विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
सदाशिव माणकेश्वर– दुस-या बाजीरावाचा एक दिवाण. हा देशस्य ब्राह्मण असून टेंभूर्णी गांवच्या देशपांडयाच्या कुळांत जन्मला होता. गोविंदराव पिंगळयाच्या पदरीं चाकरीस राहण्यापूर्वी हा कथा करून आपलें पोट भरीत असे. टिप्पूशीं इंग्रजांचें जें शेवटचें युद्ध झालें तें चालू असतां शिंदे व बाजीराव यांनीं निजामाला आपल्यामध्यें सामील होऊन इंग्रजांशीं लढण्यास तयार करण्याकरितां सदाशिवभाऊस त्याच्याकडे वकील म्हणून पाठविलें होतें. पंरतु इतक्यांत श्रीरंपट्टण इंग्रजांच्या हातीं पडून टिप्पू मारला गेल्यामुळें तें राजकारण फिसकटलें (१७९९). बाजीरावानें इंग्रजांशीं १८०२ सालच्या अखेरीस जो तह केला तो याला बिलकुल पसंत नव्हता; बाजीरावासहि तो तह त्याच्या इच्छेविरुद्धच करावा लागला असल्यामुळें व ज्या विषयासंबंधांत आपला व इंग्रज वकिलचा मतभेद होण्याचा संभव आहे, अशा विषयावर इंग्रज वकिलाशीं स्वतः संभाषण करण्याचें त्यास टाळावयाचें असल्यामुळें, वसईच्या तहानंतर इंग्रजांच्या रेसिडेंटशीं पेशव्याचा होणारा सर्व व्यवहार सदाशिवभाऊमार्फत होऊं लागला.
कर्नल क्लोज रेसिडेंट असतांना तो हिंदी लोकांच्या भेटी नेहमीं खुस्त्रजी नामक आपल्या एका हाताखालच्या पारशी नोकरामार्फत घेत असल्यामुळें सदाशिवभाऊनें त्याच्याशीं संगनमत करून परस्परांचा तळीराम गार करुन घेण्याचें ठरविलें. ('खुश्रुशेट मोदी' पहा). पुढें या दोघांचें वांकडें आलें व भाऊनें मोदीचा कांटा नाहींसा करण्याचे प्रयत्न चालविले. त्याप्रमाणें लवकरच मोदी वारला. त्रिंबकजीचें बस्तान बसल्यानंतर भाऊचें बाजीरावाजवळचें वजन अगदीं कमी झालें. पुढें त्रिंबकजी डेंगळ्यासु बाजीरावानें इंग्रजांच्या स्वाधीन केल्यावर (२५ सप्टेंबर १८१५) बाजीरावानें सदाशिवभाऊ माणकेश्वरास पुन्हां आपल्या सल्लागारमंडळांत घेतलें (१८१६) पुढें हा लवकरच वारला.