विभाग विसावा : वऱ्हाड- साचिन
सक्कर, जिल्हा- मुंबई इलाखा, सिंधमधील एक जिल्हा क्षेत्रफळ ५४०३ चौरस मैल. ह्या जिल्ह्याचा बहुतेक भाग सपाट व नदीच्या गाळानें बनलेला असून फक्त सक्कर व रोहरी येथें चुनखडीच्या लहान लहान टेंकडया आहेत. एके काळीं सिंध नदी ह्या टेंकडयांजवळून वहात असे. ह्या जिल्ह्याची हवा उष्ण व रुक्ष आहे. पाऊस ४.४ इंच पडतो.
इतिहास- इ.स. ७१२ त मुसुलमानी स्वारी होईपर्यंत हा भाग अरोर्याच्या ब्राह्मण घराण्याच्या ताब्यांत असून नंतर कांहीं काळापर्यंत उमईद खलीफ व अब्बासीद यांच्या ताब्यांत होता. १०२५ त गझनीच्या महमदानें जिंकल्यानंतर कांहीं दिवसांनीं तो अनुक्रमानें सिंध प्रांताच्या सुम्र, समा व पुढें अर्धन या घराण्यांकडे गेला. दिल्लीच्या अमलाखाली सिंधूच्या पश्चिमेकडे राहणार्या बलुची लोकांनां घालवून देऊन महर नांवाच्या सिंधी टोळीनें येथें आपलें वर्चस्व स्थापित केलें. परंतु सुलतान इब्राहिम शहाच्या नेतृत्वाखालीं दुसर्या एका सिंधी टोळीनें त्यांचा पराभव करुन त्यांचें लखी हें गांव लुटलें व अप्पर सिंधकरितां शिकारपूर ही नवीन राजधानी वसविली. अठराव्या शतकांत अफगणांच्या स्वारीपर्यंत (सन १७८१), अप्पर सिंध जिल्ह्यांत कल्होर सरदारांचा अंमल चालू होता. १८०९ व १८२४ च्या दरम्यान त्यांच्या मागून आलेले तारपूर मीर यांनीं दुराणी राज्यांतील बुर्दीक, रुपर, व सक्कर घेऊन अखेर शिकारपूरहि काबीज केलें. १८३३ सालीं तालपूरच्या अंमलांत पदच्युत अफगाण राजा शहाशुजा यानें गेलेला प्रदेश परत मिळविण्याकरितां अपर सिंधवर स्वारी केली. बहावलपूरवरुन शिकारपूरकडे जाऊन मोठा जय मिळविल्यावर मीरा लोकांपासून त्यानें ४॥ लक्ष रुपये खंडणी घेतलीं. पुडें शहानें कंदाहारवरहि स्वारी केली; परंतु दोस्त महंमदानें त्याचा पराभव केल्यामुळें परत हैद्राबादकडे येऊन त्यानें मीर लोकांकडून पैसे गोळा केले व त्यांसह तो पंजाबातं लुधियाना येथें निघून गेला. १८४३ मध्यें खैरपूरचा मीर अल्ली मुराद तालपूर याजकडे असलेल्या मुलुखाखेरीज बाकीचा मुलुख ब्रिटिशांनीं जिंकून घेतला. तत्पूर्वी १८४२ मध्यें सक्कर, बक्कर व रोहरी हीं गांवें ब्रिटिशांनां मिळालीं होतीं. खोटा दस्तऐवज व लबाडी करण्याच्या आरोपावरून मीर अलज्ी मुराद तालपूर याला दोषी ठरवून त्याच्या ताब्यांतील कांहीं मुलुख १८५२ त जप्त करण्यांत आला; हा सर्व मुलूख मिळून सक्कर तालुका झालेला आहे.
ह्या जिल्ह्यांत ६ मोठीं गांवें व ७०६ खेडीं असून एकंदर लोकसंख्या (१९०१) ५१०२९२ आहे. पैकीं शेकंडा २७ हिंदु व शेंकडा ७२ मुसुलमान आहेत. शेकंडा ९३ लोक सिंधी भाषा बोलतात. परंतु बलुची व सिरैकी या भाषाहि थोडया बहुत चालतात. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, कडधान्यें मुख्यतः (लंग व हरभरा) व गळिताचीं धान्यें हीं या जिल्ह्यांतील मुख्य पिकें होत. जिल्ह्यांत ४०० चौरस मैल जंगल असून त्यांत पिंपळ, निंब, सिरस, ताली, बहान, बाभुळ, व कंडी हीं झाडें होतात. मातीचीं वे धातूचीं भांडी, जाडेंभरडें कापड, आणि चामडयाचे जिन्नस या जिल्ह्यांत तयार होतात. रेल्वे झाल्यापासून बोलन घाटामधून होणारा व्यापार बहुतेक बंद झाला आहे. सक्र व शिकारपूर हीं व्यापाराचीं मुख्य ठिकाणें आहेत. रोहरी, मीरपूर, शिकारपूर असे या जिल्ह्याचे तीन पोटविभाग आहेत. सक्कर, शिकारपूर, घरी, यासीन, रोहरी व घोटकी येथील म्युनिसिपालिटयांशिवाय इतर ठिकाणचा स्थानिक कारबार सक्कर येथील जिल्हाबोर्ड व सात तालुका बोर्डें यांच्याकडे आहे. मुंबई इलाख्याच्या चोवीस जिल्ह्यांत साक्षरतेच्या बाबतींत या जिल्ह्यांचा नंबर २३ वा लागतो. लोकसंख्येपैकी, १.७ लोकांनां लिहितावाचतां येतें.
सक्कर शहर हें जिल्ह्याचें मुख्य ठिकाण आहे. येथून रेशीम, सुती कापड, कच्चा कापूस, लोंकर, अफू, साखर, आणि पितळेच्या कढया परगांवीं पाठविल्या जातात सुती कापड, धातू व स्पिरिट, आणि इतर कांहीं जिन्नस हा माल बाहेरुन येतो. या गांवांत एक टेक्निकल स्कूल मुलांमुलींच्या शाळा आहेत.
सक्करचें धरण- याची योजना १९२३ सालच्या जूलै महिन्यांत मुंबई सरकारनें हातीं घेतली. सिंधु नदीला मोठा बांद घालून सक्करच्या वरच्या भागांत सात मोठे कालवे बांधावयाचे आहेत. लाहनमोठया सर्व कालव्यांच्या योगानें दरसाल ५० लाख एकर जमीनीस पाणीपुरवठा होईल असा सरकारी अंदाज आहे. ही सर्व योजना पार पडण्यास १८ कोटी ३५ लक्ष रुपये खर्च होती. ३१ मार्च १९२६ अखेर या कामीं ३ कोटी ७६ लक्ष रुपये खर्च झाले होते.