विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संधिवातरोग (-हुर्मेटिझम)- शरीरांतील निरनिराळ्या सांध्यांमध्यें दाह, सूज, ठणका या प्रकारचीं लक्षणें व त्यांतच मोठा ज्वर येऊन बहुधा ह्दयाचे पडदे आणि हृदयावरणहि सुजणें अशा लक्षणांनीं युक्त असलेला असा हा रोग आहे. हा रोग मुलांनां झाला असतां सांधे सुजणें, व सर्व शरीरांत गडबड उडविणारीं ज्वरासारखीं लक्षणें फारशीं नसतात; परंतु हृदय व हृदयावरण यांनां होणारीं सूज व दाह मात्र अधिक प्रमाणांत त्यांनां होते. हा रोग मुख्यतः बालवयांतील व पूर्व तारुण्यावस्थेंतीलच आहे; म्हणून १० ते २५ वर्षे वयाच्या माणसांस हा रोग फार करून होतो आणि चाळिशी उलटल्यावर तो बहुधां होत नाहीं. या रोगाचें कारण त्याचे विशिष्ट प्रकारचे युग्मजंतू होत असें अलीकडील शोधांवरून निःसंशय सिद्ध झालें आहे. रोग्याचें रक्त, हृदयांतील विकृत पडदे, हृदयावरण, गलग्रंथीं यांतून हे जंतू पहातां येतात.
सामान्यवर्णन.- ज्वराचा जोर एकाएकीं वाढणें हा एक प्रकार आहे. तो इतका कीं १०६० ते ११०० अंशापर्यंतहि चढतो. अशा वेळीं बर्फस्नान, बर्फाची पिशवी ठेवणें असे जालीम शीतोपचार लक्षपूर्वक केले नाहीं तर मृत्यु येतो. हृदयावरणदाह व हृदयातंर्गतदाह यांच्यामुळें हृदयाचे रोग उद्भवतात. या दोषांचें मूळ रोगाशीं साहचर्य इतकें निकट असतें कीं वैद्य तर हे रोग संधिवातचें एक लक्षणच असून ते त्यांतच सामील करावे असे म्हणतात. पण हे प्रायः बालपणीं संधिवात रोग झाल्यास होतात असें वर प्रथम सांगितलेंच आहे.
मु लां नां हो णा -या रो गा चें व र्ण न- मुलांमध्यें मोठ्या माणसाइतके सांधे सुजून फुगत नाहींत. ते जरा दुखल्या, आंखडल्यासारखे वाटतात, व यामुळें छातींतील तदनुषंगिक हृदयावरणदाह अगर हृदयांतर्गत दाहाकडे लक्ष जात नाहीं. पंरतु अशा हयगयीमुळें पुष्कळ माणसांमध्यें हृदयरोगाचा बळकट व पूर्ण पाया बालपणींच घातला गेलेला असतो. म्हणून वैद्यांनींहि मुलांनां सौम्य प्रकारचा संधिवात झाल्यासारखा वाटला तरी त्यांची छाती वरच्यावर तपासून त्यास नीट विश्रांति व योग्य उपाय उपलब्ध होतील अशी व्यवस्था करावी. बालकंपवात हा रोगहि संधिवात झाल्यानंतर होतो. लहानपणीं संधिवात झाल्याच्या खुणा म्हणजे स्नायुरज्जूखालीं व त्वचेखालीं जाड व लहान टेंगळे आढळतात. हीं दुखत नाहींत व तीं एकअष्टमांश इंचा व्यासाचे वर्तुळाच्या आकाराएवढीं साधारणतः असतात. हीं सदा असतातच असें नाहीं. पण तीं ज्या मुलांनां असतात त्यांच्या प्रकृतींत संधिवात चांगलाच मुरल्याचें तें लक्षण असून हृदय बिघडलें असावें किंवा बिघडेल अशी भीति बाळगण्यास बळकट आधार सांपडतो.
