विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संत्रीं-मोसंबीं- मोसंब्यांची लागवड अमेरिकेमध्यें फ्लोरिडा, कॉलिफोर्निया या देशांत फार होते. त्याचप्रमाणें वेस्टइंडीज बेटें व ऑस्ट्रेलिया यांमध्येंहि लागवड बरीच आहे. फ्रान्समध्यें नीस या शहरीं फुलांसाठीं या झाडांची लागवड फार मोठया प्रमाणावर होते. तेथें रोज १५ टन फुलें गोळा होतात. एक टन फुलांपासून ४० औंस अत्तर निघतें व त्याची किंमत २० पौंड येते. पानें व कोंवळीं फळें यांपासून हलक्या प्रतीचें अत्तर निघतें त्याला फ्रान्समध्यें पेटिट ग्रेन असें म्हणतात. त्याचा उपयोग साबणाच्या कारखान्यांत करतात. आसाममध्यें खाशी टेंकडयांवर, बंगालमध्यें सिव्हटच्या बाजूला, मध्यप्रांतांत नागपूरच्या आसपास संत्रीं आणि मोसंबीं यांची लागवड बरीच आहे. मद्रास इलाख्यांत यांची लागवड हल्लीं वाढत्या प्रमाणावर आहे. पुणें जिल्हा, नगर जिल्हा, खानदेश या बाजूला लागवड विशेष आहे. विशेषतः खानदेशांत लागवड फार मोठया प्रमाणावर होऊन नागपूरची बरोबरी करण्याची ताकद तिकडच्या जमीनींत आहे. संत्रीं व मोसंबीं या वर्गांत ब-याच प्रकारचीं फळे येतात. व त्याच्यामधली सूक्ष्म भेद पुष्कळांना माहीत नसतो, म्हणून त्यांचे दिग्दर्शन थोडक्यांत पुढें केलें आहे. (१) कोंवळया फांद्यांवर बारीक लव, मोतीं सुटीं, उदा. पपनस (२) कोंवळ्या फांद्यावर लांब टोंक असतें; उदा. महाळुंग, जम्बुरी साखर लिंबू व कागदीलिंबू. (३) फळाच्या शेंडयाला टोंक मुळीच नसतें. उदा. संत्रा, मोसंबें, लाडू कवला.
प प न स.- पपनसाच्या जाती दोन आहेत. एक तांबडी अगर गुलाबी व दुसरी पांढरी. या जाती फक्त फळावरून ओळखितां येतात. तांबडी जात लोकांनां फार आवडते. तशी पांढरी आवडत नाहीं. याशिवाय 'चकोत्रा' म्हणून पपनसाची एक जात आहे. तिचें फळहि साध्या पपनसासारखेंच असतें परंतु तें एका बाजूला जाड व फुगलेलें असतें.
म हा ळुं ग- महाळुंगाच्या वर्गातहि ब-याच पोटजाती आहेत. महाळुंग हें मोठें फळ असून त्याची साल पाऊण इंच पर्यंत किंवा त्यापेक्षांहि जाड असते व ती अतिशय खडबडीत असते. आंतील गर फारच आंबट असतो. औषधासाठीं सालीचा पाक करितात महाळूंगाचें झाड बैठें असून पानें पिवळीं दिसतात. झाडाला कांटे फार असतात.
जं बु री चें फ ळ- (याला ईड असेंहि म्हणतात) महाळुंगापेक्षां हे लहान असतें. साल महाळुंगापेक्षां पातळ असून रस फार आंबट असतो. झाड उंच वाढतें, पानें हिरवीं असतात. फळांचा उपयोग क्वचित प्रसंगीं लोणच्यासाठीं करतात. परंतु मुख्य उपयोग म्हटला म्हणजे बियांपासून रोपे करून त्यांवर संत्र्याचे व मोसंब्याचे डोळे बांधतात.
सा ख र लिं बू- याचें फळ पिवळें व गुळगुळीत असतें. कोंवळेंपणी किंवा पिकल्यावर केव्हांहि फळ काढलें तरी त्याची चव नेहमीं पाण्यांत साखर घातल्याप्रमाणें गुळचट लागते. फळाची क्रांति अगदीं लिंबासारखी असते म्हणून यास साखरलिंबू हें नांव अगदीं अन्वर्थक आहे. झाडाला लांब कांटे असतात व पानें पिंवळट असतात. त्यांनांहि गुळचट वास येतो. साखरलिंबू व मोसंबीं हीं दोन निरनिराळीं फळें आहेत. साखरलिंबाची लागवड फारच तुरळक करतात.
का ग दी लिं बू- 'लिंबे' पहा.
सं त्री.- संत्र्याच्या वर्गांत मुख्य पांच जाती आहेत.
