विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संग्रहणी- हा रोग हिंदुस्थान, चीन, मलाया, द्वीपकल्प इत्यादी आशिया खंडांतील ईशान्य भागांतील देशांत बराच आढळतो व यांत आंतडयाच्या जीर्ण दाहामुळें रोग्यास वरच्यावर शौचास जावें लागणें, नळाश्रितवायु, सदा तोंड आल्यामुळें तिखट, उष्ण पदार्थ खाण्याची पंचाईत, मुखामध्यें टाळूं, ओठ गालांची आंतील बाजू, जीभ या ठिकाणीं आरक्तता ठिकठिकाणीं सालाडी गेलेल्या जागा अगर रक्ताधिक्य झालेल्या जागा, बारीक फोड येऊन ते फुटल्यामुळें झालेलें व्रण किंवा चट्टे हीं मुख्य लक्षणें असतात. तोंडास त्यामुळें लाळ फार येते व अन्न चावून खाणें अगर तें गिळणें या दोन्ही गोष्टी त्रासदायक होतात. गळवावर पोटीस बांधण्यासाठीं आपण तयार करतों तशा रंगाचा व स्वरूपाचा पुष्कळसा मळ शौचाच्या वेळीं पडतो. त्यांस आंबुस, दुर्गंधि बरीच येत असून त्याचा रंग पांढरा किंवा कधीं काळसर असतो. हा मळ अति फेंसाळ व ताकाचें विरजण आंबून फसफसावें तशा कुचकट दुर्गंधीनें युक्त-कीं जी निरोगी मळास येत असलेल्या दुर्गंधीहून अगदींच भिन्न प्रकारची असते अशा प्रकारचा असून त्यांत नानाविध त-हेचे जंतू असतात. नेहमींच रोगाच्या अंगवळणीं पडलेल्या आमांशाशिवाय मधून मधून त्यास पातळ जुलाबहि मध्यंतरी कधींकधीं होतात. त्यामुळें औषधोपचार व रोग्याची शुश्रुषा उत्तम प्रकारची ठेविली नाहीं तर शरीर खंगत जाऊन कृशता येते व शरीर पांढरें फटफटीत दिसूं लागतें, व रोगी मृत्यू पावतो.
उपचारः- हा रोग निवळ दुधावर रोजचें तीनचार पांच शेर ज्याप्रमाणें लागेल तितकें घेऊन राहिल्यानें बरा होतो. पण रोग उलटूं नये म्हणून एकूण एक लक्षण नाहीसें होईतों हें पथ्य संभाळावें. स्ट्रॉबेरी व पोपई हीं फळें या रोगांत देण्यास फार प्रशस्त आहेत. रोज किंवा वरच्यावर बस्ति दिल्यानेंहि रोगास आळा बसून तो बरा होतो तोंड बरें होण्यासाठीं जरुर ते उपाय करावे.
आ यु र्वे दी य- अतिसारांत योग्य औषधोपचार न केल्यानें किंवा अग्नि मंद करणारे पदार्थ अतिशय सेवन केल्यानें; संग्रहणी रोग होतो. वात, पित्त, कफ आणि संन्निपात अशा मेदानें हा रोग चार प्रकारचा आहे.
संग्रहणी रोगाची चिकित्सा अजीर्णाप्रमाणें करावी. अतिसारांत सांगितलेल्या पद्धतीनें त्याच्या आमाचें पचन करावें. अतिसारावर सांगितलेलें पाणी, ताक, सुरा वगैरे पदार्थ घ्यावे.
आमाचें पचन झाल्यावर दीपक औषधें घालून तूप पिण्यास द्यावें. यापासून कांहींसा अग्नि प्रदीप्त झाला म्हणून मळ, मूत्र, वायु यांचा अवरोध असल्यास दोन किंवा तीन दिवस स्नेहन, स्वेदन व अभ्यंग करून निरूह बस्ती द्यावा. अंगास वातनाशक औषधांनी तयार केलेलें तेल चोळावें. कफ संग्रहणींत ओकरीचीं औषधें देऊन; मग तिखट, आंबट, खारट व क्षार यांनी हळुहळु अग्नि प्रदीप्त करावा. जड व बुळबुळीत आणि आम करणारीं अन्नें वर्ज करावीं.