विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संद्वीप– बंगाल, नौखाली जिल्ह्याच्या किना-यापासून जरा दूर असलेलें एक बेट. क्षेत्रफळ २५८ चौरस मैल. यांत असलेल्या ५९ खेड्यांची एकंदर लोकसंख्या १९०१ सालीं ११५१२७ होती. या बेटाचा पूर्वेतिहास जरा मनोरंजक आहे. सिसॅरी डी फेडरिसी यानें सन १५६५ सालीं लिहिले की ''या बेटांत जहाजें बांधण्याची फारच मुबलक सामुग्री आहे व येथून २०० जहाजें मीठ रवाना होतें'' सन १६०९ सालीं हें पोतुगीजांनीं हस्तगत केलें. १६१५ सालीं आराकानच्या राजानें संद्वीप पोर्तुगीज लोकांपासून जिंकून घेतलें. येथील पोर्तुगीज व आराकानी चांचे लोकांपासून बंगाल प्रांतास बराच उपसर्ग पोंचत असल्याकारणानें सन १६६५ मध्यें नबाब शाइस्तेखानानें तें हस्तगत केलें. दिलाल राजा हा तेथील चांच्यांना शेवटला राजा होय. सन १८२२ पर्यंत याचा चित्तगांज जिल्ह्यांत समावेश होत होता. सध्यां नौखलींत होतो. याल चक्रवातांचा फारच त्रास पोंहचतो. सन १८७६ सालच्या चक्रवाताच्या तडाख्यांत सांपडून ४० हजार लोक मृत्युमुखीं पडले.