मोसंबीं:- यांची साल आंतल्या गिराला चिकटलेली असते. फळावर उभ्या रेघा असतात व वरच्या बाजूला पै एवढें सपाट चकतीसारखें वर्तुळ असतें. याच्या फळाला आंबटपणा फार कमी असतो. झाडाचीं पानें मोठीं व काळसर असतात. झाड पसरट असतें. झाडाला कांटे नसतात. मोंसब्याच्या आणखीं तीन पोटजाती आहेत. त्या नेव्हल आरेंज, चमेका आरेंज व माल्टा आरेंज. यांची लागवड इकडे फारच तुरळक द्दष्टीस पडते. माल्टा आरेंजचा रस थोडा तांबूस असतो.
संत्राः- फळाची साल अगदीं सुटी असते. सालीचा रंग तांबूस पिंवळा असतो. झाड उभें वाढतें, फांद्या आडव्या पसरत जात नाहींत. पानें मोसंब्यापेक्षां लहान व हिरवी दिसतात. रस आंबट गोड असतो.
लाडूः- हें फळ डेंखाकडे बारीक व शेंडयाकडे चपटें असल्यानें तें मोदकासारखें दिसतें. साल सुटी असते. पण रंग विशेष भपकेदार नसतो. फांद्या आंखूड, दाट व अगदीं अंगाबरोबर असल्यामुळें झाड गोल दिसतें. फळांमध्यें फारशा बिया नसतात. फळ गोडीला संत्र्यापेक्षां कमी असतें. याच्या फळामध्येंच एक लहानसें फळ केव्हां केव्हां द्दष्टीस पडतें. त्याला ७१८ पाकळ्या असतात.
कवला:- हें फळ संत्र्यापेक्षां रंगाला कमी पण लाडू पेक्षां मोहक असतें. साल सुटी असते. बिंया पुष्कळ असतात. व रस कमी असतो. फळाला वरच्या बाजूला एक वर्तुळाकार खोल रेघ असते. झाडाच्या फांद्या लांब व विरळ असतात. पानें हिरवीं, पिंवळीं व चुरमळल्यासारखी दिसतात यामुळें झाडाला पाणी कमी होऊन तें वाळत आहे असा दुरून भास होतो. ही जात अगदींच गचाळ असल्यामुळें हिची लागवड करूं नये.
रेशमी नारिंग- याचें झाडहि बहुतेक कवल्यासारखेंच दिसतें. फळें फार येतात. फळ अतिशय लहान. बिया पुष्कळ व रस अगदींच कमी असल्यामुळें या झाडांचा कांहींच उपयोग नाहीं.
ज मी न- संत्र्या-मोसंब्याच्या झाडांनां एखादी विशेष प्रकारची जमीन लागते असें नाहीं. मुख्य गोष्ट लक्षांत ठेवावयाची ती ही कीं, जमीनीला निचरा उत्तम प्रकारचा पाहिजे. तसेंच ज्या जमीनीखालीं खडक आहे किंवा फार कठीण मुरूम आहे ती जमीन संत्र्याला निरुपयोगी होय. कित्येक जमिनी मूळच्या चांगल्या असून त्यांतील झाडांनां वरचेवर अतिशय पाणी दिल्यानें व त्यामुळें खालून क्षार वर आल्यानेंहि झाडें बिघडली आहेत. एकंदरींत संत्र्याची जमीन मध्यम काळी व सुमारें २॥ ते ३ फूट खोल असून खालीं पिठया मुरूम असावा. नदीच्या किंवा ओढयाच्या कांठची मळईची जमीन असेल तर ती उत्तम होय. संत्रा व मोसंबी यांनां जरी उत्तम निच-याच्या जमिनी पाहिजेत तरी त्यांतहि थोडा भेद भाव करतां येतो. संत्र्याचें झाड निच-यासंबंधानें जितकें खोडकर आहे तितकें मोसंब्याचें नाहीं. एकाच प्रकारच्या जमीनींत जरी दोन्ही प्रकारची झाडे लाविलीं व त्यांची मेहनत मशागत जरी सारखी ठेविली तरी जमिनीला निचरा उत्तम नसेल तर संत्र्याचें झाड लवकर बिघडतें व मोंसंब्याचे झाड संत्र्याच्या मागें दोन तीन वर्षें तग धरून नंतर बिघडतें. दोहोंचा खुंट जरी सारखाच व एकाच जातीचा असला तरी मोसंब्याचें झाड व संत्र्याचें झाड यांचें रुचिवैचित्र्य कांहीं निराळेंच आहे. संत्रा लावावयाच्या जमीनींत बिन पाण्यावर अगर थोडया पाण्यावर होणारीं पिकें घेतलेलीं असावीं. जमीनींत विशेषतः ताग वगैरे गाडलेला असल्यास फार उत्तम.
