्यावायाकोल यापैकीं एखादें औषध पाण्यांत विरघळून त्याची वाफ योग्यप्रकारें घशांत श्वासमार्गों हुंगली असता या प्रकारच्या दोषी खोकल्याचें शमन होतें. व ती वाफ जंतुघ्रहि असते असा अनुभव येतो. हीं औषधें पाण्यांत मिश्र न करितां मूळ औषधांचाच न दिसेल इतका सूक्ष्म फवारा बेन्झाइनोल नांवाच्या द्रवांत मिश्र करून एका विशिष्ट श्वसनयंत्रांतून घशांत घेतां येतो. व या कामीं मेंथाल, यूकालिप्टॉल, पांढर्या देवदाराचें तेल हीं औषधेंहि विशेष उपयुक्त आहेत व तीं खोकल्याचें चांगल्या रीतीनें शमन करतात. यांतच कोकेन अगर अफू डॉक्टरच्या सलज्यानें सूक्ष्म प्रमाणांत मिश्र करुन देतां येतें.
सूक्ष्मश्वासनलिका दाह- या प्रकारचा दाह झाला असतां एक धोरण संभाळावें लागतें तें हें कीं, रोग्याचा अधिक शक्तिपात न होऊं देणें व श्वासवाहिन्यांतील कफाचें उत्सर्जन करवणें. पहिला हेतु सिद्धिस जाण्यासाठीं हृदयक्रिया शाबूत राखणारीं उत्तेजक औषधें व ब्रँडी वगैरेंच्या रुपानें अल्कोहल देणें फार जरुरीचें असतें. दुसरा हेतु तडीस जाण्यासाठीं वर दिलेले सर्व उपाय तर फायदेशीर आहेतच पण खोकून खोकून कफोत्सर्जन मुळींच होत नसेल व लक्षणें वाढत अशतील तर झिंक सल्फेट हें औषध देऊन वांती करविल्यानें पुष्कळ फायदा होतो व आराम वाटतो. या दुखण्यांत शरीरपोषण जपून पहिल्यापासून केलें पाहिजे, व पुरेसें दूध वैगरे पोषक पदार्थ पोटांत गेले पाहिजेत. रोग नाहिंसा झाल्यावर शक्ति येण्यास उतारवय झालेल्या रोग्यास अवधि बराच लागतो. त्यासाठीं या रोग्यास शक्तीचीं पौष्टिक औषधें व खाद्यपेय पदार्थ मागाहून देण्यांत यावेत.
दीर्घकालीन श्वासनलिका दाह, कारणें- या श्वासनलिकांचा वरचेवर तीव्र दाह होऊं लागल्यानें हा रोग होतो, किंवा अन्य कारणानेंहि होतो. तरुण माणसांपेक्षां उतारवयाच्या माणसांमध्ये हा विशेष आढळतो. पण अमुक वयाच्या मनुष्यास मग तें मूल कां असेना हा रोग होतच नाहीं असें नाहीं. पण हे अपवादात्मक होय. रोगोत्पत्तीचा इतिहास व क्रम असा असतो- प्रतिवर्षी सर्दीचे, पावसाळयाचे अगर हिंवाळयाचे दिवस आले कीं, खोकल्यास सुरुवात व्हावयाची व उन्हाळयाच्या आरंभीं खोकला नाहींसा व्हावयाचा पण पुष्कळ रोग्यांमध्यें या ॠतुंशिवाय इतर वेळीं जरा हवामान बदललें किंवा कांहीं तळकट खाणें अगर तळकट वासासारख्या थोडया निमित्तानें खोकल्यास सुरुवात होते. जुनाट खोकला तर वर्षानुवर्ष असतोच.
लक्षणें- हीं सर्व तीव्र दाहाप्रमाणेंच बहुतेक असतात. त्यांत फरक येवढाच कीं, ज्वर नसतो व खोकला इतका वेदनायुक्त नसतो. छातींत शब्दपरीक्षकनलिकेनें तपासलें असतां त्याच रोगाप्रमाणे शुष्क व आर्द्र विकृत ध्वनी ऐकूं येतात. खोकल्याचा त्रास दिवसभर फारसा नसतो पण पहाटें होतो. कफ सुटण्यास विशेष त्रास पडत नाहीं.
