विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
संपथर– मध्य हिंदुस्थानांतील बुंदेलखंड पोलिटिकल एजन्सींतील हें एक संस्थान आहे. क्षेत्रफळ ९७८ चौरसमैल. संपथर हें नांव समशेरगड ह्या त्याच्या राजधानीच्या नांवाचा अपभ्रंश असावा. जमीन साधारण सुपीक असून पावसाची वार्षिक सरासरी ३० इंच आहे. दतियाचा महाराजा रामचंद्र हा इसवीसन १७३३ त मरण पावल्यावर इंद्रजित हा त्याच्या गादीवर बसला. त्यानें त्याचा मुख्य साहाय्यकारी नौबे ह्याच्या मुलास (मदनसिंगास) राजधर हा किताब देऊन संपथर किल्ल्याची सुभेदारी दिली. त्यांनतर त्याचा (मदनसिंगाचा) मुलगा व नातू, देवीसिंग व रणजितसिंग हे अनुक्रमें त्या जागेवर नेमलें गेलें. पुढें मराठयाच्या चढत्या काळांत रणजितसिंग स्वतंत्र झाला ब्रिटिशांची सत्ता स्थापित झाल्यावर त्यानं इ.स. १८१७ सालीं त्यांचा आश्रय पत्करिला व तो पुढें १८२७ त मरण पावला. त्याच्या मागून हिंदुपत, व छतरसिंग हे गादीवर आले. छत्तरसिंग हा फार चांगला राज्यकर्ता झाला. सध्यां त्याचा मुलगा बीरसिंग हा गादीवर आहे त्याला सर हिज् हायनेस व राजा हे किताब व ११ तोफांची सलामी आहे.
ह्या संस्थानची लोकसंख्या (१९०१) ३२४७२ होती. येथील मुख्य जात म्हणजे चांभार, ब्राह्मण, कच्छी, गुजर व गदरिया ह्या होत. ह्या संस्थानांत शहर कायतें एकच व तें संपथर- राजधानी (लो.८२८६) होय. येथील शेंकडा ३३ लोक शेतकीवर व शेकडा १७ इतर धंद्यावर आपली उपजीविका करितात.
एकंदर क्षेत्रफळापैंकी फक्त ८५ चौरसमैल जमीन कायतो शेतकीच्या उपयोगांत आहे. बाकीचा बहुतेक भाग पडीत व जंगली आहे. मुख्य पिकें, ज्वार गहूं, चणे व कापूस हीं होत.
राज्याच्या सोईकरितां संस्थानाचे चार परगणे केले आहेत तेः– समशेरगड, समरगड, महाराज गंज आणि लोहारगड हे होत. त्या प्रत्येकांवर एक तहसिलदार असतो. साधारण व्यवस्थेंत वाजिराचाच मुख्य हात असतो. सध्यांचें उत्पन्न सुमारें दोन लक्ष रुपये आहे.