पावसाळ्यांत झाडें लावल्यावर त्यांमध्यें कोणतें तरी पोट पीक घ्यावें. हें पीक तीन चार महिन्यांत होणारें, ठेंगणें व फार पाणी न लागणारें असावें. अशीं पिकें म्हटलीं म्हणजे निरनिराळ्या प्रकारचा भाजीपाला, कांदे, लसूण, मिरच्या, वांगीं, भुईमूग वगैरे होत. हीं पिकें काढल्यानंतर सर्व जमीन चांगली नांगरून तींतील सर्व तण वगैरे काढावें . झाडांनां दरवर्षी पावसाळ्याच्या आंरभीं एक किंवा दोन टोपल्या चांगलें कुजलेलें शेणखत द्यावें. झाडें वरच्यावर तपासून डोळयाच्याखालीं फूट आली असल्यास ती लगेच छाटून टाकावी. झाडें लहान आहेत. तोंपर्यंत त्यांच्या खालच्या दाट झालेल्या फांद्या छाटून मधला भाग थोडा उघडा करावा म्हणजे झाड चांगलें वाढून त्यास फळहि उत्तम येतें. अशा प्रकारची छाटणी करण्याची वहिवाट खानदेशांत आहें; परंतु पुण्याच्या बाजूला फारशी नाहीं.
झांडाची मशागत उत्तम प्रकारें झाली असल्यास झाडांनां फळ चवथ्या वर्षी येतें; परंतु चवथ्या वर्षी मुद्दाम ताण देऊन फळ घेऊं नये. पांचव्या वर्षी फळ घेण्यास हरकत नाहीं. संत्रें व मोसंब्यांच्या झाडांनां तीन वेळां फूल येतें. पैकीं मृग नक्षत्राच्या सुमारास फूल येतें त्या बहारास मृगबहार असें म्हणतात. आंब्यांनां मोहोर येण्याच्या सुमारास फूल येतें त्या बहारीला आंबेबहार असें म्हणतात. याशिवाय हस्त नक्षत्राच्या सुमारास झाडांनां फूल येतें त्याला हस्तबहार अगर हत्तीबहार असें म्हणतात.
महाळुंग, साखरलिंबूं, जंबुरी यांची स्वतंत्र लागवड कोणी करीत नाहीं. यांचीं एक दोन झाडें बागेंत असतात. त्यांची इतर झाडांबरोबरच खणणी खुरपणी करावी किंवा झाडें जरी तशींच ठेवून दिलीं तरी त्यांपासून घरखर्चापुरती फळें सहज मिळतात.
संत्र्याचीं झाडें पंचवीस वर्षेपर्यंत टिकतात; मोसंब्याचीं झाडें पस्तीस वर्षेपर्यंत चांगलें उत्पन्न देतात. पपनसाचीं तीस ते चाळीस वर्षेपर्यंत टिकतात. बियापासून केलेलीं झाडें क्वचित ठिकाणीं शंभर वर्षांचीं देखील द्दष्टीस पडतात.
संत्र्याच्या वर्गांतील सर्व झाडांवर एक प्रकारची कीड पडते व विशेषतः तीं झाडें लहान असतांना कोंवळ्या ढि-यांवर पडते. ती वरच्यावर निवडून काढून मारून टाकावी. तसेंच थंडीच्या दिवसांत कोंवळ्या फांद्यांवर माव पडतो त्यानें फार नुकसान होतें या किडीवर तंबाखूचें मिश्रण मारावें.
पावसाळ्यांत आंबेबहाराचीं फळें मोठीं झालीं म्हणजे त्यांवर रात्री एक प्रकारचें फुलपाखरूं बसून ते त्यांतील सर्व रस शोषून घेतें आणि सकाळीं फळ खालीं गळून पडतें. यामुळें फार नुकसान होतें. हीं फुलपांखरें पकडण्याला सोपा उपाय अद्याप सांपडला नाहीं. तरी रात्रीच्या वेळीं कंदील घेऊन फळांवर फुलपांखरें बसलेली दिसतील तीं हातजाळयानें पकडून मारुन टाकावीं.
बागेमध्यें वाळवी अगर उधई होऊन झाडांचें नुकसान होतें. याला उपाय म्हणजे बागेंतील व जवळपास असलेलीं वारुळें सर्व खणून काढून त्यांतील राणी मुंगी मारून टाकणें हा होय.
वरील सर्व रोग कीटकजन्य आहेत. यांशिवाय वनस्पतिजन्य (शिलीन्ध्रवर्गांतील) असे कांहीं रोग आहेत. त्यांचीं नांवें तांबेरा व खैरा हे रोग विशेषतः फळांनां होतात. तांबे-याच्या योगानें मोसंब्याच्या फळांला सालीवर तांबूस रंग येतो. त्यामुळें भाव फार कमी येतो. खैरा रोग झाला म्हणजे सालीवर बारीक असे फोड दिसतात. त्यांच्या आसपासची साल अगदीं विशोभित चट्टे पडल्यासारखी अगर डागल्यासारखी दिसते व सर्व फळ अगदीं विशोभित दिसतें. बाग पहिल्यापासून चांगली स्वच्छ ठेविली म्हणजे हा रोग फारसा होत नाहीं, यास उपाय, वोडों मिश्रण झाडावर फळ धरल्याबरोबर मारावें, म्हणजे हा रोग होण्याचा संभव फार कमी असतो.