विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संधिपाद- या संघांतील प्राण्यांची संख्या बरीच मोठी आहे. साधारणतः जीवसृष्टींतील इतर सर्व प्राण्यांच्या संख्येबरोबर ती होऊं शकेल. वलयांकित शरीरप्राण्यांच्या शरीररचनेंत आणि या प्राण्यांच्या शरीररचनेंत थोडें साम्य दिसतें. तें हें कीं, यांचें शरीर पण उभयांगसद्दश आहे व तें एकामागें एक अशः झालेल्या वलयांकित शरीरभागांचे बनलेलें आहे व त्या सर्वांना किंवा कांहींनां शाखारूपी अवयव बनलेले असतात. तसेंच यांच्या ज्ञानेंद्रियांची रचनाहि त्यांच्या ज्ञानेंद्रियांप्रमाणें बनलेली आहे. या संघातील पेरीप्याटस प्राण्यांत या संघाच्या अनंतपद व षट्पद वर्गांतील प्राण्यांच्यासारख्याच श्वसनक्रियेंतींल वातनलिका बनलेल्या आहेत, परंतु त्यांचीं मलोत्सर्जक इंद्रियें वलयांकितशरीरप्राण्यांच्या वृक्कनलिकेसारखीं बनलेलीं असतात. या संघातील वर्गांच्या एकमेकांशी आप्तसंबंध कसा आहे हें बरोबर कळून येत नाहीं. कारण या संघांतील कवच धर प्राणी बहुतेक सर्व जलचर असून त्यांची श्वसनक्रिया जलश्वासेंद्रियांच्या द्वारांनीच चालते, तर आदिमवातनलिकाधर, अनंतपद, षट्पद व अष्टपद हे सर्व प्राणी स्थलचर अगर अंतरिक्षस्य अथवा वायुगामी असून यांच्यांत श्वसनक्रिया वातनलिकांच्याद्वारें किंवा त्या नलिकांचें रूपांतर होऊन बनलेले अवयव यांच्याद्वारें होते. या संघांतील प्राण्यांचीं सामान्य लक्षणेः- यांतील प्राण्यांचें शरीर उभयांगसदृश असून तें वलयांकित अशा पुष्कळ भागांचें बनलेलें आहे व हीं वलयें शरीरांत निरनिराळ्या त-हेनें एकवटलीं जातात. या वलयांपैकीं पुष्कळांनां अथवा सर्वांनां योग्य उपयोग होईल अशा प्रकारचें रूपांतर होऊन संधियुक्त शाखांचे अथवा गात्रांचे युगल जोडलेले असतात. कातडीवरील पुट म्हणजे त्वक पापुद्रा हा ''चिटीन'' द्रव्यमिश्रित बनलेला असतो. यांच्यांत बाह्यत्वचा किंवा अंतर्कला केशयुक्त कधींच निर्माण झालेली नसते. मेंदूप्रमाणें असणारे शीर्षज्ञानकंद शीर्षपृष्ठावर असून त्यांच्यापासून दोन्हीं बाजूंवर ज्ञानरज्जूंचे फांटे निघून ते अन्ननलिकेच्या उदरतलीं मिळतात व कबंधाच्या उदरतलाच्या मध्यभागीं असलेल्या ज्ञानकंदाच्या सांखळीशीं संयोग पावतात. पचनेंद्रिंयनलिकेवर हृदयाची स्थापना झालेली असते. ख-या शरीरगुहेचा प्रौढपणीं पुष्कळ लोप होतो व कंबंधात दिसणारी शरीरपोकळी ही निरनिराळ्या त-हेनें उगम पावलेली असून तिचा उपयोग रुधिराभिसरणांत होतो. या प्राण्यांत लिंगभेद झालेला असून पुंजननेंद्रियें व स्त्रीजननेंद्रियें व त्यांचीं स्त्रोतसें हीं जोडीनें बनलेलीं असतात. परिपूर्तितावस्थेंत शरीराची वाढ होत असतांना या संघांतील पुष्कळ प्राण्यांत रूपांतरें झालेली आढळून येतात. या संघांतील पुष्कळ प्राणी स्वभावतःच चपल असतात. यांच्यात शीर्ष, वृक्ष व उदर असे तीन भाग कमीजास्त प्रमाणांत स्पष्ट दिसून येतात व त्यांवरील गात्ररूपी अवयव ठिकठिकाणीं संघीनें जोडलेले असल्यामुळें या संघात संधिपाद असे म्हणतात. या संघांतील प्राण्यांचे स्नायू आडव्या पटट्यांनीं रेखाटलेल्या स्नायुपेशींचे बनलेले असतात.
या संधीपाद संघाचें वर्गीकरण चार वर्गांत केलें जातें ते वर्ग असेः- (१) कवचघर; या वर्गांत शेवडा, खेकडा, झिंग्या वगैरे प्राणी येतात. (२) आदिवात नलिकाधर; या वर्गांत ''पेरीप्याटस'' नांवाचा एकच जातीचा प्राणी येतो. (३) अनंतपद; यांत गोम, घोण, पैसा इत्यादी प्राणी येतात. (४) षट्पद अथवा कीटक; यांत झुरळ, पतंग, माशी वगैरे प्राणी येतात. (५) अष्टपद; यांत कोळी, विंचू वगैरे येतात. या सर्व वर्गांची माहिती निराळी दिली आहे.