या रोगाचे परिणाम- श्वसनलिकांच्या आंतील श्वेष्मावरण जाड होत जाऊन त्यावर ठिकठिकाणीं व्रण व क्षतें पडतात व यामुळें नळीहि श्वेष्मावरण झिजून गेल्यानतंर अधिक मोठी पोंकळी असलेली दिसते. या मोठया नलिकेंतून कफसंचय अधिक होऊन तेथें राहून राहून तो कुजून दुर्गंधिमय होतो व मग खोकून पडतो. फुफ्फुसेंहि जुनाट खोकल्यांत बरींच विकृत होऊन वायुवाहक नळया व पेशी कायमच्याच विस्तृत होऊन बसतात व त्यामुळें फुफ्फुस फारच फुगलेलें दिसतें आणि रोग्यास सदासर्वदा धाप लागलेली असते. याशिवाय आणखीं या रोगाचीं कारणें हृद्रोग व मूत्रपिंडदाह हीं होत व वातरक्त (गोट) व उपदंश हींहि मुख्य कारणें आहेत. मूलतः हे रोग रोग्यास होऊन त्यांत आगंतुक दोष म्हणून मागाहून या प्रकारच्या खोकल्याचा प्रवेश होतो व त्यापासून रोग्यास मोठें भय असतें. कांहीं विशिष्ट धंद्यांत पडणार्या लोकांत हा रोग फार आढळतो.
उपाय- रोगाच्या तीव्रतेच्या मानानें उपाय सुलभ अगर अवघड असावयाचेच. तसेंच ज्याप्रमाणें रोग्याचें वयोमान व इतर व्याधी असतील अगर नसतील त्याप्रमाणें उपायांत इष्ट तो बदल करणें जरुरीचें असतें. ज्यास उघडया सर्द व थंड हवेंत बारमहा कामावर जाणें भाग पडून हा रोग होतो त्याचें शरीर तर याप्रमाणें सुधारण्यासाठीं प्रयत्न कसून केला पाहिजे. या कामीं कॉड माशाचें तेल व तें तेल मिश्रित अशीं मधुर औषधेंहि फार उपयोगी आहेत. सर्द व थंड हवेंत जाण्यावांचून गत्यंतर नसेल त्या वेळीं ज्यामध्यें श्वासशुद्धिकारक सुगंधि जंतुघ्र औषधाचे बोळे ठेविले आहेत असें श्वसननाली यंत्र नाकातोंडावर अडकवून बाहेर गेलें असतां शीतरक्षण होऊन कफविकार न वाढण्याच्या कामी उपयोग फार होतो. रोगाची मजल फारच पुढें गेल्यानंतर म्हणजे ती इतकी की जरा बाहेर गेल्यानें श्रम होऊन खोकला वाढतो अशा वेळीं निवार्याच्या उबदार खोलींत रोग्यास पडून रहाण्यास सांगणें अगर सर्द अगर थंड ॠतूमध्यें उष्ण प्रदेशांत वास्तव्य करण्यासाठीं हवापालट करविणें एवढें उपाय जरुरीचे असतात. मूळ रोगावरहि कीं,ज्यामध्यें हा रोग आगंतुक दोष म्हणून मागाहून उत्पन्न झाला आङे औषधयोजना असावी. जसें रोग असल्यास पोटांत कॉलचिकम व अल्कली क्षार द्यावेत. उपदंश असल्यास त्याच्या अवस्थेप्रमाणें पारदमिश्रित अगर विरहित औषधें त्यासाठीं द्यावींत. हृद्रोगासाठीं, डिजिटालीस स्ट्रिक्नियाचा अर्क इत्यादि उपचार करणें. लघवी व कोटयाची क्रिया साफ ठेवावी. घटिकाचूषणानें अथवा आयोडाईनसारखीं औषधें लावून फुफ्फुसावरील त्वेचवर प्रतिप्रकोपनक्रिया करून आंतील फाजील रक्तसंचय कमी करावा.
श्वासनलिका विस्तरण- कित्येक प्रकारच्या फुफ्फुसाच्या रोगांमध्यें मोठाल्या श्वासनलिकांचा तीव्र अगर दीर्घकालीन दाह, तीव्र अगर दीर्घकालीन फुफ्फुसादाह, लहान मुलांतील नलिकाफुफ्फुसमिश्रदाह व कफ, क्षय या सर्व रोगांमध्यें ज्या भागांत या विकृती प्राधान्येंकरून असतील तेथील नलिकांचें येणेंप्रमाणें विस्तारण थोडेंबहुत होतेंच, श्वासमार्गावर अगर श्वासनलिकेवर धमनीविस्तरण अगर ग्रंथि उत्पन्न होऊन त्यांच्या दाबानें त्या नळयांची पोकळी आकुंच्चित होऊन त्याच्या खालील नळी विस्तृत होणें हेंहि एक दुसरें कारण आहे. श्वासनलिकेचें विस्तरण बहुतकरुन सर्व बाजूंनीं सारखें होतें, पण क्वचित नळींच्या एकच भागास फुगवटी येऊन विस्तरण पावतात पण इतर आगंतुक ग्रंथींचा दाब पडला असतां मोठाल्या नलिकाचा विस्तृत होतात. ही विकृत स्थिति सामान्यतः एका फुप्फुसांतच आढळतें व याच्या बरोबरच फुफ्फुसवृद्धि नांवाची विकृति असलेली आढळते.