रोगचिकित्सा- रोग्यास आंथरुणांत निजवून ठेवून त्याच्याखालीं एक मऊ घोंगडी व पांघरण्यास तशीच लोंकरीची मऊ धाबळी, घोंगडी घालावी सदरा किंवा बंडी जी घालणें तीहि गरम कापडाची असावी. दुखणारे सांधे अगदीं हालवूं नयेत; व त्यांच्याभोंवतीं मऊ कापूस पिंजलेला मिळतो तो पट्टयाच्या आधारानें नीट बांधून ठेवावा. सॅलीसीन किंवा सोडा सालिसिलेट हें औषध यावर १८७६ सालीं शोधून काढलें आहे व तें सांध्यांतील वेदना नाहींशा करून या रोगाची मुदत पुष्कळच कमी करतें. पहिल्या चोवीस तासांत वरच्यावर मोठया प्रमाणांत हें औषध द्यावें. नंतर प्रमाण जरा कमी करून व औषध देण्याच्या वेळांतील अंतर अंमल वाढवून हें औषध द्यावे. असा क्रम सर्व लक्षणें नाहींशीं होईतोपर्यंत पोटॅशिअम सायट्रेट किंवा बायकार्बनेट हींहि औषधें द्यावींत. तीं देतांना भ्रम होऊन बडबडणें, बहिरटपणा, कानांत आवाज होणें अशीं औषधातिशयत्वाचीं चिन्हें होऊं लागल्यास औषधाची मात्रा कमी करावी. व हें औषध देतांना तशीं चिन्हें न होण्याविषयीं लक्ष ठेवून दक्षता बाळगावी. या औषधाचा उपयोग लहान मुलांमध्यें तितका फायदेशीर होत नाहीं. कारण, जरी सांध्यांतील सूज व वेदना कमी झाल्या तरी मोठया माणसांतील हृदयविकृतींचा प्रतिबंध जसा या औषधानें होतो तसा तो मुलांमध्यें होत नाहीं. आणि मुलांमध्यें तर हृदयविकृती प्रायः होतात. अॅस्पिरिन हें एक नवीन औषध वरील औषधांच्याऐवजीं देण्यालायख आहे. व जेव्हां वरील औषधांपासून त्रास वाटेल तेव्हां हें औषध देत जावें. सौम्य प्रकारचा संधिवात असून जो ब-याच दिवस टिकतो, व ज्यांत लक्षणें सौम्य असलीं तरी बरे होण्यास ज्याला अधिक प्रयास पडतात, त्या रोगभेदाला दीर्घकालीन संधिवात म्हणावें मुलांमध्यें पुनःपुन्हां उलटणारा असला रोग हृदयविकृति वगैरेंसह पहाण्यांत येतो त्यास हे नावं युक्त आहे.
जुनाट संधिवात रोग- प्रथम वरील प्रकारचा तीव्र स्वरूपात संधिवात एखाद्यास होऊन तो पूर्ण बरा न झाल्यामुळें सांध्याभोंवती सुजेचीं चिन्हें ज्यांत असतातच त्या भेदास वास्तविक हें नांव आहे. यामध्यें सांधे आंखडून वांकडे होतात. पण हा वाकडेपणा व आंखडणें या केवळ बाह्य लक्षणावरून सांध्याच्या ठायीं प्रगट होणा-या इतर रोगांसहि हें नाव चुकून देण्यांत येतें. असे रोग कांही दाहात्मक व कांहीं रक्तमूत्रविकृतिजन्य असतात व त्यांचा या रोगांशीं वास्तविक संबंध नसतो. किंवा हें नांव ज्या वातप्रकृतींच्या माणसांनां सर्द हवा, गारठा, ओल यांच्या योगानें वार्धक्यांत सांध्यामध्यें काठिण्य येतें. त्या रोगावस्थेस देणें युक्त आहे. हा प्रकार प्रायः एक किंवा दोन मोठया सांध्यांपुरताच टिकून रहातो व तीव्र भेदाप्रमाणें शरीरांतील बहुतेक सर्व सांध्यांत प्रवेश करीत नाहीं. हेच सांधे सुजल्यानें कायमचे आंखडून बसतात व त्यांत वेदना व कुटकुट किंवा कुरकुर आवाज सांधा हलल्यानें होतो. या भेदामध्यें हृदयविकृती उत्पन्न होत नाहींत. व ज्वरादि लक्षणें होऊन प्रकृतीवर सार्वत्रिक परिणाम घडत नाहींत.
