विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संगमेश्वर, तालुका- मुंबई, रत्नागिरी जिल्ह्याच्या आंतल्या अंगास असलेला एक तालुका. क्षेत्रफळ ५७६ चौरसमैल. ह्यांत फक्त १९० खेडीं आहेत. सन ९८७८ पासून देवरुख खेडें त्याचें मुख्य ठिकाण आहे. १९२१ सालीं येथील लोकसंख्या १३०४६४ होती. ह्यांत असलेल्या 'शास्त्री' नदीच्या खोर्यांतील जमीन उत्तम प्रकारची व सपाट असून तीत तांदूळ कडधान्य ही पिकें चांगलीं होतात. ह्या तालुक्यांत उष्ण पाण्याचे झरे बरेच आहेत. पावसाचें सरासरी वार्षिक मान बरेंच म्हणजे १४३ इंच आहे.
गांव- हें पूर्वी तालुक्याचें मुख्य ठिकाण होतें. ‘शास्त्री’ अलकनंदा व वरुण ह्यांच्या संगमावर गांव वसलेलें आहे. तेथें धान्य, बारीक सारीक वस्तू व खारे मासे यांचा व्यापार चालतो. सन १८७८ साली भयंकर आग लागून सर्व सरकारी इमारती खाक झाल्यामुळें देवरुख हें तालुक्याचें मुख्य ठिकाण करण्यांत आले.
सह्याद्रिखंडावरून (एक पुराण) असें दिसतें की त्याला पूर्वी रामक्षेत्र हे नांव असून येथें भार्गवरामानें बांधलेलीं पुष्कळ देवळें होतीं. इसवीसनाच्या सातव्या शतकांत येथें चालुक्य वंशीय कर्ण राजाची राजधानी होती. त्यानें येथें किल्ला व बरींचशीं देवळें बांधलीं त्यांपैकीं कर्णेश्वर फक्त राहिले आहे. लिंगायतपंथ-संस्थापक बासव हा येथें फार दिवस होता. येथील धूतपापतीर्थ प्रसिद्ध आहे. मोगलांनी संभाजीला येथेंच पकडलें.