विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संताळ परगणे- बिहार ओरिसा, भागलपूर विभागांतील दक्षिणेकडील जिल्हा. हा जिल्हा साधारणतः डोंगराळ आहे. राजमहाल टेंकडया ह्याचा जिल्ह्यांत असून त्यांची उंची २००० फुटांहून कोठेंहि जास्त नाहीं. गंगानदी ह्या जिल्ह्याच्या थोडीशी उत्तर सरहद्दीवरून व थोडीशीं पूर्व सरहद्दीवरून वाहत जाते.
देवगड येथील लहानशी कोळशाची खाण व राणीगंजच्या कोळशाच्या खाणीचा उत्तर भाग हीं ह्या जिल्ह्यांत आहेत. नद्यांच्या निरुंद अशा खो-यांत विशेषतः तांदूळ फार पिकतो संबंध जिल्ह्यांत साल जातीचीं झाडें फार आहेत.
सन १८५५ सालीं हा निराळा जिल्हा बनविण्यांत येईपर्यंत ह्यांच्या उत्तरार्धाचा भागलपुरांत आणि दक्षिण व पश्चिम भागांचा बीरभूममध्यें समावेश होत होता. राजमहाल टेंकडयांतून लुटालूट करून राहण्या-या पहाडी लोकांनीं ईस्ट इंडिया कंपनीस बराच त्रास दिला. इ.स. १८२३ सालीं सरकारनें त्या भागाचा पूर्ण ताबा घेतला व संताळ लोकांना जंगल वगैरे कापून शेतकी करून राहण्यास उत्तेजन दिलें. सन १८५५ सालीं ह्या संताळ लोकांनीं बंड उभारलें पण थोडयाशा रक्तपातानंतर ते दबलें व सरकारनेंही चांगली चौकशी करून त्यांचीं दुःखें निवारण केलीं. पुढें त्या भागाचा (संताळ) कारभार एक डेप्युटी व ४ मदतनीस कमिशनश्नरांच्या हातीं देण्यांत आला.
इ.स. १९२१ सालीं या जिल्ह्याची लो.सं. १७९८६३९ होती. यांत मधुपूर देवगड व साहिबगंज हीं तीन शहरें आहेत. जिल्ह्याचें मुख्य ठिकाण डुमका आहे. ह्या जिल्ह्यांतील शेंकडा १३५ लोक बंगाली, शेंकडा ४६ लोक बिहारी व बाकीचे मैथिली व संताळी भाषा बोलतात. येथें ५६१ लोक हिंदू, ३४९ लोक रानटी व ८४ मुसुलमान आहेत.
ह्या जिल्ह्यांत एकंदर ६६३००० लोक (१९०१) संताल जातीचे आहेत. पैकीं ७४००० हिंदू व बाकीचे वन्य धर्मीय आहेत.
संताळ- हा मुंडावंशांतील एक लोकसमूह आहे. संताळ परगणे, बंगाल व बिहार यांतून हे लोक राहातात मध्यप्रांतांतहि यांची १०००० संख्या आहे. एकंदर लो.सं. २० लाखावर आहे. यांनां संताळ हें नांव बंगाल्यांतील मिदनापूर जिल्ह्यांतील सावंत गांवावरून पडलें असावें. मुंडारी व संताळी भाषांत बरेंच साम्य आहे. याचे वारसांच्या वांटयाचें नियम मुंडालोकांच्या नियमांसारखेच आहेत. यांच्या देव कोटींत ६ मुख्य देव आहेत. कांही देवतास्वरूपें हिंदु देवतांप्रमाणें आहेत. (मॅम - सोन्थालिया अँड सोन्थालस; कँपवेल संताळ फोकें टेल्स. बोमपास - फोक लोअर ऑफ दि संताळ परगणाज)
दुस-या जाती म्हटल्या म्हणजे भुतिया (११९०००), मुसहर (२८०००), माले सौरिया पहारिया (४७०००), व माल पहारिया (२६०००) ह्या होत. मुसुलमान मुख्यत: शेख व जोलाहा ह्या शाखेचे असून त्यांची संख्या अनुक्रमें ७७००० व ६३००० आहे. शें ८१ लोकांचा शेतकीवर, ७ लोकांचा हातमाग वगैरेसारख्यांवर, ०.६ लोकांचा व्यापारावर व ०.८ लोकांचा इतर उद्योगांवर उदरनिर्वाह चालतो.
ई.ई. रेल्वेच्या बाजूस असलेल्या टेकडयांत दगड पुष्कळ सांपडतो. सन १९०३ सालीं भालकी, दोमनपूर, घाटचोरा आणि डुमका पोटविभागांतील सार्साबाद येथें दगडी कोशाच्या खाणीं होत्या. दामोदर कोळशाच्या खाणीजवळच्या जामतारा खाणींतून उत्तम कोळसा निघतो, पण जवळपास रेल्वेच्या अभावामुळें काम चांगलें होऊं शकत नाहीं. देवगड पोट विभागांत बेहेरकी येथें तांबे, आणि सांकरा टेंकडी, तुरिपहार, बेहेरकी व पांच पहार ह्या ठिकाणीं शिसें सांपडतें. उद्योग धंदे विशेष महत्वाचे नाहींत. नाहीं म्हणावयास लाख तयार करण्याचा धंदा बराच पुढें आहे. शिवाय टसर जातीचें कापड, कमावलेलीं कातडीं वगैरे लहान सहान धंदेहि चालतात.
शिक्षणाच्या बाबतींत हा जिल्हा फारच मागासलेला आहे. फक्त शेंकडा २.५ लोक (४.७ मनुष्य आणि ०.२ बायका) साक्षर आहेत.