लक्षणें- हीं प्रथम सामान्य श्वासनलिकादाहाप्रमाणेंच असतात पण मग कांहीं विशिष्ट फरक पडत जातो असें स्पष्ट दिसून येतें. खोकला एकसारखा न येतां त्याची कांहीं वेळ टिकाणारी अशी उमळ येते. ती एकदां निघून गेली म्हणजे बराच वेळ खोकल्यापासून रोगी अगदीं मुक्त असतो. रोग्याच्या निजण्याबसण्याच्या भिन्न स्थितीनुरुप खोकल्यावर परिणाम घडतो. उदाहरणारर्थ जी बाजू बिघडली आहे त्या कुशीवर रोगी निजला असतां सर्व रात्रींतून त्यास खोकला मुळींच येत नाहीं. पण तो उलट बाजूला निजला अगर उठून पुढें वांकून बसला अथवा उभा राहिला तर खोकला येऊन पुष्कळच कफ पडतो. असा पुष्कळ कफ सांचून तो दीर्घकाल टिकणार्या खोकल्याच्या उमळीबरोबर पडणें हा या रोगाचा विशेष होय. श्वासनळी एके बाजूस फुगली असेल तर कफोत्सर्जन एकदम व विपुल सतत वृष्टीसारखें होत आहे असें दिसतें. हा कफ नळयांत कांहीं वेळ सांचलेला असतो. म्हणून त्यास बहुधां अथिशय घाण येते. दम लागणें व कफाबरोबर रक्त पडणें हीं लक्षणें असतात तर कांहीं रोगांत नसताततहि. या रोगांत ताप असणें हें दुश्चिन्हच समजलें जातें. कफाच्या कुजण्यापासून विशेष उत्पन्न होऊन ती विषबाधा होऊं लागली म्हणजे ज्वरोद्भव होतो. हें फुफ्फुसकोथ (कुजणें० या व्याधीची सुरुवात होण्याचें चिन्ह आहे. या फुफ्फुसकोथाचीं लक्षणें, थंडी वाजणें व घाम येणें हींहि आहेत. हा रोग बरेच दिवस टिकल्यास हातापायांचीं बोटें जाड होतात व विशेषतः त्यांचे शेंडे जाड होतात. याचें दीर्घकालीन श्वासनलिकादाह (दुर्गंधिकफयुक्त) या रोगाशीं असलेलें साम्य व भिन्नत्व ओळखण्यास अडचण पडत नाहीं परंतु कफक्षय होऊन फुफ्फुसांत विवर बनतें ती स्थिति व हा रोग यांमधील निदान ठरविणें एखाद्या वेळीं अवघड जातें.
उपाय- रोग्याचें विकृत फुफ्फुस व श्वासनलिका औषधांनीं सुधारणें हें शक्य नाहीं. तथापि यापासून होणारी पीडा बरीचशी कमी करतां येणें अगदीं शक्य आहे. क्रियासोट नांवाचें औषध आहे, त्याची वाफ घशांत घेणें; लसूण गोळीच्या रुपानें पोटांत देणें (प्रत्येकींत सुमारें ३० ग्रेन), मेंताल, ग्वायाकोल, किंवा युकालिप्टोल या औषधांची वाफ हुंगविणें हें जंतुघ्र व कफशामक उपाय असून उपयोगाचे आहेत. पोटांत लोह अथवा कोयनेलयुक्त शक्तिवर्धक औषधें देण्यानें शरीरप्रकृति एकंदरीनें सुधारुन त्याचा या रोगावर उपयोग होतो. फुफ्फुस अतिशय कुजलें असतां शस्त्रक्रिया करुन फुफ्फुसाचा निरुपयोगी भाग व त्यावरील बरगडयांचा कांहीं भाग अस्थ्यावरणासह कापतात.