स्नायुगतवात रोग- स्नायुसमुहांत व त्यांच्या स्नायुरज्जूंमध्यें वेदनायुक्त दाह उत्पन्न होणें हें ज्यांत लक्षण आहे त्या भेदास हें नांव आहे. पुष्कळ व्यायाम घडल्यानंतर घाम येऊन नंतर ओल, वारा किंवा गारठा बांधल्यानें या प्रकारच्या रोगास आरंभ होतो. असें होऊं नये म्हणून घाम आल्यावर कपडे बदलावे. याप्रमाणें ते स्नायुसमूह वायूनें पिडले असतां जरा हलविले, हालचाल झाली कीं, त्या स्नायूंत अशी वेदनायुक्त तीव्र कळ निघते कीं ती हालचाल थांबवून धरून तें अंग ताठल्याप्रमाणें ठेवावें लागतें. मधून मधून या वायूचा जोर कमी होतो व तेव्हां रोगी स्वस्थ पडून किंवा बसून राहिला तर आपोआप कळ येत नाहीं; पण वातपिडित स्नायु जरा हलविण्याचा अवकाश कीं झाली पुनः वेदनांस सुरवात. हा भेद पूर्ण सर्वांच्या परिचयाचा असून (खालील स्नायुसमुदायाच्या ठायीं पहाण्यास सांपडतोः-
(१) उसण; या भेदांत पाठांचे खालचे स्नायू ओणवें होतांना व ओणवें होऊन पुनः ताठ उभे रहातांना मनस्वी दुखतात. (२) पार्श्वशूल; (बरगडींत लचक भरून वेदना होणें) यांत श्वास घेतांना अगर छाती, हात हलविल्यानें असह्य वेदना होतात. (३) मन्यास्तंभ (अथवा मान अवघडणें, धरणें) ; मानेच्या स्नायूंत लचक भरल्यामुळें त्या विविक्षित बाजूकडे मान फिरवतांना दुखतें.
उपचारः- तीव्र रोगांत जितका सोडियम सालिसीलेट या औषधाचा उपयोग होतो तितका यावरील भेदांत होत नाही; पण कधीं कधीं होतो. सालीसोन, अस्पीरीन, कोयनेल, पोटॅशियम आयोडाइड हीं औषधें अधिक गुणावह आहेत; पण त्याशिवाय अन्य उपचारहि केले पाहिजेत ते असेः - पोटीस करून किंवा उसण भरली असतां विटकरीच्या रोडा तापवून (त्यावर फडके गुंडाळून) सोसेल त्या मानानें चांगलें शेकावें किंवा रिकाम्या मोठया चपटया बाटलींत किंवा त्या कामसाठींच केलेल्या विकत मिळणा-या रबरी पिशवींत कढत पाणी भरून शेकल्यानें बरें वाटतें. कांहीं ठिकाणीं प्रतिप्रकोपनिक्रिया त्वचेंत सुरूं करण्यासाठीं तीवर मोहरीचा लेप, किंवा आयोडीनचा अर्क लावावा; किंवा वेदना कमी न झाल्यास पलिस्तर मारून फोड उत्पन्न करून कळ कमी करावी. कांहीं चेंगट रोगांमध्यें, कढत पाण्याची धार वर धरून, किंवा वाफारा देऊन, अगर विजेची पेटी लावण्याचीहि जरूर पडते; कांहीं माणसांची प्रकृति असे वाताचें कायम ठाणें असलेलीच होते. अशा रोग्यांनीं उन्हाळ्याचे गरम झरे असतात तेथें राहून हवा पालट करावा. व तेथे उन्हाळ्याच्या झ-यांत स्नान करावें; व तें पाणी पिण्यासारखें औषधी आहे असा वैद्यकीय सल्ला मिळेल तर तेथील पाणीहि प्यावें.